–माणिक नेरकर–
आयुष्यात आई बापाचं छत्र हरवणं ही माझ्या दृष्टीने सगळ्यात अविस्मरणीय घटना. आईचं “जाणं” हा माझ्यासाठी अजूनही ,ताजा आणि न विसरता येणारा प्रसंग आहे; पण मी त्याविषयी लिहायचे टाळणार आहे. कारण ज्या गोष्टींनी मनाला वेदना होत असतील त्या गोष्टींची आठवण करून दुःखी होण्यापेक्षा ज्या गोष्टी मनाला आनंद देतात , त्यांच्या विश्वात रमावं , मनातल्या त्या ओल्या जखमेसाठी कोपऱ्यात एक हक्काची जागा ठेवून.. शेवटी “वर्तमानातच” जगायचे आहे. असो. टाळेबंदीच्या काळात मी अनुभवलेल्या एका आनंददायक प्रसंगाविषयी सांगावेसे वाटते.
” गा ळीत पाणी खोल मनात
मंद पिवळा उजेड भरे
सुखभराने इवलेपणी
जीव मासोळी होऊन फिरे
झरे पाझर कुठून कसे
रितेपणाला येतात भरू
दयावंत हे दान घेताना
नको कसला अर्थ विचारू”
किती सुंदर ओळी ह्या शांताबाईंच्या. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, काही भावना व्यक्त करायच्या नसतात, काही स्पर्श जाणिवेनेच अनुभव करायचे असतात, तसच काही दान हे असं असतं की घेणाऱ्याने त्याचा कुठलाही अर्थ लावायचा नसतो, फक्त तो अनुभव साठवायचा असतो, मनाच्या एका कोपऱ्यात.
कोणतीही गोष्ट ना तुम्हाला आनंदी करते ना दुःखी. ते तुम्ही असता, जे आनंदी वा दुःखी होता. आनंद कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही, तो शोधावाच
लागतो, अगदी छोट्या छोट्या गोष्टीत– आनंदी होणं ही प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आणि आकांक्षा आहे.
“अब मै राशन की कतारोमे नजर आता हुं, अपने खेतोंसे बिछडनेकीं सजा पाता हुं–” जगजितसिंग च्या ह्या ओळी
खूप काही सांगून जातात, नाही?
आनंदाचे क्षण वेचावेच लागतात, असे म्हणतात ते अगदी खरंय. त्यातही असा आनंद जर अनपेक्षितपणे वाट्याला आला, नकळत बसणारा गोड धक्का वाटावा असा , तर मग काय, सोन्याहूनही पिवळे. मला अशाच हव्या हव्याशा आनंदाचा अनुभव त्या दिवशी अनपेक्षितपणे घेता आला. आणि तो मिळवून दिला माझ्या माहेरच्या मंडळींनी. “माहेर” म्हटलं की कुठल्याही स्त्री चा ‘विक पॉईंट’ मग ती कुठल्याही वयोगटातली, कुठल्याही आर्थिक, सामाजिक परिस्थितीतील असो. बहिणाबाईंनी म्हटलेलंच आहे,
“लागे पायाले चटके,
रस्ता तापीसनी लाल
माझ्या माहेरची वाट
माले वाटे मलमल”
माहेरच्या माणसांची ओढ, त्यांनी केलेलं आपलं कौतुक, ह्याचं कायमच जिवाला अप्रूप वाटत असतं. माझ्या लेकीला बाळंतपणासाठी ह्या “कोरोना आणि लॉक डाउन ” मुळे आम्ही माहेरी आणू शकलो नाही आणि आम्ही देखील इच्छा असून तिच्या पाशी जाऊ शकलो नाही, ही खंत मधून मधून माझ्या बहिणींशी बोलतानाही येत होतीच. हीच खंत नेमकी ओळखून माझ्या मोठ्या ताईच्या लहान कन्येने एक सुंदर प्लान केला. तिने आमच्या लाडक्या लेकीचे “ऑनलाईन डोहाळजेवण ” करावे ही संकल्पना तिच्या समवयस्क बहिणींजवळ मांडली. त्यात तिच्या दोन बहिणी, मधल्या ताईच्या 3 मुली, एक मुलगा, दोन्ही मामा, त्यांचा परिवार, माझी मोठी मुलगी—ह्या सर्वांशी चर्चा करून एक नेटका प्रोग्राम आखला . आमचे जावई आणि लेकीची सासू ह्यांना मात्र पूर्वकल्पना दिली. आम्हाला आणि लेकीला एक दिवस आधी सांगितले, तेही वेळेवर तयार असावं म्हणून. अन्यथा ‘सरप्राईज ‘ च देणार होती मंडळी. आठ दिवस आधीपासूनच म्हणे त्यांची चर्चा सुरू होती, झूम app डाउनलोड करून घ्या, सगळ्यांना ऑपरेट करता येते ना, नसल्यास ट्रेनिंग देण्यात येईल, संध्याकाळी 7 पर्यंत सगळ्यांनी किचन ची कामे आटोपून रेडी रहावे, कारण जेवण काही ऑनलाईन मिळणार नाहीये—वगैरे वगैरे— आणि ठरल्या दिवशी, ठरल्या वेळेवर सगळे अगदी हजर होते. बाल गोपाल मिळून जवळपास 38 जण तरी एकाच वेळी ऑनलाईन होते. त्यात भाचीने परिवारानुसार ग्रुप्स बनवले आणि एकेका ग्रुप ने turn by turn लेकीशी, जावयाशी बोलायचे असे ठरले. कुठेही काहीही गोंधळ नाही. दोन जणींनी गाणे म्हटले. एका भाचीने कविता केली जी दुसऱ्या भाचीच्या लेकीने इतकी सुरेख सादर केली— कवितेची कल्पना अशी होती की येणारे बाळ सगळ्यांशी बोलते आहे. त्याच्या आई,बाबांबद्दल, आजी आजोबांबद्दल सांगतेय, ते देखील आपल्या गोतावळ्यात यायला किती उत्सुक आहे वगैरे—- मोठ्या ताईकडे जी काही मिठाई होती, ती वाटयांमध्ये ठेवून मिठाई ओळखण्याचा प्रकार देखील ऑनलाईन साजरा केला गेला. लेकीचे झोपाळ्यावर “सजलेले रुपडे ” डोळेभरून बघता आले. एकंदरीत “शॉर्ट फॉर्म” मध्ये ऑनलाईन डोहाळे जेवणाचा आनंद घेता आला, जो कायम स्मरणात राहून गेला.
ह्या सगळ्या प्रकारावरून एक गोष्ट लक्षात आली की आताची पिढी ही स्मार्ट आणि शार्प तर आहेच; पण त्याचबरोबर अधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य त्या ठिकाणी,योग्य तसा वापर करण्याचे कौशल्यही तिच्याजवळ आहे, जे कौतुकास्पद आहे. लॉक डाउन च्या ह्या कठीण काळात लोकांनी आपापल्या परीने स्वतःला, कुटुंबाला गुंतवून ठेवण्याचा, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला, प्रतिकूल वातावरणातही हवी तशी वातावरण निर्मिती कशी करता येते आणि दूर राहूनही एखादा सोहळा सोबतीने कसा छान साजरा करता येतो हे त्यादिवशी आमच्या भाचे कंपनीने दाखवून दिले. आम्ही तर ह्या एकाच गोष्टीसाठी त्यांचे आयुष्यभर ऋणी रहायला तयार आहोत. माझी लेकही त्या दिवशी मनाने ‘फ्रेश’ झाली. आम्हाला तिचा डोहाळजेवणचा कार्यक्रम दणक्यात करायचा होता; पण असो. माणसाच्या सगळ्याच इच्छा कुठे पूर्ण होत असतात? पण ह्या ” ऑनलाईन” कार्यक्रमाने आमच्या पदरात आनंदाचे पुरेपूर दान घातले, एवढे निश्चितपणे म्हणू शकेन.
हे असे आनंदाचे दान प्रत्येकाच्या पदरात पडो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.म्हटलेच आहे , आनंद ही एकच गोष्ट अशी आहे ,जी विभागल्याने दुप्पट होते. म्हणूनच तुमच्यासोबत वाटून घेतेय हा आनंद.
हा आनंदाचा प्रसंग आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला हे मात्र नक्की.
