–पंकज पंडित–
एप्रिल फुल बनाया ! व्हि .जे. टी. आय. (VJTI ) अभियांत्रिकी विद्यालयातील, आमच्या सहअध्यायीं, व्रात्य मित्रांच्या कंपूने, एक एप्रिलच्या सुमुहूर्तावर, विनोदी प्रसंग घडवून आणला होता,
अभियांत्रिकी विद्यालयाचा चार वर्षाचा अभ्यासक्रम इतका कंटाळवाणा असतो की जणू एखाद्या वैराण वाळवंटातील अडथळ्याची शर्यत. “थ्री इडियट्स” या तुफान यशस्वी हिंदी चित्रपटावरून , अभियांत्रिकी शिक्षणक्रमातील अडचणीची थोडी कल्पना येऊ शकेल . दर साडेतीन महिन्यांनी , सेमिस्टर परीक्षा जवळ यायची या दुष्कर, अवघड प्रवासात हास्यविनोदाचे झरे शोधणे हा कायम प्रयत्न असायचा. अभ्यासाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमात माझा सक्रिय सहभाग असायचा. असे विरंगुळ्याचे क्षण वेचायचे ; मराठी साहित्य मंडळात साहित्यिकांची भाषणे ऐकणे, विद्यालयाच्या मासिकात लिहिणे , मराठी नाटकात छोट्या भूमिका करणे, आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेणे , सह्याद्रीच्या डोंगर दर्यात भटकणे, या सारखे
टवाळा आवडे विनोद !: आमचा कंपू टवाळखोर म्हणून प्रसिद्ध होता यापूर्वी एक एप्रिलला फसविण्याचा छोटे प्रयोग केले होते आता शेवटच्या वर्षी, एक मोठा “गेम”, लक्षात राहील असा काही “प्रताप” करूया असा मी विचार करीत होतो
इंजिनीरिंगच्या शेवटच्या म्हणजे चौथ्या वर्षी, सर्वच मुलांची धडपड, चांगल्या कंपनीत नोकरीला लागायची. बहुतेक सर्व कंपन्या निवडीसाठी लेखी परीक्षा घेत असत या स्पर्धेत पुढे येण्याची अहमहमिका सर्व विद्यार्थ्यांमध्ये असायची; हे वर्म हेरून आम्ही एक कारस्थान रचले.
नुकतीच भांडुप येथील एक मोठी बहुराष्ट्रीय कंपनी , व्हि .जे. टी. आय. मध्ये उमेदवार निवडीसाठी येऊन, त्यांनी लेखी परीक्षा घेतली होती लवकरच या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्याना कंपनीमध्ये प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावणार होते. आम्ही ३१ मार्चला, दुपारी शेजारच्या इराणी हॉटेलमधून, व्हि .जे. टी. आय. प्लेसमेंट कार्यालयाला फोन केला. आमच्यातील नंदकुमार नामक, एका दक्षिण भारतीयाने “क्षीण” आवाज काढून , इंग्रजीत सांगितले
, “हॅलो मी वेणुगोपाल , XXX या कंपनीतून बोलतोय. लेखी स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांची यादी देत आहे त्या सर्वांना एक एप्रिलला, भांडूप येथील फॅक्टरीत सकाळी १० वाजता मुलाखतीसाठी बोलावले आहे”
ही यादी आमच्या प्लेसमेंट अधिकाऱ्याने लिहून घेतली आणि तत्परतेने टंकलिखित करून नोटीसबोर्डवर लावली !
आमच्या वर्गातील मुलींना या यादीत मानाचे स्थान देऊन, ते आम्ही काय ते, “स्त्रीदाक्षिण्य” दाखविले होते ! तसेच आमच्यापैकी काही जणांची नावे पण, या यादीत टाकली होती; लोकांची फजिती “याचि देही याचि डोळा” बघण्याची , संधी आम्ही वाया कशी घालवणार ? याशिवाय या काळजीपूर्वक केलेल्या निवड यादीत, अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले, ज्यांना अजून कोणत्याच कंपनीने निवडले नव्हते, बघा अल्प काळापुरते का होईना, खोटी आशा दाखविणे, हे किती सोपे असते..,!
एक एप्रिल उजाडला – स्पेशल २ ६ * फौज (*”स्पेशल-२६” हा हिंदी सिनेमा आठवतो का?):सकाळी बरोबर १० वाजता सव्वीस मुले, मुलींची फौज, नीट नेटके कपडे घालून, कंपनीच्या फॅक्टरीमध्ये, भांडुपला पोहोचली.. श्रीयुत वेणुगोपालला आश्चर्याचा धक्काच बसला! “लेखी परीक्षेच्या उत्तरात्रिका अजून तपासल्याच नाही आहेत माझ्या टेबलच्या खणात ,त्या अजूनही तशाच आहेत, मग हे “आमंत्रण” कोणी दिले ?“त्याने आमच्या प्लेसमेंट ऑफिसरला फोन लावला, तेव्हा आमचा सर्व कंपू तेथे हजार होता, अगदी संभावितपणे आमच्या गावचेच नाही, असे दाखवीत होतो! सर्वांची फजिती बघून, हसून हसून आमची पुरेवाट झाली! अखेर आज एक एप्रिल ही तारीख असल्याचे कोणीतरी निदर्शनाला आणून दिले. कंपनीने आम्हा-सर्वांना चहा-बिस्किटे देऊन, आमचे यथोचित आदरातिथ्य केले आणि आम्हाला निरोप दिला आमच्या प्लेसमेंट ऑफिसर ,श्री देशपांडे यांना कळले की आपल्याला कोणीतरी “बनविले” आहे आमचे श्री देशपांडे हे सदगृहथ असल्याने त्यांनी मोठ्या मनाने, ही गोष्ट हसण्यावर नेली आणि विषय संपला!
गुन्ह्याला वाचा कशी फुटली ?: आता हे कोणी केले याची उकल होणे हे कठीण होते आम्ही आमची नावे त्या फसव्या यादीत टाकून जणू एलीबी (alibi) घेतली होती; गुन्ह्यामध्ये सामील असणारे , खुद्द गुन्हामुळे दुखावल्याचा पुरावा ! पण गुन्हेगाराला त्याच्या फसवण्याचा कलेचा रास्त अभिमान असतो, आमच्या दुसऱ्या मित्रांनी “आम्हीच हे एप्रिल फुल घडवून आणले” अशी आवई सुरु केली आणि मग मात्र याचे गुपित आम्हीच उघड केले!
गेले ते फुलपाखरी दिवस ! राहिल्या त्या आठवणी ! आज इतक्या वर्षांनी, या गुन्ह्याचा जाहीर कबुलीजबाब मी देतो आहे आमचे सहृदय प्लेसमेंट अधिकारी , श्री देशपांडे तसेच वेणुगोपालच्या नावाने फोन करणारा आमचा दाक्षिणात्य मित्र, नंदकुमार, हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत.”एप्रिलफुल” झालेले, आमचे व्ही जे टी आई चे सहअध्यायीं, जगातील सर्व भागात विखुरले आहेत ही घटना मोजक्या लोकांच्या अंधुकशा आठवणीत राहिली आहे. या वास्तव नाट्याचा(“रिऍलिटी शो”) मी सूत्रधार असल्याने, त्यातील बारीक सारीक तपशीलसुद्धा, मला अजूनही चांगले आठवतात आणि खुद्कन हसू येते!
आता पुढील एप्रिल फुल ! पुढच्या वर्षी शुक्रवारी ३१ मार्चला२०२३ ला दुपारी , व्हाट्सअँप संदेश काही “भाग्यवान” स्पर्धकांना येईल !!!
वरील यादीत अस्मादिकांचं नाव कसे? अहो, मी स्पर्धेचे भाकीत करीत नाही आहे! केवळ फजिती बघायला म्हणून, या फसव्या समारंभाला, मी जातीने उपस्थित राहणार आहे!
झाला मी घडवलेला विनोदी प्रसंग या विषयावर माझा पुढचा लेख तयार!!
