सनविवि कथा,साहित्योन्मेष अन त्याचे आयुष्यच बदलले …..

अन त्याचे आयुष्यच बदलले …..

 

    –रसिका राजीव हिंगे

उदयाचली केशरियाची उधळण झाली, सलज्ज उषाराणी नटून भास्कराच्या स्वागताला उभी राहिली, पहाट पक्षी किलबिलत घरट्याबाहेर डोकावत निसर्गाचा आस्वाद घेण्यास आतुर झालेले होते, गंगेच्या पात्रात सोनसळी किरणांनी येऊन रविराज आल्याची वर्दी दिली अन चैतन्याला जाग आली. अशा प्रसन्न पहाटेच्या वेळी गंगेचे अभूतपूर्व सौंदर्य निरखत राहणे, तिच्या प्रवाहात हरवून तिच्याशी संवाद साधायला आशुतोषला फार आवडायचे. मनातलं सगळं तिच्याशी बोलले की त्याला एकदम शांत वाटायचे. दिवसभर ऑफिसमधे काम करायला उत्साह देणाऱ्या गंगेची ओळख झाली तीच एका चैतन्यमय व्यक्तिमत्वामुळे. जर त्यावेळी मला ती माऊली भेटली नसती तर मी आज कुठे असतो, कल्पनाही करवत नाही. गंगेच्या पाण्यातील गोल गोल उठणाऱ्या तरंगा सारखेच भूतकाळातील त्याच्या भवसागरातल्या तरंगावर तो तरंगत अगदी खोल खोल मुळाशी पोहचला.

     आशुतोष एक हुशार आणि समंजस विद्यार्थी म्हणून शाळेत ओळखला जायचा. लहानपणीच आईवडील गेल्यामुळे आजीच्या कुशीत लहानाचा मोठा झाला. आशुतोष दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला त्याचवेळी आजीस देवाज्ञा झाली. एकदा देवाज्ञा झाली की सामान्य माणूस कोणत्याच न्यायालयात दाद मागू शकत नाही हे निर्विवाद सत्य आहे. आजी गेल्यामुळे आशुतोष एकटा झाला. मामा मामी होते पण दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे त्यांनाही आशुतोषला वेळ देणे शक्य नव्हते. कॉलेजचे फुलपाखरी दिवस. म्हणणारे, बोलणारे कुणीच नाही त्यामुळे स्वतःच स्वतःचे निर्णय घेत जगत होता. काय चुकीचे, योग्य की अयोग्य कळत नव्हते. मित्रमैत्रिणीच्या सहवासात आशुतोष हळूहळू या आभासी जगात रमत गेला.

      वर्ष वाया न जाता पदवीधर तर झाला. मार्क्स ही बरे मिळाले, पण आशुतोष व्यसनांच्या आहारी गेला होता. हे जे चालले आहे ते काही योग्य नाही हे कळत होते. यातून बाहेर पडावेच लागेल हे त्याला कळत होते, पण पहिलाच पेला उचलताना संयम ठेवला तरच यातून सुटका आहे अन्यथा हा शेवटचाच असे म्हणत कधीच तो शेवटचा प्याला ठरत नाही. शिवाय ठायी ठायी तळीराम असतील तर नाहीच नाही. आशुतोषचे हे बेधुंद वागणे मामाला त्रासदायक होत होते. पदवीधर होईपर्यंत शिक्षणाचा खर्च मामा करत होताच, पण कुठेतरी हे थांबेल अन हा काही नोकरी करेल असे मामाला वाटत होते.

      मामाने आशुतोष ला बरेच वेळा समजवण्याचा प्रयत्न केला. “आशु, तुला पुढे शिकायचे असेल तर मी खर्च लावायला तयार आहे. तू मोठा व्हावंसं एवढंच मला तुला सांगायचे आहे.  दिवसेंदिवस तुझे वागणे मला असह्य होतं आहे. बाळा, असे किती दिवस चालेल! नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही. स्वतःच्या पायावर उभे रहावेच लागेल. आपल्यासारख्या सामान्य लोकांना अशी व्यसनं परवडत नाहीत. का जीवाला धोक्यात घालतो आहेस! हुशार आहेस तू , जगण्याचा उत्तम मार्ग निवड आणि आयुष्याचे सोने करून घे.”  

     आशुतोषला सगळे कळत होते पण वळत नव्हते. नैराश्य त्याच्या मनात ठाण मांडून बसलं होतं. कुठेच मार्ग दिसत नव्हता. अवहेलना, अपमान ठायी ठायी होतच होता. घरातले, बाहेरचे टोचून जिव्हारी लागेल असे बोलत होते. व्यसनापासून मुक्तता मिळत नव्हती. त्यासाठी लागणारा पैसा पुरत नव्हता. मामा मामी नी पैसे देणे बंद केले होते. 

     सद्सद्विवेक बुद्धी हरवलेला आशुतोष पहाटेच सकाळी पाच वाजता घराबाहेर पडला. अन गंगेच्या दिशेने पळत सुटला. बेभान झाला होता, काहीच सुचत नव्हते. आता गंगाकाठच मला आधार देईल,  तिच्या कुशीत घेईल हा विश्वास त्याला वाटायला लागला.कमरेपर्यंत पाण्यात उतरला होता आणि आता जान्हवीच्या पाण्यात स्वतःला झोकून देणार एवढ्यात त्याला एका नाजूक पण आत्मविश्वास, आत्मबळ असलेल्या हातांनी मागे खेचले. आशुतोष बेशुद्ध झाला होता. त्याला काठावर इतर जणांच्या सहाय्याने आणले. त्याला सावध करण्याचा प्रयत्न चालू होता. थोड्या वेळातच तो शुद्धीवर आला. पण काही बोलू शकत नव्हता. डोळ्यातुन अखंड पाणी वाहत होते. त्याला तसेच तिने बसू दिले.  हळूहळू तो शांत झाला. आजूबाजूची गर्दी पांगली तशी ती सरळ काठावरच्या देवळाकडे चालू लागली. तिच्या मागे आशुतोष खेचल्यासारखा चालत गेला. 

      सगळे दरवाजे जेव्हा बंद होतात तेव्हा ईश्वर कवाड उघडतोच. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार आणि संचिताप्रमाणे त्याचे भाग्यात असलेले त्याला देण्यासाठी तो द्वार उघडतो. फक्त कोणत्या रुपात येईल हे सांगता येत नाही. आशुतोष साठी जान्हवी अशीच ईश्वर रूप घेऊन आली जणू असे वाटले त्याला. जान्हवी सेवानिवृत्त झालेली एक शिक्षिका. सकाळी फिरायला म्हणून रोज गंगेवर जाते. पहाटेचे प्रसन्न गंगेचे रूप पाहण्याची,अनुभवण्याची तिची सवय. पहाटेच्या चैतन्यमय वातावरणाशी, गंगेच्या संथ प्रवाहाशी संवाद करणे जान्हवीला फार आवडत होतं. आजही रोजच्याप्रमाणे जान्हवीचे सकाळी गंगेच्या प्रवाहसोबत हितगुज चालू होते. अन आशुतोष आला पुढ्यात प्रवाह पतित होत होता. 

      आशुतोषकडे एकटक पहात होती जान्हवी. त्याचे मन वाचण्याचा प्रयत्न करीत होती. त्याच्यातल्या हरवलेला विश्वास शोधत होती. आशुतोष काहीही न बोलता  बसला होता. यांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होण्यापूर्वी आपण इथून निघून जावे असे त्याला वाटले. तो निघाला.

      “थांब” जान्हवीच्या आवाजातील जरब पाहून आशुतोष एकही पाऊल पुढे टाकू शकला नाही. त्याच्यासमोर उभी राहून जान्हवी त्याला निरखत म्हणाली,” काय झालं आहे? का एवढा जीवावर उदार झालास?  

      “मला जगायचं नाही, काही अर्थच नाही आहे आता जगण्यात. सगळीकडे आयुष्यात मी हरलो आहे” 

      “हरला आहेस म्हणजे. आयुष्य ही तुला स्पर्धा वाटते! तू मागितलं म्हणून नाही मिळालं हे आयुष्य. मग ते तुझ्या मना प्रमाणे कसं संपवू शकशील?” 

      आशुतोष काहीच बोलला नाही. का विचारते आहे ही बाई मला असे प्रश्न? काय अधिकार ह्यांना. कोण आहेत ह्या? मला ओळखत असतील का? मी तर ओळखत नाही ह्यांना. 

      “बोल काहीतरी बाळा.” आजी गेल्यापासून कोणीच त्याला बाळा हाक मारली नव्हती. 

      “काय करायचं मग? असंच रडत भेकत जगायचे, लोकांची टोमणी ऐकत.” 

     जान्हवीला कळाले की आत चांगलीच ठेच लागली आहे. हळूहळू आंजारून गोंजारून जान्हवीने त्याला बोलतं केलं. हाडाची शिक्षिका होती जान्हवी. बरेच विद्यार्थी तिच्या हाताखालून गेले होते.  आशुतोष पण जर मोकळा झाला, तिच्याशी बोलता बोलता. 

     ” तू हुशार आहेस, चांगलं काहीतरी करू शकतोस. तुझी इच्छा असेल तर मी मदत करीन तुला. मान्य आहे का?”   आशुतोषला ही जान्हवीशी बोलायला  आवडत असे. तिच्याशी रोज संवाद होऊ लागला. गंगेशी संवाद साधायला जान्हवी ने शिकविले आशुतोषला. त्याच्यातला आत्मविश्वास जागवीत जान्हवीने आशुतोषला  यूपीएससीच्या मार्फत सीएसई परीक्षा द्यायला लावली, आशुतोष मुळातच हुशार विद्यार्थी होता. जान्हवीच्या सांगण्याप्रमाणे आशुतोष एकेक यशाची पायरी चढत गेला. आशुतोष चे यश पाहून मामाला पण खूप आनंद होत होता. आशूच्या आयुष्यातील काळे कभिन्न दिवस सरलेत याचे श्रेय जान्हवीचे होते याची जाणीव मामाला होतीच. योग्य मार्गावर हात धरून चालणारा भेटला की यशोशिखर गाठणे सहज शक्य होतं हे आशुतोष ने सिद्ध करून दाखवले. आशु IAS ची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचा त्याच्यावरच विश्वास बसत नव्हता आपण एवढा मोठा पल्ला गाठला. 

     त्याचा ठिकठिकाणी सत्कार होऊ लागला. प्रत्येक सत्काराच्या वेळी आशुतोष  जान्हवीची माऊली म्हणून ओळख सांगत होता. सगळे श्रेय जान्हवीला देऊन तिचाच सत्कार करत होता.

     आताही गंगेशी हितगुज करतांना तो मनोमन गंगेचा आणि जणू तिचेच रूप असलेल्या जान्हवीचा, त्याच्या माऊलीचा मानस सत्कार करत होता…

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *