— शिल्पा धर्माधिकारी —
“जीवन कॆ सफर मॆ
गुजर जातॆ हे जो मकाम
वो फिर नही आतॆ”
“आपकी कसम” ह्या चित्रपटातील राजेश खन्ना वर चित्रीत केलेले हे गाणं. आपल्या पत्नीवर चुकीचा संशय घेऊन, अविश्वास दाखवून तो तिच्याशी नातं तोडतो. पण बरेच वर्षानंतर त्याला त्याची चूक उमगते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. हे कळल्यावर दुःखी होऊन तो हे गाण म्हणतो.
खरंतर मी हे गाणं कैक वेळा ऐकलं आहे. ह्या गाण्याचे अगदी शब्द अन् शब्द पाठ आहेत.
त्या गाण्यातल्या ह्या धून नंतर ही ओळ येईल, हे शब्द येतील इतक हे गाणं डोक्यात बसलंय. Rather त्याची इतकी पारायणं झाली आहेत असं म्हणायला हरकत नाही.
कधी कधी असे वाटते की ही सगळी गाणी लहानपणापासून ऐकत आलो आहोत हे जरी खरं असलं तरी तिचा खरा अर्थ कळायला इतकी वर्ष लागली.
आयुष्य प्रत्येक टप्प्यावर वेगळं काहीतरी शिकवतो किंवा वेगळे धडे देतो नाही का. ह्या गाण्यात सांगितल्याप्रमाणे गोष्टी, प्रसंग, माणसे आणि विश्वास एकदा गेला, गमावला की परत मिळत नाही हे अगदी खरंआहे.
सांगू का, मी हे गाण सगळ्यात जास्त relate करते ते विश्वास आणि माणसाशी.
प्रसंग, आठवणी स्वरूपात किंवा आठवून आनंद देऊ शकेल पण … पण एखाद्या व्यक्तीवरचा गमावलेला विश्वास तो कसा परत मिळवता येईल. एकदा अविश्वास निर्माण करणारा प्रसंग घडून गेला तर संशयाची किल्मिष कायमच मनात घर करून राहतात. अस म्हणु शकतो की अविश्वास निर्माण करणारे संशयाचे भूत कायमस्वरूपी मानगुटीवर बसते. नंतर त्या व्यक्तीशी निगडित कितीही चांगला प्रसंग घडला तरीही हे संशयाचे भूत आपला असर मनावरून उतरूच देत नाही, ना त्या व्यक्तीशी चांगला संबंध ठेवू देत.
पण खर सांगू का ही भूतबाधा काढण्यासाठी दुसर्या कुणाचीही मदत कामी येत नाही. स्वतःला जाणूनबुजून, प्रयत्नशील राहून ह्या बाधेतून स्वतःची सुटका करून घ्यावी लागते. मनाला सद् सद् विवेकबुद्धीला सतत ह्या संशयी विचारांना मनाच्या आत येण्यापासून रोकावं लागतं. मात्र एकच की ते साध्य करण्यासाठी सदसद्विवेकबुद्धीला मनाने सहकार्य करावे लागते. आणि अगदी महत्वाचे म्हणजे मनाने ह्या संशयाला घालवायचे हे ठामपणे ठरवावे लागते. मग सगळे सोपे आणि सुकर होऊन जाते. विश्वासाला गेलेला तडा जोडणे इतके सोपे नाही हे खरे आहे पण अशक्यही नाही.
अविश्वासामुळे निर्माण होणार्या गैरसमजातून माणसे दुरावतात. माणसे तोडणे फार सोपे पण जोडणे आणि जोडून ठेवणे फार अवघड. तेव्हा अविश्वास निर्माण करणार्या संशयापासून दूर राहणे हेच जास्त शहाणपणाचे
लेखिका: शिल्पा धर्माधिकारी
