सनविवि ललित,साहित्योन्मेष द ग्रेट इंडियन किचन, रिअली!

द ग्रेट इंडियन किचन, रिअली!

वैशाली प्रसन्न सुळे

मार्च आलाय. आठ तारीख आठवली ना लगेच? हो! जागतिक महिला दिन! तो कोण कसा विसरणार? सगळीकडे भाषणं, चर्चा, सत्कार, समारंभ, सोहळा यांचा महापूर येईल .याच महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मनात थोडं विचारांचं मंथन झालं. तेच या लेखाच्या रुपाने तुमच्या पुढे मांडतेय. आज मला भारतीय मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन( हो ,वयही महत्त्वाचं! कसं? ते पुढे सांगतेच ).गटातील महिलांशी अगदी घट्ट निगडित एका महत्त्वाच्या गोष्टी विषयी बोलायचं आहे. स्वयंपाक हीच ती गोष्ट! काय चमकलात ना? स्त्री आणि स्वयंपाक नव्हे, नव्हे स्त्री म्हणजेच स्वयंपाक. त्यात काय चर्चा करण्यासारखं, वाचण्यासारखं किंवा लिहिण्यासारखं ?असं वाटलं ना! या असं वाटण्यावरच मला थोडं बोलायचंय. आपल्याकडे घरात मुलगा आणि मुलगी अशी अपत्ये असताना त्या घरात ती मुलं मोठी झाल्यावर अगदी सहजपणे मुलीला स्वयंपाक घरातील प्रशिक्षण दिलं जातं आणि मुलाला बहुतेक तरी कुठल्याच घरकामाचं खास प्रशिक्षण किंवा सवय वा सक्ति केल्या जात नाही. भाजी चिरणे, पाटपाणी (आता डायनिंग टेबल पाणी) घेणेअशा छोट्या-मोठ्या कामापासून सुरुवात करत चहा ,पीठ मळणे ते चारीठाव स्वयंपाक मग काही खास पदार्थ अशा पायर्‍या ओलांडून  उत्तम सुगरणीपर्यंतचा  प्रवास तिला करायला लावल्या जातो. तिच्या घरातल्या, आजूबाजूच्या  नात्यातल्या सगळ्या स्त्रिया हेच करतांना बघत लहानाचे मोठे झालेल्या तिला त्यात काही विशेष वाटत नाही .’बाईच्या जातीला सगळं आलंच पाहिजे ‘,’सासरी जायचंय तुला’ अशी परवलीची  वाक्यं तिच्या कानावर कायम घातली जातात. मग ही अशा प्रकारे प्रशिक्षित मुलगी एकदा का गृहिणी झाली की सुगरण ,गृहकृत्यदक्ष, हाताला चव आहे पासून ते थेट आमच्या ह्यांना पिंट्याला, पिंट्याच्या आजोबांना अमुक-तमुक पदार्थ माझ्याच हातचा लागतो या पुरस्कारापर्यंत मजल मारते .आता तुम्ही म्हणाल एखादी स्त्री स्वयंपाक करते यात गैर ते काय? स्त्री स्वयंपाक करते यात काहीच गैर नाही . स्त्रीच स्वयंपाक करते आणि तिला तो करायचा असो वा नसो प्रश्नपत्रिकेतल्या कंपल्सरी प्रश्ना सारखा तिला तो करावाच लागतो. तिला तो करण्याचं वा न करण्याचं स्वातंत्र्य नसतं. हा माझा मुद्दा आहे. नाही ,नाही लेख वाचून लगेच उद्यापासून घरातील बायका मुलींनी सोफ्या वर लोळत पडावं आणि पुरुषांनी स्वयंपाकघराचा ताबा घ्यावा असं मला अजिबातच म्हणायचं नाहीये. तर आज घराबाहेर पडल्यानंतर अमुक काम स्त्रियांचं आणि अमुक काम पुरुषांचं असं काही उरलेलं नाहीये तर मग घराच्या आत, स्वयंपाकघरात स्त्रीच का बरं? स्त्री आणि स्वयंपाक हे समीकरण सगळ्यांच्याच मनात इतकं पक्कं बसलंय की खाद्य पदार्थांच्या जाहिराती, मालिका कुठलंही सामाजिक माध्यम ,पुस्तक यात स्वयंपाक घरात कायम स्त्री दाखवली जाते. वरून या जबाबदारीसाठी तिला अन्नपूर्णा, गृहलक्ष्मी इत्यादी इत्यादी गोंडस नाव दिल्या जातात.  हे एक प्रकारचे इमोशनल ब्लॅकमेल झाले. पण आज हे सगळं बाजूला ठेवून जरा वेगळा विचार करूया. समानतेच्या गोष्टी ऐकायला, बोलायला छान वाटतात. मग आचरणात आणल्या तर किती छान वाटतील? स्वयंपाक, स्वयंपाक घरातील सगळी कामे घरातील सगळ्यांनीच आपापल्या क्षमता आणि वेळेनुसार वाटून घेतली ,केली तर आपली कुटुंबसंस्था खऱ्या अर्थाने आदर्श ठरेल! काही दिवसांपूर्वी वाचनात आलं की स्वयंपाक घरातील क्रियांशी संबंधित जवळपास पन्नास च्यावर क्रियापदे आहेत. याचाच दुसरा अर्थ असा कि अशा 50 पेक्षा जास्त क्रिया स्वयंपाक घरात सातत्याने केल्या जातात नव्हे एक स्त्री त्या करते. या सगळ्या क्रिया, ही कामं करताना तिलाही कंटाळा येत असेल ,तोचतोचपणा जाणवत असेल ,वीट येत असेल नको, तो स्वयंपाक असेही वाटत असेल, बदल हवा असेल .हा विचार सगळेच( हो सगळेच) का करत नाहीत? कारण फक्त बायकांनाच व पुरुषांना याची जाणीव होऊन बदल होणार नाहीत. बरेचदा तर असे दिसते की काही घरात पुरुष स्वयंपाक घरातील कामात रस दाखवतात पण घरातील स्त्रिया त्यांना परावृत्त करतात. त्यामुळे मदत करण्याची, ती स्वीकारण्याची मानसिकता सगळ्यांनीच अंगिकारायला हवी आहे. बाई आणि स्वयंपाक घर ही चौकट मोडून आपल्या सगळ्यांचं स्वयंपाकघर हे व्हायला हवे. एखादी स्त्री जेव्हा स्वयंपाकघराची पूर्ण जबाबदारी उचलते तेव्हा तिला चहा ,नाश्ता, जेवण ,डबे ,मधल्या वेळचं खाणं ,रात्रीच जेवण हे नित्य करावं लागतं. शिवाय उपास , घरात वयोवृद्ध ,आजारी,असतील तर त्यांचं पथ्याचं निराळं, आवडीनिवडीचं निराळं .सणवार, विशेष प्रसंगांचे मेनू निराळे. म्हणजे त्या स्त्रीची सगळी शारीरिक ,मानसिक शक्ती ही केवळ हे सगळे पदार्थ करणे त्यांची पूर्वतयारी करणे त्यासाठीचे सामान आणणे या सगळ्या नियोजनातच खर्च होते. वर्षानुवर्षे ज्या स्त्रिया केवळ स्वयंपाक एके स्वयंपाक करत आल्या आहेत त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो, तुमची ही जबाबदारी दूर केली तर? मला खात्री आहे सगळ्या नाही तरी बहुतांशी स्त्रियांना हायसं वाटेल एकदम! स्वयंपाक घरात त्यांची खर्च होणारी ऊर्जा आणि आणि वेळ वाचला तर कितीतरी स्त्रिया त्यांचे छंद, आवडीचे काम करू शकतील .निदान स्वतःचे आरोग्य तरी नीट सांभाळू शकतील .जगण्याचा आनंद घेऊ शकतील. बव्हंशी यासाठी म्हटलं आहे की काही स्त्रियांचं स्वयंपाक घर हेच जग आणि स्वयंपाक हे जगणं झाल्यामुळे या जबाबदारीतून त्यांना मुक्त केलं तर एक न संपणारं रितेपण त्यांच्या जीवनात येईल आणि दुसरं काय करावं हे त्यांना सुचणार नाही. एखादा छानसा पदार्थ करून सगळ्यांची वाहवा मिळवणं आपल्या लोकांसाठी काही पदार्थ करून त्यांना खाऊ घालणं यासारखा आनंद नाही .मान्य आहे. पण बरं असो, नसो, नोकरी करत असो, इच्छा असो वा नसो स्त्रीनेच स्वयंपाक करावा हे मात्र खटकते. काही घरांमध्ये सकारात्मक बदल होत आहेत पण ते अगदी अपवादात्मकच. ही अपवादात्मक उदाहरणं सरसगट मध्ये बदलायला हवीत. आजकाल बाहेरून जेवण आणणे, जेवायला बाहेर जाणे, स्वयंपाकाला कुक ठेवणे हे पर्याय समोर येत आहेत पण त्यांचेही फायदे ,तोटे ,मर्यादा जसं की आरोग्य, खर्च या आहेतच .जोवर कुटुंबसंस्था, घर अस्तित्वात आहे तोवर स्वयंपाकघर आणि स्वयंपाक याला पर्याय नाही. म्हणून अश्या स्वयंपाकाच्या जबाबदारी कडे नवीन दृष्टिकोनातून बघणे क्रमप्राप्त आहे. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या स्वयंपाक घराच्या ओझ्या खाली दबल्या जातात ते मध्यमवयीन स्त्रिया. खरं तर त्यातल्या किती  जणिंनी नोकरी ,घर ,स्वयंपाक सांभाळून केलेली असते. आता त्यांच्या सुना शिक्षण व नोकरी करत असतात किंवा विदेशात असतात. त्यामुळे त्यांना नाईलाजाने का होईना पण स्वयंपाकघर सांभाळावे लागते. यापेक्षा घरातील सगळ्यांनी त्यांच्या वेळेनुसार भाजी कापणे, पीठ मळून ठेवणे, कुकर लावणे, कोशिंबिरी करणे अशी कामांची वाटणी केली( रोजच ,घरची स्त्री आजारी असताना किंवा बाहेरगावी गेलेली असताना नाईलाजाने नव्हे !)तर सगळ्यांना गृहिणीच्या कष्टांची, नियोजनाची जाणीव होईल .घर हसतेखेळते, आनंदी होईल .आज सुदैवाने स्वयंपाक घरातील कामं सोपी करणारी यंत्र आहेत. तयार पीठं, इन्स्टंट मिक्स अशी साधने उपलब्ध आहेत. गृहिणींनी पण त्यांचा वापर करावा . आमच्याकडे घरचचं लागतं यात भूषण मानायचं सोडून आपलं काम सुटसुटीत करावं. मागे सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल झाला होता. त्यात एक महिला ऑक्सीजन सिलेंडर लावून किचनमध्ये काम करताना दिसते आहे. फोटोची सत्य असत्यता माहीत नाही. पण एवढे टोक वास्तवात मात्र कुठेच गाठल्या जाऊ नये. भारतीय स्त्रियांच्या स्वयंपाक घरातील योगदानाची दखल एका परकीय पुरुष दिग्दर्शकाला घ्यावीशी वाटल्याने त्याने ‘द ग्रेट इंडियन किचन’ सिनेमा काढला. अखेरीस एकीकडे अंतराळात झेपावणार्या भारतीय महिला असताना सर्वसाधारण भारतीय महिलेची केवळ स्वयंपाक घर हीच ओळख ठरू नये. स्वयंपाक घराच्या खुंटीलाच कायम ती बांधलेली असू नये, गॅस जवळ खिळलेली असू नये कधी दुसरं कोणी स्वयंपाक करतं आहे आणि ती मस्त मासिक वाचते आहे, गाणं ऐकते आहे, बगिच्यात फिरते आहे ,असही व्हावं!! द ग्रेट इंडियन किचन सर्वार्थाने खरोखरच ग्रेट व्हावे एवढीच इच्छा!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *