सनविवि ललित,साहित्योन्मेष अंगणातले मांगल्य

अंगणातले मांगल्य

–कल्याणी आडत–

“धूम…. धडा ssssक” फटाक्यांच्या आवाजाने हात किंचितसा थरथरला आणि नेमकी माझ्या रांगोळीतली वेलबुट्टी धक्का लागून हलकीशी विखुरली. दिवाळीची पहाट, घरात चाललेली पहिल्या अंघोळीची गडबड आणि फटाक्यांच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड एकाग्र होऊन माझ्या पांढऱ्या रांगोळीत रंग भरणारी मी, हे समीकरण तसे काही नवीन नाही. मनातल्या मनात चुचकारत हाताने सारवून वेलबुट्टी ठीक करण्याचा मी प्रयत्न करू लागले. पण रांगोळी भलती हटखोर. पहिल्याच फटक्यात नक्षी मनाजोगी आली तर ठीक; पुन्हा त्या कलाकुसरीवर काही काम करायला गेल्यास रांगोळी तिचं मूळ सौंदर्य विसरते आणि सारवासारव केलेला प्रयत्न रांगोळीच्या दर्दी रसिकाच्या नजरेतून सुटता सुटत नाही. रसिकाच्या कशाला, आपली रांगोळी कशी आली आहे, हे बघण्याच्या हौसेपोटी पुन्हा पुन्हा दारात जाणाऱ्या माझ्याच नजरेतून ती चूक निसटली नसती.

रांगोळी, ह्या फक्त तीन अक्षरांमध्ये एक वेगळेच मांगल्य, तेज आणि पावित्र्य आहे असे मला नेहमी वाटते. कलेच्या आवडीमुळे आणि अर्थातच मुलगी असल्यामुळे रांगोळीशी संबंध फार लवकर आला. मला आठवते, मी प्राथमिक शाळेत होते तेव्हापासून रांगोळीच्या स्पर्धांमध्ये भाग घेत आले. तेव्हा इवल्याशा हातांनी फार काही रंगरंगोटी जमायची नाही. त्यामुळे आईने मला ठिपक्यांची रांगोळी शिकवली होती. युट्युबनामक मार्गदर्शकाचा तेव्हा तरी आमच्या आयुष्यात प्रवेश झाला नसल्यामुळे आई ही एकमेव गुरु. शाळेतली साधीशी जरी स्पर्धा असली तरी काय ते अप्रूप! कोल्हापुरातल्या महाद्वार रोडवर जाऊन रांगोळी आणि रांगोळीचे छोटेसे पुस्तक आम्ही घेऊन येत असू. मग आई पाटीवर सरळ एका रेषेत ठिपके कसे काढायचे, ठिपक्यांच्या आधारावर नक्षी कशी काढायची, त्यात आजूबाजूला न सांडता रंग कसे भरायचे ह्याचे छोटेखानी प्रशिक्षणच द्यायची. स्पर्धेचा दिवस उजाडला की कोण उत्साह अंगात संचारायचा. आपापली रांगोळी पटकन संपवून आम्ही मोठ्या वर्गातल्या मुलींनी काढलेल्या रांगोळ्या बघण्यासाठी जात असू. छान-छान रांगोळ्यांचे शिपाईमामा शाळेच्या एकुलत्या एक कॅमेरामध्ये फोटो घ्यायचे. आज दारासमोर रांगोळी काढली की पटकन फोटो घेऊन व्हॉट्सऍपवर स्टेटसला टाकते, पण त्या शाळेच्या कॅमेरामध्ये आपल्या रांगोळीचा फोटो यावा हे निरागस स्वप्न मात्र आजही अपूर्णच आहे.

माध्यमिक शाळेत आल्यावर रांगोळीची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी स्वतःची त्या कलेबद्दल असणारी आवड आणि त्या कलेमधली निपुणता ह्या दोन्ही गोष्टी भिन्न. आईच्या मागे लागून मग शेजारच्या गल्लीत राहणाऱ्या एका ताईकडे मी संस्कारभारती रांगोळी शिकायला जाऊ लागले. त्या ताईच्या नाजूक हातांतून रांगोळी साकार होणे निव्वळ बघत राहावे. कला माणसाला किती सुंदर बनवते, नाही? आवडत्या कलेत रमलेला माणूस दिसायला कसाही असो, त्याची एकाग्रता, चिकाटी, मग्नता आणि त्याचे कौशल्य हे त्या व्यक्तीला लाखमोलाचे सौंदर्य बहाल करतात ही गोष्ट मला तिथे कळाली. खरे तर ह्यानंतर माझ्या रांगोळ्यांना आकार येऊ लागला आणि त्या मला आवडायला लागल्या. मग गणेशोत्सवात रांगोळी स्पर्धेमध्ये हमखास बक्षीस मिळू लागले. दोन-तीन तास वेड्यावाकड्या अवस्थेत बसून पायांना लागलेली रग रांगोळी साकार झाल्यानंतर ती रंगांची मैफिल पाहून कुठल्या कुठे पळून जायची. स्पर्धेत बक्षीस मिळण्यापेक्षा स्वतःची रांगोळी कोणत्याही विघ्नाविना साकार झाली की कोण आनंद व्हायचा. आपणच काढलेल्या त्या कलाकृतीकडे मन भरून पाहत राहावे वाटायचे. कुणाची ठिपक्यांची रांगोळी, कुणाची संस्कारभारती, कुणाचा भलामोठा गालिचा, कुणाचा गणपती, तर कुणाची सामाजिक संदेश देणारी रांगोळी. प्रत्येक रांगोळी काहीतरी विचार मांडायची.

दिवाळी, गणेशोत्सव अशा सणांमध्ये तर माझ्यासाठी पर्वणीच असायची. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा रांगोळ्या काढायच्या. दिवाळीच्या पहाटे घरात चाललेली अंघोळीची लगबग, रेडिओवर लागलेली दिवाळीची गाणी, घरभर दरवळणारा उटण्याचा सुगंध, बाहेरून ऐकू येणारे फटाक्यांचे जोरदार आवाज आणि ह्या सगळ्याकडे साफ दुर्लक्ष करून रांगोळी काढण्यात रमलेली मी, हे चित्र प्रत्येक दिवाळीत आमच्या घरी दिसायचे. रांगोळी पूर्ण झाल्यावर त्यात मधोमध लावलेली पणती रांगोळीचे रंग अधिकच खुलवायची आणि त्या रंगांत पसरलेले ते प्रकाशाचे इवलेसे पण चैतन्यपूर्ण तेज माझ्या मनात कधी उतरायचे ते कळायचेदेखील नाही. दिवाळी जिवंत झाल्यासारखी भासायची. वरच्या मजल्यावरच्या एखाद्या काकू आवर्जून सांगायला यायच्या, ‘सुंदर रांगोळी काढली आहेस गं!’ जीव अगदी सुखावून जायचा. 

अंगणात मनसोक्त रंग उधळणारी रांगोळी फ्लॅटपुढच्या साचेबद्ध चौकोनात मुकाटयाने रंगू लागली. पण रांगोळीचे मांगल्य यत्किंचितही कमी झाले नाही. आता रांगोळीची पुस्तके इतिहासजमा झाली. ज्या आईने पाटीवर ठिपके काढायला शिकवले, तिला युट्यूबवर क्षणात वेगवेगळे नक्षीकाम असणाऱ्या रांगोळ्या मी दाखवू लागले. पूर्वी रांगोळ्या काढताना भरभर चालणारा हात आता लॅपटॉपच्या कीबोर्डवर जास्त काळ रेंगाळतो. सवय मोडल्यामुळे हात थरथरतो आणि रांगोळीच्या रेषा वेड्यावाकड्या होतात. पण रांगोळी काढण्याचे समाधान आणि ते वेड मात्र जसेच्या तसे आहे. 

आजही कोण्या घरासमोरून जात असताना दारात काढलेल्या रांगोळीला मनभरून पाहिल्याशिवाय माझा पाय पुढे सरकत नाही. बंगलोरला आल्यावर माझ्या ह्या छंदाला पीजीमध्ये राहत असल्यामुळे मुरड घालावी लागली. सणासुदीला भल्यामोठ्या आयटी पार्कमधल्या काचेच्या ऑफिससमोर काढलेल्या सुंदर फुलांच्या रांगोळ्या पाहिल्या की आपल्या संस्कृतीशी नाळ अधिकच घट्ट झाल्यासारखे वाटते. संक्रांतीला इथल्या घरांच्या दारांसमोर काढलेल्या रांगोळ्या बघितल्या आणि माझ्या आठवणींतले रांगोळीचे रंग अजूनही फिके झालेले नाहीत ह्याची खूण पटली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *