“संवाद”

–शिल्पा धर्माधिकारी —

स्वयंपाकघरातील काम उरकून कुसुमताई  आपल्या खोलीमध्ये येऊन बसत नाही तोच  मोबाईलची रिंग वाजली. त्यांची खूप जुनी  जिवाभावाची मैत्रीण,देवकी, जिच्याशी त्या आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी  बोलायच्या.  त्या  देवकीताईंचा फोन होता. तिचे नाव वाचून त्यांचा चेहेरा एकदम खुलला. 

त्यांनी पटकन तिचा कॉल उचलला , “देवकी, काय म्हणतेस? आज बरेच दिवसांनी फोन केलास. खूप बिझी दिसते आहेस. एक्सीबिशन्स् जोरात चालू आहेत वाटतं?” असे म्हणत जवळपास अर्धा तास  त्यांच्या फोनवर गप्पा रंगल्या होत्या. शेवटी फोन ठेवताना त्या म्हणाल्या,” बापरे किती दिवसांनी मी इतकी हसले.  तुझ्याशी बोलून खूप मजा आली. मन एकदम प्रसन्न आणि उल्हसित झालं बघ. नाहीतर घरात दिवसभर एकटं राहणं कंटाळवाणं झालं आहे. जावू दे ते. ए पण तू अशीच अधून मधून फोन करत जा. तेव्हढंच बरं वाटतं गं.” 

तसं कुसुम ताईचं कुटुंब छोटेच. त्यांच्या मिस्टरांना जाऊन आता जवळपास 6-7 वर्षे झाली होती. प्रकाश हा त्यांचा एकुलता एक मुलगा. आता मुलगा, सून, नातवंड हीच त्यांची आपली म्हणावीत अशी जवळची माणसं उरली होती. 

 नातवाची आणि त्यांची मात्र मस्त गट्टी होती.  मुलगा सून नोकरी करणारे. त्यामुळे त्याच्या जन्मापासून जास्त करून त्यांनीच नातवाला सांभाळलं. त्या नातवाला छोटा असताना  चिऊ काऊ पासून ते संतांच्यापर्यंत गोष्टी सांगायच्या.  वेगवेगळे पदार्थ करुन खाऊ घालायच्या. मधल्या काळात मिस्टर निवर्तले.  

पण नातू जसा मोठा झाला तसा घरात त्याचा मित्र परिवारही “आजी, आजी” म्हणत त्यांच्या अवतीभवती जमू लागला. मिस्टरांची उणीव ह्या पोराबाळांच्या सहवासात कमी जाणवू लागली. 

नातू मोठा झाला. आपल्या पंखाच बळ वाढविण्यासाठी उच्च शिक्षण घ्यायला परदेशी निघून गेला.

आता मात्र घर भकास वाटायला लागलं.  दिवसभर नातवंड आणि त्याच्या मित्रांचे आवाज भरून राहणाऱ्या घरात आता नको वाटणारी शांतता नांदू लागली. 

मुलगा सून कायमच आपल्या ऑफिसच्या कामात,  कॉल मध्ये बिझी. “आता काळाची गरजच आहे. काम कराल तर तराल! त्यामुळे जे चाललंय ते चांगलाच आहे.” असे म्हणत त्या नीरस आयुष्य जगत होत्या. 

पण एक बदल त्यांचात झाला होता.  नवरा – नातवंड ह्यांच्या संवादाचे आवाज त्या कुठेतरी टीव्ही किंवा मोबाईल वर शोधत होत्या.  कधीतरी सकाळी  एकट्याच मोबाईलवर विष्णु सहस्त्रनाम  ऐकत चहा प्यायच्या किंवा कधीतरी गाणी ऐकत घरकामात रमायच्या. आता त्यांची मोबाईल आणि टीव्हीशी चांगलीच दोस्ती झाली होती.

जरी माणसांची जागा ह्या गोष्टी घेऊ शकत नसल्या तरी, काही प्रमाणात आठवणींनी निर्माण होणारी सल कमी करायला मदत करत होत्या. 

पण त्यांचे  हे नवे साथीदार, मुलाला आणि सुनेला फारसे आवडले नव्हते.  सतत कॉल वर असणार्‍या सुनेला शांतता प्रिय आणि मोबाईलची  चीड होती, तर आईचं सारखं टीव्ही बघणं मुलाला म्हणजे प्रकाशला खटकायचं.

आजही, संध्याकाळी कुसुमताई आपल्या खोलीत टीव्ही बघत बसल्या होत्या. 

 हो, तशी त्यांची प्रायव्हसी  सांभाळली जावी ह्या दृष्टीने पूर्वी म्हणजे मिस्टर असल्यापासूनच त्यांच्या खोलीत एक स्वतंत्र टीव्ही सेट  होता.  मुलं आपल्या उद्योगात असतात.  उद्योगात कसली सतत ऑफिस आणि त्यांचे ऑफिसचे कुठल्याही वेळी असणारे कॉल या मध्ये बिझी. म्हणूनच, त्यांनी मुलांना डिस्टर्ब नको, म्हणून अट्टाहासाने आपल्या खोलीत एक वेगळा TV घेतला होता. 

आज  ऑफिस मधून प्रकाश थोडा लवकर  घरी परत आला आणि नेमक्या तेव्हा त्या टीव्ही बघत होत्या. टीव्हीचा आवाज ऐकून  शूज काढता काढताच थकून आलेला प्रकाश चिडून वैतागलेल्या आवाजात म्हणाला,”आई, काय सारखे टीव्ही टीव्ही.  दिवसभर टीव्ही नाहीतर मोबाईल चालूच असतो. 

मुलगा आलेला बघताच कुसुमनताईंनी टीव्ही बंद केला आणि किचनमध्ये गेल्या. त्याच्या समोर पाण्याचा ग्लास धरत म्हणाल्या, “हातपाय धुवून घे. फ्रेश होऊन ये. मी खायचं आणते आणि गरम चहा करते.”  एव्हढं बोलून कुसुम ताई किचन मध्ये निघून गेल्या.

प्रकाश फ्रेश होऊन, कपडे बदलून डायनिंग टेबल वर आला. 

लेकाच्या आवडीच्या गरम गरम  बटाटावड्याची प्लेट समोर ठेवत त्या म्हणाल्या,  “अरे हो! तुला सांगायचेच राहून गेले बघ. नमिताचा फोन आला होता. कुठलीतरी मीटिंग आहे म्हणून उशीरा येईल म्हणाली. बर, घे. शांतपणे खाऊन घे. दमला असशील. मी चहा ठेवते आपल्यासाठी.” 

थोड्यावेळाने त्याच्यासाठी आणि स्वतःसाठी चहाचा कप टेबल वर आणत त्यांनी प्रकाशाला विचारले,  “काय रे, आता तुला लागलीच कुठला कॉल नाही ना?”

पोटात थोडे अन्न गेल्यामुळे जरा तरतरी आलेला प्रकाश म्हणाला, “नाही. सुदैवाने काहीच नाही. पण  का गं?”

त्याचा आवाजातला बदलाव बघून त्या थोड्याश्या उत्साही आवाजात म्हणाल्या, ” अरे, देवकी मावशीचा  दुपारी फोन आला होता.  अरे ती जे स्वतः  डेकोरेटीव् पीसेस् बनवते ना त्याचा विक्रीचा स्टॉल पुढच्या आठवड्यात ग्रीन पार्क अपार्टमेंट मध्ये  ठेवायचा तिचा विचार आहे म्हणाली. पण कुणी ओळखीचे असेल तर स्टॉल चार्जेस कमी होतील, असेही म्हणत होती. मग मला एकदम आठवले. अरे, तुझा मित्र मंगेश नाही का तिथे रहात. त्याला विचारशील का? देवकी एव्हढ्यात येईलच तुला नीट सविस्तर सांगायला.” असे त्या म्हणत होत्याच, तेव्हढ्यात दारावरची बेल वाजली. 

कुसुमताईंने दार उघडले. दारात देवकीताईंना बघून त्या छानशा हसल्या आणि म्हणाल्या, ” शंभर वर्षे आयुष्य आहे बघ देवकी तुला. आत्ताच मी  तुझ्याविषयी प्रकाशला सांगत होते. ये बस.”

“ये मावशी, बस. काय म्हणतेस?”, असं म्हणत प्रकाशने देवकीताईंशी बोलायला सुरुवात केली.

“आईने सांगितले मला तुझ्या ग्रीन पार्क मधल्या स्टॉलच्या प्लॅन विषयी. मी सांगेन तिथल्या माझ्या मित्राला. डोन्ट वरी “

तेवढ्यात कुसुमताई आत जाऊन  पाणी घेऊन आल्या. ते देतच त्या  म्हणाल्या,  “प्रकाश तू जरूर हिचे ह्या वेळी बनवलेले  डेकोरेटीव् पीसेस्  बघ. इतके सुंदर बनवले आहेत. हे बघ, तिने दुपारी मला मोबाईल वर फोटो पाठवले होते. “असे म्हणत त्यांनी आपल्या मोबाईल मधील फोटो प्रकाशला दाखवले

“वाह! खूपच छान! ”  प्रकाशने त्या फोटो वर आपले मत दिले. 

“आई, तू पण तर पूर्वी किती सुंदर क्राफ्ट वर्क करायचीस. पण आता मात्र सारख टीव्ही नाहीतर मोबाईल हाच जणू तुझा विरंगुळा झालाय.” 

थोड्या खजील आवाजात “हुं”  एवढेच त्यांनी त्यावर उत्तर दिलं.

एकदम तो देवकीताईंना म्हणाला,  “मावशी,  आईला पण तुझ्या मदतीला घे, तिला कितीतरी नवीन प्रकार येतात. आम्ही दोघे नवरा बायको सकाळी ऑफिसला जातो आणि बहुतेक वेळा संध्याकाळी 7 –  7.30 पर्यंत घरी येतो.  तिला भरपूर वेळ मोकळा असतो. टीव्ही,  मोबाईल बघण्यापेक्षा हे निश्चितच बरं.” 

प्रकाशाच्या बोलण्याला बगल देत कुसुमताई म्हणाल्या, “देवकी , चहा घेतेस ना थोडा?  बस, मी तुझ्यासाठी पटकन गरम गरम बटाटेवडे आणि चहा आणते.” 

“नको, अगं, खायला काही नको. पण चहा चालेल.” देवकीताई म्हणाल्या.  

“बरं.  मी चहा आणि बटाटेवडे, दोन्ही आणते.वाटल तर बटाटेवडे खा.” अस म्हणत कुसुमताई त्यांच्यासाठी चहा आणि खायचे बनविण्यासाठी आत निघून गेल्या.

तसं, देवकीताई प्रकाशाला लहानपणापासूनच ओळखत होत्या. त्याच्याशी थोडे मोकळेपणाने बोलायचे असं त्यांनी ठरवलं. 

“प्रकाश, खरंतर स्टॉलच्या माहितीसाठी भेटणं हे निमित्त आहे. मला तुझ्याशी थोडं वेगळया विषयावर बोलायचं आहे. आपण थोडं बाहेर जाऊन बोलायचे का? वाटलं तर कुसुमला तुझ्या ग्रीन पार्क मधल्या मित्राला आपण भेटायला जाऊन येतो असं कारण सांग.”

प्रकाशाच्या  मनामध्ये तर्कवितर्क सुरु झाले. विचार करताना कपाळावर आठ्यांचे जाळे उमटले. लहानपणापासून सख्ख्या मावशी प्रमाणे आपल्याला अंगाखांद्यावर  खेळवणाऱ्या देवकी मावशीला निश्चितच काहीतरी महत्त्वाच सांगायच असणार हा विश्वास त्याला होता. 

त्याने कुसुमताईंना जोरात  हाक मारली, “आई,  आम्ही पटकन मंगेशकडे जाऊन येतो. त्याचा नंतर कॉल आहे म्हणून लागलीच भेटायला ये, असा त्याचा मेसेज आला आहे. तर मग आम्ही आल्यावरच चहा घेतो.”  असे सांगून कुसुमताईंना बोलायची संधी न देताच दोघेही घरा बाहेर पडले. 

प्रकाशने कार काढली.  कार जेमतेम चौकापर्यंत पोहोचत नाही तर त्यानं जरा घाबरलेल्या आवाजातच देवकीताईंना विचारलं, “काय झालंय मावशी?  काही काळजी करण्यासारखं काही नाही ना?”

त्यावर देवकी ताई म्हणाल्या, “नाही रे, तसं काळजी करण्यासारखं निश्चितच काही नाही, पण विचार करण्यासारखं मात्र जरूर आहे.”

एक दीर्घ श्वास घेत देवकीताईंनी जास्त आढेवेढे न घेता विषयाला हात घातला. 

“कुसुम बरेचदा तिच्या एकटेपणा विषयी माझ्याशी बोलत असते.  दिवसभर घर खायला उठते, कुणी बोलायला, संवाद साधायला  नाही असं बरेचदा म्हणते.” 

“पण आज पहिल्यांदाच ती म्हणत होती की, मुल मोठी झाली आहेत.  आता त्यांना फारश्या जबाबदार्‍या राहिल्या  नाहीत. त्यांच्या संसाराला माझ्या मदतीची फारशी गरज नाहीये. माझा जीव कुठेतरी आता रमवावा असे वाटते, असही म्हणत होती.”

“अजून म्हणत होती की, मला एकटेपणा दूर करण्यासाठी  वयस्कर लोकांसाठी असलेल्या नाना नानी आश्रमात  जाऊन रहावसं  वाटतंय.  आजकाल काय कितीतरी वृद्ध, नाना नानी आश्रमात नाही का जाऊन रहात. खूप कॉमन झालंय गं हे. खर सांगू का, माझ्या खोलीत एकटं राहण काय आणि त्या आश्रमात काय, फारसा फरक नाही. निदान तिथे  खूप जण असतील ज्यांच्याशी मी संवाद साधू शकेल, बोलू शकेल. माझं मन मी रमवू शकेन. अगं, ह्यातून तू वेगळा अर्थ काढू नकोस.  ह्यात मुलांचा काही दोष नाही आहे. त्यांच्या नोकर्‍याच तशा आहेत. त्यांना केव्हाही पहा ते ऑफिस कॉलमध्ये बिझी.

तिचे हे विचार ऐकून मी खूप अस्वस्थ झाले. तुझ्याशी ह्या संदर्भात मोकळेपणाने बोलाव म्हणून तडक तुला भेटायच ठरवलं.”

हे ऐकून सुन्न झालेल्या प्रकाश जवळपास ओरडलाच, “नाना नानी आश्रम म्हणजे वृद्धाश्रम?  पण असं तिला का वाटावं? आम्ही नोकरीत खरच बिझी आहोत हे मान्य आहे . आम्ही तिच्यासाठी खूप वेळ देऊ शकत नाही हे पण खर आहे. पण म्हणून वृद्धाश्रमात जाण्याचा विचार तिच्या डोक्यात यावा?  मावशी असं काय चुकलं आहे आमचं? 

देवकीताई थोड्या समजुतीच्या स्वरात म्हणाल्या, “प्रकाश, तुला राग येणार नसेल तर मला  वडीलकीच्या नात्याने तुला काहीतरी सांगावसं वाटतं. 

हे बघ, आई – वडील यांने इतके वर्ष स्वतः च्या  संसारासाठी,  घरासाठी राबल्यावर, त्यांचे  बरेचदा शरीर शिथिल होते. काहिही करू नये अशी मानसिकता बनते. कधी कधी आत्मविश्वास कमी होतो. हे झाले काही वयाबरोबर होणारे बदल. पण एक फार मोठा बदल आताच्या नवरा बायको नोकरी करणार्‍या घरांमध्ये दिसतो, आणि तो म्हणजे मोठ्यांशी कमी झालेला संवाद.  

तुम्ही मुलं ऑफिसमधून दमून थकून येता. कधी कधी ऑफिसची कामं घरी घेवून येता. तुम्हाला घरी आल्यावर विश्रांतीची, शांततेची गरज असते हे जितकं खर आहे तितकंच हे ही खरं आहे की घरी एकट्या राहणार्‍या वयस्कर लोकांना आपल्यापाशी कोणीतरी थोडावेळ बसून  बोलण्याची, विचारपूस करण्याची गरज असते. पण बहुतेक घरात तेच होत नाही. मग टीव्हीच्या आवाजातून घरात माणसाचा साचल आहे अशी खोटी भावना त्यांना जवळ करावीशी वाटते. ते त्यांना, आपण शब्द किंवा बोलणंच विसरणार नाही ह्या भीती पासून दूर ठेवतं. एका कुटुंबामध्ये हरवलेला संवाद ते ह्या आवाजामध्ये शोधतात. 

तेव्हा आपल्या घरात असे काही घडणार नाही ह्याची दखल तुम्हा मुलांकडून घेतली गेली पाहिजे. आम्हाला, तुम्हाला,  तुमच्या मुलांना, सगळ्यांनाच ह्यातून जायचं आहे.

आपण पेरू ते उगवणार आहे हे लक्षात ठेवले पाहीजे. घरांमध्ये प्रत्येकानेच  मोठ्यांशी  संवाद साधला जातो आहे ह्याची खबरदारी घेतली पाहिजे.”

थोडसं थांबत त्या म्हणाल्या, “मी हे बोलताना तुला कुठे दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पण ही आताशा घरा घरामध्ये दिसणारी परिस्थिती मी आज तुला कथन केली आहे. तेव्हा राग मानू नकोस. “

“मला तुझ्याशी जे बोलायचं, तुला सांगायचं होतं ते बोलून आणि सांगून झालं आहे. कुसुम घरी आपली वाट बघत असेल. चल आपण तुमच्या घरी जाऊ. “

 देवकीताईंच्या ह्या बोलण्याने प्रकाशला कान कोंड्यासारखं झालं. घराच्या परतीच्या रस्त्यावर प्रकाशच्या मनात विचाराचे वादळ उठलं होतं. “आपण आपल्या विश्वात एव्हढे रमून गेलो की आपल्या आईला तिच्या जोडीदाराशिवाय  आयुष्य जगणं किती अवघड जात असेल ह्याचा विचारही नाही केला,  ना कधी तिची विचारपूस केली. ती आईच तर आहे, आपल्याला समजून घेईल, हे जणू गृहीतच धरलं. पण तिला कधी आपल्या आधाराची,  समजून घेण्याची गरज असू शकते हे कधी लक्षातच आलं नाही.” 

प्रकाशने इथून पुढे आपण आपली चूक सुधारायची एकही संधी  सोडायची नाही असा निश्चय केला.

 प्रकाश आणि देवकीताई घरी पोहोचले. 

 दार उघडताच ह्या दोघांना पाहून कुसुमताई म्हणाल्या, “या, बसा. झालं का तुमच काम? मी  पटकन चहा करते तुमच्यासाठी. “

देवकीताई  हॉलमध्ये सोफ्यावर बसल्या. प्रकाश , देवकीताईंसाठी आतून पाणी घेऊन आला. थोड्या वेळात कुसुमताई  चहा  आणि खायचे घेऊन आल्या.  

आता प्रकाशाला रहावलंच नाही. मनातले गिल्ट  त्याला सहन होईना. त्याने आईला पटकन  प्रेमाने जवळ घेतलं आणि  म्हणाला, ” आई, मी खरंच चुकलो. तुला खूप गृहीत धरलं. लहान होतो, कळत नव्हतं तो पर्यंत ठीक होतं. पण एव्हढे मोठे झाल्यावरही तुला, तुझ्या मनस्थितीला समजून नाही घेऊ शकलो, मला माफ कर.”

नकळत प्रकाशाच्या अशा वागण्यानं आणि बोलण्यानं त्या गांगरून गेल्या. “देवकी, तू ह्याला सगळं…” कुसुमताईंच्या गळ्यात आवंढा दाटून आला.  त्यांना पुढचे शब्द बोलताच येईनात.  डोळ्यातील आसवे गालावर ओघळली. स्वतःला सावरत त्यांनी मुलाच्या चेहर्‍यावरून प्रेमाने हात फिरवला आणि  म्हणाल्या, ” बेटा, चूक बरोबर असे काही नसतं. प्रत्येकाने परिस्थिती समजून घेणं गरजेच असतं आणि त्याप्रमाणे बदलायची असते ती आपली कृती, आपली वागणूक.”

देवकीताईंनी प्रकाशच्या डोळ्यात घातलेल्या अंजनामुळे की काय पण त्याच्या वागण्यात बदल झाला. 

आई, मुलगा आणि सून ह्यात नित्यनेमाने संवाद घडू लागला. घरातील सगळ्यांचा एकमेकांना समजून घ्यायचा,  सांभाळून घ्यायचा प्रयत्न सुरू झाला. प्रकाशने आईच्या मोबाईलमध्ये  क्राफ्ट शिकण्यासाठीचे  खास  app download करून दिले. ते कसे वापरायचे याचे धडेही तो आईला देऊ लागला.

सुनेने क्राफ्टसाठी लागणार्‍या साहित्य आणायची जबाबदारी स्वतःवर घेतली.

कुसुमताई देवकीताईंच्या मदतीने आपल्या घरात आठवड्यातून दोन दिवस क्राफ्टचे क्लासेस घेऊ लागल्या. पुन्हा एकदा “काकू, आजी”, ह्या आवाजाचा किलबिलाट घरात होऊ लागला. त्यांचा प्रत्येक दिवस एक वेगळाच उत्साह घेऊन येऊ लागला. 

आता नित्यनेमाने ह्या कुटुंबाची दिवसाची सुरुवात सगळ्यांनी एकत्र चहा घेण्याने होऊ लागली, रात्री सगळे मिळून सुनेच्या हातची कॉफी पीत आवडती टीव्ही सिरियल पाहू लागले. 

आणि कुसुमताई मोबाईलवरच्या गाण्या ऐवजी आता स्वतः गाणे गुणगुणत आपल्या रोजच्या कामात रमू लागल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *