— सौ. ऋचिता बोधनकर दवंडे —
(हा लेख आपण इथे ऐकूही शकता https://anchor.fm/maharashtra-mandal-bengaluru/episodes/ep-e1kg8lt)
ह्या महिन्यात दिल्या गेलेल्या विषयांपैकी “सुट्टीतील खादाडी” हा विषय वाचल्यावर मन नकळत बालपणात गेले अन आठवल्या उन्हाळयाच्या सुट्ट्या आणि सुट्टीतील खादाडी…….
मार्च एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा झाल्यावर वेध लागायचे ते उन्हाळ्याच्या सुट्टीचे. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आम्हा मुलांची हक्काची सुट्टी. जवळ जवळ दीड दोन महिन्यांची सुट्टी मिळायची. मी आणि माझ्या मैत्रिणी तर उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय करायचे हे आधीपासूनच ठरवायचो. परीक्षा संपली कि दुसऱ्यादिवशीपासून सुरु व्हायची धम्माल मस्ती आणि खादाडी.
कोणत्याही एका मैत्रिणीच्या घरी जमून भातुकलीचा खेळ सुरु होत असे. त्यात पोह्याची पोळी, दाण्याचे लाडू, मुरमुऱ्याचे बारीक तुकडे करून केलेला भात, गुळाचा शिरा असे सगळे पदार्थ तयार व्हायचे. शेवटी आपआपल्या भातुकलीच्या ताटात हे पदार्थ चवीने खाल्ले जायचे. घरातील इतरांनाही हे पदार्थ हौशीने दिले जात. थोडे मोठे झाल्यावर एखादीची आई आजी कांदा, कैरी, कोथिंबीर बारीक चिरून द्यायची आणि मग आमचा कच्चा चिवड्याचा कार्यक्रम सुरु होत असे. सगळ्या मैत्रिणी मिळून पोहे, मुरमुरे, कांदा, कैरी, कोथिंबीर, तेल, तिखट, मीठ असे सगळे एकत्र करून कच्चा चिवडा बनवायचो. वर्तमानपत्राचे चौकोनी तुकडे करून त्यात कच्चा चिवडा घेऊन त्याच वर्तमानपत्राचा चमचा करून आम्ही कच्चा चिवड्याचा आस्वाद घ्यायचो. स्वतः बनवलेल्या त्या कच्चा चिवड्याची मज्जा काही वेगळीच होती. एखाद्या दिवशी “रसना” सरबताची पार्टी होत असे. संत्रा, कालाखट्टा,गुलाब, वाळा, अननस अशा वेगवेगळ्या चवींची रसना पार्टी केवळ अप्रतिम!
आम्हा मैत्रिणींचा उन्हाळ्याच्या सुट्टीतील आठवणींचा आणि खादाडीचा प्रसंग म्हणजे “बाहुला बाहुलीचे लग्न”. बाकीच्या तयारी सोबतच प्रत्येकीची आई चिवडा, लाडू, शंकरपाळे असे चमचमीत पदार्थ करून द्यायची. बाहुला बाहुलीचे लग्न लागल्यावर आम्ही एकत्र मिळून हे सगळे पदार्थ चवीने खायचो. बरोबरीने एखाद्या काकू घरी बनवलेले लिंबू सरबत किंवा कोकम सरबत आणून देत असत. त्यामुळे आमच्या पंक्तीला जणू चार चांद लागायचे आणि आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटायचे.
सुट्ट्यांमध्ये आम्ही आत्ते चुलत बहीणभाऊ एकमेकांकडे राहिला जायचो. काकूकडे राहायला गेल्यावर काकू आम्हाला दुपारी मिक्सरमध्ये वॅनिला मिल्कशेक, आंबा मिल्कशेक करून द्यायची. मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे त्यावर फेस यायचा. असे फेस आलेले मिल्कशेक पिताना आम्हा बहीण भावांचा आनंद गगनात मावत नसे. आईनी करून ठेवलेल्या साखरआंबा, गुळंब्यावर पण साखरआंबा पोळी, गुळंबा पोळी खाऊन यथेच्छ ताव मारला जायचा. कधी कधी हाच साखरआंबा ब्रेडवर लावून सँडविच म्हणून खायचो. उन्हाळ्यात भाजलेल्या किंवा उकडलेल्या कैरीचे पन्हे म्हणजे केवळ अमृतच! माझी आई नेहमी घरात कैरी उकडून किंवा भाजून ठेवायची. जेव्हा इच्छा झाली तेव्हा कैरीच्या गरात साखर, मीठ, पाणी टाकले कि पन्हे तयार. मग काय तहान लागली असे म्हणत पन्हयाचा आस्वाद घेतला जायचा. चैत्रगौरीच्या निमित्ताने आजीने केलेली आंब्याच्या डाळीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. संध्याकाळी आम्ही बहीण भाऊ बगिच्यात खेळायला जायचो. खेळणे झाले कि बाबा, काकांकडून बर्फाचा गोळा, भेळ, पाणीपुरी ठरलेलीच. कधी कधी मलाई लस्सीची पार्टी पण मिळत होती. रमत गमत, हसत खेळत एकत्र मिळून केलेली मलाई लस्सीची पार्टी आजही आम्हा बहीण भावांच्या स्मरणात आहे.
आंबा, टरबूज, खरबूज ही फळे म्हणजे उन्हाळ्याची वैशिष्ठे. आईच्या सुट्टीच्या दिवशी ताटात आंबे घेऊन ती माचवून त्यांचा रस काढताना खूप मज्जा यायची. आंब्याचा रस आणि पोळी हा तर आवडता बेत. ज्या दिवशी नावडती भाजी असेल त्यादिवशी आंब्याचा रस पोळीचेच जेवण असायचे. आंब्याचा रस काढल्यावर आंब्याच्या साली आणि कोयी पाण्यात टाकून त्याचा पाण्यातील आंब्याचा रसही बनवला जायचा. त्यात साखर आणि किंचित मीठ टाकून आवडीने पिला जाई. कधी कधी चिवळ, घोळ ह्यासारख्या जास्तकरून उन्हाळ्यात मिळणाऱ्या पालेभाज्या आई थोडी का होईना पण खायला लावायचीच. दुपारी भूक लागल्यास टरबूज, खरबूज चिरून खाल्ले जायचे. कधी काकडी, कैरी चिरून त्यावर मीठ तिखट टाकून चवीने खाल्ले जात.
उन्हाळा आणि वाळवण हे जणू समीकरणच! बटाट्याचे चिप्स आणि पापड, साबुदाणा पापड, तांदळाचे पापड, उडदाचे पापड, कुरडई हे सगळे करताना केव्हा एकदा ते कडक उन्हात वाळतात आणि आपल्याला खायला मिळतात ह्याची घाई झालेली असायची. हे सगळे तर अगदी कधीही वाटेल तेव्हा पटकन तळून खाल्ले जात असे. शेजारच्या काकू जेंव्हा पापड बनवत तेंव्हा पापडाचे लाटी खायला पण फार आवडायचे. सोबतच उत्सुकता असायची ते हातावर बनवलेल्या शेवयांची. त्या शेवया बनवताना पाहायला छान वाटायचे.शेजारील काकू त्यांनी स्वतः केलेल्या शेवया आणून द्यायच्या. त्या घरच्या शेवयांच्या खिरीची चव खरच खूप छान लागायची. अगदीच कधी कंटाळा आला तर घरचे कैरीचे किंवा लिंबाचे लोणचे पोळीवर पसरवून आई पोंगापोळी (रोल) करून द्यायची.
उन्हाळ्याच्या सुट्टीचे खास आकर्षण म्हणजे उसाचा रस, कुल्फी आणि आईसक्रीम. घरासमोरून ‘टण टण’ आवाज करत उसाच्या रसाची गाडी आणि कुल्फीचा ठेला जात असे. आजीकडे हट्टाने उसाचा रस आणि कुल्फी मागितली जायची. आजीपण सुट्टीच आहे तर घेऊ दे असे म्हणत माझा उसाचा रस आणि कुल्फीचा हट्ट पुरवायची. आपल्यासमोर काढलेल्या त्या ताज्या ताज्या उसाच्या रसाची चव मन तृप्त करून द्यायची. कुल्फी तर बदाम, पिस्ता, आंबा, केशर अशा एक से एक चवींची. कुल्फीवाले काका त्यांच्या भांड्यातून कुल्फी काढून हातात देत तेव्हा काय आनंद होत असे. आज आंबा कुल्फी घेतली आहे तेव्हा पुन्हा दोन तीन दिवसांनी केशर कुल्फी घेऊ असे आराखडे मनात तयार होत असत. माझ्या लहानपणी आईसक्रीम हे आतासारखे बाराही महिने खात नव्हते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात वॅनिला, पिस्ता, आंबा, चॉकलेट ह्यासारख्या एकापेक्षा एक चवींचे आईसक्रीम आई बाबा कुठलीही आडकाठी न करता घेऊन देत असत. शिवाय आमच्या इमारतीत एक काका राहायचे. त्यांना स्वतः आईस्क्रीम करायची आणि करून खाऊ घालायची फार हौस होती. ते घरी आईसक्रीमचे भांडे आणून आईसक्रीम बनवायचे. ज्या दिवशी आईस्क्रीम करणार असतील त्या दिवशी ते सर्व मुलांना घरी बोलवत. आईसक्रीमच्या भांडयाच्या आजूबाजूला मीठ टाकायचे. भांड्यात बर्फ, दूध, साखर आणि आंब्याचा रस टाकत असत. त्यानंतर ते भांड्याचा दांडा गोल गोल फिरवायचे. आम्ही देखील त्यांना दांडा फिरवायला मदत करायचो. काही वेळानंतर आंबा आईसक्रीम तयार होत होते. असे ताजे घरी बनवलेले आईस्क्रीम खायला आम्हा सर्व मुलांना खूपच आवडायचे आणि त्याची चव बाहेर मिळणाऱ्या आईस्क्रीम पेक्षा कितीतरी पटीने उत्तम असायची.
उन्हाळयाच्या सुट्टीतील खादाडीची अजून एक छान आठवण आहे. आमच्या इमारतीतील काही कुटुंब मिळून एखाद्या रविवारी गच्चीवर एकत्र जेवण करायचो. त्यासाठी आम्ही मुले गच्चीवर आधी पाणी टाकायचो. ते वाळले कि मग चटई, सतरंजी टाकून बसायला जागा करायचो. आई आणि सगळ्या काकू एक एक पदार्थ करून आणत. बटाटयाची भाजी, मटकीची उसळ, मसालेभात, आंब्याचा रस, घरचे लोणचे आणि घरी बनवलेले कुरडई पापड हा तर आमचा हिट बेत होता. अशारितीने सगळे मिळून गप्पागोष्टी करत एकत्र जेवताना जी धम्माल यायची ती शब्दात वर्णन करता येणार नाही.
वर्षभर शाळा अभ्यास ह्यामुळे हवी तशी मज्जा मस्ती करता येत नव्हती पण उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेली मज्जा आणि सुट्टीतील खादाडी बालमनाला ताजेतवाने करायची. तसेच पुन्हा वर्षभर शाळा आणि अभ्यासासाठी उत्साह द्यायची. दरवर्षी उन्हाळा येतो पण बालपणीच्या त्या सुट्ट्या आणि आम्ही केलेली खादाडी ह्याची आठवण आल्यावाचून राहत नाही.

अतिशय सुंदर , अभ्यासपूर्ण