प्रत्येक अन्नकण महत्त्वाचा!
—देवश्री अंभईकर धरणगांवकर—
“प्रियाssअगं नीट जेवून घे! किती घाई!” प्रियाच्या ताटात गरमागरम पोळी वाढत तिची आई म्हणाली. प्रिया भराभर तोंडात घास कोंबत होती. तेवढ्यात बाहेरुन मैत्रिणीने हाक मारल्याबरोबर हातातला घास तसाच ताटात टाकून प्रिया हात धुवायला धावली. लगेच ती बॅग उचलून निघालीही होती. “अगं ही पाण्याची बाटली घे!” म्हणत आईने तिच्या हातात बाटली दिली. “सांभाळून राहा गं सगळ्या नीट. फोन करशील!” “होs आई!” म्हणत प्रिया मैत्रिणीसोबत निघून गेली. शिबिरासाठी त्यांना महाविद्यालयातूनच बस घ्यायची होती. “हिच्या आवडीची बटाट्याची भाजी केली तर नीट जेवलीही नाही. किती अन्न वाया जातं… कधी शिकणार ही पोर!” तिचे ताट उचलताना आईने स्वतःशीच बोलत उसासा सोडला.
सुखवस्तू घरातील एकुलती एक लाडकी लेक असल्याने कधी कशाची कमतरता नव्हती. छान खायचे-प्यायचे, अभ्यास करायचा, मैत्रिणींसोबत वेळ घालवायचा, टीव्ही पाहायचा, गाणी ऐकायची, मजेने राहायचे असा प्रियाचा दिनक्रम असायचा. आई शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असे पण प्रिया दाद देत नसे.
प्रिया महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाची शास्त्राची विद्यार्थिनी होती. मैत्रिणींनी आग्रह केला म्हणून त्यांच्याबरोबर तिनेही राष्ट्रीय सेवा योजनेत (नॅशनल सर्व्हिस स्कीम/N.S.S.) भाग घेतला. प्रियाचा आणि समाजसेवेचा तोपर्यंत दुरान्वयाने देखील संबंध आला नव्हता.
दर रविवारी राष्ट्रीय सेवा योजनेचे वर्ग असत. त्यात कधी कोणी प्रबोधनात्मक भाषणे देत. कधी महाविद्यालयातच काही कार्यक्रम असायचे तर कधी देशभक्तीपर गीतांचे सामूहिक गायन असायचे त्यामुळे प्रियाला काही वेगळे विशेष करावे लागत नाही याचा आनंद होता शिवाय अतिरिक्त गुणही मिळत. काही महिन्यांनी वार्षिक शिबिराची वेळ आली. नियमानुसार प्रत्येकाला दहा दिवसांच्या निवासी शिबीरात हजर राहणे अनिवार्य होते. प्रियाला तसे जीवावर आले होते कारण असे कुठेतरी अनोळखी खेडेगावात राहून तिथे दहा दिवसही जुळवून घेणे तिच्या स्वभावात बसणारे नव्हते. मैत्रिणींनी पुन्हा एकदा तिचे मन वळवले. मुलीला काही चांगले शिकायला मिळेल म्हणून आईवडिलांनीही परवानगी दिली त्यामुळे आता प्रियाला शिबीर चुकवणे शक्यच नव्हते.
हा कॅम्प सातपुडा पर्वतरांगांतील मेळघाट भागातील एका खेड्यात होणार होता. जवळच आदिवासी वस्ती होती. महाविद्यालयाकडून राहण्याची सुरक्षित व्यवस्था सरपंचांकरवी करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या आवारात त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम होणार होते. आजूबाजूला डोंगराळ व जंगली प्रदेश होता. त्यांची बस आदल्या दिवशी संध्याकाळी तिथे पोहोचली. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठायचे असल्याने जेवण करून सारीजण निद्राधीन झाली.
शिबिर पहाटेच सुरु होई. प्रार्थना, न्याहारी, हजेरी, रोजच्या सेवा-कार्यांची आखणी, गावातून जागृती-फेरी, श्रमदान किंवा जनजागृतीचे काम, दुपारचे जेवण, सायंप्रार्थना, समूहगान, स्थानिक कलाकारांना घेऊन एखादा मनोरंजनाचा पण उद्बोधक कार्यक्रम- भारूड, कीर्तन, पोवाडा, नाटुकले इत्यादी, रात्रीचे भोजन व झोप असा दिनक्रम दहा दिवस होता.
प्रियाचा खेड्यात येण्याचा पहिलाच प्रसंग असल्याने इतक्या अडचणींमध्येही हसतमुखाने, सहनशक्तीने, खेळीमेळीने, एकमेकांना सांभाळून लोक कसे राहतात हे ती आश्चर्याने पाहत होती. आदिवासीबहुल प्रदेश असल्याने ते लोकही या शहरी नीटनेटक्या तरुण मुला-मुलींकडे कुतूहलाने पाहायचे.
रोज प्रिया व इतर शिबिरार्थी श्रमदान करत. वृक्षारोपण, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण इत्यांदींविषयक जागृती करत. गावातील शाळेत गाणी-गोष्टी शिकवत. अशाप्रकारे शिबीर पार पडत होते. प्रियाला हळूहळू शिबीर आवडायला लागले. तिला फक्त तिथले जेवण आवडत नव्हते. रोज एकतर खिचडी किंवा पोळी-भाजी असे. न्याहारीला उपमा-पोहेच. घरून आणलेला खाऊ पण संपला. प्रियाला चमचमीत खाण्याची आवड होती त्यामुळे तिथले साधे अन्न खाऊन तिला कंटाळा आला.
शिबिराच्या सहाव्या दिवशी दुपारी सरपंच व काही माणसे धावतच त्यांच्या प्राध्यापकांकडे आली…
त्यांनी सर्वांना गावातल्या जेमतेम असलेल्या सरकारी आरोग्यकेंद्रात नेले. तिथे काही आदिवासींची गर्दी जमलेली होती. त्यांनी त्यांच्या छोट्या छोट्या मुलांना तिथे आणले होते. त्यातली काही मुले अक्षरशः अत्यवस्थ म्हणावी अशी होती. नवजात बाळापासून ते पाच-दहा वर्षे वयोगटातली ती आदिवासी बालके भयंकर कुपोषणाने पीडित होती. त्यांना महाविद्यालयाच्या बसने तालुक्याच्या गावी न्यावे म्हणून ते लोक विनंती करू लागले. प्रियाचा ते सर्व पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आतापर्यंत अभ्यासाच्या पुस्तकांतच वाचलेले कुपोषण व कुपोषणाशी संबंधित अवस्थांचे आज तिला प्रत्यक्षदर्शन होत होते. त्यांना बसने ताबडतोब जवळच्या तालुक्याच्या गावी उपचारांसाठी पाठवण्यात आले. केवळ पुरेसे जेवायला मिळत नसल्यामुळे त्या निरागस बालकांची अशी अवस्था झाली होती.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या आदिवासींच्या वस्तीवर जाऊन त्यांची परिस्थिती पाहिली. दारिद्र्य, अज्ञान, अशिक्षितपणा, खडतर जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे पुरेसे सकस अन्न मिळत नसल्यामुळे घरोघरी कुपोषण ठाण मांडून बसलेले!! प्रत्येक घरात कुपोषित बालके होती.
प्रिया मनातून अस्वस्थ झाली होती. तशी ती हळवी, संवेदनशील मनाची होती. तिला नीट झोप आली नाही. डोळ्यांपुढे सतत ती आदिवासी कुपोषित बालके येत होती. त्यांच्या माताही कुपोषित, अगतिक… आपल्या बाळाला पुरेसे दूध देता येत नसण्याची वेदना त्यांच्या डोळ्यांत होती. हातापायाच्या काड्या झालेली, पाठ-पोट जणू एकच असावे इतकी खपाटीला गेलेली पोटे, खोल डोळे, अशक्तपणाने धाप लागणारे, रक्ताच्या कमतरतेमुळे विचित्र पंढरटपणा आलेले, प्रथिनांच्या कमतरतेमुळे, अन्नशोषणाच्या अभावाने क्वाशिओर्कर व मॅरॅस्मससारखे रोग जडलेली, जगतील की जातील ह्याची खातरी नसलेली ती बालके…प्रियाच्या मन:चक्षूंसमोरून हलत नव्हती.
प्रियाला आईने भरपूर वाढलेले गरम जेवण, ताटात टाकून दिलेले सुग्रास अन्न, उगीच घेतलेले पॉपकॉर्न, चिप्स आठवले. केवळ चव आवडली नाही म्हणून दूर सारलेल्या पौष्टिक भाज्या आठवल्या. वाढदिवसाला केवळ तोंडाला फासून वाया घालवलेला केक आठवला. घरात आणि हॉटेलमध्ये कितीवेळा किती अन्न वाया घालवले होते आजवर. तिला स्वतःचीच लाज वाटली. सहज मिळते आहे म्हणून आपण कसे माजल्यासारखे वागतो हे जाणवले. वाईट वाटले. प्रियाचे डोळे अचानक भरून आले… दिलेली बिस्कीटे खाताना एकेक तुकडा आपल्या भावंडाना भरवणारी ती आदिवासी मुलगी तिच्या डोळ्यांपुढे आली… चुकून सांडलेला बिस्किटाचा चुराही बोटाने निपटून खातानाचे त्यांचे चेहरे किती करूण होते. अन्नाचा प्रत्येक घास, प्रत्येक अन्नकण किती महत्त्वाचा असतो हे तिला तेव्हा पटले.
तरुण वय संस्कारक्षम असते योग्यवेळी योग्य त्या जाणिवा-संवेदना जागृत झाल्या तर माणसाच्या विचारांची दिशा बदलू शकते. घरातून तर प्रत्येकालाच चांगले संस्कार मिळतात पण म्हणतात ना ‘सोनारानेच कान टोचलेले बरे’ असतात. आईने आजवर प्रियासाठी ‘अन्न टाकू नये गं!’ म्हणून किती कंठशोष केला होता. आईचे म्हणणे कुपोषण काय असते आणि एकेका घासाचे जगात किती महत्व आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच प्रियाला पटले.
महाविद्यालयातर्फे जेवढे करता आले तेवढे अन्नदान करून शिबिराची सांगता झाली. विद्यार्थ्यांनी आपापल्या पॉकेटमनीतून पैसे जमवून कुपोषित आदिवासी मुलांना बिस्किटांचे पुडे वाटले.
प्रिया घरी आली. आईच्या गळ्यात पडून तिने आईला सांगितले, “आजपासून मी अन्न अजिबात वाया घालवणार नाही, उष्टे टाकणार नाही. गरजेपुरतेच घेईल. यापुढे खाण्याचे-चवीढवींचे नखरे बंद!!” त्यानंतर प्रियाने कधीही अन्न-पाणी वाया घालवले नाही.
पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रिया मोठ्या संस्थेत नोकरीला लागली. तिने तिच्यासारख्याच विधायक विचारांची माणसे जोडून एक सेवाभावी संघ स्थापन केला. कुपोषण व अन्न-पाण्याविना होणारे बालमृत्यू टाळण्यासाठी जागृती व मदत उभी करण्याचे कार्य करू लागली. राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश प्रियाच्याबाबतीत जणू सफल झाला होता. कुपोषित बालकांच्या भेटीच्या त्या एका हृदयद्रावक प्रसंगाने प्रियाचे आयुष्यच चांगल्या दिशेने बदलले.
प्रियाच्या कार्यालयात एक संस्कृत सुभाषित मोठ्या ठळक अक्षरांत सोनेरी चौकटीत लावलेले दिसते…
पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम्।
मूढै: पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते।।
त्याखाली अर्थ लिहिला आहे: “पृथ्वीवर तीनच खरी रत्ने आहेत- जल, अन्न आणि उत्तम विचार. अज्ञानी लोक मात्र दगडांच्या तुकड्यांनाच रत्ने म्हणतात.”
सर्व छायाचित्रे- गुगलवरून साभार.
