— निवेदिता शिरवटकर —
आज सकाळपासून सुमीचं मन कश्या कशात म्हणून रमत नव्हतं. रांधायला घेतलं तर मीठ जास्तं पडलं आमटीत…आणि दोन भाकऱ्या करपल्या . डोक्यात विचारांचं थैमान अन् मनात एकच धास्ती !
रखमेने उद्या घरी बोलावलं होतं. रखमा … तिची बालपणीची मैत्रीण! मग नाही कसं बोलायचं तिला ? बरं नाही दिसलं
असतं ते. तिच्या ओटभरण्याला साऱ्या नजीकच्या बाया संध्याकाळी घरी जमायचं बोलत होत्या . हे बोलावणं आल्यावर
नेहमी प्रमाणे आजही तिच्या जीवाची घालमेल सुरू झाली .कसंनुस काळीज घेऊन धडपडत तिथं जायचं. साऱ्या बायांच्या भोचक नजरा सहन करत समारंभ पार पडे तोवर दबक्या पावलांनी ओटी भरून जीव मुठीत घेऊन बाहेर पडायचं….. आणि का ? तर कोणा बाया बापड्या ची कुजबुज कानावर पडूनये म्हणून ….तरी ही न चुकता नेहमी कोणी ना कोणी तरी पुटपुटत असेच ,” अर्रर ! ही वांझोटी बरी आली कार्यक्रमाला …. अश्या वेळी तोंड घेऊन येऊ नये एवढंही कळत नाही ह्याबयेला ! “
” होय तर ! अपशकूनच असतो की हा ! “
दर वेळी अश्या कार्यक्रमात होणारी कुजबूज सुमीचं काळीज चिरत जाई . जीव पार कासावीस होई. डोळ्याच्या कडेवरून
उतू जाणारी आसवं मोठ्या कष्टाने परतून लावत ती निमूटपणे घरी येत असे. तेही उर फुटून त्याच आसवांना मोकळं करण्यासाठी ! मनाला पटत नसे …पण बोलावणार तरी कुणाला ?
सहा वर्ष उलटून गेली होती तिच्या लग्नाला . अजून तिची कूस उजवली नव्हती . सगे संबंधी , शेजारी पाजारी ,आल्यागेल्याचे बोल सतत ऐकून तिलाही आजकाल असं वाटू लागलं होतं की फक्त तिची कूसच नव्हे तर तिच्यातील ‘माय देखील कुठेतरी कोरडी पडत चालली होती .
‘ देवा ! हा काय माझा दोष ? मला का हे चटके ?
त्या दिवशी मंदिरात कीर्तन करणारे बुवा तर म्हणत होते की हे जे आयुष्य आहे ते सर्व फक्त त्या ईश्वराचीच कृपा .घरदार, संसार, देह ….सर्व काही त्याचच ! आपलं असं काहीच नाही . ते कीर्तन ऐकायला तर सारा गाव लोटला होता त्यादिवशी . पण ते काय बोलतात हे किती जणांना कळलं असेल कोणास ठाऊक ? मग मला हा देहसुद्धा त्यानेच दिला ना ? मग माझा काय दोष ? मी का अपशकुनी ? …. मला ही तेच काळीज आहे की जेसर्वांना त्याने दिलं आहे… कधी वाटतं त्या देवालाच सांगावं हे काळीज नको दगड दे त्या जागी !
नशीबच फाटक म्हणायचं आणि काय ? पण कधी कधी नाही सहन होत. आता तूच वाचव . गेल्या जन्मी काय पाप केलं
की ह्या जन्मी असे भोग ? मी कधीच कोणाची ‘ माय ‘ नाही का होणार ? ….आणि मग का ही वेळ फक्त हुंदक्या वर हुंदके ! ….
हे नेहमीचं झालं होतं.
एक हंडा कमरेवर अन दुसरा डोयीवर ठेवत रितं मन कवटाळून जड पावलांनी नदीकडे निघाली . सांज व्हायला अजून बराच
अवकाश होता . अंधार पडायच्या आत घरी परतायचं होतं. नदी दिसू लागताच भानावर येऊन लगबगीने काठावर पोहोचली . दोन चार ओळखीच्या बाया पाणी भरून परतायच्या तयारीत होत्या . सुमीने ओठाची कड दुमडत हसल्या न हसल्या सारखं केलं. तेही मनात नसताना .
….. आज कोणा कोणाशीही बोलू नये असं वाटत होतं. कोण जाणे उद्या ह्यांच्या पैकीच कोणी तरी तिच्या जीवाला बोल
लावून जायचं.
नदी काठावरल्या दगडावर थोडी विसावली . थंड पाण्याचा हबका मारल्यावर तिचं सैरभर मन थोडं स्थिरावलं. आली होती
खरी पाणी भरायला …. जीव कधी असाच खोल दरीत डूबून गेल्या वर जरा निवांत खुल्या आस्मानाकडे पाहत बसलं की
थोडं हायसं वाटे. दूरवर नजर टाकली . क्षितिजा वर नुकतीच लाली पसरायला सुरुवात झाली होती ….आता निघायला हवं.
पाण्याचा शेवटचा घडा भरून घेतला खरा परंतु पायवाट आता लांब वाटायला लागली . तसेच तर बरोबरीच्या सर्व पुढे
गेलेल्या ..ही वाट झाडाझुडपातून जाणारी .. पुढच्या खेपेला एखादी काठी किंवा जाड काटकी तरी सोबत ठेवलेली बरी ..
निदान दारच कुत्रं तरी ..झपाझप पावले उचलत ती चालू लागली . बाजूच्या जाळीत खसखस आवाज आला . कोणीतरी
रोखून पाहत आहे असे वाटू लागले. देवाचा धावा करत ती एकटक पाहू लागली .. एकीकडे सूमीच्या छातीचे ठोके वाढू
लागले….
ते जे काय होतं त्याची हालचाल थोडी थांबली . अधिक निरखून पाहता सुमीला वाटलं की कोणी लहान मूल आहे.
‘ इथे ह्या झाडीत अन् तेही अश्या सांजवेळी ? एवढंस पोर काय करतंय ? ‘
एका हाताने गवत बाजूला सारत ती पुढे सरसावली .
शंका खरी होती तिची ….एक तीन चार वर्षाची लहानगी मुलगी होती .मुलगी कसली !
एक मुकं जनावर होत ते ! छोट्याशा शरीरावर हे भलं मोठं डोक. विरळ केस त्याला आणखी कुरुप करत होते. कसं
सावरता येत असेल ते डोकं देव जाणे ! मंद मुलांप्रमाणे गोल गोल डोळे अन् त्यात शून्यात हरवलेली नजर आणि तोंडातून
गळणारी लाळ. धुळीने माखलेला तो कळकट फाटका पोलका अंगावर… हाता पायाच्या काड्या अन् फुगलेल पोट.
सुमीला कीव तर आली होती …पण तिला
जवळ घेण्याचं धाडस होत नव्हतं. नीटस बोलता ही येत नव्हत तिला . मोठया प्रयत्नाने घोगऱ्या आवाजात तोडके, मोडके
शब्द…. नव्हे कस कसले आवाज फुटू लागले. ती मुलगी … प्राणी जे काय होतं तिच्याजवळ येऊ लागलं… तिच्या
लुगड्याला ते मोठाले डोकं घासू लागलं …तिच्या हाताला स्पर्श करू लागलं. सुमीने धीर करून तिच्या बोडक्या , मऊशार
डोक्याला स्पर्श केला आणि त्या क्षणी तिने तिच्या पायाला गच्च मिठी मारली ……
सुमीचं सर्वांग शहारलं! त्या क्षणी हे मात्र नक्की जाणवलं की मायेच्या स्पर्शासाठी आसुसलेला होता तो कमनशिबी जीव.
सुमिला क्षणभर कळेना काय करावं बरं …मनात अनेक प्रश्न एकाच वेळी उसळू लागले.
‘ ह्या उघड्या माळरानावर कुठून आली ही मुलगी ? कमाल आहे ! …आजूबाजूला तर कोणीच दिसत नाही .
किती वेळ झाला असावा ?
बाजूच्या गावातून वाट सोडून भरकटली ….हरवली असेल का ? का …का कोणी मुद्दामच सोडून दिलं असेल ह्या उघड्या
जागेत ? का ….कशासाठी ? एखाद्या कोल्ह्या -कुत्र्याला नाही तर वाघऱ्याला घोट घेता यावा म्हणून ? असं कसं हे
माणसाचं काळीज ? ‘
हा विचार मनी येताच एक थंड सणक तिच्या मणक्यातून शिरशिरत गेली .
सुमीनं पाण्याचे घडे जमिनीवर ठेवले आणि तिला हाताला धरून जवळ ओढलं….तस ते भलं मोठं डोकं तिच्या अंगाला
घासत ती मुलगी लगट करू लागली .
सुमीनं घड्यातलं पाणी ओंजळीत घेऊन तिच्या चेहऱ्यावरली काजळी धुवून टाकली . पदराने चेहरा पुसून तिचं ते ओबड
धोबड रूपडं सुमी न्याहाळू लागली …..ती मुलगी तिच्या बोटांशी खेळू लागली .
‘अशी कशी त्या देवा ने घडवली हिला ? का बरं जन्माला घातली असेल हिला ? काय बा हे अजब रूप?’
पण का कुणास ठाऊक ! ते वेडविंद्र रूप त्या क्षणी भावलं तिला ….
कोण कुठ पोर ….ना आगा ना पिच्छा . आभाळातून उतरावी तशी आली माझ्या समोर !
दुसऱ्या क्षणी घडे उचलले आणि एका हाताने तिचा हात घट्ट पकडला . घराच्या दिशेने चालू पडली .
‘ आज सकाळीच मी विचार करत होते …..माझी कूस ही अशी कोरडी !
रडत होते त्या देवाच्या नावाने. त्यानेच धाडली की काय हिला आणि माझ्या पदरात टाकली ?
मंद आहे , त्यात हे वेडवाकड रूप ! पण शेवटी एक जीवच ना तो ! तो असा उघड्या वर सोडून द्यायचा म्हणजे ?
घरी नेऊन दोन घास खाऊ घालते .ते पुढचं पुढे …. कोण शोधत आलं तर पाहू पुढे काय करायचं ते.
देवा ! जोवर ताकत आहे तोवर जेऊखाऊ घालीन… तिचं न्हाऊमाखु करीन. तेवढं तर देवाच्या दयेने आहेच
माझ्यापाशी . फार विचार नको .
आणि हो ! उद्या सकाळी लवकरच बाजारात जाऊन छान पोलका आणते हिच्यासाठी . छान सजवून घेऊन जाते की
रखमेच्या ओटभरण्याला ….
बघू कोण काय बोलतं आणि तसंही आता कोण काय बोल लावेल याचा नाही फरक पडणार मला .
माझी कूस कोरडी नाही … माझ्यातली ‘ माय ‘ जिवंत आहे अजून ! ‘
सुमीच्या डोळ्यात विलक्षण लकाकी होती अन् चेहऱ्यावर हसू फुललं होत……
