—उज्वला तायडे—
प्रत्येक माणसाची स्वतःची अशी काही स्वप्ने असतात आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तो माणूस धावत असतो.प्रत्येक माणूस वेगवेगळी जीवनशैली जगत असतो.आपल्याभोवती असलेली माणसे, त्यांचे विचार आणि त्याचा आपल्यावर पडणारा प्रभाव त्या व्यक्तीला त्याच्या ध्येयापर्यंत नेऊन पोहोचवतो.मात्र या सगळ्या आधी गरजेचे आहे ते स्वतःला ओळखण्याची कारण जर माणसाने स्वतः ला ओळखले तरच माणूस आत्मपरीक्षण करून योग्य ते बदल करून आपले ध्येय गाठू शकतो.
एकदा का आपल्याला काय करायचंय आणि कोणत्या मार्गाने जायचं हे समजले आणि त्याला तीव्र इच्छाशक्तीची जोड मिळाली तर काहीच अशक्य राहत नाही.
भारतीय समाजजीवनात कथाकथनाची परंपरा फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. जुन्या काळातील स्त्री पुरुषांना रामायण, महाभारत, भागवत कथा, तसेच संतांची चरित्रे हे सर्व माहिती होते. कोठेही शाळेत न जाता या सर्व कथा त्यांना माहीत होत्या; त्याला कारणही तसेच होते. ही माणसे सकाळ संध्याकाळ देवळाच्या पारावर जाऊन बसत. तिथे जाऊन कथा कीर्तन ,भजन ऐकणे हा त्यांच्यासाठी विरंगुळा होता.
खरं म्हणजे ती त्यांची एक प्रकारची संस्कारशाळाच होती.श्रवणाच्या माध्यमातून त्यांना शिक्षण मिळत असे
देवळात ऐकलेल्या गोष्टी हे प्रौढ लोक आपल्या नातवंडांना सांगत असत. त्यात माझ्या आजीचाही समावेश होता. सायंकाळी आजी सडासारवन केलेल्या अंगणात तुळशीसमोर बसत असे. तुळशीपुढे फक्त तेवढा दिव्याचा प्रकाश असायचा. आजी गोष्ट सांग ना… म्हणून आम्ही भावंड आणि आजूबाजूची मुलं हट्ट धरत असु मग कीर्तन, प्रवचनात ऐकलेली गोष्ट आम्हाला सांगायची. आकाशात छान चांदण्या लुकलुकत असत. गार वारा सुटलेला असे, घरात आई स्वयंपाक करत असे, भाजीचा सुवासही दरवळत असे.अजून जेवणाची वेळ झालेली नसे. इकडे आजीची गोष्ट रंगात आलेली असे. आम्ही सर्व भावंड, शेजारची मुलं गोष्ट ऎकत असू. आजी गोष्ट खूपच रंजक करून सांगत असे. त्यासाठी ती अभिनय सुद्धा करायची,आवाजाचा चढउतार, मध्ये पशुपक्ष्यांचे आवाज काढून दाखवायची.राजा दुष्यंत, शकुंतला,चंद्रकांता गौतम बुद्ध ची गोष्ट ऐकताना ती गोष्ट आपल्या समोरच घडत आहे की काय असा अनुभव यायचा. अशी ही एक प्रकारची आमच्या अंगणातील शाळा असे. गोष्ट रंगत जाई.गोष्टीच्या शेवटाची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असे. कारण गोष्टीत काय घडले हे महत्त्वाचे असे. मग गोष्ट शेवटाकडे जाई तिचा शेवट होई.दुष्ट लोकांचे निर्दालन, दुबळ्यांना मदत, गरिबांबद्दल कणव, मैत्री,माणुसकी, प्रेम, अश्या मूल्यांना अधोरेखित करत आजीची गोष्ट संपत असे. तो संस्कार मात्र चिरकाल टिकणारा असे. ज्या माझ्यासारख्या मुलांना ,आजोबा आजीकडून अशा सुंदर वातावरणात जेवणापूर्वी, आजीच्या मुखातून तिच्या अवतीभवती बसून गोष्ट ऐकायला मिळाली ती मुले खरोखरच भाग्यवंत आहेत.माझ्या मुलांनाही त्यांच्या आजी आजोबांचा सहवास लाभत आहे. शिक्षक मुलांच्या आयुष्यात नंतर येतात. अगोदर आई वडील, आजी आजोबा, बहिण भाऊ ही मंडळी येतात. आजकाल आजी नावाचे संस्कार केंद्र दुर्मिळ होत चालले आहे. ज्यांच्या घरी आजी आजोबा आहेत ते घर माझ्यामते नक्कीच श्रीमंत आहे.लहानपणी आजीच्या गोष्टींमधून कथे बद्दल चे कुतूहल वाढतच गेले.पूर्वी गावामध्ये कलापथक यायचे, त्यांचा कार्यक्रम रात्रीचा असायचा, कलापथकातील कलाकार आपापली कला सादर करायचे.आजीसोबत कलापथक बघायला मी जायची.नाटक पहायला जायची. तेव्हा करमणुकीचे तेच साधन होते.
रात्री लवकर जेवण उरकून आपली सतरंजी घेऊन आजीसोबत जाण्यात खूप आनंद वाटायचा.
तेव्हा संपूर्ण गावात वर्तमानपत्र क्वचितच असायचे आजोबांची सर्वच मित्र मंडळी आमच्याकडे यायचे आम्हा भावंडांची जोराजोरात वर्तमानपत्र वाचून दाखवण्याची पध्दत लावली होती.
आई वडील नोकरी साठी वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने आम्ही भावंड शिकायला आजीसोबत रहायचो. तेव्हा सर्वांत मोठी बहीण अभ्यासात,सर्वच कलांत सर्वात हुशार होती. आईवडील सुटीच्या दिवशी यायचे तेव्हा आम्ही सर्वच मोठया बहिणीच्या तालमीत वाढायचो.
ती खूप हुशार असल्याने अभ्यास करायची परंतु अभ्यास करताना ती अवांतर वाचन सुध्दा करायची तेहि जास्त प्रमाणात.अभ्यासाच्या पुस्तकात ती, कथा, कादंबरी, उपन्यास ठेवून वाचायची, ही गोष्ट मला माहिती होती.आम्हाला लहानपणी बाबा चंपक, चांदोबा, किशोर सारखी पुस्तके वाचायला आणत होते.
का, कुणास ठाऊक पण तेव्हा एक ठरलेले असायचे की, बाबा घरात आले म्हणजे आम्ही सर्वच बहीण भावंड हातात पडेल ते पुस्तक घेऊन वाचत होतो. कुणी खरोखरच पुस्तके वाचत होते तर कुणी वाचण्याचे नाटक करत होते.मला आठवते मला शाळेत असताना एवढेच माहिती होते की वर्गात नंबर मिळवण्यासाठी अभ्यास करायचा. याचा उपयोग काय?कुठे होईल?हे ठाऊकच नव्हते.
एकदा आईबाबा आम्हाला माहिती न होता आले मग काय घरात सर्वांनाच सतर्क करण्याची जबाबदारी माझी असल्याने मी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला.सर्वांनी आपापली पुस्तके ज्या विषयाची मिळतील त्या विषयाची पकडून वाचू लागले. तेवढ्यात मोठ्या बहिणीने आपल्या मोठया पुस्तकांच्या आतमध्ये उपन्यास ठेवून वाचत असल्याचे माझे लक्षात आले. गंमत अशी झाली होती की वरचे पुस्तक तिने उलटे पकडले होते. बाबांचे त्याकडे लक्ष गेले नव्हते, नुकताच वनस्पतींच्या अंकुराची अधोगामी, ऊर्ध्वगामी वाढ
याबद्दल विज्ञानात शिकवले होते.
माझ्यासमोर पुस्तक नसतांनाही ऊर्ध्वगामी, अधोगामी वाढ बद्दल जोरजोरात तिच्याकडे बघून हातवारे म्हणत मी अभ्यास करत असल्याचे बाबांसमोर दाखवले.हुशार असल्याने तिच्या चटकन लक्षात आले.
झालं त्यादिवशी पासून तिच्याकडून तिने वाचलेली कथा, कादंबरी, उपन्यास मला तिने दररोज झोपताना सांगायची असे आमचे ठरले.तेव्हा फार कुतूहल वाटायचे कोण असतील हे पुस्तके लिहिणारे लोकं, पुस्तक,कथा कसे काय लिहीत असतील. मोठ्या बहिणीला मी नेहमी म्हणायची माझं सुद्धा पुस्तक असेल असं.ती म्हणायची ते लोक वेगळे असतात त्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो.मला मात्र तिचेच हसायला यायचे कारण कोणत्याही कथेत, कादंबरीत अभ्यास कुठेही नसायचा.
त्यामुळे मला इतकी पुस्तके आवडायला लागली की मी नवव्या वर्गात असताना पहिली कादंबरी वाचली.त्यानंतर सरस्वतीचंद्र,गोदान, राऊ, ययाती,श्रीमान योगी,वेगवेगळ्या महापुरुषांची चरित्र, ऐतिहासिक कादंबऱ्या, बुद्ध आणि त्यांचा धम्म इ.ताई ग्रंथालय, मैत्रिणी कडून पुस्तके आणायची. पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावरही कादंबरी वाचनाची आवड सुरूच होती.पुढे बी.एड ला गेल्यावर राहिलेली वाचनाची कमी भरून काढली.तिथे ग्रंथालयात भरपूर तत्वज्ञान, मानसशास्त्र, आणि इतरही पुस्तके होती.
त्याचा परिणाम म्हणजे आता करोना सारख्या परिस्थितीत दोन वर्षे भरपूर लिखाण केले गेले. ‘कुतूहल’ म्हणून विज्ञान आणि ललित यांची सांगड घालून विद्यार्थ्यांसाठी, किंबहुना सर्वांसाठी उपयोगी आजूबाजूचे विज्ञान विषयक लिखाण केले.
इंडियन सायन्स टेक्नो फेस्टिव्हल मध्ये माझ्या सायन्स शॉर्ट स्टोरी ची निवड होऊन त्याला कांस्य पदक मिळाले.सध्या माझे वेगवेगळ्या मासिकांसाठी, ध्वनिमासिकांसाठी लिखाण सुरू आहे, लवकरच एक पुस्तक सुध्दा प्रकाशित होईल.
आयुष्य’ म्हणजे कठीण,विविध प्रसंगाचा एक गोफ… काळ्याकुट्ट अंधारात प्रकाशाची एक झलक मिळावी म्हणून सर्वांचा आटोकाट प्रयत्न चालू असतो.आणि मग ती प्रकाशाची एक झलक मिळाली, ओळखली की आयुष्य सुखकर होतं.
बर्याच वेळा आपल्या एका जगण्यात आपण खूप काही जगायचा प्रयत्न करत असतो. आपली खूप ध्येये असतात. आपली भरकटलेली नाती असतात. विखुरलेली स्वप्ने असतात.
माझ्या जीवनातही कथा सांगणारी माझी आजी, पुस्तके वाचनाचे व्यसन लावणारी माझी मोठी बहीण, आणि करोना लॉकडाऊन मध्ये वाचलेले रोंडा बायर्न लिखित,डॉ. रमा मराठे अनुवादित ‘रहस्य’ पुस्तकाची एक आवृत्ती,’जादू’.पुस्तक ,या तीनही गोष्टींनी माझे आयुष्यच बदलून गेले. त्यासाठी तिघांनाचेही खूप धन्यवाद.
