—शिल्पा धर्माधिकारी—
कथा
“दृष्टी”
नुकतीच सकाळची सगळी ऑपरेशनस् संपवून ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर चित्रा आपल्या केबिनमध्ये आल्या. रेग्युलर पेशंट तपासण्यासाठी OPD मध्ये जायला त्यांना अजून एक तास होता. त्यामुळे शांतपणे चहाचा घोट घेत टेबलावर पडलेलं वर्तमानपत्र वाचत होत्या. पहिल्याच पानावरील मायाच्या फोटोने आणि त्या विषयीच्या बातमीने त्यांच लक्ष वेधून घेतलं.
” गेली १२ वर्षे खेड्यापाड्यात नेत्रदानाविषयी जनजागृतीचे आणि प्रसाराचे काम अथकपणे करणार्या “मायाताई” यांना “नेत्रदान हेच श्रेष्ठ दान” ह्या अंतर्गत नेत्रदानाविषयी ग्रामीण भागात जनजागृती आणि प्रसार करण्यासाठी एका NGO तर्फे देण्यात येणार्या पुरस्काराने काल सन्मानित करण्यात आले. त्यांनी आपला हा पुरस्कार आपल्या “दैवत” मानलेल्या नामवंत आणि निष्णात नेत्रतज्ज्ञ डॉक्टर चित्रा यांना समर्पित केला आहे. “
हे वाचत असतानाच फोनची रिंग वाजली. उत्साह आणि आनंद मिश्रित आवाजात माया बोलत होती. “चित्राताई आजचं वर्तमानपत्र वाचलंत ना? मला माहित आहे की तुम्ही खूप बिझी आहात पण तरीही मला तुम्हाला भेटायचं आहे. प्रत्यक्ष भेटून तो पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमच्याकडून आशीर्वाद घ्यायचे आहेत. खेड्यातील एका मुलीच्या आयुष्याला अर्थ देऊन इथपर्यंत आणणाऱ्या माझ्या “दैवता”ला प्रत्यक्ष भेटून पुरस्कार समर्पित करायचा आहे. ” माया श्वास न घेता भरभरून बोलत होती.
“अगं हो हो! जरा श्वास घे. बरं सर्वात पहिलं तुझं खूप खूप अभिनंदन. तू खरोखरीच ह्या पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती आहेस.” नंतर थोड्याश्या लटक्या रागात त्या
म्हणाल्या,” आणि काय गं, तुला मला भेटायला अपॉइंटमेंट कशाला घ्यायला हवी. तू केव्हाही येऊन भेटू शकतेस.
“ठीक. मग मी आजच संध्याकाळी तुम्हाला येऊन भेटते.” एवढ्यावर त्या दोघींचे फोनवरील संभाषण संपलं.
‘पूर्वीचा मायाचा दबलेला, घाबरलेला आवाज आणि आजचा आनंदी, उत्साही आणि आत्मविश्वासाने भरलेला आवाज! केवढी मोठी तफावत, केवढा मोठा बदल! असं पाहिलं की वाटत आपलं जीवन सार्थकी लागलं.’ डॉक्टर चित्रा आपल्याच मनाशी बोलत होत्या.
काही गोष्टी, आठवणी, प्रसंग मनावर कायमच आपला ठसा उमटवून जातात. त्यातलाच एक मनावर कायमचा कोरला गेलाला प्रसंग म्हणजे त्यांची मायाशी झालेली पहिली भेट!
आज पुरस्काराच्या निमित्ताने आणि मायाशी साधलेल्या संवादाने त्यांच्या त्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
जवळपास 20 वर्षांपुर्वीची गोष्ट. अतिशय हुशार, कर्तबगार डॉक्टर चित्रा म्हणजे सळसळता उत्साह, वैद्यकिय सुविधांपासून वंचित असलेल्या खेडेगावातील लोकांसाठी काम करण्याच्या उद्देशाने प्रेरित असलेलं आणि काहीतरी वेगळं करून दाखविण्याच्या जिद्दीने झपाटलेलं असं व्यक्तिमत्त्व!
नुकत्याच जॉईन केलेल्या “नवजीवन ट्रस्ट आय हॉस्पिटल”च्या प्रत्येक कॅम्पमध्ये त्यांचे नाव कायम अग्रणी असायचे. झोकून देऊन काम करणाऱ्या, समजूतदार, मृदुभाषी डॉ. चित्रा अल्पावधीतच कॅम्पच्या टीम मेंबरपासून ते पेशन्टपर्यंत सगळ्यांचाच आवडत्या डॉक्टर बनल्या होत्या. दैवी देणगी लाभलेला यशस्वी हात, कुठल्याही सर्जरीमध्ये कौशल्यानं आणि सहजतेनं चालत असे. त्यांच्या नेतृत्वाखाली चालवलेला कुठलाही कॅम्प यशस्वी होणारच ह्याची खात्री असायची.
असेच एकदा भंडारा जिल्ह्यातील तुमसर ह्या गावात डॉक्टर चित्रा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत कॅम्प आयोजित केला होता. ५०० पेशन्टस् अपेक्षित असलेल्या कॅम्पमध्ये सकाळच्या 3 तासात जवळपास १०० ते १५० पेशन्टस् येऊन तपासणी करून गेले होते. कॅम्प यशस्वी होत असल्याचा आनंद टीममधील प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसत होता. पण अचानक १२ च्या सुमाराला गर्दीचा ओघ कमी कमी होत जवळपास थांबलाच.
गावातील मदतनिसाला विचारल्यावर तो म्हणाला , “जेवणाचा टाइम झाला ना म्हणून गर्दी कमी झाली हाय. थोड्यावेळाने यायला लागतील लोकं.” परंतु २ वाजले तरी तिथे कोणी चिटपाखरू फिरकलं नाही . रस्त्यावरून जाणार्या एकाला लोक तपासणीसाठी न येण्यामागचं कारण विचारल्यावर हळूच दबक्या आवाजात तो म्हणाला,” गावातील एक तरुण पोरगी अचानक मरण पावलीया. म्हणूनशान सारं गाव तिकड लोटलया बघा . आता तिच सारं झाल्या बिगर कोणी हिकड यायच नाय बगा.”
डॉक्टर – “पण कशाने गेली?”
तो – ” आंधळेपणानं जी.”
डॉक्टरांनी त्याला आश्चर्ययुक्त शब्दात विचारलं, “आंधळेपण हे मरणाच कारण आहे?”
तो – “व्हयजी.”
‘आजपर्यंतच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये आंधळेपणा हे मरणाचं कारण असू शकतं अस पाहण्यात आलं नाही कधी. खरंच हेच कारण आहे की दुसरं काही? एक नेत्रतज्ज्ञ म्हणून मला निश्चितच खर कारण जाणून घेतलंच पाहिजे. ‘ अश्या विचारातच त्या म्हणाल्या “मला तिच्या वडिलांना भेटायचे आहे. मला तिकडे घेऊन चला. “
“नग मॅडम. कुठे ह्या समद्याच्या फंदात पडताया.”
“अहो एक डॉक्टर ह्या नात्याने मी त्यांना भेटू इच्छिते.”
कसेबसे त्या गृहस्थाला समजावून डॉक्टर मदतनिसाला सोबत घेऊन त्यांच्याबरोबर मुलीच्या घरी गेल्या.
१८-१९ वर्षाच्या दिसायला सुंदर अशा त्या तरुणीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी तयार करत होते. ते सगळं पाहून डॉक्टरांना गलबलून आलं. एवढ्या लहान वयात मुलीचा असा अकस्मात मृत्यू व्हावा ह्या विचाराने त्या हेलावून गेल्या. तेवढयात तिच्यासारख्याच सुंदर दिसणार्या मुलीकडे त्यांचे लक्ष गेलं. तिच्या हालचालींवरुन ती चाचपडत आहे असं त्यांना जाणवलं. तिच्या हालचालींवर शंका येवून, शेजारी उभ्या असलेल्या गृहस्थाला विचारले, “ही कोण?”
“ही व्हय? ही तिची धाकली भन हाय. बघा देवाची बी काय करणी हाय. ही बी आंधळी हाय बगा.”
हे ऐकून डॉक्टरांच्या मनात “दोघी बहिणी आंधळ्या. म्हणजे काही फॅमिली हिस्टरी की अजून काही? असे विचार डोकावले. लगेच गावातील मदतनिसाला त्या म्हणाल्या, “मला हिच्या वडीलांना आता लगेच भेटायचं आहे.” डॉक्टरांच्या डोक्यात काय विचार चालू आहेत ह्याचा त्याला काही अंदाज येत नव्हता. जास्त विचार न करता तो त्यांना तिच्या वडिलांपाशी घेऊन गेला.
“खरंच खूप दुःखदायक घटना घडली आहे. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. मला कल्पना आहे की ही ती वेळ नाही पण तरीही राहवलं नाही म्हणून बोलते आहे. तुमच्या मोठ्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि धाकट्या मुलीचे आयुष्यदेखील अंधःकारात. मी डोळ्यांची डॉक्टर आहे. तुमच्या मोठ्या मुलीच्या बाबतीत आम्ही काही मदत नाही करू शकलो. पण धाकट्या मुलीला कदाचित अंधारातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न करू शकतो. तिचं जगणं सुसह्य करू शकतो. एकदाच मला तुमच्या मुलीचे डोळे तपासू द्या. आता लागलीच नाही पण आम्ही संध्याकाळी ६ वाजेपर्यंत इथे आहोत. त्या आधी तरी निदान.” असे बोलून त्या कॅम्प साइटवर परत निघून गेल्या.
संध्याकाळी ६ वाजता कॅम्पची आवराआवर करत असताना अचानक त्या घरातील एक माणूस धावतच आला आणि म्हणाला,” तुम्हासन म्हातार्यानं डोळं तपासायला बोलीवल हाय जी.”
“आपल्या समजवून सांगण्याला यश आलं” ह्या खुशीतच डॉक्टर त्या मुलीला पहाण्यासाठी त्यांच्या घरी लगबगीन गेल्या. तिचे डोळे तपासून त्या म्हणाल्या, “बुबुळ प्रत्यारोपणाने हिची दृष्टी परत येऊ शकेल अशी मला आशा वाटते.”
म्हंजी?
डॉक्टर – “सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कोणी डोळे दान केले की त्या दान करणार्याचे डोळे ऑपरेशनने हिला लावायचे. अर्थात तिला मॅच होणारे डोळे हं.”
“त्यानं हिला दिसाया लागंल?”
“नाही, तशी आम्ही पूर्ण खात्री नाही देऊ शकत.पण झाला तर फायदाच होईल,. नुकसान काहीच नाही. आणि हो ऑपरेशनचा पूर्ण खर्च हॉस्पिटल करेल. त्यामुळे तिच्या पुढच्या चांगल्या आयुष्यासाठी तुम्ही हा प्रयत्न जरूर करावा अस मला वाटतं.”
पण ते काही न बोलता नुसतेच ऐकत राहिले. वडीलांच्या मुकेपणातच संमती मानून डॉक्टर पुढे म्हणाल्या, “मला थोडी माहिती हवी होती. ह्या दोघींचे अंधत्व जन्मतःच की नंतर कुठल्या दुसऱ्या कारणाने?” “जी दोघीबी जल्मापासूनच आंधळ्या बगा.” आता त्या मुलीचे वडील मोकळेपणाने बोलू लागले होते. डॉक्टरांनी त्यांना आता जरा खोदूनच विचारलं, “मोठी मुलगी नक्की कशाने गेली?” ते उत्तर देण्यास उत्सुक नसल्याचे जाणवलं. “घाबरू नका. मी काही कोणाला सांगणार नाही.” डॉक्टरांच्या आवाजातील आपुलकीने त्यांना आता बोलतं केलं होतं. “आमच्या गरीबाच्या घरात देवानं रुपावानी अन् लई हुशार पोरी दिल्या बगा. पण देवानं लई अन्याव केला बगा त्यांच्यावर आंधळ्या बनवून. आवं कशीबशी पोटाची खळगी भरण्यापुरता पैका कामावतोया. त्यांना ना धड चांगला कपडालत्ता देऊ शकलो ना शिक्षण. रुपावानी तरुण पोर त्यातून आंधळी म्हंजे शापच कि वो. हात पिवळं करून टाकायचं तरी कुणा संग? शेवटी एका अपंग मुलासंग मोठीच लगीन लावलया. सहा महिन्यातच सासरच्या जाचाला कटाळून जीव देला वो पोरीनं.” तो रडतच बोलला
डॉक्टर विचार करू लागल्या. नाही मला निश्चितच त्या धाकट्या मुलीला मदत केली पाहिजे. तिला दृष्टी मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्या त्याच उद्देशाने तिच्या वडिलांना म्हणाल्या,” थोरलीच्या बाबतीत जे घडल ते घडल, धाकटीला तरी दृष्टी मिळवून देण्याचा प्रयत्न करू या. तिला सर्वसामान्यांसारखं आयुष्य मिळू द्यायचा प्रयत्न करू या. बघा, विचार करा आणि मला कळवा. पण बुबुळ प्रत्यारोपणापूर्वी तिच्या काही चाचण्या कराव्या लागतील. मग योग्य डोळा मिळाल्यावर ऑपरेशन. मी तुमच्या उत्तराची वाट बघते. ” असे कळकळीने बोलून डॉक्टर कॅम्पबरोबर आपल्या गावी निघून गेल्या.
१५ दिवसातच ते कुटुंब आपल्या धाकट्या मुलीला घेऊन शहरात डॉक्टर चित्रा यांच्याकडे घेऊन आले. तिच्या प्रत्यारोपणासाठीच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. नंतर योग्य डोळा मिळाल्यावर तुम्हाला बोलवू असे सांगून त्यांना गावाकडे परत पाठवले.
८ दिवसातच तिला योग्य असणार्या डोळ्याचे नेत्रदान झाले. नेत्रदान झाल्यावर काही तासातच प्रत्यारोपण करावे लागत असल्यामुळे तिला हॉस्पिटलची गाडी पाठवून ताबडतोब आईवडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये आणून अॅडमिट करण्यात आले.
काही तासतच डॉक्टर चित्राने तिचे बुबुळ प्रत्यारोपणाचे ऑपरेशन केले . तिने डॉक्टरांना विनंती केली की तिची डोळ्यावरची पट्टी काढायच्या वेळी तिचे आईवडील समोर असावेत. रोज आवाजाने आणि स्पशनि ओळखणाऱ्या आईवडीलांना डोळ्याने बघण्याचा आनंद तिला नेत्रदानाने मिळणार होता . पट्टी काढायच्या दिवशी ती खूप खूश होती. कधीही न पाहिलेलं, नुसत स्पर्शानं , वासानं आणि आवाजानं जाणवलेलं जग आज ती प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानं पाहणार होती याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून आणि एकूणच हालचालीतून जाणवत होता.
जेव्हा तिची पट्टी काढली तेव्हा आईवडीलांना समोर बघून तिचे डोळे पाण्याने भरून आले. हेच आपले आईवडील ह्याची खात्री त्यांना स्पर्श करून तिने करून घेतली. त्यांना घट्ट मिठी मारली. प्रत्येक वस्तूला हात लावत त्यांची मेंदूत नोंद झालेली नावे जोरजोरात घेत होती. टेबल असं दिसत? भिंत अशी असते? स्पर्शाचे ज्ञान आता ती नवीन आलेल्या दृष्टीत भरून घेत होती. अवती भोवतीचा परिसर ती उत्सुकतेने न्याहाळत होती. तिच्या ह्या सर्व हालचाली डॉक्टर चित्रा अनिमिष नेत्रांनी बघत होत्या. दृष्टी मिळाल्याचा आनंद तिच्या चेहर्यावरून ओसंडून वहात होता. आईवडील आनंदाने रडत होते. तिला नवीन दृष्टी मिळाल्याचा आनंद डॉक्टर चित्रांच्या डोळ्यातून अश्रू बनून वहात होता. आपले ज्ञान दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी उपयोगात येत आहे ह्याचा त्यांना आनंद होत होता. थोड्यावेळाने डॉक्टर तिच्यासमोर आल्या आणि म्हणाल्या,”माया, आता कसे वाटते आहे तुला?” ती हात जोडत डॉक्टरांना म्हणाली, “इतके वर्ष म्या अंधारच पहात व्हते. आता माझं आयुक्ष तुमच्यामुळे उजळून निघालं बगा. आज मी समदी दुनिया बघू शकते. आता मी दुसऱ्यावर अवलंबून न्हाय. मी स्वतंत्र झाली हाय. मला नवीन आयुक्ष देणार्या तुम्ही माझ्या “दैवत” हाय.”
तिचे आईवडील डॉक्टर चित्रांना हात जोडून म्हणाले, “तुम्ही आमच्या पोरीच आयुक्षच बदलून टाकलं बगा. कायम अंधारात जगलेल्या पोरीला तुमी जगण्याचा नवा अर्थ दिला. तुमचं लई लई उपकार हायत बगा आमच्यावर. आता लगोलग तिचं दुसर्या डोळ्याचबी आपरेशन करून टाका.” पुढच्या पंधरा दिवसात तिच्या दुसर्या डोळ्यासाठी बुबुळ प्रत्यारोपण करण्यात आलं.
ह्या बुबुळ प्रत्यारोपणाच्या यशानंतर डॉक्टर चित्रा, नवीन दृष्टी मिळालेल्या मायालासोबत घेऊन मायाच्या गावात जाऊन नेत्रदानाचे महत्व सांगून आल्या.
नेत्रदानामुळे दृष्टीहिन मायाला दृष्टी मिळाली आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. ती सर्वसामान्यासारखं आयुष्य जगू लागली. पुढे तिनं शिक्षण घेतलं.
नेत्रदानाचं महत्व नेत्रदानामुळेच दृष्टी मिळालेल्या मायापेक्षा अजून कोण चांगल्या प्रकाराने लोकांपर्यंत पोहोचवू शकणार होतं. त्यामुळेच तिने “नेत्रदान हेच श्रेष्ठ दान”चा प्रसार कधी डॉक्टर चित्राताईंसोबत तर कधी एकटीने खेड्यापाड्यात जाऊन केला आणि तो आज १२ वर्षे अव्याहत चालू आहे. त्याचेच फळ म्हणजे तिला मिळालेला हा पुरस्कार.
मायाच्या आठवणींमध्ये रमलेल्या डॉक्टर चित्रा पुन्हा एकदा वर्तमानपत्रातील मायाच्या फोटोवरून सार्थ अभिमानाने हात फिरवून, पेशंट तपासण्यासाठी OPD मध्ये निघून गेल्या.
