सनविवि ललित,साहित्योन्मेष अन् माझे आयुष्यच बदलले !

अन् माझे आयुष्यच बदलले !

—डॉ. सौ.अनुराधा भागवत—

यावेळेस मात्र’कोरोना ‘ने अगदी कहरच केला आहे, कुठल्याही प्रयत्नांना दाद न देता कोरोना पसरतच चालला आहे. आईला हॉस्पिटलमध्ये हलवायची वेळ आली व माझ्या काळजाने ठावच सोडला, खरं तर ही माझी सख्खी आई नव्हे. मी तिला आई म्हटलं व तिने मला मुलगी आणि आमचे ऋणानुबंध जुळले, जवळजवळ पंधरा सोळा वर्षांपूर्वी.

                                                                           तेव्हा मी एका संभ्रांत,सुशिक्षित सुस्थिर परिवारातील पदव्युत्तर शिक्षण घेणारी लाडकी लेक होते. लग्नाची बोलणी चालू होती, ठरल्या सारखंच होतं.एक दिवस घरी यायला मला उशीर झाला म्हणून मी चटकन् रिक्षा केली—आणि घात झाला. चालत्या रिक्षांत एक माणूस घाईघाईने चढला व त्यांनी रिक्षा आडरस्त्याला वळवली.हा माझ्या आयुष्यातील सर्वात दुर्दैवी दिवस. मी शर्थीने विरोध केला पण त्यांच्या पाशवी कृत्याने माझ्या शरिराचा बळी घेतलाच. नंतर त्या रिक्षावाल्याने मला घराजवळच्या एका बसस्टॉपवर नेऊन बसवले. जरा वेळाने मी थोडी भानावर आले व माझ्या लक्षात आले, इथे सर्वच मला ओळखतात. मी स्वतःला सांवरत उठले, सर्वांच्या नजरा चुकवत, तोंड लपवत मी घरी पोचले. पण आता घरही माझ्यासाठी आधार राहिलं नव्हतं. माझी एकूण अवस्था व घरच्यांनी केलेली थोडी बहुत चवकशी यावरून घरच्यांना अंदाज आला व एक दोन दिवस तर सर्वांनी माझ्याशी बोलणंच टाकलं. माझं सांत्वन तर सोडाच त्यांचच दुःख जास्त. सतत सर्वांचे सुतकी चेहरे. ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा करणं सोडाच, तक्रार करायलाही कोणी तयार नाही. गोष्टी लपवायचा प्रयत्न, आणि लग्न उरकून टाकायची घाई सुरु केली–तेसुद्धा त्यांच्यापासून सर्व लपवून. मला पटेना. सगळ्यांपासून, सगळं लपवत मी किती दिवस चोरट्यासारखं जगत रहायचं?आणि एवढं करून कळलं तर?तर सामना करायचा, मी एकटीनेच!मला जाणीव झाली, आता यापुढे खरं म्हणजे मला एकटीनेच सर्व भोगायचे,एकटीनेच जगायचे आहे. मग कशाला हे घर,ही नाती…. विचारांच्या भरांत,मी संधि साधून, माझ्यापुरतं सामान एका सूटकेसमधे भरून मी घर सोडले. घरापासून शक्य तितक्या दूर जाण्यासाठी स्टेशनवर गेले समोर दिसली त्या गाडीत शिरले. गाडी फारशी कुठे थांबत नव्हती. गाडीत दोन वेळा चहा घेतला पण हळुहळु भूक लागली. संध्याकाळ होत आली. मग एका स्टेशनात उतरले. कांहीतरी खाऊन घ्यावे म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे कळलं, मुंबई ला जाणारी बस इथे अर्ध्या तासात येईल. रात्री कुठे थांबायचं प्रश्नच होता. बस काय वाईट?मी तिकीट काढले, बसमधे सीटही मिळाली. मी बसमधे चढल्यावर निर्धास्त झाले. चला, उद्या सकाळी मुंबई, जिथे कोणीच कोणाला ओळखत नाही. उत्तम!

                                                                                    बसमधे माझ्या शेजारीच एक प्रौढ बाई व त्यांची मुलगी बसली होती. मुलगीI.A.S.च्या परिक्षेला बसली होती. लेखी परिक्षेनंतर मौखिक परिक्षेसाठी त्या दोघी निघाल्या होत्या. त्यांनी माझ्याशी बोलायला, माझी चवकशी करायला सुरुवात केली. मी खूप थकले होते, बोलायची इच्छा नव्हती. पण त्या खूप आस्थेने, मायेने विचारत होत्या, स्वरांतली आपुलकी हवीशी वाटत होती. त्यांना चांगली वाटेल अशी माझी माहिती मी त्यांना सांगत होते, हळुहळु मी पेंगायला लागले आणि कधी झोपेच्या आधीन झाले कळलंच नाही.

                                                                                   अचानक खडखड,दडदड आवाजाने व बसच्या धक्क्यांनी जाग आली. बस घाटामधे रस्ता सोडून दरीमध्ये घसरत जात होती उतारावरून खाली जात होती. बर्थवरचं सामान खाली पडत होतं, उभं रहायचा प्रयत्न करणारे कोसळत होते. कुणी घाबरून किंचाळत, ओरडत होते, जीवाची आशा सर्वांनी सोडलीच होती, आणि अचानक बस थांबली. एक मोठा खडकवजा दगड,लहान झुडुपांची जाळी, व एक झाड याला अडखळून,टकरून बस थांबली. ड्रायव्हरने इंजिन आधीच बंद केले असावे कारण आग वगैरे लागली नाही.सर्व प्रवासी उतरायची घाई करू लागले. दाराशी गर्दी झाली. आमची सीट तशी पुढेच, तिसऱ्या क्रमांकावर होती पण दारापर्यंत पोचणे अशक्यच. कंडक्टर सांगत होता, खिडकीतून बाहेर या. आईच्या डोक्यावर कांही सामान पडले, खोक पडली व ती खाली पडली. श्रुतीने तिचे हात व मी पाय पकडून तिला वर उचलले व खिडकीतून बाहेर काढू लागलो  आधी उतरलेल्या प्रवाशांनी बाहेरून आधार दिला व आईला बाहेर काढले. तिच्या मागोमाग मी व श्रुति आमच्या पर्सेस, पिशव्या, छोट्या हातातील बैग्ज,पाण्याची बाटली बाहेर फेकून खिडकीतून बाहेर पडलो. बाहेर मिट्ट काळोख. वरच्या रस्त्यावरून एखादी गाडी गेली तर दिवे लुकलुकत त्यावरून उंचीचा अंदाज येत होता. खूपच उंच चढावं लागणार होतं. श्रुतीने आईच्या जखमेवर रूमाल दाबून धरला होता. आई शुध्दीत नव्हती. श्रुति रडायलाच लागली. मी पुढे होऊन तिला धीर दिला. आम्ही आईला उचलून वर न्यायचा प्रयत्न करू लागलो. कुणी कुणी मदतही करू लागले. आधी वर पोचलेल्या लोकांनी दोन तीन ट्रक थांबवले. त्यांनी खाली दोर सोडले, स्वतःही मदत करू लागले. पोलिसही आले मदतीला.आम्ही वरपर्यंत पोचलो. आईला तुरंत हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक होते. पोलिसांनी एक गाडी थांबवली व आम्हाला बसवून दिले. जवळच्या गांवातील एका बऱ्यापैकी वाटणाऱ्या हॉस्पिटल जवळ गाडी थांबली.मला काय वाटलं कुणास ठाऊक मी एकदम पुढे झाले, तिथल्या नर्सला म्हटलं, ” माझी आई आहे, मला सांगा काय करायचं, कुठे सही करायची? ती बरी होईल ना? ” श्रुति भांबावून माझ्याकडे बघायला लागली. मी तिला एकीकडे नेऊन हळुच म्हटलं, ” उद्या तुझी परिक्षा आहे ना? तू नीघ यांच्याबरोबर, परिक्षा देऊन इथेच ये.तोपर्यंत मी थांबते आईजवळ.”

हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या होऊन आईवर उपचार सुरू झाले. तिच्या पलंगाजवळच खाली एक साडी अंथरून मी आडवी झाले.

                                                                     मनात विचार सुरु झाले, माझ्या नशिबाचेच.माझ्या आयुष्याची गाडी कांही दिवसांपूर्वी सरळ रस्ता सोडून  खाली घसरली होती. खाली खोल गर्तेत जात होती या बसप्रमाणेच. सर्व आयुष्य उंचच उंच उभ्या कड्यासारखं समोर भेडसावत होतं. आणि अचानक सर्व थांबले. या अपघातात माझा शेवट झाला असता तरी काय बिघडणार होतं,.. पण मी वाचले, श्रुतीला माझी मदत झाली. समोरचा भेडसावणारा कडा मी चढून आले, हा माझ्या भविष्याचा रस्ता होता. माझ्यामुळे श्रुति परिक्षेला जाऊ शकली, मी तिचे भविष्य सांवरलं.स्वतःबद्दल मला आस्था वाटू लागली, विश्वास वाटू लागला, थोडा अभिमानही. आई बरी झाली. श्रुति परिक्षा देऊन आली. त्या दोघी परत घरी जातील, माझं काय? पण आई म्हणाली,

” मला आई म्हटलंस ना? मग आता मला सोडून कुठेही जायचं नाही, माझ्याजवळच रहायचं.”

– आणि तेव्हापासून माझं आयुष्यच बदललं.. नव्हे मला नवीन आयुष्य मिळालं,नवीन परिवार मिळाला. आज  मी सुखाने जगते आहे ती केवळ त्यावेळच्या आमच्या दोन दिवसांच्या सहवासामुळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *