—रसिका राजीव हिंगे—
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
कोविड-19 चा प्रादुर्भाव ओसरल्यावर दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेचे प्रांगण विद्यार्थ्यांनी फुलून आले होते. या विद्यार्थीरुपी फुलांचा सुगंध मनाला मोहवीत होता. प्रार्थनेसाठी ओळीत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव दिसत होते. शाळेची सुरुवात बँडच्या तालावर एक सुरात प्रार्थनेने झाली अन विद्यार्थी आपापल्या वर्गात जायला निघाले. वर्गात जातांना सहज दोघी मैत्रिणींचा संवाद कानावर पडला.
“अगं स्वाती, मी विसरूनच गेले ग ही प्रार्थना! आज आठवतच नव्हती मला.”
“करायची काय पाठ करून? आपलं हे दहावीचे वर्ष आहे. पुढच्या वर्षी आपण कॉलेजला जाणार आहोत. तिथे काही नसते प्रार्थना वगैरे. झालं बाई, एकच वर्ष सगळे नियम पाळायचे.”
“हो, ते ही खरेच आहे.”
त्या दोघी तर निघून गेल्या त्यांच्या वर्गात. पण मला विचार करायला भाग पाडून गेल्या. दिवसाची सुरुवात करतांना प्रार्थना म्हणायची असते, ज्यामुळे दिवस आनंददायी होतो, मनाचे आत्मबळ वाढविण्यासाठी प्रार्थना करायची आहे, असे असतानाही मागचा पुढचा विचार न करता एका क्षणात उत्तर आले. का असं वाटावं. खरंच याचसाठी का हा अट्टहास मुलांना शिकविण्याचा! जणू असाच नियम असावा असे वाटले क्षणभर मला. फक्त परीक्षेसाठी अभ्यास करायचा अन मार्क मिळवून पास व्हायचे. चांगले करियर करायचे, मोठ्या पगाराची नोकरी करायची की झाली इतिकर्तव्यता. याचसाठी का ही धडपड. म्हणूनच लिहावीशी वाटली असेल समीर सामंत यांना ही प्रार्थना. कुठे चाललो आपण. मी मी किती करायचे. आपण समाजात राहतो तर त्याचं देणं लागतो हे कळतंच नाही आपल्याला. आजकाल साधारण हाच सगळ्यांचा समज असतो की माझा फायदा आहे का काही, तर मी करतो. अगदी तराजू लावलेला असतो. का असे संकुचित विचार येतात मनात. निसर्ग करतो का असा विचार, आपल्याला जगायला जे जे आवश्यक आहे ते सगळंच निसर्ग बहाल करतो. आपणही निसर्गाचाच एक भाग आहे, तरीही सतत फायदा तोटा तोलत राहायचे ही संस्कृती नाही आपली. असा विचार केला तर प्रत्येकाच्या मनावर कसे शुद्धतेचे चांदणे पसरेल? संस्कार लोप पावत चालले की, त्याचा वारसा पुढे चालविण्यात आपली पिढी कमी पडते आहे याचा विचार करायला लावणारा हा दोघी मैत्रिणींचा संवाद.
शिक्षणासाठी पर्याय म्हणून एकतर कोविडने ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल नावाचा राक्षस विद्यार्थ्यांना भेट दिला. त्यामुळे आधीच नको ते ज्ञान विद्यार्थ्यांना झाले आहे. ग्रेग हॉफमन याच्या आईने त्याच्या हातात स्मार्टफोन देतांना ज्या अटी घातल्या त्याच यांना घालायला हव्या होत्या, पालकांच्या मदतीने. आता मोबाईल वापरू नको, असे म्हणणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा ठरेल, कारण सगळी भिस्त त्याच्यावरच होती करोना काळात. भरीस भर उरल्या वेळात दूरदर्शन.
दूरदर्शन म्हणजे मानवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. करमणुकीचे एक साधन म्हणून त्याने अवघे जीवन व्यापले आहे. घरातील आधारवड, त्यांच्यासाठी तर दूरदर्शन एक पर्वणीच ठरली आहे. असे असले तरी घरातील स्त्री, सानथोर सगळेच मग ते कोणत्याही वयाचे असो अगदी समरस झालेले असतात संध्याकाळी या मालिकेतील व्यक्तींशी.
सहज संध्याकाळी एकदा मी दूरदर्शनवर मालिका पहात होते. मी उगाचच एका चॅनेल वरून दुसऱ्या चॅनेल वर उडया मारत होते, पण कुठेही मला पहावेसे वाटले नाही. कोणतीही वाहिनी असो, मराठी किंवा हिंदी, असं छान मनाला भावेल असे काहीच पाहता येत नाही असे मला स्वतःला वाटायला लागले. माझी आवड वगैरे बदलली की काय! मला पटल्या नाहीत मालिका यापेक्षा का पटल्या नाहीत, का आवडत नाहीत ह्याचा विचार मी करू लागले. जगण्याची पद्धतच बदलली आहे. जगण्याचे जे मापदंड असतात त्यात बदल झाला आहे असे मला वाटले. अर्थात काळानुरूप बदल अपेक्षित आहेत, ते स्वीकारले आहेत, पण इतके बदल की जगण्याची शैली वेगळी वाटावी.
प्रत्येक मालिकेत स्वतःचीच पोळी कशी भाजल्या जाईल याचाच फक्त विचार आहे. मग त्यासाठी काहीही करायची तयारी. म्हणजे अगदी जीव सुद्धा घेण्याचा प्रयत्न होतो आहे. खलनायक, नायक असावेत, याशिवाय कथानक बाळसे धरु शकणार नाही, पण त्यालाही कुठेतरी मर्यादा हवी. आदर्शाचा बळी देऊन हिसकावून घेणे हे पाहिले की मन सुन्न होतं. जे आहे त्यात समाधान मानणारी आपली संस्कृती. यामध्ये जे चांगलं आहे ते न घेता वाईटच घेण्याची वृत्ती असते सर्वसाधारण. मानव हा अनुकरणप्रिय असला तरी वाईट गुण लवकर आत्मसात केले जातात. हेच कमी झाले की काय, सोबत नेटफ्लिक्स, प्राईम व्हीडिओ, अमेझॉन प्राईम, हॉट स्टार हे ही आहेतच. युट्युब ने तर अक्षरशः धिंगाणा घातला आहे. तुम्ही काहीही शोधा सापडेलच तिथे.
प्रसार माध्यमांच्या जाळ्यात ही तरुण पिढी गुरफटली जाते आहे. यातून वेळ कसा मिळेल, केव्हा वाचतील आपल्या देशाचा जाज्वल्य इतिहास. होईल का ओळख आपल्या संस्कृतीची? “वाचाल तर वाचाल” हेच खरे आहे, सत्य आहे हे सांगायला हवे आहे, हा संस्कार घरातच व्हायला हवा आहे. शत्रूला सुद्धा माणुसकीने वागवणारा आपला देश. माणुसकीच्या पायावर उभी आहे आपल्या देशाची संस्कृती. पाश्चात्य आणि पौर्वात्यांचे अनुकरण करता करता आपण आपले नुकसान करून घेतो आहे, आपल्याच ज्ञानाच्या भरवशावर हे देश विकसित होत आहेत, आपण मात्र अजूनही विकसनशीलच आहोत, हे कळायला हवे तरुणाईला.
मी माझे माझे करतांना कधीतरी आपण सगळे असा विचार का येत नाही. स्वतः साठी फक्त असे असले तरी याचीही दिशा योग्य आहे का हे पाहायला हवे. नुसती पळापळ करण्यात काय अर्थ. तो धावतो आहे म्हणून मी धावतो. शर्यत असावी, पण समजून उमजून. सातत्य हवे. कासवाने सतत चालत राहून शर्यत जिंकली, धावत सुटला नाही. पुढच्यास ठेच लागली तरी मागचा शहाणा होत नाही. कारण त्यांच्या जवळ तेवढी विचार करण्याची शक्तीच उरली नाही असे वाटते. स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याचा कधीतरी प्रयत्न करावा असे वाटायला हवे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा प्रयत्न केला तर पोहता येईल. फक्त उडी मारण्याचे आत्मबळ हवे.
जे विचार करतात ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पण पोहून जातात. सारासार विचार करण्याची सद्बुद्धी जागृत झाली तर बदल निश्चित होईल, कारण निसर्गाचं चक्र फिरतं आहे…..
