शीर्षक : प्रतिमा – एक झुंज आयुष्याशी !
—प्रतिभा बिलगी —
स्त्री! जिला स्वतःची अशी ओळख नसते. जिचे अस्तित्व गृहीत धरले जात नाही. जिचा आत्मा मेलेला असतो. आणि ती बहुतेक करून तिचे वडील, भाऊ, पती आणि मुलांमुळे ओळखली जाते. तिच्या जिवंत राहण्याचा उद्देश फक्त आणि फक्त तिच्या कुटुंबाचा आनंद असतो.
स्त्री स्वतःच्या इच्छेने काहीही करू शकत नाही. एका अज्ञात भीतीचा तिला सदैव सामना करावा लागतो. तिला नेहमीच लढावे लागते – स्वतःचे अस्तित्व, स्वतःचा स्वाभिमान आणि सन्मान वाचवण्यासाठी.
या सर्व कारणांमुळेच आई-वडील, पती, शेजाऱ्यांच्या नजरेत प्रतिमा वाईट ठरली होती. तिचा दोष एवढाच होता की तिला स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. या खडतर जगात स्वतःची जागा निर्माण करायची होती. आयुष्यात जो गडद अंधार पसरला होता, तिला त्यातून बाहेर पडायचे होते. यासाठी ती प्रकाशाचा एक किरण शोधत होती परंतु जो खूप अंधुक दिसत होता. आणि या अंधुक प्रकाशात तिच्या नियतीचा मार्ग खूपच अस्पष्ट होता.
प्रतिमा गोंधळली होती. ती बरोबर आहे की चूक हे देखील तिला कळत नव्हते. तिने जो मार्ग निवडला होता, त्या मार्गात अनेक अडथळे होते. रस्ता इतका सोपा नसणार हे तिला अगोदरपासून माहीत होते.
स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडवणे, हे एवढे मोठे पाप ठरेल असे प्रतिमाला कधीच वाटले नव्हते. जी स्त्री आपले संपूर्ण आयुष्य इतरांसाठी जगते, तिला स्वतःसाठी जगण्याचा अधिकार नाही का? हा प्रश्न सतत तिच्या मनाला भेडसावत होता. हाच विचार करत-करत ती समुद्राच्या किनाऱ्यावर कधी पोहोचली, हे तिला समजलेच नाही. समुद्राच्या लाटा शांत होत्या, पण प्रतिमाच्या मनात उठणारा प्रश्नांचा कोलाहल खूप मोठा होता जो कोणालाच ऐकू येत नव्हता. आणि ऐकू जरी गेला असता तरीही समजला नक्कीच नसता !
प्रतिमाला उच्च नाव किंवा उच्च पद नको होते, तिला फक्त स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे होते ! प्रतिमाने आपले संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबासाठी अर्पण केले होते. आता तिला स्वतःच्या स्वाभिमानासाठी, समाधानासाठी, आनंदासाठी काहीतरी करायचे होते, ज्याला लोकांनी ‘बंड’ असे नामकरण करून तिची लढाई अजून बिकट करून टाकली.
प्रतिमाला राहून-राहून एकच विचार पडायचा की लोक इतके स्वार्थी कसे असू शकतात ? कोणाचा तरी अपमान करण्यात किंवा त्यांना दुःखी करण्यात एवढा आनंद का मिळतो ? आणि जेव्हा आपलीच माणसे आपल्या विरोधात उभी राहतात तेव्हा आयुष्यात पुढे कसे जायचे?
प्रतिमाला एका क्षणी वाटले की तिच्या या विचारांना कोणताच अंत नाही. प्रतिमाचे डोळे भरून आले. डोळ्यातून अश्रूंचे दोन थेंब ओसंडून समुद्राच्या लाटांत जाऊन मिसळले. त्या उफाळणाऱ्या लाटांकडे पाहून तिला कळून चुकले की स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तिला ही लढाई लढावीच लागणार. मग ही लढाई घरच्यांविरुद्ध असो वा समाजाविरुद्ध ! तिने घाईघाईने आपले अश्रू पुसले, रडणे थांबवले आणि मनात निश्चय केला की ती कधीही स्वतःला कमकुवत होऊ देणार नाही.
प्रतिमाचे मन थोडे हलके झाले. तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती. तिच्या कपाळावरच्या आठ्या नाहीश्या झाल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावरचा ताण संपल्यासारखा वाटत होता.
प्रतिमाचे पाय हळूहळू तिच्या घराकडे वळू लागले. नव्या उमेदीने, नव्या आत्मविश्वासाने, नव्या चैतन्याने! तिने मनाशी ठरवले की आयुष्यात कितीही अडथळे आले, कितीही अडचणींना सामोरे जावे लागले तरीही ती आपल्या निश्चयापासून मागे हटणार नाही. कष्टाने, हिमतीने आणि चिकाटीने ती समाजात नक्कीच आपला ठसा उमटवेल. आणि प्रियजनांसह या जगालाही दाखवेल की स्त्रीने दृढनिश्चय केल्यास काहीही अशक्य नाही. तिला हवे असते ते फक्त थोडेसे प्रेम, विश्वास, आधार, प्रोत्साहनाचे दोन शब्द आणि शक्य असल्यास थोडासा आदर !
आज प्रतिमा एक यशस्वी उद्योजिका आहे. तिला समाजात एक विशिष्ट स्थान आहे. तिच्यासारख्या कित्येक स्त्रियांना तिने आजवर मदतीचा हात देऊन त्यांना स्वावलंबी बनवले आहे. पण आजही जेव्हा तिला तो दिवस आठवतो जेव्हा ती परिस्थितीशी हताश होऊन समुद्राच्या किनारी आपल्या आयुष्याचा महत्वाचा निर्णय घेण्यासाठी गेली होती – जीवन किंवा मरण ! परंतु समुद्राच्या लाटांनी तिला लढायची हिम्मत दिली. लाटांच्या गर्जना जणू तिला सांगत होत्या की आयुष्यातील कष्टांना हरून जीव गमावणे हा काही पर्याय नाही. उलट कष्टांना सामोरे जाऊन लोकांसाठी एक आदर्श निर्माण करणे हा आहे. आजही ती त्याच समुद्र किनाऱ्यावर उभी होती – एकटी ! परंतु पूर्वीसारखी हताश नाही तर धीट, स्वावलंबी, आत्मविश्वासी, आनंदी आणि समाधानी ! आज तिच्या मनात विचारांचे वादळ नव्हते तर तिचे मन आज शांत, स्थिर होते !
प्रतिमाने समुद्राचे शतशः आभार मानले. कारण तो तिच्या जीवनाचा मार्गदर्शक ठरला होता. तो दिवस आणि आजचा दिवस! जमीन-आकाशाचा फरक होता ! कारण त्या दिवसापासून प्रतिमाच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली होती. म्हणून प्रतिमा तो दिवस कधीच विसरू शकली नाही. हाच तो दिवस होता ज्या दिवसापासून तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. याच दिवसापासून तिने आयुष्याशी झुंज देण्याचा निर्णय घेतला होता. नवीन आयुष्याची सुरवात केली होती आणि यात ती यशस्वीही ठरली होती !
“सुरुवात छान असेल तर, शेवटही सुंदर होतो
अशा वेळी आनंद, गगनात मावेनासा होतो
विश्वास दृढ असेल तर, नेहमी यशस्वी होतो
अन्याय-आक्रमा विरुद्ध, आवाज सुद्धा बुलंद होतो
अडी-अडचणींत अनेकांना मदत करण्या, सदैव तत्पर होतो
खऱ्याची बाजू घेण्यास तेव्हा, स्वतःही खंबीर होतो
निस्वार्थ मनाने केलेल्या कार्यांचा, निश्चितच विजय होतो
हरण्याचे भय वाटले जरी, शेवटी तो ही समाप्त होतो”