निसर्ग राजा

–रसिका राजीव हिंगे–

श्री 

तीर्थरूप निसर्ग राजा,

 प्रिय म्हणू की तीर्थरूप म्हणू? तीर्थरूप फक्त आईवडीलांनाच लिहायचे असते नाही का, बाकी सगळे तीर्थस्वरूप किंवा प्रिय. तुला तीर्थरूपच म्हणते कारण तू तर सगळ्यांचाच पिता आहेस, यापेक्षा मला बाप आहेस असे म्हणायचे आहे. खरे आहे न. तू समजतोस माझ्या भावना! उगाच नमनाला घडाभर तेल नको. असो.

     तुला पत्र लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे मला तुझे आभार मानायचे आहे. माझ्या बकेट लिस्ट मधीलच हे एक आहे. पण एक विचारायचेच आहे. तू असा कसा रे वागतोस? तू लहरी आहे हे माहीत आहे, पण आजकाल तर केव्हाही कोणतेही रूप धारण करतोस. अन काय रे निसर्गराजा, तू ऋतुचक्र वगैरे फिरवलेस की काय! चक्र फिरणारच पण त्याची गती? ती कुठे हरवली आहे. सगळ्या ऋतूंनी जागा बदलली की काय?

     आजकाल तू नेमेची येतो पावसाळा ही म्हण खोटी ठरवतो आहेस, येतोस तू पण त्याची काही वेळच नाही. केव्हाही कोणत्याही महिन्यात बरसत  राहतो, नाही तर स्वतःकडे डोळे लावून बसायला सांगतो.

     तुझ्या आषाढ सरी बरसल्या की काळी आई ओलीचिंब होते अन सुगंधाचे सोहळे सुरू होतात. कळत नाही रे काहींना तुझं रूप, पण ज्याला कळतं न तो तुझ्याशी एकरूप होतो बघ.

     श्रावणातील तुझं ते  मनाला वेड लावणारं विलोभनीय रुपडे, काळे सावळे मेघ जणू मृदुंग वाजवीत आहेत आणि त्या तालावर चाललेले जलधारांचे नृत्य, मध्येच एखादी प्रकाश शलाका यावी तशी लखलखीत सौदामिनी येऊन या नृत्याला सलाम करून जाते. रविराज हळूच आपल्या अस्तित्वाची दखल देत सोनसळी किरणांची लयलूट करतो.  कधी बेभान होऊन अंगात शिरशिरी भरवतो, कधी मंद निळी झुळूक होऊन तनामनाला उत्साहित करतोस. किती देत राहतोस रे. 

      शिशिरातली पानगळ सुद्धा पैंजणांचा मंजुळ नाद निर्माण करणारी, नव्याची आतुरतेने वाट पाहणारी अशीच. हा तुझाच नियम आहे न एकाची निर्वाणी तर दुसऱ्याची पर्वणी. तुझ्या अंकावर विसावलेले सगळेच हा नियम पाळतात.  

     काळ्याशार आभाळात सांडलेली चांदणफुलें आणि पुनवेचा तेजाळलेला चांदवा म्हणजे तुझ्या सौंदर्याचे परिमाण आहे.  तुझ्या दुधाळलेल्या शारदीय चांद्र प्रकाशात प्रीतीच्या समिंदरात अश्या काही बेभान लाटा उचंबळतात की तुझ्या निर्मितीला कडकडीत सलाम ठोकल्या जातो.

     वसंत ऋतू म्हणजे तुझा मास्टर स्ट्रोक. काय  सांगू तुला. (तुझेच तुला सांगते बरं) कोकिळेचा पंचम स्वर ऐकवू की मोगरा, चाफा, निशिगंध यांचा दरवळ सांगू, पळस, गुलमोहर, पांगारा यांच्या रंगसंगतीचे वर्णन करू. कसे काय तुला हे साधते. मानवात का नाही असे अष्टपैलूत्व. काही न काही कमतरता आहेच. 

     एकापाठी एक येणारे हे ऋतू एकमेकाना पूरक असे आहेत. हेमंतातली थंडी गारठून टाकते म्हणूनच शिशिराची पानगळ, वसंताची नवनिर्मिती, ग्रीष्मातील ऊन  वर्षा ऋतूमध्ये जलधारांचे रूप घेऊन बरसते. त्यामुळे शरदात  नटलेला पहायला मिळतोस तू.  तुझे चक्र अव्याहतपणे सुरू आहे म्हणून तर आम्ही जगतोय.

     रत्नाकराच्या स्वरूपात खळखळणारे तुझे जलरूप म्हणजे तारुण्याची मस्ती. अन खरंच तू त्याच्या तळाशी रत्न लपवून ठेवतोस! कमाल आहे तुझी. म्हणून तर मला नेहमीच वाटतं की तू खरा जादूगार आहेस.  बरं प्रत्येक ठिकाणी विविधता. भूगर्भात पाण्याबरोबर कितीतरी धातूंच्या,तेलांच्या खाणी तू सांभाळतोस. म्हणून मी सुरवातीलाच लिहिले न तुझे आभार मानायचे आहेत. तुझं हे विराट रूप पाहिले की आपोआपच नतमस्तक होते मी.

     सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून शिवबाच्या पाठी उभा राहिलास. गनिमाची धूळधाण करण्यासाठी, स्वराज्य स्थापनेसाठी. किती ही उदारता. हिमालयाची उंचच उंच पांढरीशुभ्र शिखरे आव्हान करतात शौर्याला. तसेच तिथली शांतता, आपले साध्य साधण्यास साधन आहेत ऋषीमुनींना, योगी महात्म्यांना. पर्वतराजीं संरक्षक तटबंदी जणू . सौंदर्याने नटलेल्या दर्याखोऱ्यातून , गुहेतून तूच वास करतोस परमात्मा होऊन.

     प्रत्येक प्राणीमात्रांना रहायला जागा हवी हा तुझा अट्टहास. यासाठी तू जंगल निर्माण केलं. स्वच्छंद पणे पशु पक्षांना विहरता यावे म्हणून.  जंगल निर्मिती केलीस म्हणून तो वरुणराजा प्रसन्न होतो. आम्ही बघ किती कृतघ्न, सरळ जंगलाच्या जंगल उध्वस्त करत आहे.

     समर्पण हा तुझा गुण  तू समस्त मानवजातीला दिला, उपयोग फारच थोडे लोक करतात.  जे असेल ते मुक्त हस्ते उधळत राहतोस.

     पण तुझं रौद्र रूप पाहिलं की भीतीने गाळण बसते रे. भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, ढगफुटी, अशी अस्मानी संकटे म्हणजे तुझंच रौद्र रूप. याला बहुतांशी आम्हीच कारण आहोत पटतंय आता. तुझ्याकडून आम्ही फक्त घेतच राहतो. वास्तविक पाहता तू दिलेलेच पुन्हा तुला अर्पण करत राहिले, तर चक्र फिरत राहील, जर जे आहे ते जपून वापरले तर. वैज्ञानिक प्रगतीच्या नावाखाली मानवाने जो विध्वंस मांडला आहे  त्यामुळे तुला प्रदूषणाचे रूप घ्यावे लागले.  तुला एक गुपित माहीत आहे का, आज जे हे विज्ञानाच्या टीमक्या मिरवतात न ते आधीच ऋषीमुनींनी शोधले आहे. काहीही नुकसान न करता. लागला होता तुला कधी धक्का पूर्वी!   वेगाच्या मागे धावतांना काय सुटतंय ते  कळत नाही. कोविडचे रूप घेऊन आलास की समस्त मानव जातीला समज द्यायला. दे माय धरणी ठाय केलंस सगळ्यांना.

     पण तुला आता आम्ही सगळे वचन देतो, तुझी काळजी घेणार आहे, तुझ्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणार आहे, लगेच जमेल की नाही माहीत नाही पण प्रयत्न नक्कीच असेल. 

     खूप दिवसांपासून तुझ्याशी संवाद साधायचा होता. म्हणून  हा पत्रप्रपंच. तुझंच रूप तुझ्यापुढे उकलण्याचा प्रयत्न केला . आता मस्त वाटतंय. सुरवातीला तुला मी बाप म्हणाले पण मनातलं सगळं लिहिल्यावर आता माझा सखा वाटतोय… कृष्णसखा. 

      तुझ्या सगळ्या रुपांना तुझाच अंश असलेल्या माझा साष्टांग नमस्कार…

    तुझीच

    रसिक सखी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *