क्रमश:

#मजा 

आपले घर नक्की कोणते? प्रत्येक मुलीच्या,बाईच्या मनात हा प्रश्न आयुष्यात एकदा तरी येतोच. म्हणजे जिथे जन्म होतो बालपण जाते तिथे सुद्धा तू तुझ्या घरी जाशील तेव्हा कर तुला काय करायचे ते हे पालुपद ऐकावे लागतेच. आता साधा एक टॅटू काढून घ्यायचा होता, त्यावेळी बाबा, आजी सगळे हो म्हणाले होते पण चक्क आई फितूर झाली. तिचे म्हणणे त्याच्यामुळे लग्न ठरायला प्रॉब्लेम येईल. लग्नानंतर तुझ्या घरी जा आणि काय करायचे ते कर. हातावरचा टॅटू बघताना परत जुन्या आठवणी वर आल्या. मुळात या जुन्या आठवणींची सुरुवात झाली होती आपले घर नक्की कोणते या प्रश्नाने. आता साधी गोष्ट इथे एखाद्या छोट्यासा बंगल्यातल्या घरात राहायची माझी इच्छा होती पण मयांकला मात्र अगदी गेटेड कम्युनिटी नाही पण अपार्टमेंट मध्येच घर हवे होते. आणि अर्थात त्याने स्वतःचेच म्हणणे खरे केले. तसेही हा कोणत्याही घरात दोन वर्षापेक्षा जास्त राहत नाही त्यामुळे ठीकच आहे म्हणत मी ही फार ताणून धरले नाही. तिसर्‍या मजल्यावरचे दोन बाल्कनी असलेले इतके हवेशीर घर मला आवडले की मी आवडून घेतले हे मात्र मलाच अजून कळले नाही. 

हो आई लागतंय घर हळू हळू, तसे चालत पाच मिनिटांच्या अंतरावर किराणामालाची दुकाने आहेत, भाजी फळे पण मिळतात. मला वाटले तेवढा भाषेचा प्रश्न येत नाहीये.’

खरं तर आईशी बोलायचा पण कंटाळा आला होता, पण बोलले नसते तर तिने फुकाचे टेंशन घेतले असते आणि मग ते दूर करण्यात जास्त वेळ गेला असता, त्यापेक्षा हे असे वरवरचे दोन पाच मिनिटे बोललेले बरं असं म्हणत मी तो फोन कॉल उरकला. त्यामानाने मयांकची आई सॉर्टेड, म्हणजे मेसेज पाठवला तरी त्यांचे काम भागायचे शनिवारी, रविवारी मात्र त्या निवांत गप्पा मारायच्या. चार वर्षात आपण आई आणि सासूमध्ये सासूला झुकते माप द्यायला लागलो; अरे देवा! बास आता.. असे स्वतःलाच समजावत मी विचारांची साखळी तोडली.

आधीच्या अनुभवांमुळे किंवा चांगल्या पॅकर्समुळे म्हणा पण यावेळी घर लवकर लावून झाले. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी तर लागतच राहणार पण आता घरात स्वयंपाक करताना सगळ्या गोष्टी हातासरशी मिळायला लागल्या होत्या. कपाटं कपड्यांनी भरून गेली होती. माळे फारसे नव्हतेच पण जे काही होते ते ही सामानानी भरून गेले होते. सगळे बॉक्स रिकामे होऊन रद्दीवाल्याला सुद्धा देऊन झाले होते. शेजार पाजार्‍यांची तोंडओळख झाली होती. नवीन जागेत सेटल व्हायला किमान दोन तीन आठवडे लागतील असे समजून मी महिनाभराचा ब्रेक घेतला होता. पण इथे तर एका आठवड्यात सगळे झाले पण होते. मी काय करू असे विचारल्यावर मयांक म्हणाला कशाला काही करतेस, मस्त झोपा काढ. टीव्ही बघ. तेव्हा आपण चुकीच्या माणसाला चुकीचा प्रश्न विचारला हे समजून घेऊन मीच गुगल बाबाला सोबत घेतले आणि माझा माझा प्लॅन आखला. साधारण एक किलोमीटर चालत गेले तर बस स्टँड होते आणि बस तिथूनच सुटायची त्यामुळे बसायला जागापण आरामात मिळेल असा अंदाज बांधत मी बेंगलोरमध्ये बसने फिरून यायचे. कोणतेही कारण नसताना उगाच फिरायचे. पायी फिरल्याने जेवढे शहर कळते तेव्हढे खचितच गाडीने फिरताना कळते. 

मयांक साडे-आठलाच डबा घेऊन गेला होता. बाकीचे सगळे दहापर्यन्त आवरून झाले होते. मग काय मी तशीच एक बॅग आणि पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडले. मोबाइलवर रस्ता शोधत शोधत आजूबाजूला बघत मी चालत होते. कोणती दुकाने, बँक, ATM सगळ्याची नोंद मी मनात ठेवत होते. बस स्टँड दिसला आणि बस पण दिसली, आता ही लगेच निघाली तर पुढच्या बसपर्यंत मला थांबावे लागेल म्हणून मी जरा पळत पळतच बस गाठली. जाऊन बघते तर कंडक्टर, ड्रायव्हर अगदी आरामात बसले होते, बस मध्ये इन मीन चार जण होते. तरीही 10.45 ला सुटायची बस 10.46 लाच सुटली. बसचा पुढचा भाग महिलांसाठी राखीव असतो हे ऐकून होते त्यामुळे मी खिडकी पकडून तिकडेच बसले. किती वर्षांनी आपण बस मध्ये प्रवास करत आहोत याचीच मला गंमत वाटत होती. आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट फारच हलक्यात घेतो. पण त्यातली मजाच वेगळी असते. 

दोन स्टॉप गेल्यावर जरा बस भरली तेव्हा कंडक्टर आला. 

‘लास्ट स्टॉप’

‘कार्ड तोरसी’ (कार्ड दाखवा) 

हा कोणते कार्ड मागतोय हेच मला कळेना, आता इथे तिकीट पण कार्डवर घेतात का काय, मी आपले म्हणाले, ‘नो कार्ड, कॅश’

‘याके? कार्ड इल्ला? फोनअल्ली इद्रे कुडा नडेयुत्ते.’ (का? कार्ड नाही का? फोनमध्ये (कॉपी) असली तरी चालेल.)

हे सगळे काय चाललय मला कळत नव्हते. अरे देवा हे आता काय नवीन  असे मी पुटपुटत होते, तर एकदम मागच्या सीटवरची आजी म्हणाली, ‘तुमी मराठी काय? कन्नडा येत नाय?’

त्याक्षणी मला अक्षरश: ती देवदूत भासली. ‘मी नवीनच आले आहे बेंगलोरमध्ये पहिल्यांदाच बस प्रवास करत आहे, हे काय विचारात आहेत मला कळत नाहीये.’

तिने ते ऐकले आणि मग कंडक्टरला काहीतरी सांगितले त्यावर तो तिला काहीतरी म्हणाला मग माझ्याकडे बघून ती म्हणाली, ‘तेला तीस रुपये दे.’

तीस रुपये देण्यासाठी कार्ड कशाला हे माझे कोडे काही सुटत नव्हते. त्याने तिकीट दिले, पण मी नंतर बघितले तर बाकीच्या बायकांकडून तो पैसे घेत नव्हता. मग मी स्वतःहून परत त्या आज्जीना विचारले, ‘तो मला कोणते कार्ड मागत होता? तुमच्याकडून त्याने पैसे का नाही घेतले?’

माझ्याकडे बघत ती हसत म्हणाली, ‘इत बायकांना प्रवास फ्री आहे, पण त्यासाठी तुमचे ॲड्रेस असलेले कार्ड दाखवावे लागते. त्याला तू इथलीच वाटली म्हणून त्यानं आदी कार्ड मागितले.’

‘ओह असे आहे होय. म्हणजे बायकांना फ्री प्रवास आहे की फक्त कन्नड बायकांना फ्री आहे?’

‘कर्नाटकातला पत्ता असला की फ्री, माझा पत्ता बेळगावचा आहे.’

बेळगाव ऐकल्यावर मला जणू कोणी माहेरचा भेटल्यासारखेच वाटले. आधी मराठी ऐकून दिल खुश झाला होता, आता अगदी गार्डन गार्डन झाला होता. 

मला खरेतर त्या आजीशी खूप काही बोलायचे होते. विचारायचे होते पण पुढच्याच स्टॉप वर त्या उतरून गेल्या. बस बर्‍यापैकी भरली होती. लोकं चढत होते, उतरत होते. मी बसच्या खिडकीतून दिसेल तेव्हढे बेंगलोर बघत होते. पाट्या वाचत होते. एकीकडे इथल्या स्थानिक भाषेचा आग्रह दिसून येत होता, पण भाषा जपण्यातली त्यांची आस्था पण योग्य वाटत होती. त्यांची भाषा त्यांनी नाही जपली तर कोण जपणार!

मॅजेस्टिक येईपर्यंत परत आम्ही इन मीन चार जण राहिलो होतो. आपण असेच बसून राहून याच गाडीतून परत जावे का या विचारात असताना एक मन म्हणाले, आता इथवर आलोच आहोत तर हा भाग पण बघून घेऊ की, जरा चालून बघू आणि मग काय खाली उतरून मी ही चालणार्‍या गर्दीचा भाग झाला. कुठे जायचे हे मला माहीत नसताना चालायला लागले, ज्या बाजूला जावेसे वाटले त्याबाजूला चालत गर्दीचा भाग कधी झाले हे मलाही कळले नाही. हेच असते बहुदा शहराचा भाग होऊन जाणे. त्या गर्दीत माझ्यासारखे कन्नड न येणारे, कन्नड येणारे, स्थानिक, परप्रांतीय सगळेच असणार पण शहर तुम्हाला काहीच विचारत नाही. तुम्ही त्याच्याकडे प्रेमाने बघितले तर तेही तुमच्याकडे प्रेमाने बघते असा अनुभव घेत मी चालत राहिले. फळवाले, फुलवाले, नंदिनी डेयरी, भुयारातली दुकाने, ते विक्रेते बघून मला क्षणभर मुंबईत आहोत का काय असेच वाटले. मला माझ्या जुन्या शहराची साम्यस्थळे दिसायला लागली आणि हे नवीन शहर आवडायला लागले.  

         असाच गर्दीत आईचा हात घट्ट पकडून दुसर्‍या हातात भिरभिरे धरून चालणार्‍या मुलाचा तिने फोटो काढला आणि इन्स्टाग्रामवर डकवताना लिहिले, आधार असला की कुठेही हरवल्यासारखे वाटत नाही!! अर्थात हॅश टॅग #मजा होताच.

–मानसी होळेहोन्नूर

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *