— निवेदिता शिरवटकर —
नमस्कार!
माझ्या लेखक आणि प्रतिस्पर्धी मित्र मैत्रिणींनो,
खरतर अश्या प्रकारच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची माझी ही पहिलीच खेप आहे. म्हणून आम्हा सर्वांना ही संधी प्राप्त करून दिल्याबद्दल संपूर्ण सनविवि टीमचे खूप खूप आभार .
प्रत्येक महिन्यात आपल्या सर्वांच्या भेटीला येणारा हा सहित्योन्मेष स्पर्धेचा अंक दिवसेंदिवस अधिकाधिक उत्सुकता वाढवत आहे.
आधीच्या अंकामध्ये आपल्या लेखातून जी काही छाप प्रत्येक लेखक पाडत आहे ती कुठेतरी मनावर रेंगाळत राहते . त्यामुळे ह्या महिन्याच्या अंकात तुम्हा सर्वांकडून नवीन काय वाचायला मिळणार अशी उत्कंठा द्विगुणित होत आहे .
जेव्हा कोणीही लेखक स्वतःचे विचार त्याच्या लेखातून किंवा कथेतून मांडत असतो तेव्हा तो एकप्रकारे आपल्याशी जणू काही संवादच साधू पाहत असतो असं मला नेहमी वाटते.
आणि इथे तर एक नाही तर इतके लेखक एकाच वेळी त्यांचे विचार मांडत आहेत. त्याचबरोबर आपण स्वतः सुद्धा ह्या उपक्रमाचा एक भाग आहोत हा अनुभव मला निराळा वाटतो. त्यात भरीस भर म्हणून स्पर्धेची चुरस !
तुम्हा सर्व लेखकांचे वैविध्यपूर्ण लेख अन् त्यातून उमटणारे , फुलणारे विचार त्या त्या लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाची छाप कळत नकळत आपल्या मनावर पाडून जात नसतील तर नवलच ! …..
मंडळाच्या सदस्याकडून मिळणारे उत्तेजन आणि कौतुकाची थाप प्रेरणा देऊन जाते.
त्यामुळे दर महिन्याला अंक हातात येईपर्यंत वाटणाऱ्या ह्या आगळ्या वेगळ्या उत्सुकतेचा आनंद मी तरी मनमुराद लुटायचे ठरवले आहे.
तुम्हा सर्वांना माझ्या तर्फे खूप धन्यवाद !!