अभिप्राय

          मेघदूत ही कालिदासाची अजरामर रचना.  आपल्या पत्नीचा विरह सहन करू शकत नसलेल्या यक्षाची सुरस कथा. कुबेराच्या शापामुळे यक्षाला एक वर्ष आपल्या नवपरिणीत पत्नीपासून दूर राहावे लागत होते. आपले  क्षेमकुशल  कळवण्यासाठी यक्ष एका मेघाची मदत घेतो व संदेश पोचविण्याची विनंती करतो. संदेश सांगण्यापूर्वी यक्ष मेघाला प्रवासात लागणारी वेगवेगळी ठिकाणे सांगतो , तसेच कोणते प्रदेश वर्ज्य करावेत हेही  सांगतो .  उज्जैन, बनारस, विदिशा या प्रदेशांबरोबर  फुले, फळे, झाडे,पक्षी, प्राणी यांचेसुद्धा  मेघदूतात फार सुंदर  वर्णन केलेले आहे.  डॉ धनश्री लेले यांनी ह्या संस्कृत काव्याचे  श्रोत्यांच्या समजेल अशा सोप्या व  अतिशय रसाळ भाषेत इतके सुरेख विवेचन  केले की ,  दीड  तास कसा गेला हे अजिबात कळले नाही. संस्कृत भाषेचा त्यांचा व्यासंग व प्रभुत्व पदोपदी  जाणवत होते. 

           मूळ  संस्कृत  श्लोकांबरोबर मध्ये मध्ये बा .भ. बोरकर आणि शांताबाई शेळके यांचे मराठीत भाषांतरित केलेले श्लोक slides वर दाखवले होते ते  सुद्धा अतिशय भावले.   कृश  झाल्यामुळे  यक्षाच्या  हातातले कंकण हातातून गळून  पडले ; असे कालिदास म्हणतो त्यावर हाताच्या पंजावरून कंकण बाहेर येणे किती कठीण आहे व ते कदाचित दंडाच्या दिशेने गेले असले पाहिजे हा बोरकरांचा युक्तिवाद सुद्धा अतिशय समर्पक होता . 

          ‘सवाल-जवाब’ हे गिरीश दातार यांचे  सद्य परिस्थितीवर सादर  केलेले  राजकीय विडंबन होते.  कलावतीबाई या लावणी कलाकाराच्या संचावर अश्लीलतेच्या नावाखाली राजकारणी नेत्याच्या भाडोत्री गुंडांनी हल्ला  केला होता, म्हणून कलावतीने पोलिसात तक्रार नोंदवली होती. आपले साहेब गोत्यात येऊ नयेत म्हणून त्यांचा  सचिव समझोता  करण्यासाठी कलावती  बाईंकडे  येतो, आणि तिला तक्रार मागे घेण्याची विनंती करतो. वेगवेगळे तपशील देऊन  ती विनंती साफ धुडकावून लावते.

सामोपचाराने प्रकरण मिटवून टाकण्यासाठी सचिव  कलावतीबाईंसमोर एक  वेगळाच प्रस्ताव मांडतो.

क्षुल्लक कारणामुळे  भावना दुखावण्याचा सध्याच्या काळात प्रक्षोभक विषय टाळून  एक  निरुपद्रवी असा ” पर्यावरण ” विषय लावणीसाठी घ्यावा अशी विनंती करतो.  तेव्हा त्या लावणीमधून कंत्राटदार व राजकीय नेत्यांचे साटंलोटं, प्रदूषित नद्या या बाजूंवर जळजळीत भाष्य करतात.

  खणखणीत संवाद व त्याला साजेशा संगीत व नृत्याने  कार्यक्रम अतिशय रंजक झाला. अश्लीलता, अब्रुनुकसानी, देशद्रोह या विषयांवर सामाजिक व राजकीय पक्षांच्या दांभिक भूमिकेवर  भाष्य करण्यात आले . सद्य परिस्थितीत  जेंव्हा कुंपणच शेत खाते ,तेव्हा लोकशाहीची गळचेपी कशी होते याचे अतिशय समर्पक वर्णन करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

           गिरीश दातार व सुकन्या गुरव या द्वयींचा रंगमंचावरील वावर आणि अभिनय कौतुकास्पद !!

‘ज्याचा त्याच विठ्ठल’ हा अमित वझे, मधुराणी गोखले यांचा दृक-श्राव्य अभिवचनाचा सांगीतिक प्रयोग रविवारी २० तारखेस पार पडला. टेक्सास मध्ये  एका  शाळेत शिकवणारी शिक्षिका; तिच्या  वर्गामध्ये झालेल्या बेधुंद गोळीबारामुळे एका निरागस विद्यर्थ्याचे  निधन होते. यामुळे  ती  अस्वस्थ होऊन  भारतात येते .  व्यक्ती स्वातंत्र्य,  Personal Space, Privacy  ही मूल्ये जपणाऱ्या सौदामिनीला  निरपेक्षतेने कोणी मदत करू शकते यावर  विश्वास नसतो.  लहानपणीच कुटुंबाला मुकलेल्या तिला, आपले असे कोणी वाटतच नसते.  मित्राबरोबर ती पंढरपूरच्या वारीमध्ये सामील होते.   प्रत्येक दिवशी वेगवेगळी लोकं भेटत जातात. एकदा  ती आजारी पडली असताना एका निरक्षर वृद्ध बाईनी केलेली मदत पाहून तिचा माणुसकीवरचा विश्वास पुन्हा बसतो.  तिच्या  दुःखावर  हळुवारपणे  फुंकर घातली जाते आणि तिचा जगाकडे बघायचा दृष्टिकोन बदलत जातो..

          कार्यक्रमातील निवेदनाइतकेच गायन आणि वादनही  सुश्राव्य होते. 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने १८-२० सप्टेंबरमध्ये  ज्ञानयोग, कर्मयोग व भक्तियोग यांची सांगड घालणारे तीनही कार्यक्रम वाखाणण्याजोगे झाले. सर्व कलाकारांचे  मनःपूर्वक अभिनंदन व  अशा दर्जेकर कार्यक्रमाचे औचित्यपूर्ण  नियोजन केल्याबद्दल महाराष्ट्र मंडळाचे  मनःपूर्वक आभार. 

राजन परुळेकर 

अनुक्रमणिका

1 thought on “अभिप्राय”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *