अभिप्राय

कमलाबाई मराठे एकांकिका स्पर्धा

सप्रेम नमस्कार, 

          महाराष्ट्र मंडळ बंगलोर गणेशोत्सव २०२५  – श्रीमती कमलाबाई  मराठे एकांकिका स्पर्धेविषयी थोडेसे…

          स्पर्धा दुसऱ्या शनिवार रविवारी असल्यामुळे स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना खूप सोयीचे झाले. दिग्गज परीक्षकांना आमंत्रित करणे,  पूर्वी नाटकांमध्ये बहुमोल कामगिरी केलेल्या श्री ब्रम्हे काकांना दीप प्रज्वलनाचा मान देणे, अल्पोपहार व चहा कॉफीची व्यवस्था करणे, तसेच कार्यक्रम वेळेवर सुरू करून त्याची सांगताही वेळेत करणे यामध्ये आयोजकांचे कौशल्य आणि कार्यपद्धतीची प्रचिती आली.  त्याबद्दल त्यांचे कौतुक.

          नम्म बेंगळूरूतील सर्व मराठी मंडळांनी कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतला. आत्ताच्या व्यग्र जीवनशैलीतून वेळात वेळ काढून एकांकिका सादर केल्या. सर्व कलाकार, पडद्यामागील कलाकार, सहाय्यक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अथक परिश्रम आणि कष्ट दिसून आले. सर्वांचे विशेष कौतुक.

एकांकिकेविषयी थोडेसे… 

          हलकाफुलका विषय , दर्जेदार अभिनय , वेशभूषा,  प्रकाश योजना आणि एकंदरीतच आनंद देऊन जाणारी एकांकिका म्हणजे  ‘भ्रमणांती परमेश्वर’

          जीवनातल्या आणि सध्याच्या काळातील कठीण प्रश्नांवर आधारित ‘त्सुनामी’, ‘सुरवंट’ व ‘चूक कोणाची’  या एकांकिका.

          त्यातील ‘त्सुनामी’ मधील दर्जेदार अभिनय,  उत्कृष्ट नेपथ्य आणि संगीत आवडले. याशिवाय वातावरण निर्मितीसाठी जळलेल्या दुधाचं भांड प्रेक्षागृहात फिरवणे ही आगळी वेगळी कल्पना भावली. पण एकांकिका दुःखांती दाखवली हे मात्र खटकलं.

          ‘चूक कोणाची’ यामधील अभिनय, विशेषतः मुलीचा आटापिटा खूप सुंदर  वठवला. 

          तसेच सुरवंट मधील सुनेचा दिलखुलास स्वभाव, समजूतदारपणा,  नवऱ्याला मदत करणे हे गुण अभिनयातून दिसून आले.

दोन्ही एकांकिका सुखांती दाखवल्या हे आवडले.

‘अपघात’  मधील अभिनय,  वातावरण निर्मिती आणि नेपथ्य आवडलं. 

‘आम्ही सौजन्यात आहोत’ मधली धमाल यामुळे मनोरंजन झाले.

          एकंदरीत दोन दिवस उत्तम मनोरंजन झाले.  निकालासाठी थांबू शकले नाही त्यामुळे कोण विजेते हे कळले नाही.

           माझ्यामते महाराष्ट्र मंडळाविषयी आस्था असणारी सर्व मंडळे विजेती आहेत.

धन्यवाद 

डॉ. भारती देव.

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *