---वर्षा सबनीस---
१९६० -१९७० च्या सुमारास मध्यम वर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या पिढीला, चारचाकी वाहनांचे अप्रूप असायचं. रस्त्यावर तेंव्हा तुरळक दिसणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये फक्त ambassador आणि फियाट दिसायच्या . त्यांचे मालकही फार रुबाबात असायचे . त्यांना” मोठी लोकं “असे संबोधले जायचे . आम्हाला मात्र, तेंव्हा आमच्या कडे असलेली स्कूटरच “लईभारी” वाटायची. आम्ही आपली सायकल फिरवण्यातच
खुश असायचो. तेंव्हा आपणही कधीतरी कार चालवू असे मनातही आले नव्हते.
१९८० च्या सुमारास वाहन उद्योगात प्रचंड क्रांती घडून आली आणि त्यानंतर लोकसंख्ये प्रमाणेच , चारचाकी वाहनांची संख्या ही वाढू लागली . लोकांची खरेदी करायची क्षमता वाढू लागली . देवाच्या कृपेने आमच्याही दारी कार उभी राहिली. साश्रू नयनांनी गाडीची पूजा झाली आणि आता आपलीही गणना मोठ्या लोकांमध्ये झाली की काय,असे वाटून उगाचच छाती रुंद झाली .
आता गाडी चालवायला शिकायची असे ठरले ,म्हणजे मीच ठरवले. कारण “ बायकांना काही नीट गाडी चालवता येत नाही , ट्रॅफिक जॅम करतात ,” वगैरे वगैरे,असा जनमानसात गैरसमज होता. आमचे नवरोजी तर त्यांचा जन्म झाल्या नंतर, नर्सिंग होम मधून आईला कार चालवत घरी घेऊन आले होते , अशा थाटात असायचे. “तुम्ही आपले बाजूला बसूनच गाडीची मजा घ्या “ ह्या मताचे. पण मी कोण ऐकते आहे ? मी ठरवले म्हणजे ठरवलेच .
बरेच दिवस मनधरणी करून, शेवटी एक दिवस गाडी शिकवायला तयार झाले आणि आमची वरात निघाली . सकाळी गर्दी कमी असलेले मोकळे रस्ते निवडले .सुरुवातीची माहिती देऊन , हे म्हणाले, चला,सुरू करा . मनावर प्रचंड दडपण आले होते, तळहाताला घाम फुटला होता . मनातल्या मनात देवाचे स्मरण केले आणि....... Clutch वरचा पाय दिला सोडून आणि तितक्याच जोरात accelator वर पाय दाबला . त्या गाडीचा झाला घोडा आणि आमच्या वर झाली कौतुकाची बरसात. भर रस्त्यात गाडी बंद पडली. मागच्या गाड्यांचे भोंगे वाजायला लागले. मला काय करावे कळेना. त्यानंतर ह्यांनीच गाडी चालवली.घरी आल्यानंतर.... “सोडून द्या तुमचा हट्ट , ह्या जन्मात फक्त चाला, गाडी वगैरे पुढच्या जन्मी बघू “...इत्यादी इत्यादी..मुक्ताफळं आमच्यावर उधळली गेली . आमच्या उत्साहाचे असे खच्चीकरण झाले तरी मी पिच्छा सोडला नाही आणि एका ड्रायव्हिंग स्कूल मध्ये नाव नोंदवले. त्याबरोबरच अजून एक निर्णय घेतला. नवऱ्याकडून कार चालवायला शिकायची नाही . ड्रायव्हिंग स्कूल च्या कार ने आमचे शिक्षण सुरू झाले .चार पाच दिवसांनंतर असे वाटले की आता आपल्याला बऱ्यापैकी गाडी चालवता येते. आता आपली कार चालवून बघू या .
एक दिवस गुपचुप कुणाला न सांगता , नवरा घरी नसताना , गाडी काढली . गेट मधून बाहेर रिव्हर्स केली. गेटच्या बाहेर पावसाच्या पाण्याचे गटार होते .गाडीचे डावीकडचे मागचे चाक अर्धे त्या गटारीत गेले . आता गाडी पुढेही नेता येईना, मागेही नेता येईना. गेटच्या मधोमध तिरपी अडकून पडली. संध्याकाळी सगळे घरी आले तर त्यांच्या गाड्या गेटमधून आत येऊ शकतं नव्हत्या . मला कुठे लपून बसू असे झाले. पण त्यादिवशी माझे हसे न करता, “हरकत नाही ,,असे करतच शिकाल .” असे म्हणून माझे समाधान केले .
एक दिवस परत हिंमत करून गाडी चालवायची ठरवली . Garage च्या बाहेर डावीकडे पावसाच्या पाण्याचे गटार आणि उजवीकडे फुलझाडांच्या कुंड्या होत्या .रिव्हर्स केले तर एकदा गाडी तिरपी जाऊन , दोन कुंड्या धारातीर्थी पडल्या. परत कशीबशी गाडी सरळ केली .परत रिव्हर्स केली तर डावीकडे गटारीत. आता मात्र बोलणी खावी लागणार असे वाटत असताना , एक ओळखीचे काका देवासारखे धावून आले. त्यांनी गाडी सरळ करून परत गॅरेज मध्ये लावली. मग आमची मात्र अळीमिली गुपचिळी. संध्याकाळी काही झालेच नाही, अशा थाटात गुपचूप बसून राहिले .पण शहीद झालेल्या कुंड्यांनी आमची शौर्य गाथा जगजाहीर केलीच.
ड्रायव्हिंग स्कूलच्या कार मध्ये clutch आणि accelerator , त्या ट्रेनरच्या पायात पण असतात ,हा शोध मला नंतर लागला . म्हणजे आता आपल्याला बरी गाडी चालवता येते असा आपला गोड गैरसमज होतो पण प्रत्यक्षात तोच क्लच , ब्रेक वापरत असतो .त्यामुळे ड्रायव्हिंग स्कूलचा उपयोग फक्त लायसेन्स मिळवण्या पुरताच झाला.
त्यानंतर मात्र मी आणि माझ्या जावेने एक योजना आखली . काहीही झालं तरी चांगली गाडी चालवता आलीच पाहिजे असा चंगच बांधला होता. एव्हाना थोडा गाडी चालवायचा अंदाज आला होता. मग आम्ही दोघींनी एकत्र सराव करायला सुरुवात केली . एकमेकींना खूप प्रोत्साहन देत रोज कार चालवायला लागलो. परस्पर प्रशंसक समितीने खूप चांगले काम केले आणि आम्ही दोघी हळूहळू चांगली गाडी चालवायला लागलो.
कुठलेही काम, कला शिकताना खूप अवघड वाटते. पण एकदा शिकलो की मग असे वाटते की “ त्यात काय एवढं अवघड “ .महत्वाचे हे की शिक्षण अर्धवट सोडायचे नाही, प्रयत्न सोडायचे नाही . आता गेली 30 वर्षे मी गाडी चालवते आहे .आता गाडी चालवणे,इतर दैनंदिन कामां प्रमाणेच विनासायास होते .माझ्या मुलांनाही गाडी चालवायला शिकवली .
म्हणूनच म्हणते की बिघडते म्हणूनच नंतर घडते.
असे झाले माझे कार प्रशिक्षण…
Categories:
