सनविवि अनुभव,साहित्योन्मेष पाश्चात्य  संस्कृतीचा देशी भूलभुलैया 

पाश्चात्य  संस्कृतीचा देशी भूलभुलैया 

निवेदता शिरवटकर— 

” होय तर ! पार्टी तर झालीच पाहिजे !” ……..

सर्व सहकर्मीयांनी एकच सूर लावला आणि मग काय ! शेवटी मी देखील बळी पडलेच. 

अर्थात खुश नव्हते असे काही नाही. आनंद जर वाटता आला नाही तर तो ‘आनंद ‘ कसला ? मग पुढला मुद्दा होता पार्टी कुठे आणि कशी करायची . वेगवेगळे सल्ले येत होते. मग कुणी म्हणाले , नेहमी नेहमी त्याच प्रकारची रेस्टॉरंट्स नकोत . काहीतरी छान वेगळा अनुभव घेऊ. 

त्यात भरीस भर म्हणून ‘ ओल्या पार्टीचा ‘ प्रस्ताव समोर आला. बंगलोरची ‘गुलाबी थंडी’  हे केवळ निम्मित. तो प्रस्ताव ऐकताच काही जणांच्या गालावर ती ‘ गुलाबी थंडी ‘ आपसूकच उतरली. डोळे लकाकु लागले. मग शेवटी असे  ठरले की बंगलोरच्या हद्दीपाशी 

एक ‘ हॅपनिंग प्लेस ‘ आहे. खास इथल्या आयटी इंडस्ट्री मध्ये काम करणाऱ्या लोकांची आवडती जागा………. टू चील यू नो ! 

मी सुद्धा होकार दिला. छान तयार होऊन सर्वजण ठरलेल्या दिवशी वीकेंडला तिथे सुमारे आठ वाजता पोहोचलो. अश्या ‘ रेस्टॉरंट कम पब ‘  मध्ये जाण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. 

आत शिरताना जाणवलं की जाणून बुजून अंधुक प्रकाश ठेवलेला आहे. गर्दी प्रचंड !!  चेहरे धूसर दिसत होते. पण स्पीकर मात्र कानठळ्या वाजवणारे……

म्हणजे ‘ कान आणि डोळे ‘  ह्या दोन महत्त्वाच्या इंद्रियांचा ताबा आधीच घेतला गेला होता  असं म्हटलं तर गैर नाही. ( मेंदूचा ताबा घ्येण्याची प्रकिया अजून सुरू देखील झाली नव्हती ) .

रेस्टॉरंट एकदम ‘ फंकी…..स्टायलिश ‘ होते यात तिळमात्र शंका नव्हती . ‘ यंग क्राउड ‘ साठीच बनलेली. 

पण नजर थोडी स्थिरावल्यानंतर जाणीव झाली की तिथे  सर्व वयोगटातील , कौटुंबिक माणसे सुद्धा होती.…..

टेबल मिळाले . माझी जागा नेमकी अगदी स्पीकरच्याजवळ . त्यामुळे दोन – तीन तासानंतर बाहेर पडल्यावर कान शाबूत राहतील का याबद्दल मन थोडे साशंक झाले. त्याचप्रमाणे अगदी बाजूला बसलेले असूनसुद्धा सोबत्यांशी बोलताना गळा फाडून बोलावे लागत असल्यामुळे उद्या घशाची अवस्था काय असेल ही  द्विधा ! तरीसुद्धा त्याही परिस्थितीत एकदाच्या ऑर्डर्स गेल्या आणि आमची  पेटपुजा सुरू झाली.……..आमच्यापैकी काही उत्साही सोबत्यांनी   वाईनचे उद्घाटन केले . पार्टीला रंग चढू लागला .

मी मात्र एकीकडे समोर येणाऱ्या वैविध्यपूर्ण पाश्चात्य स्टार्टर्सचा आस्वाद घेत आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली . कारण गप्पा तर मारूच शकत नव्हते. 

तुम्ही विचार करत असाल कदाचित ह्यात काय विशेष ! 

सांगायचं म्हणजे  त्या दिवशी मला जे जाणवलं ते काहीसं वेगळं होतं.…….मी ड्रिंक्स करत नसल्यामुळे अजून मेंदूचा ताबा शाबूत होता ना ! 

ड्रिंक्स आणि सिगारेटचा उग्र दर्प चोहिकडून येत होता……..तरुणाई त्यात ओतप्रोत न्हाऊन निघाल्यागत वाटतं होती. उत्साह नव्हे तर ‘ उन्माद ‘ ओसंडत होता . बाजूच्या टेबलवर दोन तरुण पहुडले    ( चांगलेच टल्ली ) झाले होते. कुठे वाईनचे ग्लास फुटत होते……तर गर्दीत तोल जाऊन कोणाला बिअरचे स्नान होत होते.……मुले , मुली धुंद – बेधुंद होऊन थिरकत होते. कुठे ग्रूप डान्स , तर कुठे सोलो… कुठे सिगारेटचे धुरांडे तर कुठे ‘हाई फाय ब्रँडेड  पेहरावतील तरुण तरुणींचा बेभान  झिम्मा…….

ते सर्व पाहताना एकच  विचारांची झोड सुरू झाली. 

का कुणास ठाऊक मी कोणी ‘परग्रही’ आहे की काय असं वाटू लागलं . कारण ह्या ‘ अंबियनसच्या ‘ नावाखाली केल्या गेलेल्या वातावरण निर्मितीचे प्रयोजन काही लक्षात येईना . 

मनोरंजन , करमणूक, श्रमपरिहार सर्व काही  ठीक आहे , पण त्यात कुठेतरी त्या संपूर्ण तरुणाईच्या सर्व इंद्रियांचा कब्जा घेऊन त्यांना कायमचे नशेच्या , व्यसनाच्या अधीन करण्याचा छुपा डाव असल्याचे जाणवले. खरं तर तरुणाई म्हणजे अखंड उत्साह, जोश, सृजनशीलता ,उत्पादनक्षमता . भावी समाज अन् देशाची शक्ती , संपत्ती . 

पण जर अश्याप्रकारे ह्या सर्वाचा चुराडा बियरच्या ग्लासात आणि सिगारेटच्या धुरांड्यात होणार असेल तर त्याला आपण वीकेंडचा श्रमपरिहार मानायचे ? 

…..कारण त्यांना  सहा सात आकडी पॅकेज मिळते  म्हणून ? मला तर त्या ‘ सो कॉल्ड ‘  महागड्या रेस्टॉरंट  आणि देशी दारूच्या गुत्यात फारसा फरक वाटला नाही. मान्य आहे की सर्वचजण त्या ‘ भूलभुलैयाच्या दुनियेत ‘ कायमचे हरवून जात नसतीलही कदाचित . पण कोणी कमकुवत मनोवृत्तीचा माणूस नैराश्येच्या गर्तेत असताना तर त्या विळख्यात सापडत असेलच ना !  

मग खरच समाजाला अश्या सापळ्यांची गरज आहे ?  तेही अश्या सुशिक्षित , सधन वर्गासाठी ? केवळ ट्रेण्ड मध्ये राहण्यासाठी ? 

बरं तरुण तरुणींनी एकत्र भेटण्याची जागा म्हणावी तर त्या मद्यधुंद अवस्थेत सर्व प्रकारच्या जाणीवा बधीर झालेल्या असताना मने जुळू शकत असतील ? का फक्त शारीरिक गरजा भागवल्या जात असाव्यात ? 

मन थोडे विषण्ण झाले त्या दिवशी .

नेमकं चुकतंय कुठे ते समजेना . पण एक विचार मात्र मनात मुळे रोवू लागला . श्रमपरिहार , मनोरंजनाच्या , मानसिक तणाव हलका करण्याच्या पद्धती वेगळ्यादेखील असू शकतात ! 

दर वीकेंडला दारूच्या ग्लासात स्वतःला डूबवून टाकण्याऐवजी शारीरिक व मानसिक आरोग्यवर्धन करण्याच्या दृष्टीने आपण इतर सृजनशील तसेच विविध कौशल्य वाढवण्यासाठी कोणत्या उपक्रमात भाग घेऊ शकतो ह्याचा विचार नको का व्हायला ?  सामाजिक  किंवा सांस्कृतिक उपक्रमात आपण काय सहयोग देउ शकतो ह्याचा विचार पालकांकडून ही मुले पौगंडावस्थेतून जात असतानाच रुजवला जाऊ शकतो . अगदी दुसरे तिसरे काही नाही तर किमान आपल्याशी मिळते जुळते विचार असणाऱ्या निसर्गप्रेमी मुलांसोबत फेरफटका करण्याचा आनंद लुटता आला तरी तो एक प्रकारचा उत्तम ‘ स्ट्रेस बस्टर ‘ असू शकतो . अबोल निसर्ग नेहमीच सचेतन तसेच अचेतन मनाला खऱ्या अर्थाने हळुवार फुंकर घालत असतो ……

ह्या सर्वांपैक्की किमान एक तरी विचार राबवला गेला तर असे मानवनिर्मित सापळे कमी व्हायला आपोआपच मदत होईल . 

त्यादिवशी रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना आपण मात्र पुन्हा इथे चुकूनदेखील पाऊल ठेवायचे नाही हा निर्धार मनाशी पक्का केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *