सनविवि ललित,साहित्योन्मेष सुट्टीचे आत्मवृत्त

सुट्टीचे आत्मवृत्त

रसिका राजीव हिंगे

चला सुट्टी झाली आता 

खूप खूप खेळायचे

    ” कोण सारखं दार वाजवतंय? एकतर उन्हाची वेळ अन थोडा डोळा लागला तर सारखं खटखट, बेल का नाही वाजवत?” असा विचार करतच मी दार उघडले,

      ” धन्यवाद ग सखी,मी आलेय बरं का?”

 ” कोण ग तू? अन अशी एकदम घरात कशी आली?”

 “ओळखलं नाहीस ना मला ! मी सुट्टी. तुझ्याबरोबर गप्पा करायला आले आहे.” 

अन मी ऐकत बसले सुटीच्या व्यथेच्या कथा.

    काय हे! सारखं दडपण येतं आजकाल मला. मुलांच्या मेळाव्यात रमणारी मी, पण नको वाटतं जायला. कुणी वेळच देत नाही मला. पूर्वी किती छान होतं न सगळं. माझी वाट पहायची मुले. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी तर नुसता गोंधळ असायचा. प्रत्येक जण आनंदाने गात असायचा

     चला सुट्टी झाली आता 

      खूप खूप खेळायचे

      उन्हाळा म्हणजे सुटीचा ऋतू असे जणू समीकरणच वाटे मला. ग्रीष्मातील उन्हाचा बाऊ न करता त्याला सामोरं जात उंडारत असत बालगोपाल. मित्र मैत्रिणी, दादा-ताई, छोटू गोटू, बाळ्या, बेबी सारेच असायचे दुपारचे एकत्र. काय काय खेळाचे न! पत्ते सूर पारंब्या, विटीदांडू तर कधी बंदी साखळी, दोरीवरच्या उड्या आणि थकले भाकले की झाडाच्या सावलीत रंगायचा चम्पूल.  दुपार कधी निजलीच नाही मी  असतांना. धमाल तर असायचीच पण त्याचबरोबर वाचनवेडे वीर एखादा कोपरा शोधून वाचत बसायचे तासनतास. मुलांना सुट्टी लागली म्हणजे घराघरातून सहलीचे, तीर्थयात्रेचे बेत आखले जायचे, घरात लग्न  तर जाणून उन्हाळ्याच्या सुटीत काढायचे. महोत्सव भासायचा हा लग्नसोहळा.

         पण आता मला असे काही दृश्य पहायला मिळत नाही. मला आठवतं पूर्वी मी येणार म्हणजे सगळं घरदार हसत आनंदाने माझं स्वागत करायचे. पण आजकाल मी येणार म्हणजे पालकांची डोकेदुखी वाढत जाते. पूर्वी मोठे कुटुंब असायचे, शिवाय आई नोकरी करणारी असेलच असे नाही. उलट सुटी म्हणजे चला आता मुलांच्या अभ्यासातून सुटका. थोडा निवांतपणा यायचा. आजकाल तसे नाही न! छोटे कुटुंब, दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे मी येणार म्हणजे यांची तारांबळ उडणारच. दिवसभर नसले तरी किमान चार पाच तास तरी मुलांना अडकविणे आवश्यक आहे असे वाटू लागले आणि यातून जन्म झाला छंद वर्ग आणि संस्कार वर्ग. आईबाबा ही सुटले आणि काम करणाऱ्याला काम मिळाले. पण खरंच असे एक महिन्याचे संस्कार वर्ग घेऊन होतात का संस्कार?  हे असे  छंद वर्ग म्हणजे एक टास्क आहे मुलांसाठी  हा ही अभ्यासक्रम आहे करियर च्या दृष्टीने असेच वाटते मुलांना. पूर्वी मी आली की मामा ,मावशी, आत्या यांच्याकडे जाणे व्हायचे, किंबहुना सुट्टीच यासाठी असते असे गृहीत धरलेले असायचे. हे नात्यांचे बंध जोपासायचे बाळकडू असे लहानपणापासून दिले जायचे. सोबत राहणे, मदत करणे, घासातला घास देणे म्हणचे आजच्या भाषेत शेअरिंग करणे हा पण एक संस्कार च होय अगदी नकळतपणे केलेला आणि कोणतीही फी न आकारता. उलट प्रेमाची, वात्सल्याची देवाणघेवाण होई, सहवास मिळत असे , त्यामुळेच नाते घट्ट विणले जात असे.

         गेल्या दहा पंधरा वर्षापासून मला येऊच द्यायचे नाही असा जणू चंग बांधला आहे की काय न जाणे. कारण वार्षिक परिक्षा संपते न संपते तोच पुढच्या इयत्तेचा अभ्यासक्रम सुरू होतो. प्रचंड स्पर्धा वाढली आहे. जो तो फक्त पळत सुटला आहे. हे पण पहात नाही की आपण ज्या वाटेने चाललो आहे ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही. पुढे किती खाचखळगे आहेत हे जरी माहीत नसले तरी स्वतःच्या ताकदीचा,आवडीचा विचार करणे गरजेचे आहे. 

         तंत्रज्ञान प्रगत झालं त्यामुळे त्याच्या अनुषंगाने सगळेच प्रगत होणे गरजेचे आहे आणि हा अपरिहार्य बदल स्वीकारणे मला तसे जड गेले नाही. प्रत्येक पिढीतील बदल काळानुरूप  हळूहळू अंगवळणी पडतात. पण दिवसेंदिवस घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे झाले आहे. मुलांनी प्रत्येक क्षेत्रात पारंगत असावे हा जो अट्टहास आहे तो फार घातक आहे असे आता वाटायला लागले. माझ्या सहवासात बालगोपाल किती खुश असायचे. आताही असतात पण जे स्वरूप  बदलले आहे ते कुठेतरी काहीतरी चुकते आहे, मुलांच्या मनाचा, त्यांच्या भावनांचा, त्यांच्या ताकदीचा,आवडीचा विचार न करता माझा जो उपयोग होतो आहे त्यामुळे मला फार अस्वस्थ वाटतं, अन काळजी पण.

            या दोन वर्षात तर सुट्टी असते शाळा संपल्यावर हेच सगळे विसरून गेले आहेत. कारण कोविड मुळे घरातच शाळा, ती पण मोबाईल वरच. इंटरनेट बंद झाले की शाळा बंद. नको ते खेळ मोबाईलवर खेळून अक्षरशः वेळ घालविणे हा प्रकार. याला काही अपवाद असतील ही. प्रत्येक नियमाला अपवाद असतोच तसा. पण सर्वसाधारण पणे मोबाईल आणि विद्यार्थी हे मला पचनी पडत नाही अजून.

      जुनं ते सोनंच  असं मला म्हणायचे नाही. काळा बरोबर सुधारणा होणे गरजेचे आहे. पण प्रगतीच्या झोतात सगळंच वाहून जायला नको न असे मला वाटतं. नर्सरी पासून तर बारावी पर्यंत सगळेच माझे सखसोबती. त्यांच्याबरोबरच आईबाबा, आजी आजोबा सगळेच मला हवेहवेसे. सुकोमल  असले तरी उद्याच्या राष्टाचे भविष्य आहे, म्हणूनच त्यांना कणखर होण्यासाठी माझी गरज आहे म्हणजे त्यांच्या व्यस्त अभ्यासक्रमात मी म्हणचे एक विरंगुळा आणि अभासाव्यतिरिक्त काहीतरी वेगळे शिकण्यासाठी मिळालेला वेळ. आयुष्याच्या वाटेवर चालतांना मुलांबरोबर सगळ्यांनाच थोडी तरी उसंत मिळावी, पुन्हा नव्या उत्साहाने  पुढे चालता यावे यासाठी निसर्गाने माझी निर्मिती केली. प्रत्येक गोष्ट कारण असल्याशिवाय आणि अर्थ असल्याशिवाय परमात्म्याने निर्माण केली नाही.मी म्हणजे तुमची बॅटरी चार्ज करणारी विद्युलता आहे.  या सवडीच्या झुल्यावर मस्त हिंदोळे घेता घेता किती तरी ज्ञानकण वेचले जातात हे कळत ही नाही. 

      ह्या सुट्टीचे मर्म जाण तू बाळा

      झुलविन  रे ज्ञानाचा हिंदोळा

      तुझ्या संगती खेळता खेळता

      घडवू आपण भारत वेगळा

      किती किती फायदे आहेत न, तरी मला का सगळे विसरत चालले आहेत. कागदोपत्री मी असतेच पण प्रत्यक्ष मात्र कुणी पहातही नाही ग माझ्याकडे. हीच खरी माझी व्यथा आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *