–शिल्पा धर्माधिकारी —
“प्रत्येक विवाहेच्छूकांसाठी साजेशी, पसंतीस पडतील अशी सुयोग्य आणि अनुरूप स्थळं देणारी एकमेव विवाह संस्था म्हणजे xxx. नाव नोंदवा आणि अनुरूप जोडीदाराशी विवाह जुळवून आणा.” ही एका विवाह संस्थेची वर्तमानपत्रातील जाहिरात वाचनात आली आणि मला हसूच आले. अहो त्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामालासुद्धा लग्नासाठी अवघड शिवधनुष्य पेलावा लागला होता, तिथे आमच्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा. “चट मंगनी पट ब्याह” असे नशिब असलेले फारच थोडे असतात बरं का. नाव नोंदविले आणि पटकन लग्न ठरलं तर ठीक, नाहीतर संस्थेत घाला हेलपाटे आणि जसा “जोड्या जुळवा” हा प्रश्न परीक्षेत असतो ना त्याप्रमाणे आपल्या आणि त्यांच्या अपेक्षांच्या बसा जोड्या जुळवत आणि स्थळं निवडत.
पण माहिती आहे का? बरेचदा हे विवाहेच्छूक स्वतःचे रूप, गुण विचारात न घेताच स्वप्नातल्या जोडीदाराला समोर ठेवून अटी घालतात. मग त्यात आपल्याला गोरीपान, लांबसडक केस असलेली, उंचीपुरी, सुंदर, छान, हुशार, सर्वगुणसंपन्न मुलगी बायको म्हणून मिळावी असं एखाद्या मुलाला वाटतं तर देखणा, रुबाबदार,चांगला कमावणारा, उंच, गोरा असा मुलगा नवरा म्हणून मिळावा असं एखाद्या मुलीला वाटतं. अहो कधी कधी तर नटनट्यांवर भाळून त्यांचे रूप असलेला जोडीदारसुद्धा अपेक्षांच्या यादीत येतो बरं का.
अशावेळी खरी कसोटी असते ती पालकांची. कारण त्यांना ह्या अटी लक्षात घेऊन स्थळ निवडणं देखील तितकेच जिकिरीचं असतं. अशावेळी मलातर TV वर दाखविण्यात येणाऱ्या वधूवरसूचक मंडळाच्या जाहिरातीची आठवण येते, ज्यात वडील रस्त्यावर दिसणार्या प्रत्येक तरुण मुलाच्या डोक्यावर लग्नाचा फेटा ठेवून मुलीला “तुला हा नवरा म्हणून कसा वाटतो? तुला हा नवरा म्हणून कसा वाटतो?” असा प्रश्न विचारताना दाखवले आहे. हे पाहून मला नेहेमी वाटतं बिचारे आपल्या मुलांच्या अटींप्रमाणे स्थळ शोधण्यासाठी धडपडणारे पालक.
बरं अटींची पूर्तता करणारं स्थळ प्रत्यक्ष बघितल्यावर मनासारखं असतंच असंही नाही बरं का. कारण स्वप्न आणि सत्यात तफावत ही असतेच की.
तसंच ह्या प्रक्रियेत न मागता मत देणार्यांची संख्या पण खूप असते. त्यात नुसते मोठेच नाही तर एखाद शेंबडं पोरसुद्धा नाक पुसत “मामा मला ही मामी नाही आवडली” असे कोणी विचारले नसताना आपल मत देतं.
अहो आमच्या शेजारच्या काकू सांगत होत्या की त्यांच्या ड्रायव्हरनेसुद्धा “आपली ताई किती ग्वाड हाय. कुठे ह्या बुटक्याशी लग्न करता.” असे काळजी वाटून आपलं मत दिल होत. आता सांगा.
ह्यावरून लक्षात येत असेल की कळत नकळत लग्न ठरवणं ही आपलीच जबाबदारी आहे असे समजून ही मंडळी वधूवर संशोधनाच्या प्रकियेमध्ये हिरिरीने सहभाग घेतात आणि सगळ्यांना अजूनच गोंधळून टाकतात. ..असो.
पण वधू-वर संशोधन ही जरी अवघड, क्लिष्ट आणि कधीकधी मनस्ताप देणारी प्रक्रिया असली तरी विनोदी किस्सेसुद्धा घडतात बरं का यामध्ये.
मला अजूनही आठवतं की मी आणि सासूबाई, आम्ही दोघी माझ्या धाकट्या दीरासाठी स्थळ बघायला गेलो होतो. त्यांना सांगितलं, तुमच्या मुलीसाठी स्थळ बघता आहात असं आम्हाला xxx विवाह संस्थेतून कळलं. तशा त्या बाई म्हणाल्या, “अग्गो बाई! संस्थेत कळवायचचं राहिलं की. अहो, आमच्या मुलीचं मागच्याच महिन्यात लग्न झालं. सॉरी हं. तुम्हाला उगाच खेटा पडला. पण बघा आमच्या शेजारची सरिता आहे लग्नाची. चालेल का तुम्हाला?” अरे आमचा मुलगा काय एखादी वस्तु आहे. हे ॲव्हेलेबल नाही तर ते घ्या म्हणून सांगायला. काय एक एक नमुने असतात.
असे खट्टेमीठे, गमतीदार अनुभव जसे ह्या प्रक्रियेत येतात तसेच काही रंजक अनुभवसुद्धा येतात बरं का.
असाच काहीसा आमच्या शेजारच्या काकूंचा अनुभव त्यांनी आम्हला सांगितला होता. त्या एकदा त्यांच्या मुलीसाठी स्थळ बघालय वधूवरसूचक मंडळात जात होत्या. रस्त्याने जाताना त्यांच्या लक्षात आले की त्यांचा कोणीतरी पाठलाग करत आहे. त्या भराभरा चालू लागल्या तसे मागच्याची पण गती वाढल्याचं त्यांना जाणवलं. भीत भीत हळूच त्यांनी मागे वळून पाहिलं आणि त्या एकदम घाबरल्याचं. चक्क चक्क त्यांनी नेसलेल्या लाल साडीच्या प्रेमात गाय पडली होती आणि ती त्यांच्या मागे लागली होती. त्या घाबरून पळू लागल्या तशी ती पण त्यांच्या मागे पळू लागली. आता त्यांनी तिला चुकवण्यासाठी रस्ता cross करायचे ठरवले, तेवढ्यात रस्त्यावरुन एक रिकामी रिक्षा हळू गतीने चालताना दिसली आणि त्या घाईने त्यात पटकन शिरल्या. शिरल्या कसल्या चक्क रिक्षेच्या आत उडीचा घेतली म्हणा ना. आणि रिक्षावाल्याला “भाग जल्दी” एव्हढेच घाबरलेल्या आवाजात पण सूचक बोलल्या. परिस्थितीचे गांभीर्य समजण्याइतका रिक्षेवाला पण हुशार होता. त्याने जोरात रिक्षा पळवली आणि काकूंची त्या गाईपासून सुटका केली. आता मजा वाटते हे सांगायला पण तेव्हा त्यांचे काय झाले असेल कोण जाणे. खरंच मुलांसाठी स्थळ संशोधन करताना कधी कधी पालकांना अशा कसरतीसुद्धा कराव्या लागतात बरं का.
असाच एक किस्सा आमच्या बाबतीतही घडला होता.
मी आणि माझ्या सासूबाई एकदा छोट्या नणंदेसाठी स्थळ बघायला गेलो होतो. पत्ता कुठल्याशा बंगल्याचा होता. बंगला म्हंटल्यावर “स्थळ कस असेल?” “श्रीमंत की आपल्याला साजेस?” “हो बाई, नाकापेक्षा उगाच मोती जड नको” वगैरे चर्चा करत आम्ही दोघी पत्ता शोधत होतो. प्रत्येक बंगल्याच्या पाटीवरचा नंबर आणि बंगल्याचं नाव वाचत चाललो होतो. शेवटी बंगला सापडला. ज्यांचा आहे त्यांचे पाटीवरचे नावही मी जोरात वाचले “दे ख णे” . “नाव जुळलं गं!” सासुबाई म्हणाल्या. पत्ता सापडला ह्या खुशीत “कुत्र्यापासून सावध रहा.” ही पाटी वाचायचीच राहून गेली. मग काय गेटच्या आवाजाने जोरजोरात कुत्रं भुंकत आलं की आमच्यावर धावून. एकतर आम्ही दोघी कुत्र्याच्या बाबतीत घाबरट आणि त्याचा तो आवेश पाहून पाय लटलटायला लागले. तश्याच लटलटत्या पायाने मी सासूबाईंचा हात पकडून पळावे असा विचार केला. पण बघते तर काय सासुबाई गायब! इतक्या चपळाईने ह्या कुठे अदृश्य झाल्या असतील? असा मी विचारच करत होते इतक्यात “कोण हवं आहे ?” असा प्रश्न विचारत कोणी बाई बाहेर आल्या आणि त्यांनी कुत्र्याला आवरलं. बहुतेक त्या घराची आणि कुत्र्याची मालकीण बाई असाव्यात.
माझी छाती धडधडत होती. घशाला कोरड पडली होती. कसेबसे शब्द उच्चारत मी म्हटले,”स्थ…स्थ स्थळ म्हणजे माझ्या… नाही… मी आणि माझ्या सासूबाई तुमच स्थळ बघायला आलो होतो”
त्या जोरात ओरडल्या “काय, माझं स्थळ?”
“नाही. नाही म्हणजे मी आणि माझ्या सासूबाई माझी नणंद, सुमा आहे ना, तिच्यासाठी स्थळाची चौकशी करायला आलो होतो. पण माझ्यासोबत असलेल्या सासूबाई कुत्र्याच्या आवाजाने कुठे गायब झाल्या काय माहिती?” मी भिरभिरत्या नजरेने रस्त्याच्या दोन्ही टोकाला सासूबाईंना शोधत होते.
तेवढ्यात वरून कुठून तरी आवाज ऐकू आला ” शुकशुक, मी इथे आहे.” आम्ही दोघींनी वर पाहिले तर सासूबाई गेटच्या लागून असलेल्या कंपाऊंडच्या खांबावर चढून वर उभ्या होत्या. मी अवाकच झाले. त्या चपळ होत्या हे मी नुसतेच ऐकले होते, पण तसे कधीही अनुभवले नव्हते. कारण घरी एखादवेळेस वरच्या कप्प्यातील बरणी काढण्यासाठी साधे स्टूलच्या दोन पायर्या चढताना यांना गरगरत आणि इथे इतकी उंच कंपाऊंडची भिंत चढल्या?. मी तर त्यांच्याकडे आ वासूनच बघत राहिले.
पण सासूबाई, कुत्रं बांधलेले पाहून, जितक्या चपळाईने वर चढल्या असतील ना तितक्याच चपळाईने खाली उतरल्या.
त्या बाई म्हणाल्या, “चपळ आई वरून मुलीचा साधारण अंदाज आला आहे आम्हाला. या. आत या. “
नंतर भविष्यात ह्या देखण्यांच्या घरातच आमच्या देखण्या सुमाचे लग्न जुळलं बरं का.
हा प्रसंग तुम्हाला विनोदी वाटत असेलही कदाचित पण आमच्या दोघींची तेव्हा जी काय गाळण उडाली होती म्हणून सांगू, अजूनही आठवली तरी अंगावर काटा येतो.
पण एक सांगू, अहो वधूवर संशोधनात चांगले वाईट अनुभव यायचेच, म्हणून काही मन खट्टू करायचे नाही आणि हार तर बिलकूल मानायची नाही. उलट ह्या अनुभवांना खेळीमेळीने घेत वधू-वरसंशोधनाची मोहीम फत्ते होईपर्यंत चालूच ठेवायची. प्रत्येकासाठी कुठे ना कुठेतरी आपला जोडीदार लपलेला असतोच हो. फक्त वेळ आली की तो बरोब्बर सापडतो. मग त्यासाठी माध्यम म्हणून कोणीही असू शकतं बरं का. तेव्हा नेहमीच आशावादी रहा आणि चांगले वाईट अनुभव आले तरी योग्य जोडीदार मिळेपर्यंत संशोधन चालूच ठेवा.
