—मानसी तांबेकर—
मी लहानपणापासूनच हा असा … म्हणजे त्याचं काय झालं- साधारणतः आपल्याकडे घरात ‘गोड बातमी ‘आहे हे कळलं की घराच्या भिंती, कोपरे आपोआपच गुटगुटीत, गोड -गोजिऱ्या बाळांच्या फ्रेम अथवा पोस्टर्सनी सजतात. मग त्यात कधी डोळे मिटून शांत पहुडलेलं बाळ असतं, टॉवेल किंवा तत्सम कपड्यामधून हळूच डोकावणारं बाळ असतं, तर कधी कुठच्यातरी फुलात उमलून गोड हसणारं. आता ही पोस्टर्स बघून आपलं बाळही असचं असावं अशी माफक (?) इच्छा कुठच्याही मातेची होणे हे स्वाभाविकच आहे. पण तेव्हा बऱ्याचदा ही फोटोतली बाळे ‘विदेशी’ असतात या गोष्टीचा त्या मातेला विसर पडलेला असतो. असो… समस्त बायकांप्रमाणे माझ्या आईलाही ‘गुटगुटीत’ बाळाचे डोहाळे लागले होते. खरंतर शंभरात फार कमी लोकांना असे फोटो पाहून गुटगुटीत बाळं होतात पण माझी आई त्याबाबतीत भाग्यवान होती. तिचे सर्व प्रयत्न कामी आले,माझ्या थोरल्या किडकिडीत भावाची सर्व कसर मी भरून काढली आणि आईचे स्वप्न जन्मतःच पूर्ण केल्याने धन्य झालो.
गोरा रंग,गोलमटोल चेहरा, चेहऱ्याचा अधिकांश भाग ओथंबलेल्या गालांनी व्यापल्यामुळे त्यात लपलेले डोळे, भुईसपाट नाक. आज जरी मी ताठ ‘माने’ने जगत असलो तरी तो अवयव ना तेव्हा होता ना आता आहे . तेव्हा जर माझ्या पालकांना फोटोशूटचे प्रस्थ माहित असते व खिशाला परवडले असते तर इतर बाळांसारखे माझे फोटोही आज घराघरात असते. सेरेलॅक बेबी किंवा ग्राईप वॉटरच्या जाहिरातीत फिट बसू शकेन असा मी बालपणापासून होतो. पण आपल्या बाळाला कोणाची नजर न लागो या आईच्या मायेपोटी माझे जाहिरात क्षेत्रातले अव्वल स्थान हुकले. माझे पाळण्यातले नाव ‘गौतम’; पण गबरु, गुल्लू,गोटू , गंपू अशा ‘ग’ च्या बाराखडीतील अनेक नावांनी माझे बारसे झाले होते. आज त्यातलीच काही नावे माझी ओळख आहे. घरात असे बाळ जन्माला आले की सर्वांच्या उत्साहाला भरतं येतं. आमच्याकडे ही अशीच परिस्थिती झाली होती. कोण जास्तीत जास्त वेळ मला खांद्यावर वा कडेवर घेऊन फिरवू शकतो वा मांडीवर घेऊन झोपवू शकतो याची अहमहमिका लागली; जणू काही हे रेकॉर्ड गिनीज बुकात जाणार होते. आता विचार केला तर वाटतं की मला पेलवण्याच्या बहाण्याने प्रत्येकजण स्वतःच्या ताकदीची चाचणी करून पाहत होता यात शंकाच नाही.
माझं हे बाळसं टिकून रहावं म्हणून आजीने तर चंगच बांधला होता.जसं -जसं वय वाढत गेलं; तिच्या मला खाऊ घालण्याच्या पदार्थातही वृद्धी होत गेली. समप्रमाणात माझ्या वजनातही भर पडत राहिली. आणि माझे रूपांतर ‘गुटगुटीत’ बाळातून ‘स्थूल’ बालकात झाले होते. माझ्या अतिखादाडपणाला आणि देहयष्टीला वेसण घालण्यासाठी माझ्या काटक आजोबांनी व चपळ बाबांनी कसरत ,पोहणे , सायकल चालवणे , थोरल्या भावासोबत पळण्याची शर्यत असे अनेक रामबाण उपाय सुरु केले. त्याचा थोडा फार परिणाम माझ्या शरीरयष्टीवर दिसू लागत असतानाच शाळेतील बर्वे बाई देवासारख्या धावून आल्या . त्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात महाभारत वर बेतलेल्या नाटकात ‘भीमाची’ भूमिका देऊन माझी शारिरीक जवाबदारी वाढवलीच ; वर मला ‘छोटा भीम’ अशी नवीन ओळखही मिळवून दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानावे तितके थोडेच ! त्या दिवशी बारशाच्या वेळेस ‘भीम जन्मला ग सखे ‘ हे स्वरचित पाळणागीत गायलेल्या माझ्या आत्याबाईही भलत्याच खुश होत्या. एकंदरीत माझा लठ्ठपणा अबाधित ठेवला या महिला संघाने !
आता ‘लठ्ठपणा’ म्हटलं की मित्र-मैत्रिणीचे टोमणे, टिंगल करणे आलेच पण त्यावर मात करता यावी म्हणून की काय माझ्या आयुष्यात पंकज उर्फ ‘पक्या’ होता. मला कोणी ‘जाड्या’ मुलाने लठ्ठ म्हटल की याचे उत्तर – ‘काय बे, तुझ्या घरी फुल साईज आरसा नाही वाटतं ‘ आणि ‘रडया’ मुलाने लठ्ठ म्हटल की – अरे लेका,खात्या -पित्या घरी जन्म घेतल्यावर असच असतंय ‘अशा बेधडक उत्तरांनी तो त्यांची बोलती बंद करत होता. ‘आपले जसे शरीर आहे त्याचा मनात अभिमान बाळगावा. त्यावर प्रेम करावे. दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःचे मूल्यमापन करून दुःखी होऊ नये. तुमचे शरीर म्हणजे तुम्ही आहात आणि युनिक आहात. तेव्हा दुर्लक्ष करा दुसऱ्यांच्या कमेंट्सकडे व जीवनाचा भरभरून आस्वाद घ्या’ —‘संत’ पक्याच्या या अशा वचनांनी माझ्या ‘स्थूलपणाला’ स्थैर्य दिले. त्यानंतर कधीही मी स्वतःच्या शरीराबद्दल न्यूनगंड बाळगला नाही. याचे श्रेय मात्र पक्यालाच!
पुढे कॉलेज मध्ये असताना अचानक ‘कोमल’ माझ्या आयुष्यात आली; ते ही चक्क माझ्या रूपावर भाळून. कोमलला ‘टेडी बेयरचे’ भयंकर वेड आणि त्याच्या रंग-रूपाचा प्रचंड अभ्यास. माझ्यातला साधेपणा, सकारात्मकता दर्शवण्यासाठी तिने माझ्या वाढदिवसाला एक पांढरा टेडी गिफ्ट केला. अर्थात त्या रंगाचा टेडी देण्यामागचा उद्देश तिनेच मला समजावला. पुढे मैत्रीखातर गुलाबी टेडी, वाद झाल्यावर सामंजस्य दाखवण्यासाठी निळा टेडी, असे करत- करत प्रेम दर्शवणाऱ्या लाल टेडीमुळे आमचे नाते मजबूत झाले. सरतेशेवटी आम्ही टेडा -टेडी बनून विवाहबंधनात अडकलो. टेडी बेयर व्यतिरिक्त कोमलची खासियत म्हणजे ‘खाणे’ आणि ‘खिलवणे.’ तिच्यासारखी ‘सुगरण’ आणि ‘पट्टीची खवय्यी’ असा दुग्धशर्करायोग जुळून आल्यावर मी ‘लठ्ठ’ न राहिलो तर नवलच !
आज मी जो काही आहे त्याला केवळ माझ्या अवतीभवती असलेली माणसंच नाही तर आतापर्यंत पालथी घातलेली शहरंही तितकीच जबाबदार आहेत. कोकण मेव्याची मजा घेत बालपण सरलं, पुढे बाबांच्या बदलीमुळे कोल्हापूरचा तांबडा -पांढरा रस्सा चाखला. मुंबापुरीत कॉलेजमध्ये असताना ‘स्ट्रीट-फूड’ ची चटक लागली. इंदूरचे सासर मिळाले आणि सराफा बाजार हक्काची जागा झाली. पुढे दिल्ली,कोलकाता,हैदराबाद अशा खाण्या-पिण्याच्या चंगळ असलेल्या शहरातच मला नोकरीची संधी मिळाली त्यासाठी देवाचे आभार मानावे तितके थोडेच !
खरंतर –
स्लिम माणसांकडे बघितलं की मग कधी-कधी वाटतो हेवा
वजन कमी करण्यासाठी कोणी ना कोणी सांगत असतो यावर उपाय नवा .
दीक्षित -दिवेकर यांचा सुरु होता अभ्यास
पण पाऊस पडला …..
अन कोमलच्या हातच्या चहा -भजीने केला खेळ खल्लास !
मग ठरवलं – आज मी जो काही (लठ्ठ) आहे पण फिट आहे. तसं सांगायचं झालं तर…… वजन तो हमारी इच्छाओंका है ; बाकी जिंदगी तो बिल्कुल हलकीफुलकी है…. नाही का….!
