—वैशाली चौधरी—
एप्रिल महिन्याची दुपार, साधारण अडीच पावणे तीन वाजले असावेत. लंच नंतर ऑफिस मधल्या जास्तीत जास्त लोकांची जशी अवस्था होती तशीच माझी. डोळ्यांवर येणाऱ्या जडत्वाला कसेबसे आवरून मी माझ्या लॅपटॉप च्या स्क्रीन कडे लक्ष देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. तेव्हाच मोबाईल वाजला. जांभई देत फोन हातात घेतला. मैत्रिणीचे नाव दिसले. खास मैत्रीण असली तरी आमचे एकमेकींना नियमित कॉल नसायचे. आता का यावा बरं हिचा फोन अशा विचारात मी फोन उचलला.
“हाय माय स्वीटहार्ट, कशी आहेस??”, माझी हि गोड़ मैत्रीण तिच्या गोड़ आवाजात नेहमीच अशी गोड़ बोलते.
“मस्त. तू बोल. आज अचानक फोन?” मी.
“लग्न ठरलेय, ते सांगायला कॉल केला,” ती.
“कुणाचे?” माझा भाबडा प्रश्न.
“कुणाचे काय? माझेच,” थोडीशी लाजत ती.
“अरे वा, अभिनंदन, कोण आहे तो? कधी आहे लग्न?” मी.
“तेच तर सांगायला फोन केला. या महिन्याच्या २६ तारखेला आहे. तुला यायचे आहे,” तिने सविस्तर माहिती दिली.
“येत्या २६ ला? तेही मुंबईला? शक्य नाही, नुकतेच आठवड्याच्या सुट्टी नंतर जॉईन झाले मी. उगाच खोटे आश्वासन नाही देणार,” मनात तारखेचे गणित करत मी.
“हे बघ, मला ‘कारणे द्या’ अजिबात नाही चालणार. तुला आलेच पाहिजे, ” रागावलेली ती.
“बरं बरं, नक्की येईन,” असे ऐकल्यावरच तिने फोन ठेवला.
आता मॅनेजरच्या केबिन मध्ये जाऊन, पुन्हा एकदा रजा मागणे म्हणजे अतिशय कठीण. “का बरं हिने मंगळवारी लग्न ठेवले? सोमवारी असते तर एक दिवसाची सिक लिव्ह टाकली असती. आणि रविवारच्या फ़्ल्याईटने जाऊन सोमवारी लग्न अटेंड करून रात्रीच्या फ़्ल्याईटने परत आले असते. पण आता २ दिवसांची रजा घ्यावी लागणार. नाही हे शक्य नाही. जाऊ दे ना कशाला इतके टेन्शन? मैत्रिणीच्या लग्नाला नाही गेले म्हणजे पाप थोडीच केले?” मी माझे काम करू लागले. पण काही केल्या मनाला शांती मिळेना. बघता बघता साडे चार वाजून गेले. तरी “मैत्रिणीचे लग्न” हे काही डोक्यातून जाईना म्हणून मग शेवटी उठून चहाचा कप हातात घेऊन आले. जस जसा चहाचा घोट घशाखाली जाऊ लागला तस तसे मन भूतकाळात गेले.
“मुंबई चे ते सोनेरी दिवस. आम्ही मोजून २ च महिने एकत्र राहिलो होतो. पण त्या २ महिन्यात सुद्धा आमची मैत्री इतकी छान जमली होती कि बघणाऱ्या कुणालाही वाटे कि आम्ही वर्षानुवर्षे एकमेकींना ओळखतो. ऑफिस मधल्या गंमती एकमेकींना सांगणे, सल्ले घेणे, वीकेंडला फिरणे, आणि असे बरेच काही क्षण माझ्या डोळ्यासमोर तरळून गेले. माझ्या लग्नाला ती आवर्जून आली होती तेही आदल्या दिवशी. त्यानंतर गेली सात वर्षे आम्ही भेटलो नव्हतो. काय माहित नंतर कधी भेटू? प्रश्न फक्त तिच्या लग्नाला जाण्याचा नव्हता तर आमच्या मैत्रीचा होता,” माझ्या डोळ्यातून चटकन पाणी आले. शेवटी मी तिच्या लग्नाला जायचा निर्णय घेतला आणि बॉस च्या केबिन मध्ये रजा अनुमतीसाठी गेले. तिथे जाणे म्हणजे एखाद्या सिंहाच्या गुहेत शिरण्यासारखेच होते. पण मैत्रीच्या प्रेमापोटी मी हिम्मत केली आणि आत जाऊन शेवटी बॉसला विनंती केली
“सर खूप जवळचे लग्न आहे. फक्त २ दिवस??”
आणि बॉस ने चक्क परवानगी दिली. मला तर विश्वासच बसेना. बॉस चे आभार मानले. मी माझ्या पाच वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन जायचे ठरवले. विमानाची तिकिटे बुक झाली. कांदिवलीला माझी मावशी, तिला भेटूनही बरीच वर्षे झाली होती. मग रविवार – सोमवार तिच्याकडे थांबून मंगळवारी अंधेरीला ठरलेल्या कार्यालयात लग्न अटेंड करू आणि तिथूनच विमानतळावर जाऊन बंगलोरला परत असा मस्त प्लॅन केला.
रविवारी संध्याकाळी मी मुंबईला पोचले. मला आणि माझ्या लेकीला पाहून मावशी भलतीच खूश झाली. सोमवारचा दिवस गप्पा आणि संध्याकाळी जुहू चौपाटी असा मस्त गेला. मंगळवारी लवकर उठून आम्ही तयार झालो. मी मस्त गुलाबी रंगाचा, जांभळ्या बॉर्डरचा अनारकली ड्रेस घालून तयार झाले. मुलीला सुद्धा माझ्या ड्रेस ला मॅचिंग फ्रॉक घातला. मावशीने छान लाल रंगाची जरीकाठाची साडी नेसली. साडेअकराचा मुहूर्त होता. साडेदहालाच आमची रिक्षाची वरात निघाली.
आम्ही लग्न कार्यालयाजवळ पोहोचलो. पण तिथे बरीच शांतता होती. लग्नात असतात तसे बँड बाजा -बारात असा काहीच प्रकार नव्हता कि कसली गर्दी नव्हती. मी रिसेप्शन जवळ जाऊन चौकशी केली आणि त्यांनी जे सांगितले ते ऐकून मला शॉक बसला, “मॅडम ते लग्न तर काल होते.. “.
थोडा वेळ मला काय झाले ते कळलेच नाही. मी तशीच आ वासून उभी राहिले. माझी मुलगी माझा हात हलवत “मम्मा, कुठे आहेत ग नवरा नवरी मला बघायचे आहे त्यांना “. जवळच उभ्या असलेल्या मावशीला खूप वाईट वाटले.
“इतक्या लांबून इतक्या उत्साहाने मैत्रिणीच्या लग्नाला आली, पण चुकीच्या दिवशी. तू निमंत्रण पत्रिका नीट पहिली नव्हतीस का बाळ?” पाठीवरून मायेने हात फिरवत तिने मला विचारले. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. पटकन पर्स मधून मी मोबाईल काढला आणि तिने व्हाट्स अप वर पाठवलेल्या मेसेज मध्ये निमंत्रण पत्रिका उघडली. तारीख बघते तर काय २६ एप्रिल, सोमवार. मला अक्षरशः गरगरायला लागले. इतकी मोठी नजरचुक माझ्याकडून झालीच कशी? मला असे का वाटले कि २६ तारीख मंगळवारी आहे? माझे डोळे अश्रूंनी भरले, पत्रिकेतली अक्षरे मला दिसेनाशी झाली.
इतक्यात माझा मोबाईल वाजला. आमचे पतिदेव..तसेही मी त्यांना अशी अचानक मुंबईला निघालेली पटले नव्हते. आता काय सांगणार? कशी बशी हिम्मत करून झालेला प्रकार सांगितला. आणि चुपचाप बोलणी ऐकून घ्यायचे ठरविले. पण माझा नवरा किती तो समजूतदार, असा नवरा मिळायला भाग्यच लागते. ” हम्म्म्म्म” एवढे सोडले तर एकही शब्द उच्चारला नाही त्याने. शेवटी मीच मृदू आवाजात विचारले, “आता काय करू मी? “
“मी काय सांगू? तुझ्या मैत्रिणीला फोन लावून बघ आणि सांग तिला सगळे,” पतीदेव .
“अरेच्या, मला का बरं नाही सुचलं हे. पण ती बिझी असणार, फोन नाही उचलला तर?” मी.
“तर मग तिच्या घरच्यांचा नंबर चेक कर. पत्रिकेवर,” पतिदेव.
“किती तो गुणांचा माझा नवरा… थँक यू ” म्हणून मी फोन ठेवला आणि ताबडतोब मैत्रिणीचा नंबर डायल केला.
“आपण डायल केलेला नंबर बंद आहे. कृपया पुन्हा प्रयत्न करा, ” मी हि खूप आज्ञाधारक. तिचा नंबर पुन्हा डायल करत राहिले. पत्रिकेवरही तिचाच नंबर दिला असल्याने मी तोच नंबर ५-५ मिनिटांनी डायल करत राहिले. आणि एकदाची मला रिंग ऐकू आली. काळजात धडधडायला लागले. पलीकडून मैत्रिणीचा गोड़ आवाज आला , “हॅलो “. मला इतका आनंद झाला कि इथे शब्दांत मांडता येणार नाही. त्याहीपेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे तिचे घर कार्यालयाच्या जवळपासच होते. मग काय? “ऑटोवाले भैय्या….” म्हणत आमची वरात पुन्हा एकदा निघाली, तिच्या सासरी.
एकमेकींना भेटताच दोघींच्याही आनंदाला पारावर उरला नाही. तिला झालेला गोंधळ सांगायचं प्रयत्न मी केला, पण ती तिच्या सासरी, नवीन माणसात इतकी गोंधळलेली होती कि माझा गोंधळ ऐकून ती जास्त गोंधळून गेली. असो झाला तो गोंधळ पुरे. तिच्या घरच्यांनी मला आग्रहाने त्यांच्याबरोबर जेवायला बसवले, लग्नातले जेवण जरी चुकले तरी माझी आवडीची भेंडीची भाजी आणि हापूस आंब्याचा रस..अहाहाहाहा त्याची तोडच नाही. त्यानंतर मी तिच्या लग्नाची तारीख कधीच विसरले नाही. दरवर्षी मी तिला न चुकता लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते अर्थातच दुसऱ्या दिवशी!
