सनविवि ललित,साहित्योन्मेष प्रवास : एक सुखद संकल्पना

प्रवास : एक सुखद संकल्पना

— प्रतिभा बिलगी —

प्रवास ! एक अशी सुखद संकल्पना ज्याचे नाव ऐकताक्षणी मनात एक प्रकारची ओढ निर्माण होण्यास सुरुवात होते. मन क्षणार्धात अशा निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पोहोचते, जे कधी-कधी सत्यात उतरणे अशक्य असते. शांत समुद्र किनारा, प्राचीन इमारती, किल्ले, उनाड वारा, घनदाट जंगले, रानटी फुले, ताजी फळे, वन्यजीव, ओसंडून वाहणारा धबधबा, रस्त्याच्या कडेकडेने धावणारी नदी, नागमोडया वाटा, आकाशाला भिडणारी वृक्षवल्ली, गुलाबी थंडी, हिमशिखरे,  चमचमनारे दवबिंदू, सुर्योदय, सुर्यास्त !!! यादी कधीच संपणार नाही. अशा या प्रवासाची व्याख्या करणे महाकठीण काम आहे.

पूर्वी लोक क्वचितच प्रवास करत. कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी दूर गावी अथवा दुर देशी जाण असायचं. पण आजच्या या मशिनी युगात प्रवास एक नितांत गरजेची गोष्ट झाली आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. याचे मुख्य कारण म्हणजे वर्तमान युग हे बनावटी व घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे युग आहे. लोक कामाच्या व्यापात इतके व्यस्त झाले आहेत की कित्येक जण मानसिक तणावाखाली वावरत आहेत. या व्यापातून डोके वर काढणे सुद्धा त्यांना जमत नाही. त्यामुळेच जीवनाच्या बाबतीत नैराश्य तथा उदासीन वाटणे ही सर्वसामान्य बाब झाली आहे. लोकांना स्वतःसाठी, कुटुंबीयांसाठी वेळ काढणे खूप जिकरीचे काम वाटते. म्हणूनच आज लोक कामाचा व्याप थोड्या काळासाठी बाजूला ठेवून प्रवासाची योजना बनवतात. जेणेकरून जीवनातील तणाव, नैराश्य, उदासीनता दूर होऊन पुन्हा नवी ऊर्जा व जगण्याची उमेद निर्माण होईल. आपण केलेला प्रत्येक प्रवास आपल्या मनावर एक कायमचं चित्र कोरुन जातो ज्याचा प्रभाव बराच काळ टिकून राहतो. आपला प्रवास असा अविस्मरणीय होण्यासाठी नेहमी एक बाब लक्षात ठेवावी आणि ती म्हणजे  प्रवासात चीडचीड न करता प्रत्येक गोष्टीची मजा कशी घेता येईल हे पहावे.

प्रवास खूप सुंदर आठवणींचा ठेवा देऊन जातात. कित्येक घटना आयुष्यभर लक्षात राहतील अशा अविस्मरणीय असतात. काही घटना मजेशीर, काही थरारक, काही अविश्वसनीय तर काही भावनिक असतात. प्रवास दैनंदिन जीवनातील थकवा आणि चिंता दूर तर करतातच तसेच आपल्याला पुन्हा आनंद आणि आरोग्य देतात. संशोधनातून हेही सिद्ध झाले आहे की प्रवासाने आपल्या बुद्धीला नवीन चालना मिळते. 

पूर्वीच्या काळात लोक पायी किंवा बैलगाडीतून प्रवास करत. हळूहळू मानवाने वाहनांची निर्मिती केली. आज अशी अवस्था आहे की वाहनाशिवाय मानवाचे पाय पुढे पडतच नाहीत. वातानुकूलित गाड्यांच्या तुलनेत आज वतानुकूलरहित वाहनांचा उवयोग फक्त सामान्य माणूस करताना दिसतो. पूर्वी प्रवास करताना रात्रीच्या मुक्कामासाठी शाळा, मंदिरे, धर्मशाळा यांचा आश्रय लोक घेत असत. परंतु आजच्या या युगात वातानुकूलित हॉटेल्स, व्हीला सारखी सर्व सुखसोयींनी युक्त अशी टुमदार घर उपलब्ध आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज प्रवास खूपच छान आणि आल्हाददायक ठरलाय यात काहीच शंका नाही. 

प्रवासाचा मुख्य उद्देश मौज-मजा असला तरीही ज्या ठिकाणी आपण प्रवासाला जातो त्या स्थळाचा इतिहास, खाणे-पिणे, वेशभूषा, राहणीमान, भौगोलिक विशेषता या सगळ्या गोष्टींशी नकळत जोडले जातो. तेथील निसर्ग सौंदर्य डोळ्यांत साठवून तृप्त होतो. प्रवासाहून परतल्यावर सुद्धा अनेक दिवस ते क्षण, त्या सुखदआठवणी उगाळत राहतो. कारण मनात खोलवर कुठेतरी या आठवणी रुजलेल्या असतात. त्यांची उजळणी केल्याने मन आणि शरीर प्रसन्न राहते. मुळात नवीन अनुभव मिळवण्यासाठी आणि मनाचा थकवा घालवून आनंदी राहण्यासाठी प्रवासासारख्या क्रियाकलापा व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. म्हणूनच प्रवास हा फुरसतीचा वेळ घालविण्याचे एक साधन म्हणून जगभरात अतिशय लोकप्रिय झाले आहे. एखाद्या प्रवासाच्या ठिकाणी गेल्यावर तिथे फक्त मौजमजा न करता, तेथील निसर्ग अभ्यासपूर्वक जाणून घेतला तर त्याचा खरा आस्वाद आपल्याला घेता येतो.

मलाही अनेक ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळाली. शाळेत शिकतअसताना मी एकही शाळेची सहल चुकवली नाही. रायगडाची भव्यता, महाबळेश्वरची सुंदरता, हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा, नाशिकची लेणी अशी ठिकाणे आणि सहलीच्या आठवणी आजही लक्षात आहेत. मित्र-मैत्रिनिंसोबत केलेली मस्ती, बसचा प्रवास, शिक्षकांचा मोलाचा सहवास, अंताक्षरी आजही मनाला भुरळ पाडतात. पुन्हा एकदा लहान व्हावे आणि परत एकदा शालेय जीवन अनुभवावे असेच प्रत्येक वेळी वाटत राहते.

कुटुंबीयांसमवेतही अनेक प्रवास झाले. त्यात कर्नाटकातील गोकर्ण, मुरुडेश्वर, मैसूर, उटी, श्रवणबेळगोळ, बादामी, बेळगाव, बीजापुर तसेच तमिळनाडूतील सुप्रसिद्ध मंदिरे कंची, मदुराई, रामेश्वरम, कन्याकुमारी आणि महाराष्ट्रातील मुंबई, सोलापूर, तुळजापूर, कोल्हापूर, नाशिक, अष्टविनायक दर्शन अशी मोठी यादीच आहे. प्रत्येक क्षेत्राचा स्वतंत्र इतिहास व महत्त्व त्या-त्या ठिकाणी पहावयास आणि अनुभवयास मिळते.

कामानिमित्त सुद्धा बऱ्याच ठिकाणी जायची संधी मिळाली. दिल्ली, केरळ, मुंबई सारखी शहरे फिरावयास मिळाली. दिल्लीचा लाल किल्ला, इंडिया गेट, राजपथ, कमल हाऊस पाहून खूप आनंद झाला. दिल्लीच्या फेरीत दोन्ही वेळा विमानाचा प्रवास घडला. दिल्लीत असताना तेथील खाद्यपदार्थ चाखायची संधी मिळाली. पुरी-छोले, चटपटे नाश्त्याचे पदार्थ, राजमा-चावल आठवले की आजही तोंडाला पाणी सुटते. आमच्या मुंबईची तर शानच निराळी ! दिमाखात उभा असलेला गेट वे ऑफ इंडिया, महालक्ष्मी मंदिर, राणीचा बाग, बूट हाउस, हाजी अली कधीच विसरणे शक्य नाही. चौपाटीवरची भेळ, गरम वडा-पाव, खमंग पावभाजी, झणझणीत मिसळ आठवली की तोंडात पाणी येते. केरळला तर देवभूमी म्हणतात. तिथल्या अथांग पसरलेल्या नदीत बोटहाऊस मधून फिरण्यात जो आनंद आहे तो दुसर्‍या कशात नाही. केरळला गेल्यावर तिथल्या पारंपारिक जेवणाचा आस्वाद घेणे म्हणजे स्वर्गसुख अनुभवणे ! अननसाची कोशिंबीर, पायसम म्हणजे खीर, लाल तांदळाचा भात, सांबर, पापड असा अद्भुत मेनू चुकवणारा माझ्या मते मूर्ख ठरेल. अशा या प्रवासाची कहाणी कधी संपूच नये असे वाटते.

अशा या वेगवेगळ्या प्रवासांत पाहिलेली वेगवेगळी ठिकाणे, तिथे घडलेले वेगवेगळे अनुभव, तिथल्या आठवणींची उजळणी करत पुढचा प्रवास आता कधी घडेल याचीच उत्सुकता लागलेली आहे. 

“कामाचा व्याप सांगू कोणाला

उसंत नाही एका क्षणाला

वाटे थोडी विश्रांती घेऊ

प्रवासाचे वेध लागले मनाला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *