–पंकज पंडित–
अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्याची गोष्ट आपणाला माहीत असेलच. असा जादूचा दिवा मिळाला तर काय मज्जा येईल, नाही ! आपण आपल्याला हवे ते मागून घेऊ पण अनेक इच्छापूर्ती झाल्यावर, अजून, अजून मागतच राहू की आता बस्स, असं म्हणून तो जादूचा दिवा फेकून देऊ ? मला असाच जादूचा दिवा लाभला होता. त्याची प्रचिती घेतल्यानंतर, मी तो जादूचा दिवा, चक्क फेकून दिला! आणि परत कधीही तो वापरला नाही , त्याची ही कहाणी
मी लवकरच गद्धेपंचविशीत प्रवेश करणार होतो Engg /MBA करून मी नुकताच एका मोठया खाजगी कंपनीत नोकरीला लागलो होतो. घसघशीत पगार व इतर भत्ते पण चांगले होते शिवाय सेल्सची नोकरी असल्याने, भारतभर फुकट फिरायला मिळत असे. परंतु “आहे मनोहर तरी, गमते उदास ” अशी अकारण उदासी, काहीशी चमत्कारिक परिस्तिथी होती.मला नक्की काय पाहिजे ते मात्र सांगता येत नव्हते.
तेव्हा “EST” नावाचे एक महागडे ट्रैनिंग परदेशातून, मुंबईत आले. आम्ही तुमचे “ट्रान्सफॉरमेशंन”, “संपूर्ण परिवर्तन” करणार असा त्यांचा दावा होता त्यावेळी या “EST” ट्रैनिंगचा बराच बोलबाला होता . मी ESTची दोन आठवड्याची कार्यशाळा पूर्ण केली पण त्यातून मला काहीच बोध झाला नाही.निराशाच झाली. मग त्यांचेच अजून एक छोटे ट्रैनिंग केले. त्यात एक प्रयोग करायचा होता , “तुम्ही चमत्काराचा अनुभव घ्या ” एखादी छोटी इच्छा करा आणि बघा ती पुरी होते काय? तशी मी अमुक एका मित्राला भेटण्याची इच्छा ठेवली आणि काय आश्चर्य ! तो मित्र,त्याच दिवशी, अगदी वाट चुकवून, मला भेटला ! मग काही पदार्थ खाण्याची इच्छा केली. तीही सहज फलद्रुप झाली. असे बरेच छोटे, यशस्वी प्रयोग, झाल्यावर, मी म्हंटले, आता एखादी मोठी इच्छा करून बघूया. तेव्हा मी तीन इच्छा व्यक्त केल्या आणि सर्व इच्छा माझ्या पंचवीसाव्व्या वाढदिवसाच्याआधी पूर्ण व्हायला हवे होते अशी अटपण घातली.
१. मला कार हवी होती तेव्हा कार असणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण होते. आता कार असण्याचे विशेष अप्रूप राहिले नाही.स्वतःची कार चालविण्याचे माझे लहानपणपासूनचे स्वप्न होते. तेव्हा आमच्या घरात, नातेवाईकांत, समवयस्क मित्रांमध्ये, तसेच सोसायटीमध्ये, विशेष कोणाकडेही कार नव्हती. एवढेच काय, तेव्हा माझ्याकडे साधी स्कूटरसुद्धा नव्हती आणि मी एकदम कार घ्यायचे स्पप्न बघितले.
२. प्रेम म्हणजे काय असते? याचा मला अनुभव हवा होता . कॉलेजमध्ये प्रेमाने सतत हुलकावणी दिली होती. हिंदी चित्रपटात, कवितेत प्रेमाची थोरवी गात असतात पण प्रेमाचा मला स्वाअनुभव मात्र शून्य होता.
३. मला अमेरिका बघायची होती कारण तेव्हा इंजिनियर झाला की लगेच अमेरिकेला जाण्याचा प्रघात होता. आमच्या घरातील, बरेच नातेवाईक अमेरिकेला स्थायिक झाले होते “भारतात काय ठेवले आहे “? अशीच तेव्हा परिस्थिती होती . अमेरिका जणू स्वर्गच आहे असे वाटायचे.
असे तीन संकल्प करून मी माझ्या नित्यकर्माला लागलो आणि चमत्काराना सुरुवात झाली. अवघ्या एका आठवड्यात मी सेकंडहॅन्ड फियाट कार विकत घेतली! अस्तित्वाला माझी इच्छापूर्ती करायची इतकी घाई झाली की मला गाडी चालवता पण येत नव्हती.मग माझ्याच गाडीवर, मी गाडी चालवायला शिकलो !”प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असते”, याचा पण यथावकाश अनुभव मिळाला (“येह कहानी फिर कभी “!) आणि सरतेशेवटी माझ्या पंचविसाव्या वाढदिवसाच्या सुमुर्हतावर, माझ्या कंपनीने, मला अमेरिकेला दोन आठवड्याच्या ट्रैनिंग प्रोग्रॅमला पाठविले !
पाब्लो कोयलो याची अलकेमिस्ट(Alchemist) नावाची एक कादंबरी आहे. त्यात एक सुप्रसिद्ध वाक्य आहे , “जेव्हा तुम्ही एखादा संकल्प हृदयापासून व्यक्त करता , तेव्हा सर्व अस्तित्व , तुमचा संकल्प पूर्ण करायला ,जणू “कारस्थान”च करते”. फक्त तुमचा संकल्प त्या जग्गानियंत्या , सृष्टीकरत्यापर्यंत नीट पोहोचला पाहिजे, की लगेच तो “तथास्तु” म्हणतो
जादूच्या कांडीसारख्या,अस्तित्वाने माझ्या सर्वच्या सर्व, तिन्ही इच्छा, पूर्ण केल्या आणि तेही दिलेल्या वेळेत ! मी कृतार्थ झालो!! त्या अस्तित्वाचे मी आभार मानले आणि संकल्प केला की आता काहीही न मागता, आयुष्याचा प्रवास करायचा. अस्तित्वाला माझ्यासाठी जे जे काही मान्य असेल, ते ते आनंदाने स्वीकारायचे. त्यानंतर मला अस्तित्वाने आयुष्यात माझ्या कोत्या, मर्यादित मनाच्या इच्छेपेक्षा, कितीतरी अधिक, अमर्याद खजिने मला उपलब्ध करून दिले.
“मन का हो तो अच्छा और ना हो , तो और भी अच्छा”: असं हिंदी कवी श्री हरिवंशराय बच्चन म्हणायचे. “मनोगती”(मनाची समजण्याची आकलन शक्ती) मर्यादित असते. मनाच्या इच्छा आकांशा , बहुतेक अहंकारातून येत असतात. त्या मनाप्रमाणे पूर्ण झाल्या तरी मन त्यात काही “खोट ,वैगुण्य” काढते. म्हणून इच्छा पूर्ण झाल्या तरीही मन कधीही संतुष्ट होत नाही; ते अजून, अजूनचा हव्यास धरते आणि मग अस्तित्वाने तुमच्यासाठी जे काही आणखीन खास, सर्वात उत्तम पर्याय राखून ठेवले असतात , त्यात आपला हस्तक्षेप होतो. याउलट जर काहीही इच्छा न ठेवता, जे मिळाले, तेच मला हवे होते!, अशी “अनिवार्य निवड” (choiceless selection)केली तर मग अस्तित्व कृपेचा आभाळ फाडून वर्षाव करते
आता “निवड” म्हंटल की “अनिवार्य” कशी ? तर आयुष्यात जे जे घडून गेले आहे, घडत आहे, त्याबद्दल “संपूर्ण आणि अनिवार्य स्वीकृती” करायची. पंचविशीतील या निर्णायक वळणानंतर, माझ्या आयुष्याला “नवीन सुरवात” झाली .हा मोठा सुयोगच होता. कारण सहजपणे , विनासायास , वस्तू माझ्याकडे चालत आल्याचे अनुभव नेहेमी यायला लागले. मग असे “चमत्कार”, इतके “नित्य” झाले की त्याचे आश्चर्य वाटायचे बंद झाले ” कोणतीही गोष्ट हवीच” असा अट्टाहास कोणत्याच बाबतीत राहिला नाही. “जे जे मिळाले , ते ते मानले त्याचा प्रसाद”. कोणाशीही स्पर्धा संपली. “ठेविले अनंते , तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान”!
१. मला “माझ्या मालकीच्या वस्तू ” हव्यात
२. मी या वस्तूंचा “वापर, उपयोग, वा उपभोग” घेणार.
त्यामुळे,
३. मी “आनंदी” होणार
असा या “मनोगती”च्या तीन तार्किक पायऱ्यांचा क्रम आहे. परंतु “वस्तू”प्राप्ती झाली तरी त्यातून “आनंदा”ची प्राप्ती अभावानेच होते. हा क्रम जर उलट ३, २, १ असा केला, आणि मग, “आपल्या नित्य-आनंदातून , आपण जेव्हा स्वाभाविकपणे, सहज कृती, कर्म करतो; तर मग त्या पाहिजे त्या वस्तू, आपोआप, आपल्याकडे आपसूकच , आकृष्ट होतात!” या इच्छापूर्तीच्या योगायोगाचा, धार्मिकपणाशी किंवा देवधर्म, नित्यनेम पाळणे याच्याशी काहीच संबंध नाही. म्हणतात ना , “जे जे इच्छी प्राणी, ते ते पुरवी चक्रपाणि ” ! मोटारगाड्या अशा अनेक “वस्तूंचे आणि गृहसौख्य, इ, वास्तूंचे” तसेच संपत्ती, दीर्घायुष्य, आरोग्य, चांगल्या नोकऱ्या, परदेश गमन, इ गोष्टींचे “योगायोग ” अगदी सहज घडून येऊ शकतात.
“सत्य संकल्पाचा, दाता नारायण” (इति संत तुकाराम) : इच्छा, स्वप्नरंजन हा व्यक्तिगत मामला असतो पण जेव्हा त्याला व्यापक स्वरूप मिळते तेव्हा तो संकल्प होतो. स्वतःच्या भाग्यउदयात अनेकांना भागीदारी दिल्यावर, अस्तित्व त्या संकल्पाला हमखास “तथास्तु” म्हणते. कारण आता संकल्प सर्वसमावेषक झालेला असतो. उदा. हिंदवी स्वराज्याचा संकल्प करणारे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रणांगणातील धुरंधर सेनानी. किंवा आजकालचे उदाहरण म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक, नारायण मूर्तीसारखे यशस्वी उद्योजक; ज्यांनी इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनाही, “स्टॉक ऑपशन्स”च्या (stock options) परिस स्पर्शाने गर्भश्रीमंत केले. यांसर्वांनी आपल्या वैयक्तिक इच्छेला, व्यापक स्वरूप देऊन, अनेकांना आपल्या स्वप्नापूर्तीत सामील केले. अल्लाउद्दीनच्या दिव्याची गरज नाही. सगळ्यांकडेच इच्छापूर्ती करणारा कल्पवृक्ष आहे! मग सांगा तुमचा अनुभव. तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर!
