–पूजा सोनवणे–
मागच्या वर्षी नाताळाच्या सुट्ट्या म्हणून कुठे तरी जाऊयात असं ठरवत होतो, हैदराबादला, राजस्थानला किंवा कोडाईकनालला जाऊयात असे ठरत असताना, ओमिक्रोन नावाच्या कोविडच्या नवीन भावाने जन्म घेतला होता. लॉकडाऊन समजा झालाच तर कुठे अनोळखी जागी अडकण्या पेक्षा मुंबईला जायचं ठरवलं. समजा लॉकडाऊन झालाच तर मुंबईत नातेवाईक आहेत आणि पुण्यात पोहोचणं सहज शक्य आहे, म्हणून मुंबई हे पक्कं केलं.
२५ डिसेंबरची भल्या पहाटेची फ्लाईट घेऊन मुंबई गाठले. कॉफी आणि थोडा टाईमपास करून नणंदेकडे पोहोचलो. घरी पोहोचल्यावर चविष्ट नाश्ता केला. तोवर घरी सगळे नातेवाईक पोहोचतच होतो. खऱ्या अर्थाने जीवाची मुंबई करायला सुरवात झाली. पत्त्यांची मेहफिल रंगली, तासा -तासाला चहाचे कप येतच होते. दुपारचे भर पेट जेवण आणि पुन्हा पत्ते, उनो खेळता-खेळता संध्याकाळ झाली. डिसेंबर असल्यामुळे मुंबई आवडत होती, उकाड्याचा लवलेशही नव्हता. खादाडी आणि धमाल करताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. आम्ही पोहोचलो एका फेमस चाट कॉर्नरला, मेनू बघून काय घायचे आणि काय नाही.असा गोंधळ उडाला होता काय सांगू तुम्हाला. मग खायला मागवत राहिलो सगळे आणि पोट फुटेपर्यंत खाल्ले. खाऊन झाल्यावर घरी पोहोचल्यावर पुन्हा पत्ते आणि चहाचे राऊंड्स सुरू झाले. संडे इज फंडे म्हणत दुसरा दिवस ही मुंबई-भ्रमंती केली.
पुढच्या दिवशी सगळे आपापल्या मार्गी गेले आणि आम्ही पोहोचले आमच्या मित्राकडे. वर्क फ्रॉम होम आणि वर्क फॉर होम करत धमाल करत इतर मित्र मैत्रिनींना भेटत होतो. ह्यात हवी ती सगळी काळजी घेऊन! सॅनिटायझर, मास्क, बेसिक सेफ्टी हे सगळे पळून फिरत होतो. बघता- बघता नवीन वर्ष जल्लोषात सुरू झाले आणि आम्ही बंगलोरला यायच्या तयारीला लागलो. त्या वेळेस कोविडची टेस्ट करणे आवश्यक होते. टेस्ट करून घरी आलो, संध्याकाळी बाहेर जेवायला गेलो. जेवून घरी यायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे घरी आलो आणि मस्त झोपलो, दुसर्या दिवशी बाग भरायची आणि रात्री विमानतळावर जाऊन पहाटेची फ्लाईट घेऊन बंगलोरला यायचे असे ठरले होते.
पहाटे जाग अली म्हणलं रिपोर्ट्स आले असतील, डोळे किलकिले करून ई-मेल उघडून बघितलं तर रिपोर्ट आला होता. नुसता आला नव्हता तर तो पॉसिटीव्ह आला होता. सकाळचे पाच वाजले होते, नवऱ्याला गदा-गदा हलवून उठवले आणि सांगीतले माझी कोविड टेस्ट पॉसिटीव्ह आली ये आता तुझी बघ पटकन. तो झोपेत होता, त्यामुळे म्हणाला आत्ता झोप थोड्या वेळाने बघतो. मला सुचत नव्हते त्यामुळे त्याला सांगीतलं आत्ताच्या आत्ता ते बघ. मग काय, त्याने पहिले तर त्याचा रिझल्ट निगेटिव्ह. त्याला सांगीतलं हॉल मध्ये झोप. पुढे काय करायचे ते बघूयात.
त्याने पटापट ज्यांना भेटलो त्यांना मेसेज करून कळवून टाकले. उगाच पुढे वाढायला नको. आता राहीला प्रश्न ‘तो’ आला कुठून, त्यावर बोलत बसले तर १० पाने भरतील. असो, हे सगळे आता कसे निस्तरायचे? एकतर मित्राकडे होतो, त्यांना अजून किती त्रास द्यायचा म्हणून पुन्हा एकदा टेस्ट करूयात असं ठरविले. काही केल्या कोणी घरी येउन पटकन टेस्ट करून जायला तयार नव्हते, त्यात दुसर्या दिवशी पहाटेची फ्लाईट होती. टेस्ट चुकून पॉसिटीव्ह आली असेल तर पुढची टेस्ट करून घेऊयात. कसा बसा एक लॅब वाला घरी आला पण तोवर महानगर पालिकेत नाव पोहोचले होते आणि दुसरी एक नातेवाईक पॉसिटीव्ह आले होते. आता हे पक्के झाले होते की माझी टेस्ट पॉसिटीव्ह आहे आणि इन्फेकशन कमी जरी असले तरी हे असा आहे. मग फॅमिली डॉक्टरला फोन केला आणि औषध सुरू केले.
मित्र, त्याची बायको आणि माझा नवरा असे तिघं बाहेर आणि मी एका खोलीत आयसोलेटेड. व्हिडीओ कॉल करून पुढे काय करायचे हे ठरवत होतो. भावाला फोन केला, तो म्हणाला मी घ्यायला येतो आपण पुण्याला येऊ, तू वरच्या घरी एकटी राहा, खाली आम्ही सगळे राहतो. मग मित्र माझे रडणे ऐकून ओरडला तुला इथे काय त्रास आहे? १० दिवसात बाहेर येशील कशाला उगाच रिस्क घेऊन पुण्याला जायचे तुला ? कळत सगळं होते पण वळत मात्र नव्हते, आपली चुकी नसताना आपल्याला त्रास होतोच आहे पण आपल्या मुळे ह्यांनाही त्रास. हा माझ्या प्लॅनचा भाग नव्हता मला घरी यायचे वेध लागले होते. पुढचा सगळे प्लॅनिंग फिसकटले होते. काहीच सुचत नव्हते. अजून पुढे काय वाढून ठेवले आहे काय माहिती अश्या विचारांनी डोक्याला त्रास होत होता. आता जे झालं ते बदलता येणार नाही ये, हे लक्षात घेता माझा कोविड-आयसोलेशनचा प्रवास सुरू झाला. नशीबाने चांगले मित्र मिळतात हे मात्र नक्की. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असे करत मित्र, त्याची बायको आणि माझा नवरा तिघंही कामाच्या जबाबदार्या सांभाळत होते.
बघता-बघता ५ दिवस संपले, ठाणे महानगरपालीके प्रमाणे माझे आयसोलेशन संपले होते आणि माझ्या डॉक्टर कडून पण ग्रीन सिग्नल मिळाला होता, पण आता मला खोकला सुरू झाला होता आणि आपल्यामुळे कोणालाही त्रास नको व्हायला म्हणून आम्ही अजून ५ दिवस बाहेर नाही पडायचे ठरविले. हळू-हळू खोकला कमी झाला, अकराव्या दिवशी मी एका खोलीतून घर भर फिरायला मोकळी झाले आणि लगेच दुसर्या दिवशी पुणे गाठले. त्या दिवसा पासून कानाला खडा,ह्यापुढे २५ डिसेंबर ते ५ जानेवारी मी महाराष्ट्रात पाऊल ठेवणार नाही. सलग दोन्ही वर्षी महाराष्ट्रात असताना, त्याच तारखेला टेस्ट पॉसिटीव्ह आल्यामुळे झकास नवीन वर्षाची सुरवात झाली त्यामुळे किती ही वाटले तरी विषाची परीक्षा नाही द्यायची हा मी केलेला अलिखित संकल्प आहे.
