सनविवि अनुभव,साहित्योन्मेष  ‘ऑनलाइन’ शाळेचा पहिला दिवस

 ‘ऑनलाइन’ शाळेचा पहिला दिवस

   — मानसी गजानन तांबेकर —       

‘कोरोना’ नावाच्या विषाणू ने  सर्वांना काही ना काही नवीन गोष्टी शिकवल्या. कुणाला स्वयंपाक ,कुणाला धुणीभांडी, कुणाला चित्रकला तर कुणाला गायन-वादन. नेहमी विद्यार्थ्यांना शिकवण देणाऱ्या माझ्यासारख्या शिक्षिकेला या कोरोना ने शिकवली ’ऑनलाईन शाळा.’ फ्रान्स क्रांती एवढीच ‘ऑनलाईन शाळा’ म्हणजे शिक्षण क्षेत्रात खूप  महान क्रांती होती. फ्रान्सच्या क्रांतीच्या भाषेत म्हणायचे झाल्यास माझ्यासारख्या अनेक शिक्षक-शिक्षिकांच्या अवस्थेचे चित्रण करणे आवश्यक आहे. या क्रांतीला सामोरे जाण्याआधी माझी अवस्था फार बिकट होती. गुडमॉर्निंग च्या सुरात स्वागत,वर्गहजेरीचा तालात पाढा ,काळ्याभोर बोर्ड वर पांढऱ्या खडूने उमटलेली अक्षरे, कधी उत्तर देण्यास हिरिरीने पुढाकार घेणारे, कधी मागच्या बाकावर बसून बिनधास्त गप्पा मारणारे,मधल्या सुट्टीची आतुरतेने वाट पाहणारे  विद्यार्थी; असा ५० बाय २० फुट च्या शाळेच्या खोलीत भरणारा चौथी ‘अ’चा वर्ग. अचानक १३ बाय १५ इंची खिडकीत भरणार होता. आम्ही ‘गूगल मीट’ च्या माध्यमातून मुलांना भेटून त्यांची शाळेची चिंता ‘मिट’वणार होतो. या नवीन पद्धतीत ही ‘कल्पकतेने शिक्षण’ या संकल्पनेला तडा जाऊ नये म्हणून PPT Presentation,Video Making,VideoRecording असा वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम शाळेने आमच्याकडून पूर्ण करून घेतला. Upload presentation, शेअर स्क्रीन, पब्लिक चॅट असे भले-भले शब्द मला क्रांती कडून उत्क्रांती कडे नेत होते. पाहता पाहता मी सिस्टम परिपूर्ण झाले.

   अखेर ‘तो’ दिवस उजाडला. ‘ऑनलाईन’ शाळेचा पहिला दिवस. दहा वर्षाच्या शैक्षणिक कालावधीत मी पहिल्यांदाच ‘काय’ शिकवायचं त्यापेक्षा ‘कसं’ शिकवायचं याची उजळणी करत होते. आज राहून राहून मला ऐशीं च्या दशकातली  हिंदी सिनेमातली आई आठवत होती जी आपल्या आळसात लोळत पडलेल्या लाडक्या लेकाला लाडिकपणे उठवत असते-अरे बेटा, उठो ,आज ‘इस्कूल’ नहीं जाना क्या? इस्कूल नहीं जाओगे ,पढोगे ,लिखोगे नहीं तो बड़े होकर कलेक्टर कैसे बनोगे? तिचे ते शब्द आठवले आणि वाटलं तेव्हा त्या ‘इस्कूल’ साठी तयार झालेले ते पोरगं आता खरंच ‘इ-स्कूल’ मध्ये दाखल झालं होतं. सवयीप्रमाणे पाच मिनिट आधीच 

मी ऑनलाईन वर्गात जाऊन बसले. डस्टर ,खडू ,वह्या ,पुस्तके या गोष्टी पडताळ्याऐवजी mute,unmute,share screen अशी सगळी बटणं आपली कामं चोख बजावत आहेत की नाही याची खात्री करून घेतली.दरवाजा वर कामवाल्या बाईने मारलेल्या बेलचा आवाज शाळेच्या घंटेसारखाच माझ्या कानात घुमू लागला. शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन वर्गात शिरताना थोडी घाबरलेली ,बावचळलेली मुले ऑनलाईन क्लास मध्ये टेक्नॉलॉजी आणि गॅजेट चे बाळकडू मिळाल्यामुळे सराईतपणे  दाखल झाली. ऑनलाईन क्लास मुळे नवीन घडीचा गणवेश, नवे बूट ,नवे दप्तर ,वह्या -पुस्तके हे सर्व आपल्या मित्र -मैत्रिणींना दाखवायची नवलाई, त्यातून मुलांना आणि त्यांचे उत्साही चेहरे पाहून आम्हा शिक्षकांना मिळणाऱ्या आनंदावर विरजण पडले होते. तरी नमस्ते ,सुप्रभात, मॅडम कशा आहात तुम्ही? तर मध्येच हाय पिंकी, हॅलो अजय हे असे आवाज लॅपटॉप स्क्रीनच्या भिंतीत आणि विंडोज मध्ये घुमत होते. मुलांच्या त्या किलबिलाटाने कान आणि त्यांचे प्रसन्न चेहरे पाहून मन सुखावलं. पण थोड्याच वेळात किलबिलाटाचा कलकलाट झाला होता.अशावेळी ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ हे वर्गातले शिक्षकांचे ब्रीदवाक्य आज फोल ठरत होते. त्याची जागा ‘Mute All’ या बटणाने घेतली होती. पूर्ण वर्गाला क्षणात शांत करायची त्या बटणाची ताकद पाहून, आता ‘गप्प बसा’ असा जयघोष न करता मी शिकवू शकते या भाबड्या विचारांनी मन सुखावले.  नवीन लॅपटॉप, उत्तम इंटरनेट, विजेची कृपा आणि सोबत मी धडाडीने पूर्ण केलेला सिस्टीमचा अभ्यासक्रम यामुळे क्लास सुरळीतपणे चालू होता. व्हिडिओ आणि ऑडिओ बटनाशी खेळ करून उगाचच क्लास डिस्टर्ब करणाऱ्या कुलदीप मध्ये मला मागच्या बाकावरचा मुलगा दिसू लागला. माझ्यात ला शिक्षकी बाणा जागा झाला.मी त्याला पकडलं आणि प्रश्न विचारला. कुलदीप चा व्हिडिओ ऑन झाला मात्र खुर्चीत बसण्यापेक्षा जवळ जवळ रेललेला ‘कुलदीप’समोर आला. . कुलदीप भलताच ‘COOL’ होता. एका हातात पराठ्याचा रोल, तोंडात लाडू आणि पाठी दूधाचा ग्लास घेऊन उभी त्याची माता असा सरंजाम होता! इंटरनेट व्यवस्थित असतानादेखील तो ‘फ़्रिज’ झाला होता. अचानक सगळे बघताहेत हे कळल्यावर त्याने तोंडातला लाडू चावायचाच बंद केला. इतक्या सर्वांसमोर एकट्याने लाडू खायचा त्याच्या आयुष्यातला हा पहिला प्रसंग होता. त्याची आई पटकन दूधाचा ग्लास ठेवून क्लास मधून निघून गेली. त्याचा हा अवतार आणि व्रात्य पणा पाहून खरंतर खूप वाक्य जिभेवर रेंगाळली होती पण त्यांना आवंट्यासोबत गिळून आणि डोळ्यात असलेल्या रागीट भावांना प्रेमात बदलून मी त्याला क्लासमध्ये लक्ष देण्याची फक्त ‘कूल’ धमकी दिली. तेवढ्यात सागर नावाच्या विद्यार्थ्यांनी पटापट UNMUTE करून उत्तर देण्याची तयारी दाखवली. मीही त्याचा चुणचुणीत पणा पाहून खुश झाले. तो उत्तर देणार तितक्यात त्याचा छोटा भाऊ त्याचं कसलंसं पुस्तक फाडताना त्याला दिसला म्हणजे आम्हा सर्वांना दिसला. ते दिसताच ही स्वारी ताडकन उठली आणि दोघांमध्ये जुंपलेल्या मारामारीचे थेट प्रक्षेपण आम्हाला झालं. आवाज ऐकून त्याची आई आली खरी; पण त्या माऊलीने फक्त व्हिडिओ ऑफ केला आणि पुढे महायुद्धाचे पडसाद येतायेत असं वाटताच मी त्यांची बोलती बंद केली. मी मोर्चा क्लास च्या मुलींकडे वळवला. एका  खिडकीत सानिका चे वडील झाडू मारण्यात इतके मग्न झाले होते की  आपल्या लेकीचा कॅमेरा ‘ऑन’ आहे याचा त्यांना विसर पडला होता. तिच्या वडिलांचा सोफ्याखालून केर काढायचा राहिला हे मी चाणाक्ष डोळ्यांनी  बघितले आणि हसू उमटले. आता मी मधुराला प्रश्न विचारणार तितक्यात जोरजोरात खडखडाट ऐकू आला. मी हा आवाज कसा आणि कुठून येतो आहे ह्याचे निदान  लावेपर्यंत तो माझ्याच स्वयंपाक घरातून आहे हे सांगण्यासाठी मुलांची चढाओढ लागली होती.  मग लक्षात आलं ; सकाळी वीज गेली होती तेव्हा गडबडीत वॉशिंग मशीनचे बटण चालू राहिले होते. माझ्या कामवाल्या बाईंनी प्रसंगावधान राखून बटण बंद केले पण तरी या प्रसंगाने क्लासची शांतता भंग पावली होती. माझ्याकडून झालेल्या गडबडीमुळे माझा हिरेमोड झाला होता.ही परिस्थिती मी सावरणार तोच कुठच्याशा खिडकीतून क्लासची वेळ संपल्याची घोषणा झाली. एकच लगबग उडाली. शाळेचा तास संपल्यावर होणाऱ्या घंटेची वाट बघणारी मी भानावर आले. मुले ‘बाय मैम, थँक यू मैम’ म्हणत पटापट क्लास सोडून निघून गेली.ऑनलाइन क्लास मध्ये मी एकटीच होते. मनात विचारचक्र सुरु झाले. आज कितीतरी वर्षांनी मी शिक्षिकेपेक्षा एका विद्यार्थिनी च्या भूमिकेत होते.  खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. जिज्ञासा, कुतूहल, नवलाई, भीती आणि आनंद या मिश्रित भावनांमध्ये घालवलेला माझा शाळेचा पहिला दिवस मी पुनः अनुभवला आणि या ओळी आठवल्या-

जीवन झाली शाळा, अनुभव झाला गुरु

 रोज नवीन शिकून                       

 अध्ययन आणि अध्यापन ठेवा  सुरु.

                                                                                                 

                                   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *