–प्रतिभा बिलगी–
जीवनात येणारा प्रत्येक क्षण येतो आणि जातो. त्या क्षणांमध्ये जर काही सामर्थ्य असेल तेव्हाच ते क्षण स्वत:चे अस्तित्व टिकवून धरतात आणि त्यालाच आपण ‘अविस्मरणीय’ म्हणतो. अविस्मरणीय म्हणजे ज्याचा विसर पडणार नाही असा, आठवणीत ठेवण्यायोग्य किंवा विसरता न येण्याजोगा. प्रत्येक अविस्मरणीय क्षण हा जगण्यात एक नवी उभारी आणतो.
खरेतर जीवनाच्या प्रवासात प्रत्येक क्षण, घटना म्हणजे सातत्याने बदलणाऱ्या परिस्थितीचा साक्षीदार असल्यामुळे मनात-अंतर्मनात तो क्षण कायमचाच रूतून बसतो. प्रवास, एक अशी गोष्ट जी मनाला आनंद तर देतेच शिवाय अखेरपर्यंत त्याची आठवण जीवाला सुखी करते.
लांबचा वा जवळचा, नेहमीचा असो वा कधीतरी केलेला, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात सातत्याने प्रवास करते. तो कामानिमित्त असो किंवा मनोरंजनासाठी अथवा मानसिक आरोग्यासाठी. अश्या या प्रवासामध्ये कोठेतरी अल्लड, अखवळपणे वाहणारी एखादी नदी, कधी पक्ष्यांच्या थव्याने शोधलेला शांत तलावाचा विसावा, कोठे शेजारून जाणारी बैलगाडी, अंधाराची अनुभुती देणारा लांबलचक बोगदा, कधी पवनचक्या, तर कधी कडेच्या रूळावरून जाणारी रेल्वे निसर्गाचे प्रत्येक रूप इथे पाहता व अनुभवता येते. जाता जाता आपली सोबत करणारे असंख्य पक्षी, इवलेसे प्राणी निसर्गाची जादू दाखवतात तर दुसऱ्या बाजूस मानवी प्रगतीचे शिखर दाखवणाऱ्या उंच लांब इमारती पुन्हा वास्तवाची जाणीव करून देतात.
मी केलेल्या कित्येक प्रवासांपैकी माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग मला बेळगावच्या प्रवासादरम्यान घडला. इथल्या गोकाक धबधब्याला भेट न देता परतणे म्हणजे एक सुंदर निसर्ग सौंदर्याला मुकणे असे आहे. या गोष्टीला माझे मन बिल्कुल तयार नव्हते म्हणून गावाकडे जाणारी गाडी मी धबधब्याकडे वळवण्यास मुलाला सांगितले. ही गोष्ट आमच्या आत्ताच्या योजनेत बसत नव्हती परंतु जाण्यासाठी तो ही तयार झाला.
बेळगावी शहरापासून या धबधब्यापर्यंत पोहोचणे ही मजेची बाब आहे. गावातील रस्त्यावरून आणि भात-उसाच्या हिरव्यागार शेतातून गाडी चालवणे हा एक अतिशय चांगला ग्रामीण अनुभव होता. तिथे पोहोचल्यावर डोंगरावरून ओसंडून वाहणारा धबधबा पाहून आनंद झाला. एक रोमांचकारी धबधब्याला भेट देणे म्हणजे फक्त तो पाहणे नव्हे तर तिथल्या नदीवरील केबल पुलावरून चालणे हा ही आहे. यासाठी आम्ही पुलावरून चालत गेलो. अहा ! यासारखा दुसरा अनुभव नाही. त्या झुलत्या पुलावरून पाण्याचा प्रवाह पाहून अंगावर रोमांच उभे राहिले. नंतर आम्ही पाण्याचे थंड प्रवाह ओलांडण्यासाठी आणि फॉलचे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवण्यासाठी खडकांच्या खाली गेलो. मनसोक्त त्या वाहत्या पाण्यात भिजलो. थंडगार पाण्याचे शिंतोडे अंगावर झेलताना खूप मजा आली. मी पाण्यात थोडा वेळ पाय बुडवून बसले. त्या क्षणी सगळ्या चिंता, मनावरचा ताण, सगळ्या नकारात्मक भावना नष्ट झाल्याचा अनुभव आला.
घटप्रभा नदीवरील हा धबधबा पावसाळ्यात अमेरिकेतील नायगारा धबधब्याची आठवण करून देत होता. भले मोठे पात्र असलेल्या घटप्रभा नदीतील पाणी रोरावत खाली कोसळताना त्यातून होणारा आवाज, उडणारे तुषार पाहणे हा माझ्यासाठी एक अत्यंत आनंददायी आणि रोमांचकारी अनुभव होता. हा रोमांचकारी अनुभव मनात साठवून या धबधब्याच्या खडकाळ घाटाच्या दोन्ही बाजूंच्या स्मारकांना देखील आम्ही भेट दिली. इथे देवी दुर्गा, भगवान षण्मुख आणि भगवान महालिंगेश्वराची मंदिरे यांचा समावेश आहे जे पारंपारिक चालुक्य स्थापत्यशैलीमध्ये बांधलेले आहेत. देवदर्शन झाल्यानंतर पेटपूजाही तितकीच जरुरी होती कारण पोटात आता कावळे ओरडण्यास सुरुवात झाली होती.
तिथून बाहेर पडून बाजूच्याच एका चहाच्या टपरीवर काही खाण्यास मिळते का हे पाहण्यास गेलो. तिथल्या गरमागरम भजीच्या वासाने भूक अजून दुप्पट लागली. चविष्ट भजी, स्पेशल भडंग आणि वाफाळलेला चहा पिऊन त्या क्षणी स्वर्गातील अमृत सुद्धा यासमोर फिके वाटले.
असा हा अविस्मरणीय प्रवास म्हणा किंवा प्रसंग म्हणा किंवा अनुभव म्हणा किंवा क्षण म्हणा ! काही मोजक्या क्षणांतील आजही मनाच्या कोपऱ्यात ताजा असलेला असा हा क्षण !
“ क्षण ते सुंदर आणि मनोहर
मज देतात जगण्या उमेद नवी
पुन्हा एकदा हे क्षण अनुभवण्यास
आतुरता दाटली माझ्या या मनी “
