क्रमश:

कहाणी हिरोशिमाची

– भाग एक 

५ ऑगस्ट १९४५! प्रशांत महासागरात एका प्रचंड युद्धनौकेवर इनोला गे नावाचे बॉम्बवाहू विमान विश्रांती घेत होते. बोटीवर असणाऱ्या इतर अनेक विमानांपेक्षा या विमानाला खास सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. भोवताली तारेचे कुंपण होते. हातात मशीनगन्स घेतलेले सशस्त्र सैनिक सर्वत्र तैनात केलेले होते. बी -29 जातीच्या या विमानात नक्की काय खास आहे याची मात्र कोणालाच कल्पना नव्हती. संपूर्ण मानव जातीचा इतिहास बदलून टाकणाऱ्या एका नवीन युगाकडे दुसऱ्या दिवशी इनोला गे झेप घेणार होते.

युद्ध ही आजपर्यंत अनेक शोधांची जननी ठरली आहे.  अनेक असामान्य बुद्धिवंतांनी आणि आपापली प्रतिभा पणास लावून वेगवेगळ्या शस्त्र-अस्त्रांची निर्मिती केली आहे.  इनोला गे देखील अशाच एका महासंहारक शास्त्राचे वाहन होते. त्या शस्त्राचा हा पहिलाच प्रयोग असला तरी शस्त्र बनवण्याचे प्रयत्न मात्र सहा वर्ष आधीपासून सुरू होते.

१९३९ च्या मार्च महिन्यात लिओ झीलर्ड नावाचा जर्मन शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन ना भेटायला आला. त्यानं जर्मनी युरेनियम चा वापर करून एक अतिसंहारक बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आईन्स्टाईन ना दिली. आण्विक उर्जेचा वापर करून बनवलेल्या बॉम्बची भीषणता लक्षात यायला आईन्स्टाईन ना वेळ लागला नाही. त्यांनी स्वतः अणुऊर्जेचा वापर शस्त्र म्हणून करण्याचा कधी विचार देखील केला नव्हता पण असा एखादा बॉम्ब जर एखाद्या शहरावर किंवा वस्तीवर टाकला गेला तर तिथल्या हजारो लोकांचं काय होईल याची कल्पना देखील त्यांना करवे ना.

आईन्स्टाईनने तात्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रुजवेल्ट यांना एक पत्र लिहिले. अणुबॉम्बची भीषणता त्यांनी या पत्रातून राष्ट्राधक्ष्यांना कळवली. परंतु ते साल होते १९३९! युरोपात दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याच्या मार्गावर होते. रुजवेल्टना एका शास्त्रज्ञाच्या कल्पनेतील बॉम्ब पेक्षा होऊ घातलेले युद्ध खूपच जास्त महत्त्वाचे वाटत होते. त्यांनी ते पत्र एका फाईल मध्ये ठेवून दिले मात्र ठेवण्यापूर्वी ‘महत्त्वाचे’ हा शेरा मारायला ते विसरले नाहीत.

लवकरच युरोपात युद्धाला सुरुवात झाली आणि त्याची व्याप्तीही वाढू लागली. पाठोपाठ वेगवेगळ्या सूत्रांकडून बातम्या येऊ लागल्या. नॉर्वे मधील जड पाण्याचे एक क्षेत्र जर्मनांनी ताब्यात घेतले. झेकोसलावाकिया मधल्या युरेनियमच्या खाणी ताब्यात घेऊन तेथे परत उत्खनन सुरू केले या दोन्ही गोष्टी अणुबॉम्ब तयार करण्यासाठी अत्यावश्यक असतात.  यानंतर मात्र आईन्स्टाईनचे ते पत्र राष्ट्राध्यक्ष रुजवेटनी पुन्हा बाहेर काढले. एवढेच नव्हे तर ब्रिटिश आणि अमेरिकन शास्त्रज्ञांना या विषयावर अधिक संशोधन करण्यास सांगितले. अर्थातच अणुबॉम्ब तयार करणे काही सोपे काम नव्हते त्यासाठी लागणार होता प्रचंड पैसा आणि अनेक ज्ञानी शास्त्रज्ञ. दुर्दैवानं याच सुमारास अनेक युरोपियन शास्त्रज्ञांनी युद्ध आणि नाझीझम या दोन्हीला कंटाळून अमेरिकेचा रस्ता धरला आणि अमेरिकेचे काम खूपच सोपं झालं.

२ डिसेंबर १९४२ ला या शास्त्रज्ञांच्या चमुला प्रचंड मोठे यश मिळाले. शिकागो मधील बॅचलर्स ऑफ फुटबॉल फिल्ड या इमारतीखालील गुप्त प्रयोग शाळेत पहिली मानवनिर्मित साखळी प्रक्रिया म्हणजे चेन रिएक्शन यशस्वी झाली आणि अणुबॉम्ब तयार करणे शक्य आहे हे सिद्ध झाले.

अर्थात हे यश जर्मन शास्त्रज्ञांना आधीच मिळाले असण्याची शक्यता होतीच त्यामुळे एका अति गोपनीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्याचे नाव होते प्रोजेक्ट मॅन हॅटन आणि उद्दिष्ट अणुबॉम्ब बनवणे. या प्रोजेक्टची गोपनीयता इतकी जास्त होती की अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनाही त्याची नीटशी कल्पना नव्हती. प्रोजेक्टचा खर्चा होता सुमारे दोन बिलियन डॉलर्स पण त्यातल्या एका डॉलर साठी सुद्धा संसदेची संमती घेण्यात आलेली नव्हती. प्रोजेक्टवर हजारो लोक काम करत होते पण फक्त बोटावर मोजण्या इतक्या लोकांना हे प्रोजेक्ट नक्की काय आहे याची कल्पना होती.

अणुची नियंत्रित साखळी प्रक्रिया हा मानवाने आपल्या प्रतिभेच्या जोरावर लावलेल्या अनेक शोधांपैकी एक शोध असला तरी या शोधाचं पुढे काय झालं हे पाहूया पुढच्या भागात.

– भाग दोन

इसवीसन १९४२ मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञांना अणुची नियंत्रित साखळी प्रक्रिया घडवून आणण्यात यश मिळाले आणि मेनहॅटन प्रोजेक्ट ला सुरुवात झाली. मॅनहॅटन प्रोजेक्टने नव्या आण्विक युगात प्रवेश केला खरा पण दुसऱ्या बाजूला मात्र युद्धाने भलतेच वळण घेतले. आजवर जगात असंख्य युद्ध लढली गेली होती पण बहुतांशी प्रमाणात या युद्धांचा थेट प्रभाव हा हातात शस्त्र घेतलेल्या सैनिकावर किंवा राजकीय व्यक्तींवर  होत असे.

आता युद्धाच्या सीमा रणांगणापुरत्या सीमित न राहता नागरी वस्त्यांपर्यंत पसरू लागल्या. विमानं आता घर, शाळा, शहर, खेडी यांच्यावर बॉम्ब वर्षाव करत होती. अजिबात सैनिकी किंमत नसणारे डार्स्टन हे जर्मनीतील शहर दोस्त राष्ट्रांनी उध्वस्त केले. हम्बर्ग, टोकियो, इंग्लंड जवळच्या अनेक नागरी वस्त्या या सगळ्यावर प्रचंड बॉम्ब वर्षाव झाला. युद्धात मरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची संख्या लाखाच्या घरात पोहोचली. जर्मनीची अत्याधुनिक v1 आणि v2 रॉकेट्स दोस्त राष्ट्रांच्या शहरांवर धडकू लागली. 

पण नंतरच्या १८ महिन्यात मात्र हे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकू लागले. ६ जून १९४४ रोजी दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने फ्रान्सवर पुन्हा विजय मिळवला आणि ते जर्मनांच्या ताब्यातून हिरावून घेतले. फ्रान्समध्ये शिरलेल्या सैन्याबरोबर एक छोटी विशेष तुकडी एका गुप्त कामगिरीवर फ्रान्समध्ये शिरली. अणुबॉम्ब बनवण्यात जर्मनीला यश आले आहे काय, नसल्यास त्यांची प्रगती कोठवर आली आहे हे शोधून काढणे या गुप्त तुकडीचे काम होते. लवकरच त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. जर्मनीने अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न पूर्णपणे सोडून दिला असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात जर्मनी अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने हालचाल करीत होते मात्र त्यांना त्यात फारसा रस उरला नसण्याचे पुरावे या तुकडीने ब्रिटन आणि अमेरिकेकडे सादर केले. अमेरिकेत मॅनहॅटन प्रोजेक्टर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सुटकेचा निष्वास सोडला. अणुबॉम्ब आणि त्याचे अतिगंभीर परिणाम अधिकाधिक तीव्रतेने त्यांच्या नजरेसमोर येत होते. जर्मनीने अणुबॉम्ब तयार करण्याचे प्रयत्न सोडून दिल्यामुळे आता अमेरिकेनेही मॅनहॅटन प्रोजेक्ट बंद करावे अशी या सर्व शास्त्रज्ञांची अपेक्षा होती. अल्बर्ट आईन्स्टाईननी राष्ट्राध्यक्ष रुजवेल्टना पुन्हा पत्र लिहिले. परंतु परिस्थिती शास्त्रज्ञांच्या हाताबाहेर केव्हाच निघून गेली होती. कोणत्याही महाभयंकर अस्त्राच्या उपयोगाशिवाय सुद्धा दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्र जिंकू शकतील अशी परिस्थिती डोळ्यासमोर आलेली होती पण तरीही मॅनहटन प्रोजेक्ट सुरूच राहिले.

अति विध्वंसक अस्त्र एकदा तयार झाले की त्याच्या उपयोगाच्या निर्णयात  कोणताही वैज्ञानिक निकष असणार नाही नाही याची शास्त्रज्ञांच्या चमुला पूर्णपणे कल्पना होती पण तरीही आपले संशोधन त्यांनी पूर्ण जोमाने चालू ठेवले. मात्र या अस्त्राचा मानवावर उपयोग केला जाणार नाही अशी भाबडी आशा बऱ्याच जणांच्या मनात जिवंत होती.

१६  जुलै १९४५ न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात एक महाभयंकर उद्रेक झाल.  नुसत्या डोळ्यांनी तो स्फोट पाहणाऱ्यांनी तर दृष्टीच गमावली असते. वाळवंटातील वाळू देखील या स्फोटाने वितळली. नारंगी रंगाचा एक तप्त गोळा जणू तेथे तांडव नृत्य करत होता. गोळ्याच्या आतील तापमान सूर्याच्या तापमाना होऊनही अधिक वाढले होते. हा कोणत्याही प्रकारचा नैसर्गिक उद्रेक नव्हता. ती होती एका नवीन महाभयंकर युगाची नांदी.

या स्फोटानं संपूर्ण मानव जातीचे भविष्य बदलून टाकणाऱ्या एका नव्या युगाला कसा जन्म दिला ते पाहूया पुढील लेखात.

—गंधाली सेवक

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *