क्रमश:

#मजा 4

‘रविवार सकाळ ही काय भल्या पहाटे लवकर उठून आवरून बाहेर ट्रेकला वगैरे जायची वेळ असू शकते.

का? रोज तर उठावे लागतेच मग रविवारी रोजच्या वेळेपेक्षा किमान सव्वा दीड तास जास्त झोपलेच पाहिजे म्हणजे आठवड्यातल्या इतर दिवसांचा किमान पंधरा पंधरा मिनिटे एक्स्ट्रा झोपण्याचा कोटा त्या दिवशी तरी पूर्ण केला पाहिजे ना? तशी आम्हाला शनिवारी सुट्टी असते पण तरीही रविवार सकाळची झोप ती रविवार सकाळचीच झोप.’ मयांक जाईला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता.

‘अरे माणसा आता या शहरात येऊन दोन अडीच महीने झाले, तू मला रस्त्यावरच्या ट्रॅफिकमधून उरलेल्या वेळात हे शहर आणि त्यातले मॉल इतकेच दाखवले आहेस. त्यामुळे कंटाळून मी काही ठरवले तर आता तू यायला नकार देतोस?’

‘जाई मी फक्त इतकेच म्हणतोय असे भल्या पहाटे उठून, किंवा शनिवारी रात्रीच चालायला जाऊन आपला रविवार कसा सत्कारणी लागणार? काहीतरीच असते तुझे. झोपेत मेंदूची वाढ होत असते, तुला माझ्या मेंदूची जास्त वाढ नको आहे का?’

‘आता वाढून वाढून गंज लागायची वेळ आली आहे तुझ्या मेंदूला, मला सांग शेवटचे पुस्तक कधी आणि

कोणते वाचले होतेस तू? पुस्तके एकवेळ मी समजू शकते पण कामाच्या धबडग्यात निवांत वेळ मिळत

नाही आणि पण तुला स्केच काढायला किती आवडायचे. शेवटचे चित्र, स्केच कधी काढले होते? पूर्वी तू

मिळेल त्या कागदावर काही बाही काढत राहायचास अगदी मला यायला उशीर झाला तर काहीतरी काढून माझ्या हातात द्यायचास आता काय झाले?’ ‘तू पटलीस आणि बायको झालीस, आता कशाला तुला इम्प्रेस करू?’ ‘तू म्हणजे ना कहर आहेस. मला काही माहीत नाही, मी सनराईज ट्रेकला जाणार आहे. तुला यायचे तर ये नाहीतर इथे झोपा काढ मी जाणार आहे.’

‘तू जाईच आहेस ना?’ जाईच्या हाताला एक छोटा चिमटा काढत मयांक म्हणाला.

‘गप रे खरेच मला जायचे आहे, एखाद्या वेळी रविवार सकाळ दे की माझ्यासाठी!’ त्याच्या जवळ जात

जाई म्हणाली. लाडात आलेली बायको हे अतिशय संमोहक प्रकरण असते आपल्या नकळत आपण कधी हो म्हणून बसतो. आपल्यालाच कळत नाही आणि अर्थात भानावर येईपर्यंत बाण सुटलेला असतो याची परत एकदा प्रचिती मयांकला आली. न्यूटन ने लॉ ऑफ इनर्शिया हा केवळ आपल्यासाठीच लिहिला आहे असे मला कायम वाटायचे. पूर्वी दर वीकएंड वेगळ्या ठिकाणी घालवणारे आपण आता वीकएंडला घराचे दार पण ओलांडत नाही याची जाणीव होऊन मयांकला हसू आले. काय गंमत असते सगळी, एका कोणत्या क्षणी आपल्याला वाटते हेच आपले रुटीन आहे, हीच आपली आवड आहे आणि आपल्याही नकळत आपण एका कॉम्फर्ट झोनमध्ये जातो. मग त्याची सवय लागून जाते आणि त्यातून बाहेर पडायला लागणारे कष्ट, प्रयत्न करायला नको वाटते. हे आपले वय झाले हे तर सुचवत नाही ना? इतका विचार करण्यापेक्षा आपण बायकोला उगवता सूर्य बघायला जायला हो म्हणले असते तर मेंदूच्या काही पेशींना इतका विचारच करावा लागला नसता ना मयांक आत्मसंवाद करत बोलला.

खरेतर बेंगलोरला आल्यापासून काही ना काही कारणाने शहराच्या बाहेर जायला जमलेच नव्हते. तसे तर बेंगलोरपासून १०० किमी च्या अंतरवरची ठिकाणे अशा नावाचे एक फोल्डर लॅपटॉप मध्ये होते मात्र आधी घर लावणे आणि नंतर उन्हाळा, ऑफिसचे काम अशा सगळ्या सबबींखाली त्या फोल्डर आणि जागा सगळ्याचाच विसर पडला होता. Insta वर एखादे रील बघून किंवा कोणाशी यात्री बोलणे झाल्यामुळे जाईला एकदम ट्रीगर झाले असणार, पण चांगले आहे, असे दोघांपैकी एकाला तरी ट्रीगर व्हावे म्हणजे बदल घडून येतात.

पहिल्यांदा जाणार तर आपण दोघेच नको त्यापेक्षा टुर ऑपरेटर सोबत जाऊ आणि त्यानिमित्ताने काही ओळखी होतील अशा हेतूने जाईने सनराईज ट्रेक बुक पण केला आणि मग पुढचे चार-पाच दिवस त्या धामधुमीतच गेले. स्कंदगिरी चा सनराईज ट्रेक. पण त्यासाठी रात्री 11 वाजताच निघायचे होते. पूर्वी खास करून कोरोनाच्या आधी हे असे ट्रेक भरपूर केले असल्याने रात्री अपरात्री प्रवासाची सवय होती, किंबहुना या ट्रेकमुळे त्या आठवणी ताज्या होत होत्या.

या ट्रेकसाठी होणारी खरेदी बघून मयांकने जाईला एकदा विचारले पण, ‘आपण नक्की स्कंदगिरी ट्रेकला जातोय की हिमालयात जात आहोत.’ पण खूप दिवसांनी काहीतरी शॉपिंग करण्याचे मिळालेले कारण जाई थोडीच सोडणार होती. ‘ ही फक्त सुरुवात रे , नंतर जातच राहू ना म्हणून घेतले.’ हे तिचे उत्तर ऐकून तो फक्त हसला. कारण तिला भेटायच्या आधी तो स्वतःला आरंभशूर म्हणवून घ्यायचा, पण तिला भेटल्यावर छे आपण हिच्यापेक्षा किती तरी बरे आहोत हेच त्याला कळले.

शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसाने सुखद गारवा होता हवेत, आता कशाला कुठे बाहेर जायचे, मस्त लोळत वीकएंड काढू या विचाराला दोघांनी तोंडापर्यंत यायच्या आधीच गिळून टाकले. शनिवारी सांगितलेल्या  वेळेच्या आधीच ते पोहोचले, कारण ट्रॅफिकचा अंदाज घेऊन लवकर निघाले पण शनिवारी रात्री चक्क रस्ते तुलनेने रिकामे होते. ‘हे असे कमी गर्दीचे बेंगलोर किती छान वाटते ना?’

‘मला तर प्रत्येक शहर रात्री जास्त सुंदर वाटते. म्हणजे एक दिवस सुखनैव पार पाडल्याचा समाधानाचा सूर असतो रात्रीत असे वाटते मला आणि दुसऱ्या दिवसाची उत्सुकता पण जाणवते. आता बघ ना, आपल्याला अजून हे शहर आपले वाटायचे आहे, पण आता इथल्या काही काही गोष्टी पण चांगल्या वाटायला लागल्या आहेत ना?’

त्याच ठिकाणी हिंदी बोलणारी अजून दोन चार लोकं बघून हे पण नक्की आपल्यासारखेच असणार असे त्या दोघांनी एकमेकांना डोळ्यांनीच खुणावले. दहा मिनिटात गाडी आली आणि सोबत असलेले ते चार जण पण बसमध्ये चढले. गाडीत बसल्यावर ओळख, पाळख, गप्पा सुरू झाल्या. जोपर्यंत आपले प्रवासाचे ठिकाण एकच आहे हे माहीत नव्हते तोपर्यंत अनोळखी असणारे आता काही काळ एकत्र व्यतीत करायचा म्हणून ओळखीचे झाले होते.दोन तासात स्कंदगिरीच्या खालच्या गावात पोहोचले पण. एकदम काळाकुट्ट अंधार पण तरीही त्याची भीती वाटत नव्हती. कदाचित सोबतीला आपले माणूस असेल तर आपोआप भीती कमी होत असावी. ब्रेक घेऊन टीम बरोबर चालायला त्या दोघांनी सुरुवात केली तेव्हा हात हातात नसले तरी एकमेकांच्या साथीने वाट सरत होती. जाईने दोघांच्या शूजचा फोटो काढला आणि कॅप्शन टाकली, ‘जेव्हा तुम्ही सोबतीने चालता

तेव्हा नवी सकाळ फक्त काही पावलांवर असते !!!’

आणि अर्थात हॅशटॅग #मजा होताच!!!

अनुक्रमणिका

1 thought on “क्रमश:”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *