कहाणी हिरोशीमाची – भाग तीन
जुलै 1945 मध्ये न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात अमेरिकेने आपला पहिला अणुबॉम्ब टेस्ट केला. सुमारे 32 किलोमीटर अंतरावर प्रचंड जाड अशा काँक्रीटच्या खंदकात बसून ते दृश्य पाहणाऱ्या शास्त्रज्ञांचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. हा बॉम्ब एका शंभर फूट उंचीच्या स्टीलच्या टॉवरवर ठेवण्यात आला होता त्या टॉवरचे स्फोटानंतर नामोनिशाण देखील उरले नव्हते. नियंत्रित अणु साखळी प्रक्रियेने तयार केलेल्या पहिल्या अणुबॉम्बच्या स्फोटाची तीव्रता साधारणतः 500 ते 1000 टीएनटी असेल असा बऱ्याच शास्त्रज्ञांचा अंदाज होता तो साफ चुकला. पहिल्या अणुबॉम्बच्या प्रायोगिक स्फोटाची तीव्रता होती सुमारे वीस हजार टीएनटी.
अणुबॉम्बच्या त्या पहिल्याच स्फोटाचे वर्णन करताना एका शास्त्रज्ञाने लिहिले आहे- त्या स्फोटाने जणू एकाच वेळेला धरती दुभंगली आणि आकाशाला तडे गेले. अणुबॉम्ब तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक प्रमुख शास्त्रज्ञ होते रॉबर्ट ओपेनहायमर. वैज्ञानिक असून ते एक थोर विचारवंत आणि तत्त्वज्ञानी ही होते. स्वतःचे विचार व्यक्त करायला त्यांनी प्रत्यक्ष भगवद्गीतेचा आधार घेतला. ‘मी जगाचा विनाश करायला जणु मृत्यू रूप धारण केले आहे’ याचे मूर्त स्वरूप त्यांना त्या स्फोटामध्ये दिसले.
या घटनेला अवघे वीसच दिवस उलटले होते, इकडे टीटानियम बेटावर इनोला गेच्या इंजिनाने फुरफुर सुरू केली. या विमानावर अवघा एकच बॉम्ब होता. साधारण दहा फूट लांब दोन फुटापेक्षा थोडा अधिक रुंद आणि त्याचं वजन होतं 9000 पाउंड्स. याचे प्रचंड आकारमान वगळता हा बॉम्ब अगदी बाकी बॉम्ब सारखाच दिसत होता. अर्थातच त्याच्या प्रचंड शक्तीची कोणालाही कल्पना नव्हती. पॉल तिब्बेट आणि रॉबर्ट लुईस हे विमानाचे पायलट असणार होते. पॉल तिबेट्स ने आपल्या आईच्या स्मरणार्थ त्याच्या आवडत्या विमानाला ‘इनोला गे’ नाव दिलं होतं.
इनोला गे ने धावपट्टीवर वेग घ्यायला सुरुवात केली आणि सर्वांनीच आपापले श्वास रोखून धरले. आदल्याच दिवशी बी 29 जातीची चार विमान अतिवजनामुळे उड्डाण करताना कोसळली होती. पण आपल्या सोबतच्या ‘लिटल बॉय’ या भारी भक्कम बॉम्बचे वजन पेलत इनोला गेने यशस्वी उड्डाण केलं आणि सर्वांनी सुटकेचा निष्पास सोडला.
या विमानाच्या आधी चार हवामान निरीक्षक विमाने आकाशात झेपावली होती. इनोला गेच्या समोर यावेळी चार वेगवेगळी लक्ष्य स्थानं देण्यात आली होती. त्यात सर्वात प्रथम होते हिरोशिमा! पण हिरोशिमाला हवामान खराब असल्यास अथवा अन्य कोणत्याही कारणाने जाणे न जमल्यास निगारा, कोकुरा किंवा नागासाकी या तीन पैकी कोणत्याही शहरावर अणुबॉम्ब टाकूनच परत येण्याच्या आज्ञा इनोला गे च्या पायलट्सना दिल्या गेल्या होत्या.
इकडे हिरोशिमामध्ये नवीन दिवसाला नुकतीच सुरुवात झाली होती. लोक ऑफिसला निघण्याच्या गडबडीत होते. मुलं शाळेत निघाली होती. रस्ते वाहनांनी गजबजले होते. हिरोशिमा शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे डाऊन टाऊन मध्ये एक मोठा टॉवर होता आणि त्या टॉवरवर एक भलं मोठं घड्याळ होतं. हे प्रचंड घड्याळ तीन दिवसांपूर्वी सकाळी 8.15 ला बंद पडलं होतं. हा एक मोठा आश्चर्यकारक योगायोगच म्हणावा लागेल. ते ऐतिहासिक घड्याळ बंद पडल्यानंतर बरोबर तीन दिवसांनी म्हणजे 6 ऑगस्ट 1945 या दिवशी सकाळी बरोबर सव्वा आठ वाजता हिरोशिमा मधली हजारो घड्याळं कायमची बंद पडली.
सकाळी सव्वा आठच्या सुमारास हिरोशिमाच्या मध्यवर्ती भागावर ‘बी 29’ जातीचे एक विमान घरघरतांना अनेकांनी पाहिले. अशा अनेक विमानांची तशी त्यांना सवय होतीच. हिरोशिमा शहर होकीयामा आणि मोटायासू या दोन नद्यांच्या संगमावर वसले आहे. या संगमाच्या जवळ शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा जणू प्राण असलेला एक टी शेपचा पूल होता. पण यावेळी विमानातील अधिकाऱ्यांनी हिरोशिमामधल्या या पुलावर नेम धरला आणि हिरोशिमाचेच काय पण संपूर्ण जगाचे भविष्य कायमचे बदलले.
इनोला गे ने टाकलेला बॉम्ब जमिनीवर पोहोचण्याआधीच सुमारे 580 मीटर उंचीवरच फुटला आणि एक प्रचंड आगीचा गोळा सगळीकडे थैमान घालू लागला. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच या गोळ्याच्या आवाक्यातल्या गोष्टी पूर्णपणे नष्ट झाल्या. काही मिनिटांतच जळलेल्या काळ्या पडलेल्या पडलेल्या रस्त्यांवर राखेचे ढिगारे जमा झाले. अधिकृत आकडा सुमारे 70 हजाराचा असला तरी हिरोशिमा मध्ये अणुबॉम्ब पडल्याक्षणी किती लोकांचा बळी गेला याची आज ही पूर्ण कल्पना नाही. पण जे जगले वाचले त्यांच्यासाठी ही नरक यातनांची फक्त सुरुवात होती.
बॉम्बस्फोटापाठोपाठ भूकंप सदृश कंपने हिरोशिमा शहराला जाणवली. अनेक मोठमोठ्या इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या. घरातील शाळेतील ऑफिसमधील अनेक बायका मुले माणसे क्षणार्धात चिरडली गेली. ठिकठिकाणी पुन्हा आगी लागल्या. बॉम्बच्या प्रचंड स्फोटामुळे होणाऱ्या या इतर परिणामांचा कोणी विचारच केला नव्हता.
आपले काम फत्ते झाल्यानंतर थोड्याच वेळात इनोला गेने उलटे वळण घेतले आणि परतीचा रस्ता धरला. वैमानिकांनी खाली नजर टाकली आणि पायलट रॉबर्ट लुईस किंचाळलाच ‘ओ माय गॉड’ आपण हे काय केले? पायलट पॉल तिब्बेटने सांगितले, संपूर्ण हिरोशिमा शहर जणू खदखदणाऱ्या डांबराच्या पिंपासारखे दिसत होते. बॉम्बस्फोटानंतरचा धूर मशरूम सारखा आकार धारण करून ढग बनून अजूनही हिरोशिमाच्या डोक्यावर घोंगावत होता.
इकडे आगीतून कोसळलेल्या इमारतीतून जगल्या वाचलेल्या लोकांनी बाहेर यायला सुरुवात केली तेव्हा धुमसणारा धूर आणि राख यामुळे बाहेरच्या हवेत श्वास घेणे मुश्कील झालं होतं. एक प्रकारची विचित्र राखाडी रंगाची धूळ सगळीकडे भरून राहिली होती. काही फूट अंतरापलीकडचे काहीही दिसत नव्हते. जिकडेतिकडे मृत माणसांची, जनावरांची कलेवरं पडली होती. जिवंत असलेल्यांपैकी बरेचसे जखमी होते. कित्येक जण तर स्वतःचे अवयव शोधत होते नक्की काय घडले आहे आणि आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे याचा कोणालाच पत्ता नव्हता. शहराच्या बऱ्याचश्या भागातून इतर जगाशी संपर्क साधण्याचे कोणतेही माध्यम उरले नव्हते. साऱ्या हिरोशिमाभर एकच प्रेतकाळा पसरली होती. माणसाने माणसावर केलेला मानव जातीच्या इतिहासातला हा सर्वात भयंकर हल्ला होता.
कहाणी हिरोशिमाची- भाग चार
हिरोशिमावरील बॉम्ब हल्ल्यातून वाचलेल्यांचे अनुभव आजही ऐकायला मिळतात. या संपूर्ण घटनेचे सर्वात मार्मिक वर्णन केले आहे ते युद्धातून वाचलेल्या लहान मुलांनी! त्यांचा युद्धाशी काहीही संबंध नव्हता. कित्येकांना तर युद्ध म्हणजे काय हे देखील ठाऊक नव्हते पण तरीही त्या घटनेने सर्वांचेच आयुष्य पार बदलून टाकले. कित्येकांना आयुष्यभर त्याची किंमत मोजावी लागली कारण एकच.. हातातून गेलेल्या शस्त्राला सैनिक आणि घाबरलेली लहान मुलं यांतील फरक कळत नाही.
योशीहिरो कामुरा, अणुबॉम्ब पडला तेव्हा हिरोशिमातील एका शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकत होता. या घटनेनंतर काही वर्षांनी त्यांनी आपले अनुभव लिहून ठेवले आहेत.
तो म्हणतो..मी वर्गात बसलेलो असताना अचानक सारे काही पिवळे झाले. अतिशय प्रखर सूर्यप्रकाश डोळ्यात गेल्यावर वाटेल तसे काहीसे वाटू लागले आणि भूकंप सदृश धक्केही जाणवू लागले. या धक्क्यामुळे योशीहिरो बेशुद्ध पडला. जागा झाला तेव्हा त्याच्या बाजूला, बाजूच्या वर्गात शिकणारी त्याची लहान बहिण उभी होती. तिच्या अंगावर भाजल्याच्या जखमांच्या अनेक खुणा होत्या. आजूबाजूला प्रचंड गोंधळ उडाला होता. तेव्हा तेथून उठून ते दोघं आपल्या घरी जायला निघाले. शाळेच्या जवळच असलेल्या घरी ते पोहोचले तेव्हा घर पूर्णपणे कोसळले होते. कामोरा भावंडांना प्रचंड तहान लागली होती, कुठे पाणी मिळेना म्हणून त्यांनी तसाच नदीचा रस्ता धरला. नदीवर गेले तर नदीचे पाणी काळे काळे होऊन गेले होते. कसली तरी राखाडी रंगाची धुळ त्यात मिसळलेली होती. अनेक मृत शरीर अवयव वाहत येत होते. पण योशीहिरो समोर दुसरा पर्यायच नव्हता. थोड्यावेळाने पाण्यातल्या गोष्टी बाजूला ढकलून ते दोघेही तसेच ते पाणी प्यायले. घराकडे परतल्यावर बऱ्याच वेळाने रात्री त्यांना कळले की घर कोसळताना त्या ढिगाऱ्याखाली सापडून त्यांची आई मरण पावली आहे. वडिलांचा तर काहीच पत्ता लागत नव्हता. योशीहीरो लिहितो त्या रात्रभर मी अगदी हृदय पिळवटून रडलो पण ऐकायला कोणीही नव्हते. त्याची छोटी बहीण तर जणू बधिर झाली होती. ती इतकी घाबरली होती की कित्येक दिवस डोळे बंद करायचीच तिची तयारी नव्हती. अखेरीस सुमारे दहा दिवसांनी म्हणजे 15 ऑगस्ट ला तीही मरण पावली.आपल्या अनेक लेखांचा योशीहीरो ने केलेला शेवट अत्यंत हृदयस्पर्शी आहे. तो म्हणतो दूरच्या नातेवाईकांनी घेऊन गेल्यामुळे माझे आयुष्य तर पुढे चालू राहिले. पण त्यादिवशी मी काय गमावले याची तुम्ही फक्त कल्पनाच करू शकता. तसा माझा कोणत्याही माणसावर राग नाही. पण युद्ध मात्र प्रत्येकच माणसाचा शत्रू आहे हे नक्की.
ताकाको ओकीमोटो या इयत्ता दुसरी शिकणाऱ्या मुलीचे अनुभव तर अधिकच मन विषन्न करून टाकणारे आहेत. बॉम्बस्फोटानंतर तिचे सारे कुटुंबीय एकत्र आले खरे पण तिचा सर्वात मोठा भाऊ मात्र पोहोचू शकला नाही. त्याचे काय झाले हे कधी कळलेच नाही. दुसरा भाऊ परत आला तो अत्यंत जखमी अवस्थेत..आणि दुसऱ्याच दिवशी त्यांने प्राण सोडले. त्यानंतर दोन दिवसांनी तिची आई मरण पावली. आईचे अंत्यसंस्कार करून परतत नाही तोवरच तिच्या मोठ्या बहिणीने जगाचा निरोप घेतला आणि लवकरच तिच्या वडिलांचा हे मृत्यू झाला. एव्हाना 300 किलोमीटर लांबच्या शहरात राहणारे तिचे काका आपल्या कुटुंबीयांचे काय झाले याची कोणतीही बातमी कळत नसल्यामुळे हिरोशिमाच्या वेशीवर येऊन थांबले होते. ही चौकशी करण्यासाठी त्यांनी दिवसेंदिवस मैलोनमैल रस्ता चालत तुडवला होता. सरकारी तंबूत अगदी योगायोगाने त्यांची भेट झाली आणि ते ताकाकोला आपल्या घरी घेऊन गेले.
वयाच्या सहाव्या वर्षी अनाथ झालेली ताकाको 2010 सालापर्यंत जिवंत होती पण तिच्यासारख्या अनेक मुलांना अनाथ करणारा तो दिवस तिच्या स्मरणातून कधीही पुसला गेला नाही. आपल्या उर्वरित आयुष्यात युद्ध आणि अणुबॉम्ब या विरुद्ध जनजागृती करणारे अनेक भाषणे तिने केली.
6 ऑगस्टला अणुबॉम्बच्या स्फोटाबरोबर हिरोशिमातील हजारो माणसे मेली; नंतरचे कित्येक दिवस रोज मरत राहिली. शहरातली बहुतेक इस्पितळे उद्ध्वस्त झाली होती. बचावलेल्या डॉक्टर्स नर्सेसनी शहराच्या बाहेर मदत केंद्रे सुरू केली. तिथे दररोज मैलोनमैल लांब रांगा लागू लागल्या. बॉम्बस्फोट होऊन काही तास उलटत नाहीत तोच बऱ्याच नागरिकांमध्ये एका विचित्र रोगाची लक्षणे दिसू लागली. त्यांना उलट्या जुलाब होऊ लागले. कित्येकांच्या थुंकीतून रक्त पडू लागले, केस पुंजक्या पुंजक्यांनी गळू लागले. बऱ्याच जणांना प्रचंड ताप चढला, अंगावर लाल जांभळे डाग उमटू लागले. डॉक्टरांना कसलेच निदान होईना, या विचित्र रोगाने मरणाऱ्यांची संख्या सुद्धा हजारोंच्या घरात पोहोचली. अणुबॉम्बने हिरोशिमात फक्त आगीच लावल्या नव्हत्या, तर भूकंपासारखे धक्के दिले होते आणि त्यात वापरल्या गेलेल्या किरणोत्सर्गी पदार्थांच्या उत्सर्जनामुळे भयंकर रोग पसरले होते. किरणोत्सर्गामुळे असा काही रोग होऊन तो या प्रमाणात पसरेल असा विचारच कुणी केला नव्हता सहाजिकच या रोगावरचे औषधही कुठल्याही डॉक्टरला ठाऊक नव्हते. अणुबॉम्बच्या स्फोटानंतर कित्येक आठवडे, महिने, वर्षे याप्रकारे जगले वाचलेले लोक विविध प्रकारचे परिणाम भोगत राहिले.
हिरोशिमा मध्ये अणुबॉम्बच्या स्फोटाने नेमके किती लोक मेले याचा नक्की आकडा आजही उपलब्ध नाही पण अंदाजे 70 हजार लोक पहिल्या दिवशी मरण पावले. नंतरच्या काळात हा आकडा दीड लाखापर्यंत पोहोचला. हिरोशिमात असणाऱ्या रेडिओॲक्टिव्ह लेव्हल्स साधारण आठवडाभरानंतर वेगाने कमी होऊ लागल्या पण सुमारे वर्षभर काही ना काही प्रमाणात किरणोत्सर्गाचे अवशेष शिल्लक असण्याच्या नोंदी पाहायला मिळतात. यामुळे सहा ऑगस्ट रोजी तिथे नसणाऱ्या परंतु नंतर मदतीसाठी आलेल्या अनेक लोकांना सुद्धा कॅन्सर सारखे महाभयंकर परिणाम भोगावे लागले.
गंधाली सेवक

अतिशय व्यथित आणि उद्विग्न करणारे वर्णन आहे . हिरोशिमा आणि नागासाकीने जे भोगले ते आणखी कोणाच्या वाट्याला कधीच येऊ नये