–रेवती कुलकर्णी
एका गावांत एक छोटासा टुमदार बंगला होता. त्याच्या पुढेमागे भरपूर जागा होती, छोटी बाग होती आणि समोरच एक मोठे आंब्याचे झाड होते. त्या झाडावर पक्ष्यांची घरटी होती. एका फांदीवर एका चिऊताईचे घरटे होते. चिमणाचिमणी आणि त्यांची दोन पिल्ले. ती उडायला शिकत होती.
एक दिवस त्या बंगल्यात एक कुटुंब रहायला आले. आजी आजोबा, आई बाबा आणि मिनी आणि तिचा दादा.
आईबाबांचे घर लावण्याची काम चालले होते, तेंव्हा ही दोघे बहिण भाऊ अंगणात मस्त हुंदडत असायची! एक दिवस असेच खेळता खेळता त्यांना झाडाखाली चिमणीचे पिल्लू पडलेले दिसले. त्यांच्या पंखात बहुतेक काटा घुसला होता त्यामुळे त्याला उडतां येत नव्हते, चिवचिव करत होते. केविलवाण्या आवाजात ती चिमणी सारखी चिवचिव करत त्याच्यापाशी घोटाळत होती. मिनीने तिच्या आजोबांना बोलावले. त्यांनी तिच्या दादाला कापूस, डेटाॅल आणायला सांगितले. त्यांनी त्या पिल्लाला हळूच उचलले आणि हलक्या हाताने त्याच्या नाजूक पंखात घुसलेला काटा काढला,तिथे कापसाने डेटाॅल लावले. अलगद उचलून त्याच्या घरट्यातही थोडा कापूस पसरवून त्यावर ठेवले. मिनीला आईकडून एका वाटीत थोडी दूधपोळी आणायला सांगितली आणि त्यापुढे ठेवली. त्या पिल्लाने आधी धडपडत पण नंतर चुटूचुटू खाऊन संपवून टाकली.
मिनी आणि तिच्या दादाचा नंतर रोज हाच उद्योग झाला होता, त्याच्या घरट्यापाशी काहीतरी खायला ठेवायचे आणि टाळ्या पिटत त्या पिल्लांकडे बघायचे. त्यांची छान दोस्तीच झाली होती . चिऊताईला सुद्धा आता ह्या कुटुंबाची सवय झाली होती.
त्यातच आली दिवाळी!
मुलांच्या आणि आजोबांच्या उत्साहाला उधाण आले होते, मिनीच्या दादाने आजोबांच्या मदतीने आकाशकंदील बनवायला घेतला होता. बागेत एक कोपरा आजीने आणि आईने रांगोळीसाठी गेरूने सारवून ठेवला होता. आणि पलिकडे बाबा आणि दादाने किल्ला करायचा ठरवले. मिनी सगळ्यांच्यातच लुडबुड करत होती.
एकदम मिनीला एक आयडिया सुचली, ती आईला म्हणाली , “आई अगं त्या चिऊताईची पण दिवाळी करूया का?
तू तिच्या घरट्याखाली छोटीशी रांगोळी काढशील का? आणि दादा एक छोटा आकाशकंदील तिच्या घरट्याजवळच्या फांदीवर लावशील का? आजी तू आणि आईने मिळून जे फराळाचे बनवले आहेस ना त्याचे छोटे तुकडे करून एका छोट्या प्लेटमधे तिच्या घरट्यात ठेऊया का?”
“अरे भारी आयडिया ! “ सगळे एकदमच ओरडले!
मिनीला एकदम भारी वाटायला लागलं!
दिवाळीचा दिवस उजाडला. बाबांनी आपल्या घराला लावला, तसा छोटा कंदिल चिऊताईच्या घरट्यापाशी बांधला. आईने सुरेख रांगोळी काढली, लाडू, चकलीचे तुकडे एका प्लेटमधे घालून तिच्या घरट्यात ठेवले. चिऊताईनेआणि दोन्ही पिल्लांनी ते चुटूचुटू खाल्ल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला !
अश्या तऱ्हेने चिऊताईची पण दिवाळी झकास झाली!
मुलांनो कशी वाटली गोष्ट?