मस्त कलंदर ..शोभा बोंद्रे
या पुस्तकात लेखिकेने असामान्य व्यक्तींची ओळख करून दिली आहे.

किशोर कुमार एक अफलातून नट,अनेकांच्या मनावर जादुई आवाजाने अधिराज्य गाजवणारा व अनेक अजरामर गीतांचा गायक. पण तो जितका त्याच्या भूमिका व गाण्यांसाठी प्रसिद्ध होता त्याहीपेक्षा जास्त प्रसिद्धी त्याच्या चक्रमपणाच्या चित्रविचित्र गोष्टींना मिळाली. लहानपणापासून त्याचा गमत्या स्वभाव मोठेपणीही कायम होता पण नंतर नंतर त्यातील निष्पाप, निर्व्याज भाव लोपला होता व त्याची जागा चीड,बेताल व बेलगाम वागण्याने घेतली होती. हे असे का घडले असावे? याची उत्तरे आपल्याला या लेखात मिळतात.
भरत दाभोळकर- भरत आपल्याला माहिती आहे तो त्याच्या गाजलेल्या अमूल, व्हिडिओकॉन, एलआयसी यासारख्या जाहिरातीमुळे .पण जाहिरातींच्या जगातील इंग्रजीच्या वर्चस्वाला तडा देऊन भारतातील अनेक भाषांच्या समावेशाचा धाडसी विचार मांडून त्याने तो यशस्वीपणे अमलात आणला. त्याचं प्राणी प्रेम व त्यासाठी ऑफिस हे प्राण्यांना दुसरं घर वाटावं म्हणून फायबर ग्लासचं जंगल बनवणारा भरत हा एकमेव. त्याच्या प्राण्यांची अफलातून नावे ‘वडू’ हे पर्शियन मांजर तर ‘ओह् -सो स्वीट!’ याचा शॉर्ट फॉर्म म्हणून ‘ओशो’ नावाचा कुत्रा तर त्याच्या मकावचे नाव ‘ सद्दाम हुसेन!’ आईचं मन राखण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करणारा, मित्र ,सहकारी ही नाती अनेक वर्ष जोडून ठेवणारा, हाताखालच्या व्यक्तींवर आयुष्यात कधीही आवाज न चढवणारा ‘द भरत दाभोळकर!’ वाचायलाच हवा.
निलु म्हणजे नावापासून कामगिरी पर्यंत ,विचारांपासून वागणुकीपर्यंत एक विलक्षण व्यक्तीमत्व! भारत ही जन्मभूमी आणि अमेरिका ही कर्मभूमी असणारी निलु या विश्वाची नागरिक आहे तिचा धर्म एकच माणुसकीचा आणि तिची खरी कमाई आहे उदंड समाधान! स्वतः ठरवलेल्या मार्गावरून कितीही अडथळे आले तरी धीर न सोडता यशस्वीपणे वाटचाल करून, निरपेक्ष मनाने सतत माणुसकीचा ध्यास घेतलेली व सर्वांवर फक्त प्रेमच करणारी निलु- निरंजना गव्हाणकर मनाला खूप भावली.
अनेक विविध उद्योग धंद्यांमध्ये अपयश आल्यानंतरही जिद्द, चिकाटी आणि आशावाद असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे जयंत साळगांवकर. लोकसत्ता -शब्दरंजन कोडं ते काल निर्णय हा त्यांचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे.
आधुनिक परिकथेतील राजकुमार ” विजय मल्ल्या” सर्वांना सुपरिचित व्यक्तिमत्व! तरीसुद्धा लेख वाचून प्रत्येकाने त्याच्याबद्दलचे स्वतःचे चित्र स्वतःच तयार करावे हे लेखिकेचे म्हणणे तंतोतंत पटणारे आहे.
सर्वच व्यक्तिरेखांचे सुसंबद्ध शब्दांकन लेखिकेने केले आहे!
वैशाली तोरवी
-x-x-x-x-x-x-x-

उत्तम सारांश आहे पुस्तकाचा. परंतु दाभोळकरांवर एवढा मोठा परिच्छेद आणि मल्ल्या, साळगांवकरांवर मोजकीच वाक्ये लिहून तुम्ही त्या दोघांवर अन्याय केलाय वैशालीताई! 🙂