श्रद्धांजली

विनम्र श्रद्धांजली

महाराष्ट्र मंडळाच्या माजी अध्यक्ष श्रीमती पद्माताई टोळ यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. 2022 साली योगदान पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. त्यांचे कार्य आम्हाला कायम मार्ग दाखवीत राहील.

सनविवि संपादक मंडळ आणि महाराष्ट्र मंडळ कार्यकारीणीकडून पद्माताईंना भावपूर्ण श्रद्धांजली !!!

प्रिय पद्माताई

तुम्ही ८० वर्षांचा एक सुंदर प्रवास पूर्ण केलात.

तुमचं प्रेम आणि हास्य मी कधीच विसरणार नाही. 

तुम्ही केवळ माझ्यासाठी मैत्रीण नव्हतात तर एक आदर्श व मार्गदर्शक होतात.   

            एक बातमी आली…पद्माताई गेल्या. पंचतत्वात विलीन झाल्या. पण खरंतर आठवणीच्या स्वरूपात त्या आजही आपल्यात आहेत. जीवनाचा प्रवास थांबला असेलही पण तुमच्या आठवणी आमच्या सोबत सदैव राहतील. 

            महाराष्ट्र मंडळाच्या माजी अध्यक्षा आणि योगदान पुरस्कार विजेत्या पद्माताई म्हणजे प्रेमळ आणि अत्यंत दिलदार व्यक्तिमत्व!

            लहान थोर सर्वांशीच त्यांची मैत्री असायची. कधीही भेटल्या तरी सर्वांची अगदी अगत्यानी चौकशी करायच्या. त्यांना रागावलेले आम्ही कधीच बघितले नाही.

            त्यांची टापटीप रहाणी आणि हसरा चेहरा हा सदैव स्मरणात राहील. महाराष्ट्र मंडळाच्या कामकाजामुळे आमचा, पद्माताई आणि अण्णांशी खूप जवळचा संबंध होता. एखाद्या सामाजिक कार्यात सर्वस्व अर्पण करून झोकून देऊन कसे काम करायचे हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो.

            मंडळाच्या कार्यक्रमांना नेहमीच शुभेच्छा देणे आणि कार्यक्रम संपल्यानंतर आवर्जून कलाकारांची भेट घेऊन त्यांना शाबासकी देणे, हे त्या नेहमीच करत असत, किंबहुना आम्ही सर्वजण त्याची वाटच बघत असायचो.

            एखादी कळी उमलते आणि विकसित होता होता आपल्या सौंदर्याने आणि सुगंधाने सर्वांना आनंद देते, तसे त्यांचे पूर्ण विकसित जीवन होते. 

            आम्ही त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळावी यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्या आठवणी सदैव मनात साठवून, त्यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीच्या वाटेवरून आपण मार्गक्रमण केले तरच ती त्यांना खरी श्रद्धांजली होईल.

 राजीव आणि जयश्री पोतनीस

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *