–डॉ. सौ.अनुराधा भागवत —
दिवाळीचा सण म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सण,आनंदाचा, उत्साहाचा, नात्याचं महत्त्व सांगणारा, जवळीक वाढवणारा, जीवनात हर्षाचे, मांगल्याचे दीप लावून प्रकाशमय करणारा. शेतीच्या, घराच्या कामांतून यानंतर सर्वांनाच थोडी फुरसत मिळते. हवेतील सुखद गारवा मनाला आल्हाददायक बनवत असतो. थंडीच्या गारठ्या वर मात करणारा लग्नकार्यातला सळसळता उत्साह वातावरण भारून टाकतो, आणि अशा वेळीच वर्ष संपत असल्याची जाणिव होते. चांगल्या वाईट, सुखद दुःखद, घटनांनी व्यापलेले हे वर्ष आता आपल्या आयुष्यातून वजा होत असतं.हे वर्ष कसंही गेले असले तरीही मनाला हुरहुर लागतेच. खरंतर दिवाळी संपते तेव्हाच आपल्या मनात येतं,या वर्षीचे सणवार आता संपले डिसेंबर लागला, हा आता शेवटचा महिना. मन नकळतच नविन वर्षाच्या स्वागतासाठी आतुर होते.
पूर्ण जगभर नविन वर्षाचं स्वागत खूप जोरात, जोषांत होत. आजच्या काळातील आपल्या समाजातील हा एक महत्त्वाचा सणच म्हणावा लागेल, याची तयारी पण खूप आधी पासून सुरु होते. भारतीय समाजमन उत्सवप्रिय आहेच. प्रत्येक गोष्ट मनापासून करणं त्याला भावतं व ते त्यात रमतं.तुळशीच्या लग्नानंतर लग्नांची धामधूम सुरु होते, पण हा एक पारिवारिक समारंभ असतो. भावनोत्कट, व्यस्ततेचा, गोतावळ्यासाठी उत्साहाचा, मजा मस्करीचा असला तरी त्याला उत्सवाचे स्वरूप नसते, निदान शहरात तरी. असं म्हणायचं कारण, शहरात नववर्षाच आगमन जेवढ्या धूमधडाक्यात होत तेवढे खेड्यापाड्यात, छोट्या गावात होत नाही. व्यवसायानिमित्त मला छोट्या गांवांमधून फिरावं लागते त्यामुळे गांवाकडच्या जीवनाची थोडी जवळून ओळख झाली आहे. तिथे लग्न म्हणजे सर्व गाव वर्हाडी,गांवाच कार्य. नाच गाणी, खाणं पिणं मनसोक्त. तिथे लग्नाला पण उत्सवाचे स्वरूप येते अगदी सार्वजनिक उत्सवाचे. नववर्षाच्या उत्सवाची गरज म्हणून तिथे कमी वाटते कां?तसं अलिकडे गांवाकडेही हे लोण पोचले आहे पण जास्त करून गांवातील मुले शहरात येऊनच ही हौस भागवतात.
आता आपल्या देशातही सर्वत्र साजरा होणारा हा सण अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण म्हणावा लागेल. हा आपला पारंपारिक, पारिवारिक सण नाही. सार्वजनिक नाही, खरा सामाजिकच. सार्वजनिक म्हणता येणार नाही कारण होळी, गोकुळाष्टमी सारखा सरसकट सर्वांनी मिळून मिसळून साजरा केला जात नाही. आपल्या पारंपरिक सणांप्रमाणे घरात पूजा, नैवेद्य, ब्राम्हण सवाष्ण, अशी गडबड उडत नाही. घरच्या घरी परिवारा सोबत असे या सणाचे स्वरूप नसते .बहुतेक जण घराबाहेर… क्लब, हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊस अशा ठिकाणी मोकळ्या हवेत मौज मजा करत आनंद साजरा करतात. आपल्या वयोगटातील माणसं एकत्र येतात व आपल्या वयोमानानुसार मौज मजेचा कार्यक्रम आखतात. कुठे शांतपणे पेयांचा आस्वाद घेत, माफक मद्याचा समावेश करत गप्पा, गाणी, रेकॉर्ड्स काही ठेका धरणारी पावलं असा ज्येष्ठ नागरिकांचा गट,कुठे खूप वर्षांनी एकत्र आलेले जुने मित्र मैत्रिणी, कुठे मुलांशिवाय एकत्र जमलेली मध्यमवयीन जोडपी, तर कुठे मुलाबाळांसकट तरुण जोडपी आणि या सर्वांवर कळस म्हणजे तरुण महाविद्यालयीन पोरांचा जल्लोष व धिंगाणा!
सर्व जगावर राज्य करायला पूर्वेकडून अवतरलेलं हे नविन वर्ष जणु एक एक देश पादाक्रांत करत पुढे सरकू लागते. जाणारे वर्ष रात्री बारा वाजता संपते. प्रत्येक देशाच्या वेळेनुसार तिथे नविन वर्ष सुरु होते. घरांत बसून दूरदर्शन वर कार्यक्रम बघणाऱ्यांना ही मजा खूप अनुभवायला मिळते. अगदी पूर्वेकडील ऑस्ट्रेलिया, जपान वगैरे देशातील नववर्षाच्या स्वागताच्या बातम्या दूरदर्शनवर झळकू लागतात पण आपण मागच्या वर्षातच असतो. असाच काहीसा अनुभव ज्यांची मुले शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने परदेशात गेली आहेत त्यांच्या पालकांना येतो. आणि या सणाचा जणु एक आवश्यक उपचार आहे की आपल्या ठिकाणी बारा वाजून गेले की सर्व एकमेकांना फोन करून नविन वर्षाच्या शुभेच्छा देऊ लागतात. एकच धमाल उडते मोबाइल मुळे तर प्रत्येक जण प्रत्येकाला फोन करतो. मुले अगदी आवर्जून आईवडिलांना फोन करतात अगदी आईला वेगळा व बाबांना वेगळा. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मुलांचा फोन येतो तेंव्हा आईवडील घड्याळात बारा वाजायची वाट पहात असतात, फोन जवळ घेऊन बसलेले असतात. फोन तत्परतेने उचलला जातो. पण अमेरिकेत अगदी पश्चिम किनाऱ्यावर राहणाऱ्या मुलांचा फोन येतो तेव्हा फोनच्या आवाजाने जाग येते.
आनंद, उल्हास संसर्गजन्य असतो असे म्हणतात ते अगदी बरोबर आहे आपल्या मनात उत्साह असो वा नसो,शुभेच्छा देणाऱ्याच्या आवाजातून प्रतीत होणारा आनंद आपल्या मनात प्रतिध्वनित होतोच. नव्याची नवलाई काही औरच असते. एखादी गोष्ट नविन आहे म्हणूनच ती आपल्याला सुखावते. परस्परांना शुभेच्छा देताना, घेताना या आनंदाने सर्वांची मनं भारावतात,हा आनंद सर्वत्र भरून राहतो.
आजकाल कुठे कुठे एक विसंवादी सूर ऐकू येतो. असं वाटतं नविन वर्षाचं हे स्वागत पुष्कळांना आवडत नाही किंवा पटत नाही. त्यांचं म्हणणं हे नविन वर्ष आपले नाही, हिंदूंचे नाही. आपण हिंदू, आपले नविन वर्ष गुढीपाडव्याला सुरु होते. मान्य आहे. आपले नविन वर्ष, नविन संवत्सर, नविन पंचांग गुढीपाडव्याला सुरु होते. यांत न पटण्यासारखे कांहीच नाही. आपण आपल्या पध्दतीने गुढीपाडवा साजरा करतोच की पण म्हणून हे नविन वर्ष आपल्यासाठी नाही कां?
तसं पाहिलं तर पारसी, मुसलमान, सिंधी सर्वच धर्मांचे नविन वर्ष वेगवेगळ्या वेळी सुरु होते. व्यापारी लोकांचे नविन वर्ष दिवाळीत सुरु होते. आपल्या देशात आर्थिक वर्ष एक एप्रिल पासून सुरु होते. अशा वेगवेगळ्या नविन वर्षांची आपल्याला संवय आहेच. नाताळच्या सणाला जोडूनच वर्ष सरतं व नविन वर्ष अवतरतं. पण म्हणून हे फक्त ख्रिश्चनांचं आहे कां?या नविन वर्षाची सांगड कुठल्याही धर्माशी घातली गेली नाही आहे. हे नविन वर्ष सर्वांचे, सर्व जगाचे आहे, आपलेसुद्धा आहे.
” वसुधैव कुटुंबकम् ” हे शिकवणारी आपली संस्कृति आहे. मग या विशाल कुटुंबात सर्वांनी एकोप्याने एकदिलाने रहायला नको कां?जगाच्या बरोबरीने आपल्याला ही पावलं टाकायची आहेत. मग नविन वर्षाचं हे आगमन व त्याचं स्वागत करणारा हा सण आपलासा करायला हवा. बहुतांश भारतीयांनी तो केलेलाच आहे. आपणही सर्वांच्या सुरांत सूर मिसळून मोकळेपणाने त्याचा आनंद घेऊ या.
भलं बुरं कसं ही असलं तरी जुने वर्ष आता सरलेलंच आहे. नविन वर्षाच्या पोटांत काय दडलंय कुणालाच माहित नाही. प्रत्येकाच्या मनात नविन वर्षाबद्ल भरपूर आशा, सुखसमृद्धी च्या अपेक्षा असतात नव्हे तशी खात्रीच असते. नविन वर्षासाठी पुष्कळ जण काही संकल्प करतात, मी पण केला आहे. आपल्या मनांत येणारे सतत इतस्ततः भरकटणारे विचार वेळोवेळी कागदावर उतरवण्याचा, त्या विचारांना एका विषयाशी सुसूत्रपणे बांधून, अधिक सखोल विचार चिंतन करून एक लेख किंवा निबंध लिहण्याचा दर महिन्याला एक. यापूर्वी मी हे कधीच केलेलं नाही माझ्यासाठी हा संकल्प एक आव्हानच आहे. पेलवेल ना मला?नविन वर्षाच्या चाहुलीने मला हा संकल्प करायला प्रव्रुत्त केलं. मनांत एक विश्वास आहे, माझ्या सोबतीला साथ देणारा मित्र परिवार आहे, जरूर पडेल तिथे मदत करून संकल्पाला सिध्दि पर्यंत पोचवणारे भक्कम पाठीराखे आहेत. पूर्ततेच्या कल्पनेने मन आनंदत आहे. त्याच आनंदाने मी आपणा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देते.
मनापासून सर्वांचे………. नूतन वर्षाभिनंदन !
