— देवश्री अंभईकर धरणगांवकर —
थंडगार वारा अंगावरून गेला की विचित्र शहरल्यासारखं होतं. आयुष्य थंड आणि थांबल्यासारखं वाटतं. कुठूनसे गिटारचे सूर कानांवर पडतात…मन बेचैन करतात. हातातली इंग्लिश कादंबरीही मग वाचाविशी वाटत नाही. टेबलं, खुर्च्या, भिंती, सर्वच भोवताल तटस्थपणे आपल्याकडे पाहतोय असं वाटतं. त्या निर्जीव वस्तूही कंटाळलेल्या सुस्तावलेल्या वाटतात. घराबाहेरही पडता येत नाही कारण सगळीकडे कोरोना रोगाची दहशत. सगळे लोक एकमेकांपासून अंतर राखून असलेले – सामाजिक संपर्क जणू संपल्यासारखा झाला आहे आणि हे सर्व कधी संपणार तेही कळत नाही. गजबजलेला, हसता-खेळता, व्यस्त असलेला देश क्षणात महामारीच्या भीतीने स्वतःला घरात कोंडून बसलेला. मग शाळा – महाविद्यालये तरी कशी अपवाद असणार! सर्वच बंद. सर्व वयोगटातील विद्यार्थी घरात बसून आपापल्या मोबाईल-संगणकांवर होईल तसा अभ्यास करत शाळेची- महाविद्यालयांची पुन्हा उघडण्याची वाट पाहत असलेले. पूर्वी सणासुदीला शाळेला मोठी सुट्टी मिळाली की कसा आनंद होत असे. पण दोनच दिवसांत शाळेची, शाळकरी सवंगड्यांची आठवण येत असे आणि कधी ठराविक तारखेला शाळेत जाऊ असे होत असे. रम्य ते बालपण. पण यंदा ती शाळा पुन्हा सुरू होण्याची तारीखच माहिती नाही. कोरोना आपल्या रोगट, अदृश्य व क्रूर हातांनी सर्व जगालाच नाचवीत आहे. तेव्हा लहानग्यांना शाळेत एकत्र येण्यापासून दूर ठेवण्यातच शहाणपण वाटले तर नवल ते काय. उसासून सहज खिडकीबाहेर पाहिले…
आजकाल सतत घराजवळ असलेल्या व खिडकीतुन दिसणाऱ्या त्या शाळेकडे लक्ष जातं आणि काळजात हलकंच काही हलल्यासारखं वाटतं. उगीचच मन भूतकाळात – पार शाळेत जाऊन पोहोचतं. शाळेच्या आठवणीने त्या तशा मरगळीतही हळूच हसू येतं. कसे होतो ना शाळेत असताना आपण! साधे, निरागस, मस्त, उद्याची चिंता नसलेले…आणि आपली शाळाही तशीच साधी पण जिव्हाळा वाटेल अशी.
गावाकडची शाळा आठवली की आजही मन जिव्हाळ्याने, आदराने भरून येतं. ब्रिटिशांनी बांधलेली त्या काळची कोर्ट-कचेरीची, अनेक खोल्यांची ती इमारत स्वातंत्र्यानंतर शाळेसाठी देण्यात आली, एवढाच तिचा पुसटसा इतिहास कळलेला. शाळेचे वर्ग चांगलेच प्रशस्त होते. चार-चार खिडक्या, समोर व मागे दरवाजे असलेले. छत चांगलेच उंच व वर लाकडी तुळया व मंगलोरी कौले असलेले. भिंतींना आतून चुनखडीचा पांढरा रंग आणि बाहेरून चुन्यात मिसळलेला पिवळा रंग फासलेला. समोर भलामोठा भिंतीवरचा काळा फळा. त्या फळ्यावर रोजची दिनांक व एक सुविचार लिहिण्याची संधी वर्गातील ज्याला मिळेल तो त्या दिवशी दिवसभर लॉटरी लागल्यासारखं टेचात मिरवत असे. लाकडी बाके व लाकडी मेज. त्यावर जुन्या काळची शाईची दौत ठेवायची गोलाकार वाटीसारखी जागा. काही वर्गांत तर खालीच लाल सतरंजीच्या पट्ट्या टाकून त्यावर सावकाराच्या पेढीवर असतात तशी लाकडाची उतरती बैठी टेबलं लिहिण्यासाठी दिलेली. ही अगदी पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची रचना. त्या शाळेच्या आवारात काही छोटी-मोठी झाडं सावली धरून असलेली. तिथेच सारा गलका असायचा मधल्या सुट्टीत डबे खायला. शाळा अशी तेव्हा फार प्रशस्त वाटायची. आवडायची. शाळेच्या कितीतरी आणखी आठवणी गच्च भरून येणाऱ्या लोकलट्रेनसारख्या मग मनात येऊ लागतात. त्या साऱ्याच असंख्य आठवणी शब्दबद्ध करणं अवघडंच. त्या काळचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळकरी मैत्रिणी… आता असं वाटतं किती छान दिवस होते ना ते. पुन्हा नजर खिडकीतून दिसणाऱ्या शेजारच्या आता बंद आणि शांत असलेल्या शाळेकडे जाते. मन क्षणात ‘कोरोनामय’ वर्तमानात येतं.
शाळेच्या भिंती मुलं घरी गेल्यावर कसं भकास वाटतं याची जाणीव मूकपणे करून देत असतात. शाळा सुटते. मुलं घरी जातात मग गोंगाट, गडबड, बडबड, घोकंपट्टी, सूचना, ओरडा, वह्या तपासणं काहीच नसतं. क्षणापुर्वी गजबजलेला वर्ग मग कसा रिकामा, ओकाबोका, कसनुसा वाटतो. पण गमंत म्हणजे मधल्या सुट्टीत मात्र तोच वर्ग मेंढरं चरायला सोडल्यावर झाडाखाली गवतावर अंग टाकून जरा निवांत पहुडलेल्या एखाद्या मेंढपाळासारखा वाटतो. शाळा सुटल्यावर सफाई करणाऱ्या कर्मचारी बायका यांत्रिकपणे वर्ग झाडून घेऊ लागतात. त्यांनी लोटलेल्या कचऱ्यावरसुद्धा मुलांच्या खुणा उमटलेल्या असतात. पेन्सिलीची टोकं, टोक काढून काढून झिजलेल्या पेन्सिली, खडूचे तुकडे, काहीतरी खरडून उगाच खोडून चुरगाळून टाकलेले वहीचे मागचे कागद, मेणाच्या रंगकांड्या, तुटलेल्या स्केलपट्ट्या, पेनाच्या कांडीने कोरलेली खोडरबरं, कुणी वाढदिवस म्हणून वाटलेल्या चॉकलेटची रंगीत वेष्टणे, कागदांची विमानं, एखाद्या पुस्तकाचे फाटलेले मुखपृष्ठ. काय काय तरी असतं त्या कचऱ्यात. पूर्वी तर वर्गात बोरे-आवळे, भुईमुगाच्या शेंगासुध्दा चुपचाप खाऊन बिया व टरफले डेस्कच्या आत सापडत. असा तो कचराही मुलांच्या चैतन्यमयी अस्तित्वाची साक्ष देणारा असतो. आता शाळा बंद आणि आता सर्व शांत-शांत…कोरोनामुळे अतीच स्वच्छ.
एरव्ही जेव्हा शाळा सुटण्याची शेवटची घंटा वाजते तेव्हा ती फार कर्कश्य वाटते. जरा जास्तच वेळ वाजते. आता शिक्षकांनाही घरचे वेध लागतात. सर्व मुलं घरी गेल्यावरही त्यांना थोडावेळ का होईना उगीच थांबावे लागलेले असते. तसा नियमच असतो आणि त्याचा दैनंदिन रोषही असतो. लगबगीने सारे शिक्षक सही करायला गर्दी करतात. मस्टरची अवस्था सतत हाताळून कळकट्ट झालेली असते. येताना आणि जातानाही सही करण्याची सक्ती असते. हो, कुणी चुपचाप अर्धा वेळ दांडी मारून पळाले तर. ऑफिसचा बाबू टक लावून पाहत असतो. अमुक वेळ अचूक झाल्याशिवाय तो कुणालाही मस्टर देत नाही अन् मारक्या रेड्यासारखा बघत राहतो. कितीतरी वर्षं तो हे काम करतो आहे. शाळेच्या भिंतींना सर्व माहित असतं.
मुलं येतानाही आणि निघतानाही किलबिलाट करतात. तसे ते सतत बोलतच असतात. शिक्षकांची पाठ वळली की त्यांचं बोलणं सुरु. काय बोलतात इतकं आणि काय त्यांचे विषय असतात कुणास ठाऊक. पण मुलांचा गोंगाट सतत सुरु असतो. त्यांना शांत बसवून जरासा अभ्यास करून घेणं म्हणजे कसबच. परीक्षेतच काय ती तेवढी जरावेळ शांतपणे बसतात. जिन्यावर, कॉरिडॉरमध्ये, मधल्या मोकळ्या चौकात, मैदानावर कुठेही त्यांची पावलं वाजतात…ते पळतात, बागडतात, हुंदडतात, कधी धडपडतात, पुन्हा उठतात, लोटालोटी करतात, एकमेकांच्या खोड्या काढतात. घरी जाताना केवढा आनंद असतो शाळा सुटल्याचा त्यांच्या निरागस चेहऱ्यांवर. मग शाळा शांत होते. खूप वेळ कडेवर घेऊन हाताला रग लागल्यावर एखादी आजी हळूच आपल्या नातवंडाला थोडावेळ खेळायला खाली सोडते आणि जरा उसंत घेते तसे मुले घरी गेल्यावर शाळेचे होते.पण जसे ते नातवंड थोड्या वेळाने पुन्हा आजीला येऊन बिलगते तसे शाळेलाही दुसऱ्या दिवशी मुले पुन्हा येणार हे ठाऊक असते. कोणत्याही वर्गाची आणि वयाची असली तरी मुलं ती मुलंच. निरागस, निष्पाप, बालिश, चैतन्यमयी, खेळकर आणि हुशार.
शाळा सुटल्यावर मात्र शाळेलाही सगळं भकास वाटतं… मोठी सुट्टी पडली की शाळेला करमत नाही. आपल्या विद्यार्थ्यांचा पदरव पुन्हा ऐकण्यासाठी शाळा वाट पाहत असते. यंदा तर कोरोनाच्या साथीमुळे ही सुट्टी संपण्याचे नाव न घेणारी. शाळाही उसासते, मूक अश्रू ढाळते. वॉचमन दिवे विझवतो, कुलुपं लावतो. संध्याकाळच्या लांब सावल्यांत शाळेच्या इमारती निःशब्द, स्तब्ध उभ्या असतात. उद्या येणाऱ्या किलबिलाटाची सवयीनं वाट पाहत. रात्र चढते. हळूहळू त्या इमारती अंधारात बुडून जातात…तिथून बाहेर पडलेल्या प्रत्येकाचं बालपण आठवत! पुन्हा एकदा मुलांचे आनंदाने उजळलेले चेहरे पाहण्याची शाळा वाट पाहत राहते…
