–मानसी गजानन तांबेकर–
परवाच लग्नाच्या वाढदिवसाप्रित्यर्थ देव-दर्शनानंतर ‘आज तू एक साडी विकत घे;मी तुझ्यासोबत शॉपिंगला येतो’ असे म्हणून मिस्टरांनी मला एक सुखद धक्का दिला. क्षणाचाही विलंब न करता, त्यांचा विचार बदलायच्या आत मी तीन-चार दुकानांची नावे सांगून मोकळी झाले आणि गाडीचा मोर्चा त्या दिशेने वळवायला सांगितला. रस्त्यात मी माझ्याकडे असणाऱ्या विविध प्रकारच्या साड्या, त्याचे रंग, पोत याची उजळणी केली आणि मग ‘अबोली’ रंगाची साडी नसल्यामुळे ती घेईन असे जाहीर केले. पहिल्या दोन दुकानात साडी आणि किंमत यांच्या व्यस्त प्रमाणामुळे हिरमोड झाला. तिसऱ्या दुकानात ‘अबोली ‘ रंगाच्या साड्यांचे प्रकार विशेष नव्हते. त्यामुळे खट्टू मनाने मी बाहेर पडणार; तितक्यात तिथल्या एका सेल्समनने त्याची करामत दाखवायला सुरुवात केली. माझ्यासारख्या गोरी कांती असणाऱ्या आणि मध्यमवयीन बाईला अबोलीपेक्षा दूसरा रंग कसा खुलून दिसेल हे पटवण्यात तो यशस्वी झाला आणि मी चक्क लालचुटूक साडी घेऊन दुकानातून बाहेर पडले. त्यानंतर मात्र मिस्टरांनी ‘त्या सेल्समनने संयमाने आणि युक्तीने मला पटवून साडी घ्यायला कसे भाग पाडले’ यावर विस्तृत विश्लेषण केले आणि त्याच्या या गिऱ्हाईकाला पटवण्याच्या कलेला दाद दिली.खरतरं हे आणि असे अनुभव तुम्हा-आम्हा सर्वांच्या आयुष्यात बऱ्याचदा येतात. आपल्या समाजात ‘पटवणे’ हा शब्द केवळ गिर्हाईकापुरतेच स्तिमित नाही. तर ‘अमक्याने चिकणी पोरगी पटवली’, ‘तिने श्रीमंत पोरगा पटवला’ अशा वाक्यातूनही या शब्दाचा वापर आढळतो. पण मला ‘पटवणं’ म्हणायचं आहे ते वेगळ्या अर्थाने -आपल्या बरोबरील व्यक्तीला आपल्या प्रभावाने बदलायचं,आपल्या संस्कारानं त्यांच्या सवयींना आणि आवडीनिवडीला घडवायचं. त्याच्या स्वभावाला चकचकी आणायची. अशा अर्थाने ‘पटवणे’ म्हणजे विशेष कला-कौशल्याचं काम, चातुर्याचं काम. कोणतीही गोष्ट त्याच्या कलेने करणे म्हणजे ‘कला’. कला या शब्दात ‘क’ म्हणजे ‘कर्म’ आणि ‘ला’ म्हणजे ‘लावण्य’. पटवण्याच्या कलेत पटवणारा आपले कर्म पार पाडीत समोरच्या व्यक्तीचे कळत -नकळत विचार बदलतो हे त्याचे लावण्य.
ही कला अगदी पुरातनकालापासून चालत आली आहे. महाभारतात कुरुक्षेत्रावर अर्जुनाने युद्धास नकार देताच भगवंताने ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणत ‘युद्ध अटळ का आहे?’ हे अर्जुनास पटवून दिले. नारदमुनींनी वाल्या कोळीला पाप-पुण्याचा हिशोब पटवून दिला आणि मग वाल्याचा ‘वाल्मिकी’ झाला.’ हे विश्वचि माझे घर’ असे वर्णित संत ज्ञानेश्वरांनी आपापसातील हेवेदावे , भांडणतंटे विसरुन एकतेच्या संदेशाचे निनाद प्रत्येक मानसमंदिरात घुमवले. तर रामदासांनी मनाचे श्लोक किंवा दासबोध सारख्या ग्रंथांतून भक्तिमार्गाबरोबरच,संसार-व्यवहार लोकांना पटवून दिला. १८५७ मध्ये मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई सारख्या योद्धयांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करून जनमानसात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि मग पुढे स्वतंत्र भारताचा इतिहास घडला. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी’ या संत तुकडोजी महाराजांच्या उक्तीला सार्थ करत महात्मा ज्योतिराव फुल्यांसारख्या समाजसुधारकांनी मुलींसाठी शाळा काढण्याचे धाडस दाखवून स्त्री शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले आणि ‘अबला’ स्त्रीला ‘सबला’ बनवले. थोडक्यात पटवण्याची ही कला युगानुयुगे चालत आलेली आहे. या कलेचे उपासक अगदी घर-घरात आढळतात . दैनंदिन उदाहरणातून जीवनाची नैतिक मूल्ये मुलांना पटवून देणारे आई- वडील, शैक्षणिक विकासाचे बीज रुजवणारे आणि समाजातील विद्याधन वाढावे म्हणून कार्यरत असलेले शिक्षक, अंधश्रद्धेला ‘खो’ घालत,प्रयोगाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोणातून समाज सुधारणारे शास्त्रज्ञ, आरोग्यविषयक योग्य ते सल्ले देऊन स्वस्थ आणि निरोगी आयुष्याचे पटवून देणारे डॉक्टर, घटस्फोटाच्या उंबरठयावर असतांना आपल्या अशिलाला सामंज्यसाची वाट पटवून देण्यात यशस्वी झालेले वकील किंवा जाहिरातींमधून विविध उत्पादनाची माहिती देऊन,त्या वस्तू आपल्या जीवनासाठी कशा आवश्यक आहेत याची वेळोवेळी आठवण करून देणारे व्यापारी असे अनेक लोक या कलेचे जोपासक आहेत. प्रभावी संप्रेषण, विश्वास संपादन, मनमोकळा संवाद ,सौजन्यपूर्ण व्यवहार ,तर्कनिष्ठ विचार मांडणी ,हट्ट ,साम -दाम -दंड -भेद ,प्रेम या सारख्या अनेक माध्यमांतून या कलेचे सादरीकरण होते .प्रत्येकाचे माध्यम व युक्ती वेगळी पण उद्दिष्ट एक-ते म्हणजे समोरच्याला आपले म्हणणे पटवणे म्हणजेच त्याचे ‘मन वळवणे.’ काळानुसार त्याच्या पद्धतीत बदल झाले आहेत. आज इन्फ्लूएंसिग, कन्विन्सिंग, निगोशिएटिंग अशा विविध नावांनी ही कला प्रचलित होत आहे. पटवण्याच्या या कलेत पटवून घेणारी किंवा पटली जाणारी व्यक्ती, तिच्या भावना ही तितक्याच महत्वाच्या .ही कला आत्मसात करण्यासाठी तर्काच्या कोंदणात बसलेले विचार मांडता येणे गरजेचे आहे. आपण ‘आर्ग्युमेंट्स’ करायची पण ‘आर्ग्युमेंटेटिव्ह’ व्हायचे नाही, तर्क मांडायचा पण भांडायचे नाही. जेव्हा आपलं उत्तर किंवा आपण शोधलेला मार्ग दुसऱ्याला पटवायचा असतो तेव्हा आपलं मत सांगण्यापूर्वी आपल्या दोघांचं कशावर एकमत आहे याचा शोध घेऊन सहअनुमतीचे वातावरण निर्माण केले पाहिजे.फ्रँक बेटगर या अमेरिकन विमा पॉलिसी विक्रेत्याने ‘How I Raised Myself from Failure to Success In Selling ‘या नावाचं एक छान पुस्तक लिहिले आहे. अवलोकन आणि चाणाक्षपणा यांचा उपयोग करून त्याने एका महिलेच्या मालमत्तेचा प्रचंड मोठा विमा कसा उतरवला याचे वर्णन त्या पुस्तकात आहे. काय बोलल्याने समोरच्या व्यक्तीला मोकळं वाटू शकतं, त्याच्या मनाच्या तारा छेडल्या जातात हे समजण्याचा चाणाक्षपणा आणि चतुरपणा अवगत असलेले खरे कलावंत. म्हणतात ना-कुठच्याही व्यक्तीला पटवण्यासाठी त्याची ‘अचूक नाडी’ ओळखता आली पाहिजे. एकूण काय थोड्या-फार प्रमाणात ‘पटवणं -ही कला’ प्रत्येकाला उपजतच असते. फक्त ती केव्हा, कशी, कुठे आणि कुणावर वापरायची याचा मात्र सारासार विचार करायला हवा तरच आपण त्या कलेचा आनंद उपभोगू शकतो.
‘पटवणे’- एक कला