— मुग्धा आपटे कोपरकर —
तुम्हाला काय वाटलं, शाळेला दांडी मारावी असं केवळ विद्यार्थ्यांनाच वाटतं? साफ चूक. वर्षातील काही दिवस असे असतात जेंव्हा शिक्षकांनासुद्धा शाळेला बुट्टी मारायची अगदी मनापासून इच्छा होत असते. आजचा दिवस असाच होता. शिक्षक पालक भेट म्हटलं कि स्वातीला धडकीच भरायची. शिक्षकी पेशा सुखाचा असं ज्या कोणाला वाटते त्याने एक दिवस शिक्षकांच्या खुर्चीवर बसून पालकांच्या प्रश्नांच्या भडिमाराला सामोरं जावं, असं तिला नेहेमी वाटायचं. पालकांचे सर्व नमुने पाहायला मिळतात त्या एका दिवसात. काही येतात ढीगभर तक्रारी घेऊन शाळेतल्या प्रत्येक गोष्टीबद्दल. तर काही असतात समजूतदार. शालेय व्यवस्थापनासमोर शिक्षक बरेचदा हतबल असतात हे त्यांना समजत असतं. काहींना गेल्या परीक्षेत आपल्या मुलाचा अर्धा गुण कुठे कापला ह्याच्या इतकं महत्त्वाचं दुसरं काहीच वाटत नसतं. संस्कृतकडे ते केवळ एक स्कोअरिंग सब्जेक्ट म्हणून पाहात असतात. मनातल्या मनात काहींचं नावच स्वातीने “सासू” असं ठेवलाय, कारण त्यांचं काम एकच, सारख्या सूचना. आपल्याला कसं शिक्षकांपेक्षा जास्त कळतं हे मुलांसमोर दाखवायच्या तयारीनेच येतात ते भेटीला. मात्र काही असतात गुणी, अगदी आपल्या मुलांसारखेच. हे शालेय वर्ष सुरु होऊन तीन महिने पूर्ण झाल्यावर एक नवीन विद्यार्थिनी स्वातीच्या वर्गात दाखल झाली होती ‘अनु‘. अगदी गुणी, सालस आणि अभ्यासू. आज तिचे पालक पहिल्यांदाच भेटायला आले. शाळेतल्या सुविधांवर , शिक्षकांच्या शिकवण्यावर खूष होते. स्वाती मॅम तर तिच्या खास आवडत्या शिक्षिका, म्हणून अनुला संस्कृत पण आवडायला लागलंय म्हणाले. ” एक छोटीशी विनंती होती, तिला जरा पुढे बसवाल का? फार मागे नको.” ” का हो? फळ्यावर लिहिलेलं दिसत नाही का नीट ?” ” नाही, तसं नाही. म्हणजे…” ” हे पहा, काही संकोच करू नका. मोकळेपणे सांगा.” ” मॅडम, बॅकबेंचर्सचा त्रास होतो थोडा. ते स्वतःही वर्गात फार लक्ष देत नाहीत आणि दुसऱ्याचंही विचलित करत राहतात. म्हणजे त्यांनी अभ्यासाला किती महत्त्व द्यावं ह्यावर आमचं काही म्हणणं नाही, पण हिच्या अभ्यासात व्यत्यय नको, एवढंच वाटतं..” स्वातीच्या कानांवर त्यांचे शब्द तर पडत होते, पण मन पार भूतकाळात गेलं होतं.
अगदी अनुच्याच वयाची होती स्वाती तेंव्हा. बाईंची लाडकी हुशार विद्यार्थिनी. सुंदर हस्ताक्षर, नीटनेटक्या वह्या, वेळेवर पूर्ण केलेला गृहपाठ यामुळे बाई तिच्यावर अगदी खूष असत. वर्गात सगळ्यात पहिल्या नाहीतर दुसऱ्या रांगेत, बाईंच्या जवळजवळ नाकाखाली बसून मन लावून अभ्यास करायची. बाईंनी प्रश्न विचारायची खोटी, की उत्तर द्यायला हिचा हात लगेच वर. नुकतीच आठवीत गेली. उन्हाळ्याच्या सुट्टीत बघता बघता उंची अचानक वाढली. आठवीचं वर्षं सुरु झाल्यावर नव्या वर्गशिक्षिकांनी तिची रवानगी केली शेवटून दुसऱ्या रांगेत. स्वातीसाठी हा मोठा धक्काच होता. मागच्या बाकावरून वर्ग किती वेगळा दिसायचा. फळा आणि शिक्षक आपल्यापासून खूप लांब आहेत, नव्हे त्यांनी आपल्याला त्यांच्यापासून खूप लांब लोटलंय हीच भावना तिच्या मनात घर करून राहिली होती कितीतरी दिवस. मागच्या बाकांवर आजूबाजूचं वातावरणही तसं वेगळंच होतं. जरा जास्तच खोडकर मुलं. गृहपाठाच्या वह्या क्वचितच वेळेवर पूर्ण असायच्या आणि वर्गातही लक्ष बाई काय शिकवतायत ह्यापेक्षा खिडकीतून बाहेर मैदानात काय दिसतंय ह्याकडे जास्त. काही अधिकच दांडगट. आपापसातही जरा काही वाजलं कि एकदम गुद्दागुद्दीवरच यायची. हुशार नव्हती असं नाही, पण ती हुशारी नको तिथे वापरायची खोडी. इंग्रजीमध्ये ना स्पेलिंगं धड असायची ना गणिताची प्रमेय लक्षात असायची पण जीवशास्त्राच्या तासाला मात्र पुनरुत्पादनाचा धडा शिकवताना मुद्दामून खोचक प्रश्न विचारायची. स्वातीचं फार नाहीच जमायचं तिथं कोणाशी. बाईंना सांगून पाहिलं, पण त्या तरी साठ साठ मुलांच्या वर्गात कोणाकोणाकडे लक्ष देणार ? तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे , आजूबाजूला देऊच नको, इतका साधा उपाय सुचवण्यापलीकडे त्या काहीच करू शकल्या नाहीत. शाळेची पुढची तीन वर्षं नाईलाजाने काढली स्वातीने मागच्या बाकावर.
” मॅम, काय झालं? आम्ही काही अवास्तव मागणी करतोय का?” अनुच्या आईबाबांच्या प्रश्नाने भूतकाळात हरवलेली स्वाती एकदम दचकून भानावर आली. ” नाही, नाही. तसं अजिबात नाही. मला कल्पना आहे. अहो, शिक्षकांचं काम केवळ आपला विषय शिकवणं एवढंच नसतं. विद्यार्थ्यांच्या इतर गरजांकडेही लक्ष देणंही तितकंच जरुरी आहे. मी बघते, मला काय करता येतं ते.” अनुच्या पालकांनी जरी कोणाचं नाव घेऊन तक्रार केली नसली तरी ‘ आर्यन, सिमरन, निखिल’, स्वातीच्या मनात काही नाठाळ मुलांची नावं आलीच. ह्या पेरेंट टीचर मिटींगच्या निमित्ताने त्यांच्या पालकांशी बोलून बघावं तर प्रत्येकाचा वेगळा सूर होता. “पौगंडावस्थेतल्या मुलांच्या अंगात थोडा दांडगटपणा असणारच” इथपासून “या वयात मुलांनी थोडी मस्ती नाही करायची तर कधी” इथपर्यंत आणि ” तो घरी आमचंपण ऐकत नाही, आम्ही काय सांगणार त्याला” इथपासून ” आम्ही आमच्या मुलीवर कसलाही दबाव आणत नाही” इथपर्यंत भाष्य करून पालक आपले हात झटकून मोकळे झाले. पेरेंट टीचर मीटिंग संपली तरी बराच वेळ स्वाती याचाच विचार करत होती. शिक्षककक्षात दुसऱ्या दिवशी तिने हा विषय काढला तेंव्हा इतर शिक्षकांनीतर जवळजवळ उडवूनच लावलं. ” पालकांना काय जातंय सूचना करायला? त्यांना घरी एक – दोन मुलांना सांभाळणं जड जातं, आपल्याला इतक्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचं असत. हे असले प्रश्न सोडवत राहिले, तर पोर्शन कोण पूर्ण करणार? नाठाळ मुलांना सुधारत बसायचं का हुशार मुलांना बोर्डाच्या परीक्षेत अधिकाधिक मार्कानी उत्तीर्ण कसं होता येईल, हे पाहायचं? ” इतर शिक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकून स्वाती चक्रावून गेली. मुख्याध्यापकांशी हा विषय काढल्यावर त्यांनी तर ” आपला क्लास कंट्रोल करायला शिका, मिस स्वाती” असं म्हणून तिची बोलतीच बंद केली.
पण स्वाती सहजासहजी हार मानणाऱ्यातली नव्हती. सतत नवीन वाचन करणं , नवीन शिकत राहणं, प्रयोगशील असणं हा तर चांगल्या शिक्षकाचा धर्म आहे, ह्या मताची होती ती. आपल्या परीने यावर काहीतरी तोडगा शोधायचाच हे तिने मनाशी पक्कं केलं. तिने विचार केला, आपल्या वर्गाची रचनाच अशी असते की टेबलच्या एका बाजूला फळ्याजवळ शिक्षक आणि दुसऱ्या बाजूला सैनिकी शिस्तीत एकामागेएक उभे केलेली बाकं. काही शिक्षकांच्या अगदी पुढ्यात आणि काही दूर मागे. काही विद्यार्थ्यांनी पुढे आणि काहींनी मागच्या बाकांवर बसणं भाग होतं. बरं, कुठे बसायचं याची निवड तरी मुलांच्या हातात कुठे होती. जीवन, आर्यन, सिमरन आणि निखिलसारखे बॅकबेंचर्स काही स्वखुशीने मागच्या बाकावर जाऊन बसले असतील असं नाही. पण इयत्तेमागून इयत्ता मागच्या बाकावर बसून त्यांनी तिथेच त्यांचा कोष तयार केलाय. हे अंतर मिटवायचं कसं? गेले काही दिवस प्रत्येक फ्री पिरिअडमध्ये स्वातीने कम्प्युटर लॅबमध्ये बसून इंटरनेटवर बरीच शोधाशोध केली, काही रिसर्च पेपर्स वाचले. तिला सापडला एक मस्त उपाय. शिक्षक आणि विध्यार्थी यांना एकत्र सहभागी होता येईल अशी प्रयोगशाळेसारखी वर्गरचना. एकामागे एक रचलेल्या बाकांवर बसण्याऐवजी काही बाकं जोडून मुलांना त्यांच्या सभोवताली छोट्या छोट्या गटांमध्ये बसता येईल अशी वर्गरचना तिने करून पाहिली आपल्या वर्गात. मुख्याध्यापिकांचा विरोध झालाच सुरुवातीला आणि येताजाता काही जुन्या शिक्षकांचे शेरे सुद्धा ऐकायला लागले, ” आमच्या वेळेला नव्हतं असलं काही. आमच्या धाकात शिकत होती मुलं चुपचाप, पाठीमागे भलेही हिटलर म्हणत असूदेत. लोकशाही पद्धतीचा वर्ग म्हणे ! नसती फॅडं आहेत..” मुलं आणि पालकही जरा साशंकच होते पण स्वाती डगमगली नाही. ह्या नवीन प्रयोगावर तिचा पूर्ण विश्वास होता. गेल्याच आठवड्यात वर्गात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला आर्यनने स्वतःहून हात वर केला. या आठवड्यात तर सिम्रन, अनु आणि निखिलने एकत्र प्रोजेक्ट सादर केलं तेंव्हा स्वातीची खात्री पटली, तिच्या वर्गात आता कुणी बॅकबेंचर उरलं नव्हतं. त्यांच्यातलं अंतर कळत नकळत नाहीसं झालं होतं.
