पत्रलेखन

-- मानसी तांबेकर --

प्रिय वर्षा राणी,

                   दरवर्षी आठवण येते मला तुझ्या स्पर्शाची,

                ओलाचिंब भिजलेला मी,मिठीत तुझ्या असल्याची.

     ‘बा आदब, बा मुलाहिजा, होशियारss वर्षाराणी येत आहे होss’, हे शब्द कानी पडले की मन पहिल्या भेटीच्या आठवणींनी चिंब -चिंब भिजतं. मृगाच्या रथात बसून, बिजलीचा चाबूक घेऊन, नभांच्या मेघगर्जनेच्या तुताऱ्या फुंकत तू दिमाखदार आगमन करून ग्रीष्माच्या अनिर्बंध सत्तेने त्रासलेल्या मला मुक्त केलंस आणि मी तुझा झालो तो कायमचा. आजही तुझं असं आगमन झालं की माझ्यात नवचैतन्य बहरतं. तू आलीस की सारी चराचरसृष्टी तुझ्या स्वागताला सज्ज असते, आसमंतात मृदगंधाचं अत्तर उधळलं जातं आणि सारं वातावरण कसं सुगंधी होतं. घामाने हवालदिल झालेली आपली लेक वसुंधरा सचैल स्नान करते. हिरवा शालू, काळ्या मेघांचं काजळकुंकू याने तिचे सौंदर्य तू खुलवतेस. माझ्या नगरीतल्या प्रत्येकाला तू आपलसं केलं आहेस. तू आलीस की मरगळलेले वृक्ष-वेली अंग झटकून देत आनंदाने डोलतात. घशाला कोरड पडलेल्या नद्या,ओढे,तळी-विहिरी पाणी पिऊन तृप्तीचा हुंकार देतात. डोंगर-कपारीतून वाहणारे झरे, नागमोडी वळणं घेत-घेत, स्वछंद बागडत वाट शोधतात व सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतात. अगोदरच तयार करून ठेवलेल्या घरट्यात पक्षी विसावतात आणि साठवलेल्या दाणागोट्याच्या वळचणीतून हळूच डोकावत तुला निःशब्दपणे कौतुकाने बघतात. मोर पिसारा फुलवून आपला आनंद व्यक्त करतो तर मुंग्या वारुळाचा आश्रय घेतात. छपरांवरून पागोळ्या ओघळत असतात,विजेच्या तारांवर पाण्याच्या थेंबाच्या मुंडावळ्या पाहिल्या की माझ्या ओठी शब्द येतात-“ओ सजना, बरखा बहार आयी.’ शेत नांगरून आभाळाकडे नजर लावून बसलेल्या कृषिराजाला तुझ्या पाऊलांची टप -टप गंधर्व किन्नरांचे स्वर वाटू लागतात. ‘ये रे ये रे पावसा…’ म्हणत, छत्र्या -रेनकोट सांभाळत मुलं बेधुंद होऊन नाचतात आणि कागदी नौदल प्रमुख होऊन आईचा मारही खातात. कुणी खवैय्या गरम -गरम चहा व भजी याचा स्वाद चखत असतो, कुणी रसिक उबदार पांघरूण घेऊन झक्कपैकी कादंबरी वाचत पडतो ,कुणी आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीत रममाण होतो, तर कुणी भाविक चंद्रभागेच्या तीरी नामसंकीर्तनात दंग होतो. खरंच तुझ्यात अशी जादू आहे की तू माझ्यात सामावलेल्या सर्वांना धुंद करतेस. तुझ्या आषाढातल्या रूपावर कवी कालिदासही भाळले होते. बरस बरस तू मेघा रिमझिम । आज यायचे माझे प्रियतम । असं लाडिकपणे म्हणत जेव्हा श्रावणात तू माझ्या भेटीस येतेस तेव्हा माझे मन अजूनच कोमल बनते.ज्याप्रमाणे कोकिळेला वसंत ऋतूत कंठ फुटतो त्याचप्रमाणे तुझे श्रावणातले मोहक रूप  माझ्यातल्या कविमनाला भुरळ घालते. मग’ श्रावणमासी हर्ष मानसी’ म्हणत एखादा ‘बालकवी’ गुणगुणायला लागतो तर कधी एखाद्या ‘स्वरलते’च्या मधुर स्वरातून ‘घननिळा’ बरसू लागतो. तुझ्या श्रावणातल्या रूपावर भाष्य करताना कवी  रवींद्रनाथ टागोर  म्हणतात -‘वादळवारे श्रावणात फुलणाऱ्या मालती फुलांच्या सुगंधाने वेडे होऊन गेले आहेत , माती श्रावणधारांच्या स्पर्शाने शहारून गेली आहे , धरती आणि गगनाच्या मिलनप्रसंगी श्रावणाची पर्जन्यवीणा वाजते आहे.’  श्रावणातील तुझ्यासोबतची प्रत्येक पहाट चैतन्याची कुपीच घेऊन येते. कधी हे चैतन्य शिवाला बेल वाहणाऱ्या भक्तांच्या रूपात आपल्याला भेटते , तर कधी मंगळागौरीसाठी पत्री-फुले गोळा करणाऱ्या परड्यांत दिसते. विविध रंगांचा नाजूक तेरडाही जिवतीच्या व्रतासाठीच सकाळी तयार असतो. अशा या श्रावणात कुणी निसर्ग दर्शन घेण्यास निघाला तर सरसर आवाज करत तू त्याच्यावर कोसळतेस आणि त्याने आडोसा शोधावा तर पुन्हा मिश्कीलपणे तुझे हास्य पिवळ्या उन्हातून ओसंडून देतेस. ह्याच उन्हासोबत लपंडाव खेळतांना तू जेव्हा माझ्या मनःपटलावर सप्तरंगांची उधळण करतेस तेव्हा तुझं ते रूप अनेकजण आपल्या डोळ्यात साठवतात तर चित्रकार आपल्या कुंचल्यातून साकारतात. तुझे असे कौतुक पाहून मी मनोमन खुश होतो.  पण तुझ्या अचानक येण्याने माझी धांदल उडते.  सोबत तुझा खट्याळ मित्र वारा आला की तू थोडी बेशिस्त वागतेस. तुझ्या या वागण्याने नगरातील वाहतूक विस्कळीत होते. क्वचित वीज जाते. नेहमी दिमाखाने चमचमणाऱ्या लक्षावधी चांदण्या आणि त्यांचा तारकानाथ गगनाच्या प्रांगणात कोठेच दिसत नसतात, माझे साम्राज्य तू तुझ्या काळ्या ढगांच्या बुरख्याने झाकून टाकतेस. सगळीकडे अंधाराचं साम्राज्य… पण तू मूर्त स्वरूपात असतेस ‘सतत कोसळत….’ तुला आठवतं, अशाच एका रौद्र रात्री भगवंतानी कृष्णावतारात या इहलोकात आगमन केले होते. पण तुझे ‘रौद्र’ रूप किंवा ‘रुसलेलं’रूप पाहवत नाही. हरित वृक्षांजागी सिमेंट काँक्रिटची जंगलं उभारून तुला अडथळा आणणाऱ्यांना पूर किंवा दुष्काळाची टाचणी टोचून सुधारण्याची चेतावणी देतेस. तुझे हे रूप आम्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी आणते किंवा तोंडचं पाणी पळवते. अशी रुसत नको गं जाऊस…. मला माहित आहे; सदोदित वसंताचे गुणगान करणाऱ्या लोकांना जेव्हा तुझे महत्त्व उमगले तेव्हा त्यांनी तुला ‘राज्ञीपद’ बहाल केले. वेळच्या वेळी, हवी तशी, हवी तेवढी हजेरी लावत सर्व धरित्रीला सुजलां -सुफला करण्याची ताकद तुझ्यात आहे. तीन महिन्यात वर्षाची बेगमी होते म्हणून तर तुला मी ‘वर्षा राणी’ म्हणतो. आजही तुझ्या आगमनाची मी चातकाप्रमाणे वाट पाहत असतो कारण तू म्हणजे विपुलता. तू म्हणजे सृजनशीलतेचा संहारावरचा विजय आहेस. तू माझे सौभाग्य आहेस. तू आलीस की माझ्या तप्त मनाला दिलासा मिळतो आणि तुझ्या प्रेमाच्या ओलाव्यात मी बेधुंद भिजून जातो. तुझ्या भेटीसाठी आसुसलेल्या माझ्या ओठी एकच गाणं असतं – ‘ये रे घना,ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना…’ 

तुझा आणि फक्त तुझाच,

निसर्ग राजा  

                                                                                                                                          .

                                                                                                                                  

                           

1 thought on “पत्रलेखन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *