सनविवि अनुभव,साहित्योन्मेष साहित्योन्मेष *ऑक्टोबर* महिन्यासाठी विषय लेख क्र. 10* भाषेची शुचिता महत्वाची की संवाद साधणे महत्वाचे?

साहित्योन्मेष *ऑक्टोबर* महिन्यासाठी विषय लेख क्र. 10* भाषेची शुचिता महत्वाची की संवाद साधणे महत्वाचे?

—– शिल्पा धर्माधिकारी —–

मी माझ्या मुलाच्या अ‍ॅडमिशनसाठी कॉलेजमध्ये गेले होते. तिथे दोन लेक्चरर्स एकमेकांशी बोलत होत्या. त्यातील एक म्हणाली,  “विद्यार्थ्यांनी ह्या सत्रातील कार्यपुस्तिका पूर्ण करून त्यावर स्वाक्षरी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मला  प्राध्यापक कक्षाकडे जरा लवकरच गेले पाहिजे.  विद्यार्थी माझी वाट पाहत असतील.” 

 

मला त्यांचा  हा संवाद समजायला जरा जडच गेला. न रहावून मी त्यांना विचारले, “तुम्ही शुद्ध मराठीत बोलत आहात ना ?”

 

 त्यावर त्यातील एक लेक्चरर  म्हणाल्या, “हो”. 

 

मी: आज मराठी भाषा दिन आहे का?

 

त्यावर त्या हसत म्हणाल्या,” नाही. का? ” 

 

मी : “नाही नाही, तुम्ही इतकं शुद्ध मराठीत बोलत आहात ना  म्हणून वाटलं. काय आहे,  इतकं प्युअर मराठी ऐकायची आणि बोलायची सवयच राहिली नाही ना. आणि खरं सांगू का त्यातले बरेचसे शब्द मला कळलेच नाहीत. म्हणजे कदाचित शाळेत  शिकलेही असतील पण ते आठवत नाहीत.”

 

लेक्चरर: ” अहो  म्हणूनच  आम्ही शुद्ध मराठीत बोलायचे ठरवले आहे, जेणेकरून मराठीतील शद्ब विस्मृतीत जाणार नाहीत. कुठेतरी माझ्या मराठी मायबोलीला जिवंत ठेवण्यासाठीचा हा प्रयत्न.  कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरवात ही स्वतः पासूनच करावी. नाही का?”

असे बोलून त्या दोघीही निघून गेल्या. 

 

मग मला जाणवले की त्या किती खरे बोलून गेल्या. आजकाल आपण मराठी भाषिक लोकं कुठे शुद्ध मराठी भाषा बोलतो.  बरेचदा  बोलताना, लिहिताना दुसर्‍या भाषेतील शब्दांची सरमिसळ  अगदी बेमालूमपणे म्हणजे सहजपणे करतो;  असे वाटावे की जणू  हा मराठी भाषेतीलच शब्द आहे.  बघा, हा “बेमालूम ” शब्दसुद्धा मराठीतील नाहीच. आपण भाषेची शुद्धता, शुचिता विचारात न घेता फक्त आशयालाच महत्व देतो. 

 

आता बघा ना, माझ्या  ह्या लेखाच्या सुरुवातीला मी जी काही  वाक्ये लिहिली आहेत, त्यात मराठी इतकेच किंवा त्याहून जास्तच इंग्रजी भाषेतील शब्द खूप सहजतेने वापरले आहेत.   आणि चक्क चक्क त्या संमिश्र मराठी भाषेत लिहिलेल्या वाक्यांचा तुम्हाला अर्थही कळला, हो ना?  ही भेसळयुक्त भाषा आपल्या इतकी सवयीची झाली आहे की त्यातून आपले विचार, आशय आणि भावना पोहोचत आहेत ना, मग झाले तर तेवढाच विचार आपण करतो.

 

अहो, मराठी भाषिक मी,  पण मला मात्र तो कॉलेजमधील शुद्ध मराठी भाषेतील संवाद समजायला कठीणच गेला. बघा ह्या भेसळयुक्त भाषेने माझ्या शुद्ध मराठी भाषेतून होणारे संवाददेखील समजायला अवघड झालेत.  

 

थोडक्यात, आपण दुसर्‍या भाषेला जवळ करता करता, कधी त्याची   सरमिसळ करत आपल्या भाषेची शुद्धता गमावून बसलो ते कळलेच नाही.

 

हे खरे आहे की कालानुरूप प्राकृत ते मराठी असे भाषा आपले स्वरूप बदलत गेली. जशी जशी दुसरी साम्राज्ये आपल्या देशावर  राज्य करत  गेली तशी तशी त्यांची भाषादेखील आपल्या भाषेवर आक्रमण करत गेली. त्यांच्या भाषेतील शब्दांना  प्रतिशब्द नाहीत म्हणून  आणि प्रतिशब्द शोधल्या नंतरही सवयीनुसार मराठी भाषेमध्ये दुसर्‍या भाषेतील शब्दांचा  वापर सर्रास होतच गेला आणि तो अजूनही चालू आहे. त्यामुळे घडते असे आहे की कैक मराठी शब्द मागे पडले आणि काही लोपही पावले. अर्थात ह्याने संवाद थांबला नाही. तो संमिश्र भाषेतून चालूच राहिला.  पण मराठी भाषा मात्र आपली शुद्धता गमावून बसली. 

 

खरंतर मराठी भाषा शुद्धीकरणासाठी, ती जिवंत रहाण्यासाठी  सावरकरांनी चळवळ सुरू केली. त्यांनी इतर भाषेतील शब्दांसाठी बरेच मराठी  प्रतिशब्द शोधून भाषा अजून समृद्ध केली. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही मोठमोठ्या लेखकांनी लेखनाद्वारे , नाट्यकलाकृतींद्वारे मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे, जिवंत ठेवण्याचे  कार्य केले. पण ते कार्य यशस्वी बनविण्याची जबाबदारी कुठेतरी आपल्या सर्वांचीही आहे. नाही का? 

 

आजही असे कितीतरी मराठी भाषेतील प्रतिशब्द आपल्याला माहीत नाहीत आणि ते जाणून घेण्यासाठी आपण उत्सुकही नाही.  जसे  पारसी भाषेतील “बुरुज”, “तब्येत”, “नाच “. अहो,  इंग्रजीतील कितीतरी शब्दांना मराठीत प्रतिशब्द आहेत. जसे “कॉलेज”, “ग्रुप”, “मार्क”, “सॉरी”. पण त्यासाठीचे मराठीतील  प्रतिशब्द आपण  कुठे वापरतो. 

 

वेबसाईट, न्यू पोस्टस्, पासवर्ड यांसारखे बर्‍याच नवीन इंग्रजी शब्दांसाठी प्रतिशब्द आलेले आहेतच की.   पण केवळ  क्लिष्ट  आहेत म्हणून आपण ते वापरु इच्छितच नाही.

 

 थोडक्यात, इतर  भाषेतील कितीतरी शब्दांना मराठी प्रतिशब्द असतानाही आपण  त्यांच्या वापरासाठी इच्छुकच नाही आहोत. 

  

आपण जर नीट निरीक्षण केले तर लक्षात येईल की वाक्यात बरेचदा आपण  कर्ता आणि क्रियापद सोडले तर उरलेले शब्द दुसर्‍या भाषेतील  वापरतो.  उदाहरण म्हणजे  “मी कॉलेजला अ‍ॅडमिशन  घेतली.”   

 

अहो, संवाद हा संमिश्र भाषेतही  घडत राहील, पण आपली मराठी भाषा मात्र तिची शुद्धता आणि समृद्धता  गमावून बसेल. कालांतराने लोप पावण्याच्या मार्गावर  जाईल आणि त्याबरोबर आपण आपली मराठी भाषिक म्हणून असलेली ओळखसुध्दा गमावून बसू.  

 

तेव्हा संवादाबरोबरीने आपली भाषा समृद्ध आणि शुद्ध ठेवण्यासाठी आपण  जास्तीत जास्त मराठी शब्दांचा, प्रतिशब्दांचा वापर करायला हवा.  अर्थात क्लिष्ट प्रतिशब्दांचा वापर हा प्रत्येकाने व्यक्तिगत ठरवावा.  परंतु एकदा मराठी प्रतिशब्द वापरात आले की प्रचलित व्हायला, रुळायला वेळ लागणार नाही.  

 

हो, पण मला एक गोष्ट जरूर सांगाविशी वाटते की,  जशी  चिमूटभर साखर पदार्थात सहज सामावून त्याची चव वाढवते, तसेच   दुसर्‍या भाषेतील कितीतरी शब्द मराठी भाषेत सहजपणे सामावून गेले आहेत.  त्यांनी मराठी भाषेचे सौंदर्य वाढवले आहे, खुलविले आहे. तेव्हा अशा शब्दांचा  वापर  करायला काहीच हरकत नाही असे मला वाटते. 

 

हो, पण महाविद्यालयातील त्या अध्यापिकांचा, आपली मराठी भाषा शुद्ध आणि शुचित ठेवण्याचा प्रयत्न खरोखरंच स्तुत्य आहे. मला तो भावला. तेव्हा आता मी, माझ्या घरातील सगळ्यांनी आणि मित्र-मैत्रिणींनी  जास्तीत जास्त  शुद्ध मराठीत बोलण्याचा निश्चय केला आहे. 

 

अर्थात कुठलाही बदल हा एकदम होत नाही.  तो घडून यायला थोडा  वेळ द्यावाच लागतो. पण प्रयत्न मात्र  थांबले नाही पाहिजेत.

 

तेव्हा  जास्तीत जास्त  शुद्ध मराठीत बोलायचा प्रयत्न करायला हवा,  जेणेकरून “माझ्या मराठीचे काय बोलु कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके”  अशा मराठी भाषेला  अ-मृत बनवण्यासाठी आपण कायमच प्रयत्नशील रहायला हवे आणि आपल्या भाषेची आणि त्याला जोडून असलेली आपली ओळख आणि उंची ही जगापुढे वाढवायला हवी.  

 

✍ शिल्पा धर्माधिकारी 

२५/९/२०२२

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *