--अंजली संगवई--
उन्हाळ्याची सुट्टी म्हंटली की आजही विद्यार्थ्यांना एक वेगळाच आनंद होतो. जरी गेल्या दोन वर्षांपासून शाळा अधिकांश घरून ऑनलाईन होत असल्या तरी देखील आजही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उन्हाळी सुट्टीचा आनंद अगदी तसाच आहे जसा पूर्वी असायचा. सुट्टीतले उद्योग मात्र आता बदलले आहेत. परवा एका मैत्रिणीशी फोनवर बोलतांना तिने लेकीच्या सुट्टीतल्या छंदवर्गा बद्दल सांगितले. एक नाही तर दोन छंद वर्गात तिची नोंदणी केलीय म्हणे. ते करतांना त्याचे केलेले संशोधन, ते कसे योग्य त्याबद्दल बरीच माहिती सांगितली. तसेच त्यासाठी मोजावे लागलेले पैसे याबद्दलही सांगितले. ऐकून अवाक झाले. मनात प्रश्न देखील निर्माण झाले. सध्या छंद वर्गाचा इतका सुळसुळाट झाला आहे हे तिच्याशी चर्चा करतांना लक्षात आले.
आपली आवड जपली जाणार किंवा काहीतरी नवीन शिकायला मिळणार हे जरी खरे असले तरी शाळेला सुट्टी लागल्यावर परत शाळेसारखे या वर्गात पाठविणे कितपत गरजेचे आहे.
मुले खरच उत्सुक आहेत का? याचा विचार पण व्हावा.
छंद म्हणजे आपल्याला आवडणारी कला जोपासणे, या वर्गात खरच असे होत असेल?
म्हणजे कुठली एकच गोष्ट नाही शिकवत अनेक गोष्टी ठरलेल्या वेळात शिकवतात.
यात कितपत छंद जोपासला जातो किंवा कितपत आवडीने केल जात हे देखील एक कोडेच आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शाळेला सुट्टी लागल्या लागल्या या वर्गाला जाणे म्हणजे खरच सुट्टी अनुभवणे असू शकत का? हा पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. यासाठी भरपूर पैसे पण मोजावे लागतात. आधी असे नसायचे.
बघा, कितीही नाही म्हंटले तरी आणि होत नसली तरी पूर्वी आणि आता मध्ये तुलना केलीच जाते. तुलना फक्त अर्थिक मुद्यालाच धरुन किंवा वैयक्तीक असते असे नाही. काही वेगळे मुद्दे असतात ते दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही.
छंद पूर्वी पण जोपासले जायचे आणि आता जोपासले जातात(आता बरेचदा लादले जातात) पण स्वरूप बदलले आहे. तसे होणे साहजिक पण आहे.
मुलांच्या सुट्टया म्हंटले की हल्ली आईवडिलांना मुलांना कसे व्यस्त ठेवायचे हा मोठा प्रश्न असतो आणि मग त्यासाठी धडपड सुरू होते.
पूर्वी असे नसायचे,
ही मनात सूरु झालेली तुलना आपसूकच थेट बालपणात जाऊन पोहचली.
पूर्वी आमच्या वार्षिक परीक्षा संपल्या की निकाल जाहीर होण्यास दोन तीन आठवड्यांचा अवधी असायचा, तेव्हा संगणक नव्ह्ते त्यामुळे साधारण एवढा वेळ लागत असे. यावेळात आम्हाला शाळेकडून काही प्रोजेक्ट दिले जायचे. आम्ही ते खूप उत्साहात करायचे कारण अभ्यासाव्यतिरिक्त काहीं करायला आम्हालाही आवडत असे.
या प्रोजेक्ट मध्ये माती पासून काही कलाकृती, तसेच घराची किंवा शाळच्या इमारतची प्रतिकृती तयार करणे, ती पण टाकाऊ वस्तूंपासून बर! कुठलेही साहित्य स्टेशनरी दुकानातून सहसा विकत आणले जात नसे.
माती पासून कलाकृती तयार करतांना माती आणणे त्याला आकार देणे, ते वाळवणे मग त्याला रंग देणे हे सारे खूप आनंदाने करीत असू. मातीपासू विविध प्रकारच्या कलाकृती बनवितांना त्या कला क्षेत्राशी ओळख व्हायची. तसेच कलेत तुमचा किती कौल आहे हे पण कळायचे या साऱ्या कलाकृतींना नाममात्र गुण असायचे तरी देखील आम्ही सारे मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन आणि एकमेकांना मदत करून ते उत्तम करायचा प्रयत्न करीत असे. तेव्हा स्पर्धा इतकी हावी नसायची, आणि perfectionचा खूप कटाक्ष नसायचा. ज्याला त्यात रुची त्याची कलाकृती आपसूकच कळायची. आता सारखेच सगळेच जमलेच पाहिजे, सगळ्याच कला यायलाच पाहिजे हे शास्त्र देखील तेव्हा नसायचे.
जुन्या नोटबुक चे कव्हर जे खरड्याचे असायचे त्याचा उपयोग करून इमारतीचा ढाचा तयार झाला की मग त्याला सजविणे आलेच. आता विचार केला तर वाटत, घर किंवा शाळेची इमारत करतांना अभियांत्रिकी किंवा इंटरियल डिझायनरचे बाळकडू मिळायला तिथूनच सुरुवात झाली. त्यावेळी हा शाळेचा किंवा शिक्षणप्रणालीचा उद्देश होता की नाही माहीत नाही, पण या उद्योगांमुळे नवीन काहीतरी शिकायला मिळायचे हे मात्र खरे. असे सगळे करेपर्यंत निकलचा दिवस उजाडायचा.
. तसेच सुट्टीत एक अजून उद्योग आवर्जून करायचो तो म्हणजे बाहुला बाहुलीचे लग्न! आता तुम्हाला ते हास्यास्पद वाटेल पण तेव्हा आम्ही करीत असे. मांडव घालने, बाहुला बाहुलीला कपडे शिवणे, खाण्याचे जिन्नस जमवीणे असे सगळं नियोजन मिळून करीत असे. आता ज्याला इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतात त्याची अल्पशी ओळख तेव्हाच व्हायची. एक सारख्या काड्या गोळा करून मांडव तयार, त्याला सजवीने. शिंपी काकाकडून कापडाचे तुकडे आणून बाहुला बाहुली चे ड्रेस तयार करणे, तेव्हा फॅशन माहिती नसायचे पण त्याच नांदी कुठेतरी तिथे व्हायची. या खेळाच्या निमित्याने हे सारे नियोजन करीत असे.
सुट्टीत शालेय गृहपाठ असायचा पण अभ्यासाव्यतिरिक्त. तो म्हणजे संग्रहित वही तयार करण्याचा. जे काही छान सुंदर तुम्हाला दिसेल ते त्या वहीत संग्रहीत करीत असे. निमंत्रण पत्रिका मधील सुंदर फोटो, जाहिराती मधील काही चित्रे, वर्तमापत्रामधील फोटो तसेच काही वेगळे स्टिकर वहीत चिटवून त्याचे नाव त्याची थोडक्यात माहिती असे सगळ त्या वहीत संग्रहित करीत असे. तसेच कधी विविध प्रकारच्या झाडांची पाने फुले वहीत संग्रहित करून त्याची माहिती लिहिणे हा देखील गृहपाठ सुट्टीत असायचा.
या साऱ्या गोष्टी मुळे जिज्ञासा निर्माण व्हायची. यामुळे संग्रहणाची आवड निर्माण झाली. पुढे कुठे काही चांगले वाचनात आले तर ते देखील एखाद्या वहीत किंवा डायरीत संग्रहीत करायची सवय लागली. आम्ही हे सारे उद्योग कुणाच्या मोठया बहीण भावाची मदत घेऊन करीत असू. कारण तेव्हा गुगल बाबा नव्हते. सगळ्यांचे प्रॉजेक्ट चांगले झाले पाहिजे ही भाबदी भावना असायची. स्पर्धा तेव्हा आमच्या मनावर आरूढ नसायची. त्यातून मदतीची सवय जडली. आपले छंद कुठले हे समजले.
तेव्हा छंद वर्ग ही संकल्पना एवढी उदयास आली नव्हती. तेव्हाचे सुट्टीचे दिवस वरील उद्योग करण्यात, तसेच आईला उन्हाळी कामात मदत करणे, मामाच्या, काकाच्या, आत्या-मावशीच्या गावी जाणे असे घालवायचे. बालपण आम्ही भरभरून उपभोगले.
आता घरातील प्रत्येक जण व्यस्त आहे, ती तशी काळाची गरज आहे.
आताचे छंद वर्ग आताची गरज आहे पण त्यात बालपण हे कुठेतरी गृहीत धरले जात आहे. त्यांना त्यांच्या आवडीचे काही करु द्यायला हवे. ज्यात खऱ्या अर्थाने त्यांचा छंद जोपासला जाईल. थोड जून थोड नव अशी सांगड घालून छंद/रुची निर्माण करायला पाहिजे.
सध्या सर्वत्र व्यवसायीकरनाचे युग आहे. ते छंदवर्गात नसावे असे नाही पण व्यवसायाबरोबरच तो खऱ्या अर्थाने छंद वर्ग असावा. पाल्याचा कौल त्याची आवड पण बघितली पाहिजे आणि कुठलीही गोष्ट त्याच्यावर लादली जाता कामा नये.
आताचे चित्र बघता जाणवत की बालपण कुठेतरी हरवले आहे!
खरच ‘ते खरे बालपण’ शोधायला हवे!
ते या आणि पुढील पिढीला अनुभवायला मिळायला हवे!
