—– वैशाली चौधरी —–
काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीला माझी एक छोटीशी कथा पाठवली होती. थोड्या वेळाने तिचा रिप्लाय आला,
“मस्त !! खूप छान लिहिले आहेस. तुझे मराठी किती हाय लेव्हलचं झालेय गं!!”
“माझे मराठी, तेही हाय लेव्हलचे? बापरे!! मग आम्हा लेखक\कवि लोकांचा एक व्हाट्स अपचा समूह आहे त्यातल्या कविता आणि लेख तुला पाठवल्या तर तू त्यांच्या मराठीला काय म्हणशील??” माझे उत्तर.
“काय सांगतेस?” ती.
“मग काय तर. आपली मराठी भाषा आहेच तशी परिपूर्ण, समृद्ध!! जितके शिकू तितके कमीच आहे,” मी.
“ते सगळे ठीक आहे गं. पण कसे आहे ना, थोडे आपल्या बोलीभाषेत लिहिले असेल तर ते मनाला जास्त भावते!” ती.
“हो गं, पण इतके सुंदर शब्द असतात कि ते वापरलेच नाहीत तर ते कधी लोकांपर्यंत पोहोचणार पण नाहीत,” मी.
“ते सगळे ठीक आहे. पण तू मात्र अशाच सध्या, सोप्या आणि सरळ मराठी भाषेत लिहीत जा. मला तसंच आवडतं,” ती.
शेवटी माझीच मैत्रीण ना!! काही वर्षांपूर्वी मलासुद्धा तसेच वाटायचे. अजूनही वाटतं. बोलीभाषेतल्या कथा, लेख मला जास्त आपल्याशा वाटतात. मनाला पटकन भिडतात. आपलीच कथा आहे असे वाटून जाते. मराठी भाषा एकच पण तिच्या बोलीभाषा अनेक!! प्रत्येक शहर-गावानुसार आपली मराठी भाषा कशी बदलत जाते, तिची चाल, लय, काही शब्द.
मी फेसबुक वर एक अकाउंट फॉलो करते. ते बऱ्याच लेखिकांनी एकत्र येऊन बनवलेले अकाउंट आहे. खूप छान छान कथा असतात. पण काही कथा, बोलीभाषेतल्या असतात. मागेच एकदा कौतुकाने त्या अकाउंटवरची कथा वाचायला घेतली, पण लेखिकेने त्यात बरेच मालवणी शब्द वापरले होते, जे मला समजले नाहीत. त्यामुळे, कथा छान असूनही, वाचताना मला त्याचा आनंद उपभोगता आला नाही. तेव्हा कळले, आपली बोलीभाषा आपल्याला आपलीशी वाटते. पण दुसऱ्याला ती आपलीशी वाटेलच असे नाही..!!
मागच्या आठवड्यात, अशीच एक कथा वाचायला मिळाली. पण त्यात इतके इंग्रजी शब्द भरले होते, कि मराठी कथा वाचते आहे कि इंग्रजी, हेच कळेना. उदाहरणार्थ,
“हे हाय, हाऊ आर यु ??”
“आय एम फाईन, थँक यु !”
“यु आर ऑन टाईम,”
अशी बरीच इंग्रजी वाक्ये कथेमध्ये भरली होती.
आता याउलट दुसरी कथा, त्यामध्ये प्रत्येक शब्द शुद्ध मराठीमध्ये लिहिला होता. म्हणजे आपण दैनंदिन जीवनात जे काही इंग्रजी शब्द वापरतो, तेही मराठी मध्ये लिहिले होते. फोन, टेबल, सायकल, कॅमेरा, इत्यादी. तेही वाचायला थोडा त्रास झाला. अर्थ पटकन समजेना म्हणून वाचताना कथेची लिंक तुटत होती. अक्षरशः एखादी इंग्रजी कथा वाचताना खूप कठीण शब्द आला, कि कसे आपण डिक्शनरी घेऊन त्याचा अर्थ बघतो आणि मग तो समजल्यावरच पुढे कथा वाचायला चालू करतो. तसेच मला वाटू लागलं.
माझ्या मते, कथा, लेख लिहिताना, भाषा कशी वापरावी हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे.
उदाहरणार्थ, कथेतील एखादे पात्र बार्शी- परांडा मध्ये राहणारे दाखवले असेल तर त्या पात्राचे संवाद पुणेरी मराठीत लिहिले तर कसे वाटेल? यापेक्षा जर त्याच पात्राचे संवाद मराठवाडी मध्ये लिहिले तरच ते पात्र अधिक खुलते.
कथेमधील स्थळ, प्रसंग या गोष्टींनासुद्धा तितकेच महत्व आहे. आता अमेरिकेमध्ये एखादी मराठी व्यक्ती अमेरिकेशी बोलतानाचा प्रसंग असेल, तर तो नक्कीच इंग्रजीमध्ये लिहावा लागणार, नाही का? नाहीतर त्या व्यक्तीशी मराठी बोलतानाचा संवाद लिहिला तर ते योग्य वाटणार नाही.
तसेच एखादा ऑफिसमधील प्रसंग लिहिताना, त्यांच्यासार मराठी- इंग्रजी असा संमिश्र उपयोग करावा लागेल.
तुम्ही एखादी जपानी कथा लिहिणार असाल तर त्यात नक्कीच जपानी भाषा तुम्हाला अधून मधून वापरावी लागणारच. त्याशिवाय तो “फीलच” नाही ना येणार 🙂
कथेमध्ये एखादा प्रेम प्रसंग किंवा कविता असेल तर मग आपली अशी सुंदर परिपूर्ण मराठी भाषा…किती शब्द वापरू नवीन नको, अलंकार वापरू कि उपमा, अशीच अवस्था होईल नाही का??
तर एकूण काय?? मला असे वाटतं कि आपली भाषा इतकी समृद्ध आहे यात काही वाद नाहीच. पण कथा किंवा लेख, त्याचे विषय, वाचक वर्ग, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन, बोलीभाषा, इंग्रजी शब्द, मराठी शब्द, भाषेची शुचिता या सर्व गोष्टींचा योग्य समन्वय साधणे हेच एका चांगल्या लेखकाचे गुण आहेत.
