—– विशाखा पेंडसे-पंढरपुरे —–
प्रमाणभाषा आणि बोली भाषा असे भाषेचे सामान्यतः दोन प्रकार मानले जातात.
प्रमाणभाषा काळानुरूप सामान्यतः थोडी थोडी बदलत असली, तरी बोली भाषा ही काळाबरोबरच प्रांतानुसार, समाजानुसारही बदलते. औपचारिक, कायदेशीर बाबींसाठी, शासकीय कामकाजासाठी प्रमाणभाषेचा वापर आवश्यक आहे. कारण तिथे शब्दांचा आणि शब्दप्रयोगांचा विशिष्ट समान अर्थ सगळ्यांपर्यंत पोचणे गरजेचे असते. लेखनात किंवा तोंडी संवादात बोली भाषेचा वापर हा अनौपचारिक सहजतेसाठी, सोयीसाठी, लालित्यासाठी आणि भाषेच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी उपयुक्त असतो.
मराठी ही एक भाषा विचारात घेतली तरी एकाच काळात विविध भागांमध्ये मराठीची विविध रूपे बोलली जात असतात. एकाच भागातही जात,धर्म,व्यवसाय यांनुसार बोली भाषेची विविध रूपे ऐकायला मिळतात. मात्र या विविधतेतही एकता असते. विदर्भातला माणूस तळकोकणात गेला, तर अस्सल मालवणीत बोलल्या गेलेल्या वाक्यांमधला शब्दन् शब्द जरी त्याला कळला नाही, तरी त्या बोलण्यातला साधारण अर्थ त्याला नक्कीच लक्षात येईल. कारण वर्हाडीही मराठीच आणि मालवणीही मराठीच!
अशा या विविध बोलीभाषांच्या वापराने भाषेचे सौंदर्य नक्कीच वाढते. परंतु जेव्हा गंभीर, वैचारिक किंवा औपचारिक स्वरूपाचे भाषण अथवा लेखन करणे अपेक्षित असते, तेव्हा बोली भाषेचा वापर खटकू शकतो. तिथे प्रमाणभाषा वापरणेच योग्य ठरते.
मराठीमधल्या अनेक लेखकांनी आपल्या लेखनात बोली भाषेचा वापर अतिशय प्रभावीपणे केलेला आहे. जयवंत दळवी, आनंद यादव, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, विश्वास पाटील ही काही सहज आठवणारी उदाहरणे. माडगूळकर-मिरासदार-शंकर पाटील या त्रयीने तर कथाकथन हे एक नवीनच माध्यम निर्माण करून त्या माध्यमाद्वारे आपले लेखन अधिक प्रभावीपणे महाराष्ट्रात पोचवले. साठोत्तर काळातल्या लेखकांच्या पुस्तकांमधून त्या त्या समाजाच्या व्यथांबरोबरच त्यांच्या बोली भाषांनाही मराठी वाङ्मयात मानाचे स्थान मिळाले. दु:ख असो वा आनंद, राग असो वा प्रेम, सर्व प्रकारच्या भावभावना बोली भाषेतून अतिशय प्रभावीपणे व्यक्त होतात. बोली भाषांमध्ये एक प्रकारचा अभिजात गोडवा असतो, सहजता असते.
’मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर’ म्हणणार्या बहिणाबाईंची कविता खानदेशी बोली भाषेतच साकार झाली. ’त्यां दिसां वडाकडे गडद तिनसना, मन्द मन्द वाजत आयली तुजी गो पैंजनां’ लिहिणार्या बा. भ. बोरकरांनी कोंकणी भाषेत कविता लिहिल्या. बोली भाषेच्या वापरामुळे या कवितांच्या सौंदर्यात भरच पडली आहे.
ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी असणार्या लेखनात बोली भाषेचा वापर जास्त ठळकपणे उठून दिसतो. कारण ग्रामीण जीवनात पारंपरिक बोलीभाषा जास्त सर्रास वापरल्या जातात. पण शहरी भागातही विविध बोलीभाषा असतातच. ’पुणेरी मराठी’ असा शब्दप्रयोग रूढ असला, तरी पुणे शहराच्याही विविध भागांमधल्या पारंपरिक बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. पुलंचे ’पेस्तनकाका’ अस्सल मुंबईकर आहेत, पण घामाला ’ग्हाम’ म्हणणारी त्यांची बोली ही खास पारशी समाजाची आहे. ती इतर समाजांमध्ये ऐकू येणार नाही.
’कोसला’ हे भालचंद्र नेमाडे यांचे पुस्तक मराठी साहित्यात अनेक अर्थांनी मैलाचा दगड समजले जाते. विषयाचा आणि मांडणीचा वेगळेपणा याबरोबरच भाषेचा वेगळा वापर हेही या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ही कुठल्या विशिष्ट प्रांतातली बोली भाषा नसली तरी सहज बोलल्यासारखी भाषा आहे. अशीच सहज, वैशिष्ट्यपूर्ण भाषा प्रकाश नारायण संत यांच्या ’लंपन’ची आहे. तशीच सहज संवाद साधणारी भाषा मिलिंद बोकील यांच्या ’शाळा’ मध्ये आहे. बोली भाषेच्या वापरामुळे अशा पुस्तकांमधले कथन अधिक प्रभावी होते.
चित्रपट, नाटके, दूरचित्रवाणीवरील मालिका हीदेखील भाषेच्या बाबतीत महत्त्वाची माध्यमे आहेत. मच्छिंद्र कांबळी यांनी केलेली मालवणी भाषेतील नाटके अतिशय लोकप्रिय ठरली. अलीकडच्या काळात ’सैराट’ चित्रपटातील सोलापूर-उस्मानाबादकडची अस्सल ग्रामीण भाषा दाद घेऊन गेली. ज्या पार्श्वभूमीवरची कथा मांडायची आहे, तिथल्या समाजाची बोली भाषा मांडता येणे हे महत्त्वाचे आहे. लेखकाचा पुरेसा अभ्यास नसेल, तर कथा कोल्हापूर जिल्ह्यातल्या खेडेगावात घडत असूनही बोली मात्र पश्चिम महाराष्ट्रातली वापरली जाते आणि मग विषय चांगला असूनही लेखन प्रभावी ठरत नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये समाजमाध्यमे आपल्या आयुष्याचा भाग बनून गेली आहेत. अनेकजण नियमितपणे या समाजमाध्यमांमध्ये लेखन करतात. आपले लेखन अधिकाधिक लोकांनी वाचावे,अशी इच्छा साहजिकच प्रत्येक लेखकाच्या मनात असते. अशा वेळी समाजमाध्यमांमध्ये लिहिताना आपली भाषा लक्ष वेधून घेणारी असावी, असा प्रयत्नही अनेकांचा असतो. या प्रयत्नात बोली भाषेचा वापर अर्थातच जास्त होतो आणि ते स्वाभाविकच आहे, मात्र सतत अशी अनौपचारिक, हलकीफुलकी भाषा लिहिण्याची आणि वाचण्याची सवय लागल्यामुळे कधीकधी गंभीर विषयांवर लिहितानाही तशीच भाषा वापरली जाते आणि मग विषयाचे गांभीर्य हरवते. त्याचप्रमाणे विषय जरी हलकाफुलका असला, तरी मराठीतली तीच तीच विशेषणे आणि क्रियाविशेषणे अनेक वेळा वापरली जातात आणि मग ती भाषा समृद्ध रहात नाही. उदाहरणार्थ, पाऊस ’मस्तपैकी’ पडतो, एखादी तरुणी नटूनथटून ’मस्तपैकी’ तयार होते, जेवणही ’मस्तपैकी’ होते, एखादी सहल ’मस्तपैकी’ पार पडते आणि एखाद्या मुलाला आईकडून ओरडा मिळतो, तोही ’मस्तपैकी’! दूरचित्रवाणीवरच्या वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रांच्या ॲप्सही या भाषेच्या आहारी जाऊन आपापल्या ’ब्रेकिंग न्यूज’ जास्तीत जास्त आकर्षक करण्याच्या नादात चुकीचे शब्दप्रयोग वापरताना दिसतात.
प्रमाणभाषा ही ’शुद्ध’ आणि बोली भाषा ’अशुद्ध’ असा काही जणांचा गैरसमज असतो. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या ’पिग्मॅलियन’चे पु. ल. देशपांडे यांनी केलेले ’ती फुलराणी’ हे मराठी रूपांतर सुप्रसिद्ध आहे. मंजुळा साळुंके नावाची फुलं विकणारी साधीशी मुलगी आणि तिची ’अशुद्ध’ भाषा ’सुधारण्याचा’ विडा उचलणारे प्राध्यापक जहागिरदार यांची ही कथा. हे नाटक म्हणजे व्यक्तीच्या भाषेवरून तिला उच्च किंवा कमी दर्जा देणार्या मानसिकतेवरील सणसणीत भाष्य आहे.
भाषा हे संवादाचे, माणसाला माणसाशी जोडण्याचे माध्यम आहे, तोडण्याचे नाही, ही मूलभूत बाब आपण सदैव लक्षात ठेवली पाहिजे. तो संवाद अधिकाधिक चांगला, परिणामकारक होण्यासाठी बोली आणि प्रमाणभाषेचा उपयोग झाला पाहिजे.
– विशाखा पेंडसे-पंढरपुरे