—– वर्षा सबनीस —–
विधात्याने इतर प्राणीमात्रां पेक्षा मानवाला एक खूप मोठी शक्ती दिली आहे . ती आहे विचार करायची शक्ती आणि त्या विचारांची अभिव्यक्ती करायची क्षमता. ह्या विचार शक्तितून आणि त्याच्या अभिव्यक्तीतून भाषेचा उगम झाला आहे .भाषेचा उगम कधी झाला असावा ह्याबद्दल संशोधकांना काही पुरावे सापडलेले नाहीत . काहीका असेना, भाषेमुळे आपल्या भावनांना शब्दाचे रूप मिळाले. दोन व्यक्तींमध्ये संवाद निर्माण झाला, दैनंदिन आयुष्यातील व्यवहार शक्य झाले . नवजात बालकाला सुद्धा राग, प्रेम, ह्या भावना कळतात . त्या जन्मतःच अभिभूत असतात . पण त्याला भाषेची जोड मिळते , ती त्याला बोलता यायला लागल्या नंतर. आजूबाजूला असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचे बोलणे ऐकून तो बालक भाषा शिकतो .
भाषेचा मूलभूत उद्देश्य आहे संवाद . ह्या संवादा करता उपयोगात आलेली भाषा फार महत्त्वाची आहे. प्रत्येक भाषा आणि तिची लिपी, ही काना, मात्रा, वेलांट्या नी नटलेली आणि शब्दसंपदेने समृद्ध असते . भाषेत प्रत्येक शब्दाचे महत्त्व असते, जागा असते . उदाहरणार्थ , दोन मित्रांची असते ती गळाभेट, दोन प्रेमिकांची असते ती मिठी . रहस्व, दीर्घा च्या फरकाने सुद्धा शब्दांचे अर्थ बदलतात . सुर लिहिले तर अर्थ राक्षस असा होतो आणि जर सूर लिहिले तर संगीतातील नाद असा अर्थ होतो. शुद्ध भाषा आणि त्यातील चपखल शब्द ,वाचकाला अपूर्व आनंद देतात . साहित्यातील शुद्धता, शुचिता , साहित्याला सुंदर आणि अर्थपूर्ण करते . दर्जेदार साहित्याचा तो पाया आहे .
“भाषासु मुख्या मधुरा “ह्या सुभाषिता प्रमाणे प्रत्येक भाषा अतिशय गोड असते .तर अशी भाषा, माणसा माणसा मधला दुवा , एकमेकांमधल्या संवादाचे माध्यम असते . भाषेचा हळुवारपणा दोन प्रेमी जीवाना जवळ आणतो, भाषेची जरब मुलांना आईवडिलांच्या धाकात ठेवते .संवादातून नेते जनतेला आपलेसे करतात आणि भाषेच्या मदतीने गुरू शिष्यांचा ज्ञानार्जनाचा प्रवास अविरत राहतो .पण जर लिहिलेले साहित्य , कलाप्रकार जर सामान्य लोकांना कळलेच नाही तर लेखकाचे मनोगत कसे समजेल . लेखकात आणि वाचकात संवाद होणारच नाही.
संवादाचा अभाव बऱ्याचदा नातेसंबंधांवर होतो . गैर समजाचे कारण ठरतो . म्हणून संवाद हा सशक्त समाजाच्या घडणाला कारणीभूत असतो.
जगभरात असंख्य भाषा बोलल्या जातात. पावला पावलावर बदलणाऱ्या भाषा , कालांतराने रूप बदलत राहिल्या .बोली भाषा , मानक भाषे पेक्षा खूप वेगवेगळ्या स्वरूपात येत राहिल्या . त्यामुळे मूळ भाषा आणि तिचे शुद्ध रूप मात्र अशुद्ध होत गेले . साहित्यात आढळणारी शुद्ध भाषा दैनंदिन व्यवहारात अशुद्ध रुपात दिसू लागली . भाषेचे हे अशुद्ध रूप समाजात प्रचलित होत गेले. इथे मी काही उदाहरणे देऊ इच्छिते .
स्थळ..मुंबई. १९८७ मध्ये मी बँकेत कार्यरत होते . गप्पा करत करत आमची कामं सुरू असायची . एकदा बोलण्याच्या ओघात मी म्हणाले, “जरा थांबा, मी टोटल घेऊन घेते आणि मग तुम्हाला देते.” माझ्या बाजूला बसलेल्या सह कर्मचारी नी लगेच विचारले, “तुम्ही नागपूरच्या काहो ?” मी निरागसपणे हो म्हणाले . “वाटलच मला. घेऊन घेते…ही दोन क्रियापदे का बरं ? “तो पर्यंत मी अशुद्ध मराठी बोलते याचा मला पत्ताही नव्हता .उलट मराठी विषयात आपल्याला चांगले मार्क्स मिळतात ह्याचा अभिमान होता . खूप विचार केल्यानंतर मला माझ्या संभ्रमाचे उत्तर मिळाले . नागपूर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असल्यामुळे , तिथल्या भाषेवर हिंदीचा खूप प्रभाव पडला आहे . हिंदीत, “मैं टोटल ले लेती हुं” चे मराठीत भाषांतर “ मी टोटल घेऊन घेते “ असे झाले .
स्थळ..बेंगलोर..१९९०मध्ये मी मुंबईहून इथे स्थाईक झाले . रात्री झोपताना सासूबाई म्हणायच्या, “ अग,सगळे दिवे काढून झोपा बरं”
मला खूप मजा वाटायची . दिवे काढा म्हणजे काय, बल्ब काढून ठेवायचा का ?
अजून एक मजेशीर प्रसंग . आमच्या घरी आलेल्या एक काकू, माझ्या शांत झोपलेल्या मुलीकडे बघुन म्हणाल्या, “अग बाई, पाप झोपली का ?” मी नव्यानेच कर्नाटकात आलेली, क्षणभर अवाक झाले… पाप..माझी मुलगी..? मनातल्या मनात म्हणाले, अहो हे माझे पाप नाही. चांगली लग्नानंतर वर्ष भराने झाली आहे….त्या काकू गेल्यानंतर, मी नवऱ्याला सगळे सांगितले . घरात सगळे खो खो हसले. “ अग , इकडे लहान बाळाला पापू असे म्हणतात. बोली भाषेत पापुचे पाप झाले .
तर, अशी ही भाषा आणि तिची झालेली बोली भाषा . दोन्ही तिन्ही प्रसंगात भाषेच्या अशुद्ध रूपाने झालेला गोंधळ बघितला ना..? बोली भाषेत बदलणारी रूपे मूळ भाषेला अशुद्ध करतात . पण त्याने संवाद थांबला का ? .तर अजिबात नाही . नवख्या माणसाला जरा विचार करावा लागला एव्हढेच. पण संवाद झालाच .
आमच्या मंडळाच्या एक ज्येष्ठ सदस्या म्हणायच्या , “मंडळाच्या मासिकात सगळ्या सदस्यांनी काहीतरी लिहायलाच पाहिजे . मनात असलेल्या भावना शब्दात उतरवायच्याच.” उद्देश्य होता, संवाद साधण्याचा . सगळ्यांना उत्तेजना देण्या करता व्याकरणाच्या , रहस्व दीर्घाच्या चुका पण पोटात घालायच्या असा त्यांचा नियम होता. थोडक्यात काय, तर सगळ्यांनी संवाद साधायचा प्रयत्न करायचा . त्याकरता भाषा थोडी अशुद्ध झाली तरी चालेल . साहित्यिकांच्या दृष्टीने हे अक्षम्य असेलही पण सामान्य जनतेच्या आयुष्यात भाषेच्या ह्या अशुद्ध रूपाने काही फरक पडत नाही .
संस्कृत भाषा, जगातल्या अतिप्राचीन भाषांपैकी एक आहे . ह्या भाषेची शुचीता महत्त्वाची आहे. शुद्ध स्वरूपातील श्लोकांमध्ये, मंत्रसामर्थ्य आहे . मंत्रांचे शुद्ध रुपात उच्चारण केले तर त्या शब्दांच्या कंपनांचा शरीरावर योग्य तो परिणाम होतो
भगवत गीता संस्कृत भाषेत लिहिली गेली. सामान्य जनतेला कळावी, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत मराठीत त्याचे भाषांतर केले . म्हणून गीतेचे सार सामान्य जनतेला कळू शकले . हा संवाद शक्य झाला तो केवळ भाषेमुळे .
ज्ञानेश्वरी चे ही मंत्रसामर्थ्य सर्वश्रुत आहेच.त्यातील ओव्या अनेक व्याधींवर रामबाण उपाय ठरल्या आहेत . त्या ओव्याचे सुस्पष्ट वाचन, पारायण परिणामकारक ठरतात . इथे ओव्यांची शुचिता, शुद्धता फार महत्त्वाची आहे .
तर अशी ही भाषेची महती . भाषे शिवाय आज मी माझे मनोगत ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले नसते . शुचिता सांभाळायचा मी आटोकाट प्रयत्न करता करता, संवाद ही साधायचा प्रयत्न केला आहे ….
