सनविवि ललित,साहित्योन्मेष सुट्टीच्या छंदवर्गांचे बोकाळलेले प्रस्थ !

सुट्टीच्या छंदवर्गांचे बोकाळलेले प्रस्थ !

                                                              

— डॉ.सौ. अनुराधा भागवत —

होळीचा सण संपताच सर्वांना वेध लागतात वार्षिक परिक्षांचेव त्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीचे.सर्वच जण आतुरतेने या सुट्टीची वाट पाहतात. काळाबरोबर पुष्कळ गोष्टी बदलल्या,सुट्टी अजून तशीच आहे पुष्कळशी.आजकाल सुट्टीबरोबर मामाच्या गांवाची आठवण येत नाही तर वेध लागतात आता सुरू होणाऱ्या निरनिराळ्या गोष्टींच्या क्लासेसचे,छंदवर्गांचे. पालक स्वतःच या वर्गांची चवकशी करून मुलांना तिथे पाठवतात. सुट्टी किती मोठी असली,शाळा बंद असली तरी मुले अडकलेलीच.यावर्षी आम्ही नातीच्या ओढीने तिच्या सुट्टीत मुलाकडे रहायला पळालो.दोन वर्षात कुठे जाणं झालं नव्हतं. आता छान झुकझुक गाडीत बसून पळती झाडे पहात आम्ही सुट्टी लागण्यापूर्वी मुलाकडे पोचलो. आम्हाला बघताच नात आम्हाला चिकटली, आजोबांच्या कडेवर चढून बसली, कौतुक सोहळा सुरू झाला.जेवतांना मग सुट्टीच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा सुरू झाली..

एका आधुनिक ऐटबाज सर्व सुविधायुक्त वसाहतीतील तशाच सर्व सुविधायुक्त प्रशस्त सदनिकेत माझा मुलगा राहतो. सोसायटीच्या क्लबमध्ये बैटमिंग्टन कोर्ट आहे. दुपारनंतर रिकामंच असतं. रोज संध्याकाळी तिथे खेळायला जायचं ठरले व सकाळी आमच्या प्रभातफेरी बरोबर सायकलिंग! दुसऱ्या दिवसापासून सुरुवात झाली. माझी दुपारची झोप अर्धवट सोडून मी उठले, नात एकटक कार्टुन्स बघत होती, हलायला तयार नाही. कसंबसं तिला खेळायचा पोशाख (पांढरा टॉप व स्कर्ट )घालून, बूट घालून तयार केले, दूध-बिस्किट दिले व आजोबांबरोबर रवाना केले. किती आणि काय खेळली कुणास ठाऊक?पण लगेच सूनबाई तिच्यासाठी नविन रैकेट,शटल् कॉक्स एक पांढरा हेअरबैंड व मनगटावर लावायचा पट्टा घेऊन आली. पालकांचाच उत्साह जास्त. एक दोन दिवस बरे गेले व तिने हट्ट धरला,

” मला बैटमिंग्टन कोचिंगला नांव घालायचं आहे. परवापासून सर येणार आहेत शिकवायला. “

माझा मुलगा म्हणत होता,” पुढच्या आठवड्यात पोहण्याचा वर्ग सुरू होत आहे, तिथे तूं जा.त्याची वेळ पाहू मग ठरवू.”  यावर सुनेची आपली मते,…पोहणं की बैटमिंग्टन?…मुलीला अजून येत कांहीच नाही.

” वेळा जमल्या तर दोन्ही कडे पाठवणार कां रे? ” मी न राहवून मुलाला विचारले.

” हो.नक्कीच.”

” पोर बिचारी अगदी थकून जाईल ” मी स्वतःशी पुटपुटल्यासारखं बोलले. मोठ्याने बोलले असते तरी कुणी ऐकलं नसतंच म्हणा.

दोन दिवसांनी सहज बोलावे तसे सुनेने सूतोवाच केले,

“त्या उर्मिला मैडम आहेत ना,ऑनलाइन नाच शिकवणाऱ्या त्या सुट्टीत घरीच क्लास घेतात, त्याची चवकशी करु या.”

” पण वेळ…

“नाही, आधी पोहण्याच्या व बैटमिंग्टनच्या वेळा ठरू देत, मग बघू.” मुलाला पुरतं बोलू न देता सूनबाईने समजूतदारपणा दाखवला.

” पण आणखी एक क्लास म्हणजे पोर बिचारी अगदी थकून जाईल.”मला काळजी पडली. तेवढ्यात सून माझ्याकडे वळून म्हणाली,

” आई,नाच खरंच छान जमतो तिला, ऑनलाईन क्लास असतो तेव्हा बघते ना मी. पावलांचा ठेका अगदी चुकत नाही. मैडमपण कौतुक करतात.”

” हो.हे अगदी खरं. अगं अगदी सहा महिन्याची होती, मी गाणं म्हणायची ना,

                                            एक पाय नाचव रे गोविंदा,

                                             घागरीच्या छंदा…. 

तेव्हा इतका छान ठेका धरायची, खूप छान डोलायची.” मी तिला दुजोरा दिला खरंतर माझी सगळीच नातवंडं माझ्या गाण्यावर छान डोलायची, पण म्हणून लगेच क्लास?माझ्या मुलीची मुलगी जातेच की नाचाच्या क्लासला, मग हिला हवाच. ती अशीच जात असते सुट्टीत कुठे कुठे,…नाच,टबलटेनिस,स्केटिंग, गिटार, व्यक्तित्वविकास,वगैरे. शिवाय मुलाचे क्लासेस वेगळेच… क्रिकेट, तबला, रायडिंग,काय नी काय. एक दिवस मुलीशी फोनवर बोलणं झालं आता सुट्टी असल्यामुळे मुख्य विषय हाच,मुलांचे क्लासेस, कारण हे क्लासेसचं लोण आता फारच पसरले आहे. गप्पांच्या ओघात मी मुलाला म्हणाले, ” अरे,काल ताईचा फोन आला होता, तिचा मुलगा पण अशाच तीन चार क्लासेसना जातो आहे कालच एशियाड चा क्लास सुरु केला म्हणे “

” एशियाड ?”मुलगा दचकलाच,” आई, अगं,ऑलिम्पियाड असेल.”

“असं असतं का काही?मग तेच असेल.”मी पुटपुटले.    “छान आहे, क्लासला गेलं की आपली मुलं खूप छान स्कोअर करतात” त्याचे हे वेगवेगळे छंदवर्ग ऐकून मुलगा आणि सून तर खूषच झाले.

“आजकाल फारच झालंय या कोचिंगच प्रस्थ,गल्लोगल्ली बोकाळलेत,सुट्टीत तर ऊतच येतो. पावसाळ्यात जशा कावळ्याच्या छत्र्या उगवतात ना जागोजागी तसे सुट्टीत हे छंदवर्ग.”मी.

” आई, अहो मुलं सुट्टीतच हे सर्व शिकू शकतात ना “सून.   ” अगं पण किती क्लासेस एकेका मुलाच्या मागे?”मला राहवलंच नाही.

“आजकाल लागतंच हे सर्व, आणि आपण शिकवू शकतो तर कां नाही?बरं कांही नाही शिकवलं तर सुट्टी उगाचच वाया जाते “सून ठामपणे म्हणाली. लहानपणापासून आमच्या सुट्या काय वाया गेल्या?खरंतर आमची सुट्टी कधी या वर्गातून त्या वर्गात जाण्याच्या धांवपळीत वाया नाही गेली. आम्ही सुट्टीत मोकळेपणाने खेळलो, हुंदडलो,पुष्कळ भांडलो सुध्दा.

  हल्ली असं होतं, शाळेत जसं सगळ्या विषयांच्या तासाला हजर रहावंच लागतं तसं सुट्टीत मुलांना असतील नसतील त्या सर्व वर्गांना आलटून पालटून जावंच लागतं. घरात एखाद दुसरंच मूल, पालकांजवळ पैसा भरपूर. आपल्या बाळाला जमेल तितके जास्तीत जास्त द्यायचं, कधीच काही कमी पडू द्यायचं नाही ही आई वडिलांचीच हौस व इच्छा, मग काय?माझी आजी म्हणायची,            ‘अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने।’      आपल्या पाल्याला किती झेपतंय,किती जमतंय ते पाहून पारखून मग या छंदांची जोपासना करावी हौसेला किंवा इच्छेला सम्रुध्दीची साथ असलीतरी विवेकाची मुरडही असावी. पण याला आणखीही एक कारण आहे, या प्रश्नाची आणखी एक बाजू आहे. नोकरीच्या ठिकाणी मुलं एकटीच राहतात, विभक्त कुटुंब, दोघेही नोकरी करणार, रोजचे आठ दहा तास दोघे बाहेर. मुलांना सुट्टी म्हणून आईवडील नाही ना घरी थांबू शकत,मग मुले कुठेतरी अडकलेलीच बरी.पालकांचा नाइलाज असतो… मान्य. पण पालकांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न मानू नये,मुलांवर सक्ती करु नये.मामा, मावशी, काका, आत्या सर्वच नोकरी करणारे, कधी अंतरं दूर पडतात, मुलंही एकटी जायला, रहायला तयार नसतात.यामुळे नातेवाईकांच्या ओळखी होत नाहीत, सहवास घडत नाही प्रेम जडत नाही, मुलांच्या सर्वांगीण विकासाला याही गोष्टी आवश्यक असतात.

आम्ही इथे रहायला आलो पण बघता बघता नातीचे चार क्लाससुरू झाले. नाच,पोहणे, कलरिंग-पेंटिंग, बैटमिंग्टन!प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या,जागा वेगळ्या. दिवसभर आजोबा तिची ने-आण करतात व मी तिला काही खायला प्यायला देऊन, कपडे बदलून तयार करते. पण हे सर्व उरकण्यात एक प्रकारचा यांत्रिकपणा येतो हळुहळु, केल्याचे समाधान मिळत नाही. नातीचे लाड कौतुक करायचं राहून जातं, तिलाही आजीआजोबांचा लळा लागत नाही.

  एकटीच स्वतःशी काही विचार करत असताना मनात आलं,आपणच घरी क्लासेस काढून नातवंडांना या छंदवर्गांना बोलवलं तर?दहा दिवस, फार तर पंधरा दिवस, अगदी सोपे, पण उपयोगी. शिवणकाम भरतकाम, सुरवातीचे टाके,स्तोत्र पाठांतर, हस्ताक्षर व शुध्दलेखन, योगासने व किरकोळ व्यायाम, सुबक रांगोळ्या.. रंग भरणे. नांव पण सुचलं,’ गुणविकास वर्ग ‘मी छान गोष्टी सांगेन, पुस्तकं वाचू.माझं ठरलं. पुढच्या वर्षी सुट्या लागायच्या आधी मुलांना कळवायचं,   ‘ आजीचे गुणविकास वर्ग, मुलांना पाठवा.वयोगट ६ ते १३ वेळ दिवसभरात कधीही रोज दोन तास.क्लासच्या वेळात त्यांचा आवडता खाऊ व गोष्ट.’

मला एकदम उत्साह वाटू लागला. माझ्या या वर्गांना नातवंडं घरी जमली आहेत, माझ्या भोवती रमली आहेत याची झोपेतच काय मी जागेपणीही स्वप्नं पाहू लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *