सनविवि अनुभव,साहित्योन्मेष माझं एकत्र कुटुंब

माझं एकत्र कुटुंब

–वर्षा सबनीस —

आपल्या भारतवर्षात पूर्वापार चालत आलेली एकत्र कुटुंब पद्धती,इतरत्र कुठेही बघायला मिळत नाही . मोठा चौसोपी वाडा,त्यात तीन-चार पिढ्या, एकमेकांची सुखदुःखे वाटून घेऊन,गुण्यागोविंदाने एकत्र राहायची. एकाच वेळी घरात आजी-आजोबा,आई-वडील ,भाऊ त्यांचे परिवार, त्यांची मुलं ,नातवंडं, अशा अनेक नात्यांनी विणलेल एकत्र कुटुंब असायचं. संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे आजी आजोबा ,तर घरात धनार्जन करणारे ,व्यवसाय बघणारे ,बाबा ,काका …अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेल्या आई ,काकू .. दिवसभर किलबिलाट करणारी मुलं असं काहीसं चित्र असायचं एकत्र कुटुंबाचं. एकाच स्वयंपाक घरात शिजलेले अन्न सगळे आनंदाने एकत्र बसून खायचे.

 काळाच्या ओघात हे चित्र कुठेतरी हरवलं .कारण काही का असेना पण हळूहळू घरात भिंती तयार झाल्या. त्यानंतर नात्यात आणि  नंतर मनात सुद्धा .प्रत्येकाची स्वतंत्र विचारसरणी, नोकरीची निराळी जागा ,

भाऊबंदकी अशा अनेक कारणांमुळे घरं विस्कळीत झाली. नात्यातला आपलेपणा आणि जवळीक कमी होऊन अंतर वाढायला लागले.  परिणामी एकत्र कुटुंबांचे विभाजन होऊन प्रत्येकाची स्वतंत्र घरे झाली. चौसोपी वाडे ओस पडले.शहरात जाऊन लहान घरात स्वतंत्र 

संसार थाटले गेले.मुलं पाळणाघरात मोठी होऊ लागली.

 मी आज माझ्या कुटुंबाची , माझ्या एकत्र कुटुंबाची प्रतिनिधी म्हणून माझे अनुभव इथे सादर करणार आहे .१९९० मध्ये मुंबईहून बंगलोर ला आले. मुंबईला असलेल्या माझ्या छोट्याशा घरट्यातून एका विशाल वृक्षाच्या छायेत आले. मन खूप साशंक होतं. मुंबईच्या अफाट गर्दीत आमचं तिघांचं छोटसं घरकुल होतं . तिथून बंगलोरला आले आणि बेंगलोर चा सुखद गारवा जरा जास्तच सुखद वाटला .आमच्या तिघांच्या घरातून एकदम दहा जणांच्या घरात आले .मुंबईत लहान मुलीला पाळणाघरात ठेवून, लोकल, बसच्या गर्दीतून कामावर जाणं,आल्यानंतर घरकाम अशा तारेवरच्या कसरती तून अचानक सुटका झाली आणि एकत्र कुटुंबाचा पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा कळला .मुलीला पाळणाघरात नाही,तर आजी-आजोबांच्या प्रेमळ छत्रछायेत ठेवून कामावर जायचं होतं. तिला काऊचिऊच्या गोष्टी सांगून घास भरवणारी आजी होती ,तर तिच्याशी खेळणारे, तिला फिरायला नेणारे आजोबा होते. मनाला मिळालेला तो दिलासा अनमोल होता . आपल्या अनुपस्थितीत आपली मुलं एकटी नाहीत तर त्यांचे प्रेमळ आजी आजोबा त्यांच्या बरोबर आहेत हे खूपच समाधानकारक होतं .

अलीकडे सगळ्याच मुली किंवा आया म्हणूया ,नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर असतात.अशावेळी आपल्या मुलांची काळजी घेणारे, प्रेम करणारे आजी-आजोबा घरी आहेत हे किती सुखाचे आणि दिलासा देणारे असते हे मी सांगू शकते. पाळणाघराची व्यावसायिक व्यवस्था या प्रेमाच्या तुलनेत कवडीमोल ठरली .घरी आजीआजोबां कडून मुलीला संस्कार पण मिळायला लागले.

हळूहळू माझा बेंगलोरला जम बसायला लागला .घरात सासू-सासरे, दीर जाऊ ,त्यांची मुलं ,आमची मुलं अशा दहा जणांच्या घरात मी पटकन रुळले .सुनांवर मुलीं प्रमाणे प्रेम करणारे सासू-सासरे मिळण हे माझं  भाग्यच .खूप मोठ्या मनाने ,सासूबाईंनी त्यांचे स्वयंपाक घर आम्हा सुनांच्या हाती सोपवलं ,पण हे करताना यत्किंचितही दुःख नव्हत, उलट तुम्ही नवीन पिढीनेच आता सगळं करायचे आहे हीच भूमिका होती.दिवसभर दोन्ही सुना घरात नसताना मुलांना सांभाळणं, घराकडे लक्ष देणे हे त्यांनी लीलया केलं. तीन बायका एका घरात आनंदाने राहतो याचं कारण माझ्या सासूबाई . सगळ्यांची पडती बाजू त्यांनी सांभाळून घेतली , अजूनही घेत आहेत .

 सगळे सणवार, प्रवास सगळ्यांनी मिळूनच करायचे असा अलिखित नियमच आहे घरात. प्रवासात पणजी पासून पतवंडा पर्यंत सगळे एकत्र असतो आणि धमाल करत असतो .

आमच्या घरातली सर्वात महत्त्वाची बाजू अशी की आमच्यापैकी कोणीही पैशाला नात्यापेक्षा जास्त महत्त्व दिलं नाही .माझ्या दृष्टीने हा एकत्र कुटुंबाचा पाया आहे. 

महिन्याचा होणारा खर्च आम्ही वाटून घेतो .त्यात कुणावर अविश्वास नसतो. क्षुल्लक गोष्टींना प्राधान्य न देता,जमेचीच बाजू नेहमी लक्षात घेतो .

 मुलं लहान असताना तर एकत्र कुटुंब एक वरदान वाटतं होतं.मुलांची आजारपण, अभ्यास , शिकवण्या ,शाळेत नेणें पोचवणे अश्या सगळ्या गोष्टी आम्ही मिळून केल्यामुळे अजिबात जड वाटल्या नाहीत.सासु सासऱ्यांची आजारपण सुद्धा आम्ही मिळूनच निभावून नेली. पडेल ते काम आनंदाने करत, प्रत्येक प्रसंगात एकमेकांची शक्तीच झालो. एकमेकांवर असलेला विश्वास,कौटुंबिक जिव्हाळा आणि कष्टाळू वृत्ती, यामुळे सगळ्यांचीच उत्तरोत्तर प्रगती होतं गेली. म्हणूनच सगळे म्हणतात की तुम्ही दोघी जावानी “जावा जावा ,उभा दावा ” ही म्हण खोटी ठरवली .माझ्या सासूबाई,जाऊ आणि मी,जवळपास एक सारख्याच कुटुंबातून आल्यामुळे आमची मूल्ये, विचार इत्यादीं चांगले जुळले.

पण एकत्र कुटुंबाचा एक तोटा ही आहे बरं. आमचे मित्रमंडळ,शेजारी यांच्याशी आमचे सामाजिक संबंध खूप कमी असायचं.ही बाब लक्षातआल्यावर आम्ही आमचे सामाजिक संबंध सुधारण्यावर भर दिला.

आज आमच्या कुटुंबाकडे एक आदर्श कुटुंब म्हणून बघतात. खूप अभिमान वाटतो.तराजूच्या पारड्यात फायदे नेहमीच जास्त होते , खूप जुळवून घ्यावे लागले, काही गोष्टी मनासारख्या झाल्या तर काही मनाविरुद्ध. पण तरीही एकमेकांची साथ कधी सोडविशी वाटली नाही .

हळूहळू मुलं मोठी झाली.त्यांची लग्न झाली.आनंदाची बाजू अशी की आमच्या मुलीही ,सासरी एकत्र कुटुंबात नांदत आहेत.चुलत भावंडं असूनही सख्यासारखे वागणारी, एकमेकांवर खूप प्रेम करणारी मुलं बघितली की केलेल्या सगळ्या तडजोडीचा विसर पडतो. उतारवयात आजूबाजूला सुखासमाधानाने नांदणारी मुलं, नातवंडं बघून सासूबाई खूप आनंदी आणि समाधानी असतात. सुख ,सुख म्हणजे आणि काय असावे..…

1 thought on “माझं एकत्र कुटुंब”

  1. Hello !
    Very Nice Article ! We were also staying in Bangalore ( Bengaluru ) from 1990 to 2002 .Those were the Days !
    There was a problem of Parthenium Trees which were planted by the Govt. but Pollen form this tree used to cause Respiratory Problem to many people. Some suffering persons even asked Transfer back to Mumbai or some other place. Ultimately Govt listened to several requests by the public and stopped planting any such trees !
    Bangalore now has drastically changed !
    We were active members of Maharashtra Mandal in those years.
    We always wait for the next Sa. Na. Vi. Vi.
    With Best Wishes
    Chandrashekhar N Kane
    ( LM 200 )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *