अजिता पणशीकर
पार्श्वभूमी: आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेची अंतिम फेरी आज होणार आहे. गेले तीन महिने २५ महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने ह्यात भाग घेतला होता. आधी झालेल्या अनेक फेऱ्यांमध्ये बरेच वैविध्यपूर्ण विषय दिले गेले होते. अनेक महाविद्यालयीन मुलामुलींच्या कलकलाटाने सभागृहात चैतन्य पसरलंय. कोविड नंतर पहिल्यांदाच एकत्र येऊन असा कार्यक्रम होत असल्याने घरात राहून कंटाळलेली मुलं आपापलं मित्रमंडळ घेऊन हजर झाली आहेत. त्यात ह्या दोन्ही कॉलेजांमध्ये नेहेमी अतिशय चुरशीची स्पर्धा होते. त्यामुळे आज कोण जिंकणार ह्यावर पैज लावणंही चालू आहे!
स्टेजवर मधोमध ४ खुर्च्या ठेवल्या आहेत. समोर एक टेबल आणि दोन माईक, प्रत्येक टीमसाठी एक. दोन प्रतिस्पर्धी संघ, आणि प्रत्येकी दोन विद्यार्थी, असे चौघे बसले आहेत. स्टेजच्या डाव्या अंगाला तिरकं ठेवलेलं अजून एक टेबल आहे. त्यावर फुलांचा गुच्छ आणि त्याच्यामागे साहित्यिक जगातील दोन नामवंत जजेस – डॉ. गोखले आणि श्री. देशपांडे – आधीच विराजमान आहेत. टिळक महाविद्यालयाच्या टीमचे अजिता आणि अथर्व, आणि गांधी महाविद्यालयाच्या टीमचे विशाल आणि गौरी, तयारीत बसले आहेत.
वादविवाद सुरु करण्यासाठी घंटा वाजली.
डॉ. गोखले : चला सुरु करूया आता. प्रथम, तुम्हां चौघांचे अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! नियम तर तुम्हाला पाठच असतील एव्हाना 🙂 सर्वात महत्वाचं म्हणजे, एकमेकांना बोलायची संधी द्यायची, आणि वेळेत आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडायचं. प्रेक्षकांना शांतपणे ऐकण्याची नम्र विनंती आहे.
श्री. देशपांडे: आजचा आपला विषय आहे ‘साहित्योन्मेष – लेखन मुक्त असावं की त्याला विषयाची, वेळेची, स्पर्धेची बंधने असावी?’. ह्या स्पर्धेविषयी सर्व महाविद्यालये जाणतातच आणि ह्या स्टेजवरच्या विद्यार्थ्यां चाही त्यात वर्षभर सक्रिय सहभाग होता.प्रत्येक संघाने दिलेल्या वेळेत आपली वैयक्तिक मतं मांडायची आहेत. टिळक कॉलेजने आता सुरवात करावी आणि गांधी कॉलेजने त्यावर विवाद मांडावा.
अजिता: साहित्योन्मेष! हा शब्दच बरंच काही सांगून जातो. एखादी गोष्ट उघडणें, फुलणे, विकसणे म्हणजे उन्मेष. इथे तर खुद्द साहित्याचा अविष्कार व्हावा हे अभिप्रेत आहे. लिहिणाऱ्या प्रत्येकाने आपल्या परीने अनुभवण्यासाठी दिलेलं एक उत्तम व्यासपीठ! साहित्याचे विविध प्रकार, विविध अंग समजून घेण्याची सुवर्णसंधी! माझा स्वतःचा अनुभव अतिशय आनंद देणारा आणि समृद्ध करणारा आहे.
अथर्व: अजिताप्रमाणेच मलाही वाटतं. माझ्यातले अनेक सुप्त गुण साहित्योन्मेषने फुलवले. मलाही माहित नसलेल्या माझ्या मनाच्या खोल डोहात चिंब भिजवून आणले. कधी-कधी वेळेच्या बंधनामुळे जागरणे झाली खरी, पण त्याचा शेवट नेहेमी समाधानात होत असल्याने काही तक्रार नाही माझी 🙂
विशाल: वेळेचं बंधन! हेच न पटणारं आहे. साहित्य हे मुक्त असलं पाहिजे. अमुक तारखेपर्यंत द्या म्हंटलं की त्याला एक व्यावसायिक रूप येतं. आनंदासाठी केलेली गोष्ट का अशी बांधील असावी? लिखाण हे आपल्याला स्फ़ुरेल तेव्हा झालं तर त्याचं स्वरूपचं वेगळं असतं.
गौरी: पटतो मलादेखील विशालचा मुद्दा. किती जणांनी आयत्यावेळी पाठवली असेल त्यांची ई-मेल? जबरदस्तीने काहीतरी लिहून दिल्यावर ते चांगलं साहित्य होतं का?
अजिता: माझ्यासारख्या नवख्या लेखकांसाठी ‘वेळ’ एक बंधन नसून, लिहिण्यासाठी दिलेला ध्येयबिंदू होता. आपल्या रोजच्या व्यापातून, कामातून, गाठायचा एक टप्पा होता. आणि ‘चांगलं साहित्य‘ कुठलं हे व्यक्तिनिष्ठ नाही का? प्रत्येक विषयावर अनेक विचार असतात हे आता गेले बारा महिने आपण पाहिलेच ना?
अथर्व: आणि इतके वेगवेगळे विषयही दिले होते परीक्षकांनी प्रत्येक महिन्यात! भिन्न साहित्यप्रकार मांडायलाही भरपूर वाव दिला होता. विषय दिल्याने आपल्या सर्वांच्याच कल्पकतेला पंख मिळाले!
गौरी: विषय वेगवेगळे असले तरी शब्द मर्यादा घातली होती! त्याने पुन्हा बंधन नाही का येत? कुणी लेखकांना – पु.लं. ना, अत्र्यांना, मंगला गोडबोलेंना शब्द मर्यादा दिल्याचं ऐकलंय? उत्तम साहित्याचा उगम हा स्वतंत्र विचारात, बंधमुक्त वातावरणात होतो असं माझं ठाम मत आहे.
विशाल: आणि मनातून भरभरून जेव्हा विचार येत असतात तेव्हा त्याला ‘किती शब्द’ ह्याचं कुंपण घालणं योग्य आहे का? मला स्वतःला अनेकदा येथेच्छ लिहिता आलं नाही, विषय मनासारखा असूनही! पुन्हा हा प्रश्न रहातोच – विषय पूर्वनिर्धारित असायला हवे होते का?
अजिता: सर्वांना एकाच तराजूत मोजायचं असलं, तर मापदंड एकच असावा लागणार, नाही का? मला वाटतं, प्रभावी लेखनासाठी शब्द मर्यादा मदतच करते. त्यातून मराठीतून लेख लिहायचा म्हंटल्यावर आवर्जून अनेक मराठी शब्द जे मागे पडले होते ते पुढे येऊ लागले. मराठीत विचार सुरु झाला. तेवढंच नाही, तर आपलं मराठीचं शब्दभांडार वाढलं. नाहीतर हल्लीच्या संवादातून, दैनंदिन देवाण-घेवाणातून इंग्रजी शब्द सहज तोंडी येतात. माझ्या मते, हे खूप मोठं यश आहे ह्या उपक्रमाचं!
अथर्व: मला भिन्न साहित्य प्रकाराचा मुद्दा जरा खुलासा करून सांगावासा वाटतो. प्रत्येक महिन्याचा विषय दिल्यावर, त्यावर काय लिहावं हा विचार तर असायचाच, पण कसं मांडावं हे दुसरं आव्हान असायचं. ह्या निमित्ताने वेगवेगळ्या गद्य आणि पद्य पद्धती पाहिल्या गेल्या.
विशाल: ह्या बाबतीत आपल्याला मोकळीक होती हे मात्र मी मान्य करतो. पण ‘साहित्योन्मेष’ हे स्पर्धेच्या रूपात दिल्याने त्याचं मोल कमी झालं असं नाही का वाटत तुम्हाला? गौरी, तुलाही ह्या बाबतीत काही बोलायचं आहे म्हणाली होतीस नं?
गौरी: हो विशाल, मला अजिता-अथर्व ह्या टीमला प्रश्न विचारायचा आहे. समजा ही स्पर्धा नसती, केवळ नवीन-जुन्या लेखकांना प्रोत्साहन म्हणून सांगितलं असतं तर जास्त निखळ स्वरूप आलं नसतं का? चला, जरी विषय दिला, तरी ‘स्पर्धेने’ काय साधलं?
अथर्व: तुझा प्रश्न अगदी योग्य आहे, गौरी. पण कधी-कधी, सातत्याने एखादी गोष्ट करून घ्यायची असेल अनेकांकडून, तर बहुतेकांना काहीतरी प्रेरणा लागते. आणि नेहेमीच ती आंतरिक असेलच असं नाही.
अजिता: आणि मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या बहुतेक उपक्रमांना हे गरजेचे होते. स्पर्धा ही क्षमतेच्या कक्षा रुंदावायला मदत करते. त्यातून अधिक चांगलं लिहिण्याची ओढही लागू शकते काहींना. आत्ता आपण ज्या वाद-विवादात सहभाग घेतोय, तीही एक स्पर्धाच नाही का? आपल्या चर्चेतील खुसखुशीतपणा त्यानेच तर वाढतो आहे नं? 🙂
विशाल: मजा तर येते आहे, पण आता वेळ संपत आली आहे हे भान ठेवायला हवं. मला शेवटी एवढंच सांगायचं आहे की २५ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी ह्यात भाग घेतला, स्पर्धा ठेवलीच होती, तर मग दर तीन-चार महिन्यांनी लिखाण करणाऱ्यांना काही अभिप्राय, काही सुधारण्याच्या सूचना दिल्या असत्या तर त्यांचा लेखन अधिक उठावदार व्हायला नक्कीच मदत झाली असती.
अजिता: हे मात्र अगदी बरोबर आहे. ह्या पुढे जाऊन मी हे ही म्हणेन की जर ह्या वर्षभराच्या काळात एखादं शिबीर वा लेखन कार्यशाळा घेतली असती तर निश्चितच त्याचा सर्व लेखकांच्या ‘फुलण्याच्या‘ प्रक्रियेला अधिकच चालना मिळाली असती. ‘साहित्योन्मेष’ झाला हे मात्र निश्चित! 🙂
वाद-विवादाची वेळ संपली सुचवणारी घंटा झाली.
ही मनोरंजक चर्चा ऐकायला जमलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा पाऊस पाडला. मागे दोन्ही जजेस हलक्या आवाजात चर्चा करत होते. कुठलं महाविद्यालय जिंकणार हे ऐकायला सगळ्यांचे कान आतुर होते.
तेवढ्यात डॉ. गोखले आणि श्री देशपांडे उभे राहिले. हसून त्यांनी दोघांनी हॉलमध्ये जमलेल्यांना अभिवादन करून एका मोठ्या कार्डावर लिहिलेले नाव वर धरले. ‘विजेता संघ – टिळक महाविद्यालय‘!
सकारात्मक विचार आणि स्पष्ट मांडणी ह्यामुळे चार गुणांनी अजिता-अथर्व ची टीम जिंकली असल्याचं जाहीर केले. दोन्ही संघांना शाबासकी देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. शिट्या आणि टाळ्यांनी पुन्हा एकदा सभागृह दुमदुमलं!
